आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गरज ही शोधाची जननी असते. पाण्यात पडलं की हातपाय हलवावेच लागतात असं म्हणतात. म्हणजेच आयुष्यात पुढे काहीतरी करण्यासाठी सगळे पर्याय बंद झाले की स्वत: काहीतरी करुन एखादा पर्याय आपण शोधतोच. हा नियम आयुष्यातील सगळ्याच गोष्टींना लागू होतो.
१९७५मध्ये तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली आणि भारतीय इतिहासात आणखी एका पर्वाची सुरुवात झाली. आणीबाणीच्या अगोदरचा भारत आणि नंतरचा भारत असे २ प्रकार भारताच्या आधुनिक इतिहासात निर्माण झाले. आणीबाणीनंतर देशातील सगळ्या परकिय कंपन्यांना परत जायला सांगण्यात आलं. इथेच भारतातील कंपन्यांना आपली प्रगती साधण्याची संधी मिळाली. यातलीच एक कंपनी म्हणजे प्युअर ड्रिंक्स ग्रुप.
आज आपण याच समूहाच्या प्रसिध्द कॅम्पा कोला नावाच्या शीतपेयाचा इतिहास जाणुन घेणार आहोत. कोका कोला या प्रसिध्द शीतपेयाची जागा घेण्यासाठी तयार करण्यात आलेले हे शीतपेय त्यावेळी खुप गाजले होते.
भारतातील युवक वर्गासाठी तयार केलेले हे पेय लगेच सगळ्यांच्या आवडीचे झाले. ७०च्या दशकाच्या मध्यात कोका कोला ही कंपनी भारतीय बाजारपेठेतुन बाहेर पडली तेव्हा बाजारात एक मोठी दरी निर्माण झाली. लोकांना कोका कोलाचा पर्याय हवा होता, तेव्हाच कॅम्पा कोलाची बाजारात उतरलं. लोकांनी देखील त्याला लगेच पसंती दर्शवली.
आकर्षक जाहिरात आणि “द ग्रेट इंडियन टेस्ट” या आपल्या पंचलाईननं भारतीय युवकांना या शीतपेयाकडे खेचून आणलं. अनेक तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला सलमान खान त्यावेळी या शीतपेयाच्या जाहिरातीमध्ये झळकला होता. तो त्यावेळी फक्त १६ वर्षांचा होता, त्या जाहीरातीत त्याच्याबरोबर आयेशा म्हणजेच टायगर श्रॉफच्या आईनं काम केलं होतं.
ही जाहिरात अंदमानमध्ये चित्रीत करण्यात आली होती. काही तरुण एका बेटावर मस्ती करत असताना चित्रीत केलेली ही जाहीरात त्यावेळी खुप प्रसिद्ध झाली. आयुष्याचा उत्सव साजरा करण्याचा संदेश या जाहीरातीतुन देण्यात आला होता.
प्युअर ड्रिंक्स समुह भारतातील भारतीय शीतपेय समुहातील सगळ्यात मोठं आणि महत्त्वपुर्ण नाव आहे. खरंतर याच समुहाने १९४९मध्ये कोका कोलाची उत्पादनं भारतात आणली होती. १९७०च्या मध्यापर्यंत कोका कोलाचं उत्पादन आणि विक्री करणारा हा एकमेव समुह भारतात होता.
नंतर याच शीतपेयाचं ऑरेंज आणि लेमन पेय बाजारात आणलं गेलं. यासाठी लहान मुलांचं चित्र दाखवणारी एक छापील जाहिरात बनवली गेली. “वी आर इन इट टूगेदर फॉर द फन ऑफ इट, फॉर द टेस्ट ऑफ इट” असं त्या जाहीरातीच्या खाली लिहिलं होतं. अजुन एका छापील जाहीरातीत “कॅम्पा के संग संग, लेते मजा हम” अशी पंचलाईन वापरण्यात आली.
कॅम्पा कोलाला सगळ्यात मोठं आव्हान होतं ते थम्स अप, ज्याची सुरुवात सुध्दा १९७७ मधेच झाली.
१९९१ला जागतिकीकरणामुळे झालेल्या आर्थिक बदलांच्या आधीच भारतात नवीन शीतपेयाच्या वर्चस्वयुध्दास सुरुवात झाली. पेप्सीने भारतीय बाजारात उडी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते. याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.
पेप्सीचा प्रवेश सोपा व्हावा म्हणुन राजीव गांधींनी खाद्यउद्योग सुरु केला. पेप्सीच्या केचअप आणि चिप्ससाठी शेतकरी बटाटे आणि टमाटे पाठवू शकतात असंसुध्दा सांगण्यात आले.
शेवटी पेप्सीनी पंजाब ऐग्रो समुहाबरोबर भागीदारी करुन आपलं शीतपेय लेहर पेप्सी या नावानी बाजारात आणलं. थम्स अपचे सहमालक, प्रकाश चौहान यांनी पेप्सी आणि कोका कोलाच्या भारतातील पुनर्प्रवेशास प्रखर विरोध केला. यासाठी केली गेलेली राजकीय कुटनीती आणि नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी वारंवार आरोप केले.
नंतर त्यांनीच थम्स अप कोका कोलाला विकली आणि थम्स अपची एक नवीन सुरुवात झाली.
या सगळ्या कोला युध्दात कॅम्पा कोला मात्र मागे पडले. अमेरिकन कंपन्यांनी उत्कृष्ट जाहिराती आणि ग्राहकांच्या मागणीचा चांगला आढावा घेऊन आपल्या उत्पादनात आवश्यक ते बदल घडवून आणले. कॅम्पा कोलाला मात्र हा बदल लवकर स्वीकारता आला नाही आणि म्हणुनच २००० साली त्यांचे बाटली उत्पादनाचे दिल्लीतील कारखाने बंद करण्यात आले.
आता कार्यरत नसले तरी भारतीय लोकांना स्वदेशी शीतपेय देण्याचे काम त्यावेळी कॅम्पा कोलाने केले. कोका कोलासारख्या मोठ्या आणि प्रसिध्द शीतपेयास टक्कर देणारे एकमेव भारतीय शीतपेय म्हणुन कॅम्पा कोला नेहमीच लोकांच्या लक्षात राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.