आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
एकेकाळी सिगारेटच्या पाकिटांवर ‘कॅन्सर’ग्रस्तांचे फोटो आणि चेतावणीचा संदेश लिहलेला नसायचा, १९८०च्या दशकात तर भारतातील एका सिगारेटच्या पाकिटावर चक्क हैद्राबादच्या चारमिनाराचा फोटो छापलेला असायचा, त्या सिगारेटच्या ब्रँडला देखील लोक चारमिनार म्हणून ओळखायचे. त्याकाळी भारतातील दर चार धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमधे एका व्यक्तीला या चारमिनार सिगारेटचे व्यसन असायचे.
१० नोव्हेंबर १९३० साली स्थापन करण्यात आलेल्या चारमिनार सिगारेटने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. व्हीएसटी इंडस्ट्रीज या निजाम पुरस्कृत कंपनीकडे या सिगारेटची मालकी होती, पुढे एका ब्रिटिश अमेरिकन कंपनीने चारमिनारचे ९५% समभाग विकत घेते, तिचे मालकी हक्क ताब्यात घेतले व मूळ मालकांच्या हातात फक्त ५% भागाची मालकी सुपूर्द केली.
१९७० साली भारत सरकारने फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन कायद्याअंतर्गत भारतातील कंपन्यांना त्यांच्यातील परदेशी समभाग ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले, मग मात्र या कंपनीचा ताबा पुन्हा भारतीयांकडे आला. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात चारमिनार सिगारेट जगभरात गाजली. दुसऱ्या महायु*द्धात सहभागी झालेल्या सैनिकांनी हैद्राबादेत तळ ठोकले होते, तिथे वास्तव्यास असताना त्यांना चारमिनार सिगारेटचे व्यसन लागले. पुढे या सैनिकांच्या माध्यमातून ही सिगारेट जगभरात पसरली.
भारतात तर पहिल्या दहा सिगारेट कंपन्यांमधे चारमिनारचा समावेश होऊ लागला. चारमिनारची घोडदौड ही अशीच सुरु होती, पण पुढे १९८९ नंतर त्यांच्या घोडदौडीला लगाम लागली, आर्थिक बाजू कमकुवत होत गेली आणि विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत ही कंपनी बाजारातून हद्दपार झाली होती.
चारमिनारच्या प्रसिद्धीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अनेक बाबी होत्या, त्यापैकीच एक होती, चारमिनारची वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात पद्धती. चारमिनारच्या सिगारेटची जाहिरात फार वेगळी आणि भावनिकदृष्ट्या बांधून ठेवणारी होती. या जाहिरातींमधे जॅकी श्रॉफ हा लोकांना “रिलॅक्स होऊन चारमिनार सिगारेट प्या” अशी साद घालताना दिसतो. तुमच्यासारख्या माणसाला समाधान फक्त चारमिनारच प्रदान करू शकते, अशा आशयाची दुसरी टॅगलाईन देखील चारमिनारच्या जाहिरातीत वापरली जायची.
७० च्या दशकात चारमिनारच्या जाहिरातीत एक मुलगा आपल्या मोटारसायकलवर एका मुलीला घेऊन जाताना दिसतो, बॅकग्राउंडला संदेश दिला जातो की ‘मला एक बाईक द्या, मला एका हायवे द्या, मला एक मुलगी द्या, आणि मला एका गरम तंबाखूचा स्वाद द्या!’
चारमिनारच्या जाहिरातीत करण्यात येणारा पौरुषत्वाचा गौरव व त्यातून दिला जाणारा ‘रिलॅक्स व्हा आणि चारमिनार घ्या’ हा संदेश यामागे पुरुषांना आकर्षित करण्याची भावना होती. ही सिगारेट प्या म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल, हे सांगताना चारमिनारच्या निर्मात्यांना भारतातील चिंताग्रस्त मध्यमवर्गीय माणसाला आपल्याकडे आकर्षित करायचे होते.
७० च्या दशकात जास्त लोक सिगारेट पित नव्हते कारण बहुतांश लोकांना सिगारेट परवडत नव्हती, यामुळेच त्यांनी या जाहिरात पद्धतीचा वापर करून पुरुषांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
एका चारमिनारच्या जाहिरातीत आपल्याला दोन लोक दिसतात जे एकमेकांशी चारमिनार सिगारेटच्या एका पॅकसाठी स्पर्धा करताना दिसतात. या दोघांच्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील चारमिनारने पुरुषांच्या पौरुषत्वाचे रूपक वापरून आपल्या उत्पादनाकडे लोकांना आकर्षित केल्याचे दिसून येते.
चारमिनार सिगारेट ही एक प्रकारे मलबारो या स्त्री-केंद्री ब्रँडच्या विरुद्ध बाजूचे प्रतिनिधित्व करायची आणि दोघांचे संभाव्य ग्राहक ही वेगवेगळे होते.
पुढे मार्लबोरोनेसुद्धा त्यांच्या स्त्री-केंद्री जाहिरातीतुन बाहेर पडत मार्लबोरो मॅनच्या पुरुषी जाहिराती करायला सुरु केलं.
पुरुषकेंद्री व पौरुष्यत्वाने भरलेल्या डिझाइन्स व्यतिरिक्त चारमिनारची अजून एक जमेची बाजू होती, ती म्हणजे चारमिनार या वास्तूचे केले जाणारे प्रदर्शन. चारमिनारप्रमाणे अनेक ब्रँडस ज्यांच्या उगम हा ब्रिटिश काळात झाला, त्यांचे नामकरण हे ऐतिहासिक वास्तूंच्या नावावरुन करण्यात आले होते, स्थानिक लोकांना या ब्रँडबद्दल आपलेपणा वाटावा या उद्देशाने हे नामकरण केले जायचे.
निजामी राजवटीचे प्रतीक असलेल्या चारमिनारने सुरुवातीच्या काळात निजाम संस्थानात आपल्या नावाच्या बळावर यश मिळवले. शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान हा देखील चारमिनारची सिगारेट प्यायचा, आपल्या संस्थानातील स्थानिक ब्रँडला लोकांनी पसंती द्यावी म्हणून तो खास भाजलेल्या तंबाखूची सिगारेट मागवून प्यायचा. एकीकडे मार्लबोरो सिगारेट ही गर्भश्रीमंत लोकांच्या आलिशान आयुष्याचे प्रतिनिधित्व करत होती तर चारमिनार हे मध्यमवर्गीय पुरुषांचे, जे स्वतःचा जगण्याच्या संघर्षाला कंटाळून थकून जात व एका निवांत क्षणाची प्रतीक्षा करत.
लोकांना रिलॅक्स होण्याचे कारण देऊन चारमिनारने मोठ्या प्रमाणावर लोकांना आपल्याकडे आकर्षित केले, आपल्या उत्कृष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे असंख्य ग्राहकांनी चारमिनारला पसंती देखील दिली होती. चारमिनारच्या पुरुषकेंद्री ब्रॅंडिंगची परिणामकारकता इतकी होती की लोक तिचे शेकडो धोके जरी त्यांच्यासमोर वाचले तरी सगळं काही झुगारून लावत त्या सिगारेटला ओढायचे.
चारमिनार जरी आज बाजारात नसली तरी त्यांच्या पुरुषकेंद्री ब्रॅंडिंग स्ट्रॅटेजीचा वापर आजही अनेक ब्रँड्स करतात. कोणी ‘बेस्ट द मॅन कॅन गेट’ म्हणतं तर कोणी ‘मेन विल बी मेन’ म्हणतं, पण अजूनही अनेकांना चारमिनारच्या ‘रिलॅक्स अँड हॅव्ह चारमिनार’ या टॅगलाईनची आठवण येतेच !
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










