आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जॉन एफ़ केनेडी एकदा म्हणाले होते की, ”आपल्याला जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर शस्त्रास्त्रांनी सज्ज असण्याशिवाय पर्याय नाही”. हा विरोधाभास असला तरिही कटू वास्तव आहे. आजच्या घडीला जो देश अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे तो सर्वात जास्त युध्दापासून सुरक्षित आणि इतर देशांशी शांततापूर्ण संबंध असणारा आहे.
सध्या जगभरात महामारीशी झुंज चालू असतानाच सर्वच देश आपापल्या सुरक्षा प्रबंधांकडेही लक्ष देत आहे, या पार्श्वभूमीवर आज जगभरातल्या माध्यमांनी दखल घ्यावी अशी घटना भारत आणि फिलिपिन्स या दोन देशांदरम्यान घडली. आजवर शस्त्रास्त्रं खरेदी करणारा, आयात करणारा भारत आता शस्त्रास्त्रांचा मोठा निर्यातदार बनू पहात आहे. याच दिशेनं फ़िलिपिन्सशी झालेल्या कराराकडे बघता येईल.
फ़िलिपिन्सच्या नौसेनेला भारतानं ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईल विकण्याच्या करारावर सह्या झाल्या आहेत. फ़िलिपिन्सनं भारताशी याबाबत ३७.५० कोटी डॉलर्सचा (२ हजार ८१२ कोटी रूपये) व्यवहार केला आहे. हा व्यवहार भारतासाठी आणि जगाच्या नकाशावर दोन कारणांसाठी महत्वाचा आहे कारण, भारत पहिल्यांदाच शस्त्रांस्त्रांचा खरेदीदार म्हणून नव्हे तर विक्रेता म्हणून समोर येत आहे.
ब्रह्मोस मिसाईल निर्यातीमधली ही पहिली परदेशी मागणी आहे. दुसरं कारण हे आहे की फ़िलिपिन्सकडे चीनचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जातं. तसेच फ़िलिपिन्ससह ४२ देश भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदी करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यात बहुतेक देश चीनच्या कारवायांनी त्रस्त असणारे आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या व्यवहाराकडे जगभरातील सुरक्षायंत्रणा एक अत्यंत महत्वपूर्ण घटना म्हणून बघत असल्यास नवल नाही.
ब्रह्मोस हे मिडियम रेंज सुइपरसोनिक क्रुझ मिसाईल भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानं बनलेलं शस्त्र आहे. जमिन, जहाजं, पाणबुडी तसेच हवेतूनही याचा मारा करता येतो. तज्ज्ञांच्या मते हे एक प्राणघातक शस्त्र आहे. जगभारातली शस्त्रास्त्रांची बाजारपेठ ही एक गुंतागुंतीची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत अमेरिका, रशिया आणि फ़्रान्स हे तीन मोठे खेळाडू आहेत. या तीनही देशांना कोणाकडून शस्त्रास्त्रं विकत घेण्याची गरज नाही कारण हे देश स्वत: शस्त्रास्त्रं निर्मितीमधे आहेत. यांच्याकडून शस्त्रास्त्रं खरेदी करणार्यांत सौदी अरेबिया सारखे देश आहेत.
भारतानं या बाजारपेठेत प्रवेश करताना आपल्या शेजारी देशांपासून सुरवात केलेली आहे. मालदिव्ज, सेशेल्स, इंडिनेशिया, फ़िलिपिन्स, व्हिएतनाम यासारख्या देशात भारतीय शस्त्रास्त्रं पुरवठ्यासंबंधी सातत्यानं चर्चा होत आहेत.
ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईलचा वेग ध्वनीच्या वेगाच्याही तिनपट जास्त आहे. ४३२१ किलोमिटर प्रतितास या वेगानं मारा करण्यास हे मिसाईल सक्षम आहे. या बातमीनं सर्वात मोठा झटका चीनला बसला आहे. चीनच्या आक्रमक वर्तवणूकीचा फ़टका फ़िलिपिन्स वर्षानुवर्ष सहन करत आहे. फ़िलिपिन्सनं जगातील सर्वात वेगवान भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस सुपरसोनिकची खरेदी करून चीनला झटका दिला आहे.
चीनचे माजी सैन्य रणनीतीकार सुन त्सू यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी एक पुस्तिका लिहिली होती, द आर्ट ऑफ़ वॉर. या पुस्तकात सैन्य रणनीती आणि युध्द लढण्याच्या सिध्दांताबाबत विवेचन केलेले आहे. यात एका प्रकरणात नमूद केलेले आहे की, शत्रूच्या कमकूवत बाजूवर सतत हल्ला करत राहिलं पाहिजे आणि संधी मिळताच अशी चाल केली पाहिजे की शत्रू हैराण झाला पाहिजे. आज भारताची एकूण हालचाल याच युध्द सिध्दांताला धरून चाललेली दिसत आहे.
गत दोन दशकांत चीननं बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान अशा देशांसोबत अनेक सुरक्षा करार केले असून या देशांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रं मोठ्या प्रमाणात पुरविली आहेत. चीनचा उद्देश लख्ख आहे, भारताशी सीमा लगटून असणार्या देशांना शस्त्रास्त्रांनी सज्ज करुन भारतावर दबाव ठेवणं. आता भारतानं चीनला त्याला समजणार्या भाषेत उत्तर देण्यास सुरवात केली आहे.
याशिवाय भारतानं व्हिएतनामसोबतही ७५० कोटी रुपयांचा सुरक्षा करार केलेला आहे. व्हिएतनामला भारतीय बनावटीची १२ हाय स्पिड गार्ड बोट देण्यात आली आहे. योगायोगाची गोष्ट अशी की व्हिएतनाम ‘साऊथ चायना सी’मधला देश आहे आणि फ़िलिपिन्सची चीनची सीमाही हीच आहे. या सीमेवर चीन-फ़िलिपिन्स सैन्याच्या सततच्या चकमकी अस्थिरता आणि युध्दजन्य परिस्थिती असते.
साऊथ इस्ट एशिया हा भारतीय शस्त्रांसाठीची नवी बाजारपेठ बनू पहात आहे. २०१६ -१७ या वर्षात १५२१ कोटींची शस्त्रास्त्रं निर्यात करण्यात आली होती तो आकडा २०२०-२१ या वर्षात ८४३४ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. हे आकडे भारताचे पसरले जाणारे हातपाय स्पष्ट करणारे आहेत. २०२५ सालापर्यंत हा आकडा ३५ हजार कोटींपर्यंत नेण्याचा मानस भारतानं बोलून दाखविला आहे आणि हा पुरेसा स्पष्ट संकेत आहे.
आजच्या घडीला ही बाजारपेठ ५०० बिलियन डॉलर्सची आहे आणि यात शस्त्रास्त्रं निर्माता म्हणून भारतानं स्थान बनविणं याला महत्त्व आहे. या बाजारपेठेचा एक नियम आहे, तुम्ही एक चॅम्पियन उत्पादन बनवा आणि त्याच्या जोरावर इतर उत्पादनांसाठी जागा निर्माण करा. ब्रह्मोस हे भारताचं चॅम्पियन उत्पादन आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.