आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
झाडाचं प्रत्येक अवयव, प्रत्येक पान, मुळापासून ते फळापर्यंत सगळं काही उपयोगी असतं. पुराणात कल्पवृक्षाची संकल्पना आहे. आपण त्याच्याकडे जे मागतो ते तो आपल्याला देतो. या मागचा मतितार्थ हाच आहे की झाडाकडे काहीही मागितलं तरी तो आपल्याला देण्यास समर्थ आहे. झाडांकडे आपण अन्न मागितलं तर आपल्याला फळं मिळतील, आपण वस्त्र मागितले तर कापूस मिळेल, जर आपण खुर्च्या मागितल्या तर लाकूड देईन. पण जर खुर्च्याच मिळाल्या तर …?
आपण वेगळ्या वेगळ्या आकाराची झाडं बघितली असतील, पण खुर्ची किंवा इतर फर्निचरच्या आकाराची झाडं असतात असं आपल्याला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हा चमत्कार इंग्लंडमधील एका जोडप्याने करून दाखवला आहे.
त्यांनी झाडांना ‘फर्निचर’ च्या आकाराने वाढवून एक ‘फर्निचर गार्डन’ तयार केलं आहे. आदिमानव देखील अशाच प्रकारे झाडांचा वापर फर्निचर म्हणून करून घ्यायचे. ग्रीक, रोमन, चाइनिज, जपानी संस्कृतीत याचे उल्लेख आढळतात. गॉवीन आणि आलाईस मुन्रो असं या जोडप्याचं नाव. या कल्पनेचं मुळ गॉवीनच्या बालपणात आहे. जन्मतः त्यांच्या पाठीचा कणा वाकलेला होता. अनेक वर्ष पट्टा लावून तर होते. त्यांचे डॉक्टर्स, नर्सेस अत्यंत प्रेमळ व कायमच सहकार्य करणारे होते.
हळूहळू ते बरे झाले, त्यांच्या पाठीचा आकार लागला. याच दरम्यान त्यांच्या घरी असलेल्या ‘बोनसाय’ झाडाला खुर्चीचा आकार येऊ लागला काही दिवसांनी ती हुबेहूब खुर्ची दिसू लागली.
त्यांच्या मनात विचार आला की माणसाच्या शरीराला योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलं तर आकार बदलू शकतो तर झाडांच्या बाबतीतसुद्धा असं का होऊ नये? असा विचार करून साली त्यांनी हा प्रयोग करायला सुरुवातीला केली. इंग्लंडमधील पीक शहराच्या छोट्याश्या जागेवर झाडांना खुर्च्यांचा आकार देण्यास सुरुवात केली. २०१२ साली त्यांचा विवाह अलाईसशी झाला. लग्नाच्या एका वर्षानंतर ‘फुल्ल ग्रोन’ कंपनीची सुरुवात केली आणि पूर्णवेळ या संकल्पनेवर काम करायचं ठरवले.
सुरुवातीला भरपूर त्रास झाला. त्यांचा पहिला प्रयोग नैसर्गिक आपत्तीमुळे, तर कधी प्राण्यांमुळे बिघडला. यासाठी ते दोघे काही खास शास्त्र आणि विज्ञान शिकत व नवनवीन प्रयोग करत होते.
त्यांच्या असं लक्षात आलं, की झाडांची वाढ खुंटवून किंवा तोडून हे शक्य नाही, तर वाढत्या झाडांना व्यवस्थित आकार देऊन हे करता येईल.
या खुर्च्या बनवणे काही वर्षा दोन वर्षाचं काम नाही. एका खुर्चीला बनायला सहा ते नऊ वर्षं लागतात आणि आणखी एक वर्ष ती खुर्ची वाळायला द्यावे लागतात. अर्थातच या मागचा खर्च नक्कीच कमी नाही. त्यामुळे यांची किंमतही साजेशी आहे. खुर्च्यांची किंमत १०,००० पाउंड आहे. लॅम्प्सची किंमत ९००-२३०० पाउंडपर्यंत जाते तर टेबल २५००-१२५०० पाउंड आहे .
सध्या जोडप्याकडे डेर्बिशायर येथे गार्डन आहे, जिथे अशी झाडे वाढवली जातात. २५० खुर्च्या, १०० लॅम्प्स आणि ५० टेबल्स अशा संख्येत त्यांच्या गार्डनमधे फर्निचर आहे.
याचसोबत आपल्या घरासाठी ते डाइनींग टेबल तयार करत आहेत, पण तो बनायला त्यांना जवळपास दहा वर्ष वाट बघावी लागणार आहे!! पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने त्यांना एक मोठं शेत किंवा जागा हवी आहे, जिथे ते प्रयोग करून आणखी विविध प्रकारचे फर्निचर तयार करु शकतील. या नावीन्यपूर्ण संकल्पनेबद्दल त्यांना लोकांपर्यंत पोहचवून प्रसार करायचा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









