आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी द*हश*तवाद्यांनी मुंबईवर ह*ल्ला केला होता व या ह*ल्ल्यात अनेक निष्पाप लोकं मारली गेली होती. या ह*ल्ल्याच्या अनुषंगाने BCCIने पाकिस्तानी खेळाडूंना IPL स्पर्धेत भाग घेता येणार नाही असे जाहीर केले होते. आता ही काही पहिली अशी घटना नाही की ज्याच्यामुळे एका खेळावर परिणाम झाला आहे. अशीच एक घटना नॉर्दन आयर्लंडमध्ये घडली होती व त्याचे पडसाद हे फाईव्ह-नेशन चॅम्पियनशिपवर उमटले होते. तर ती घटना काय आहे ते पाहूयात. सो लेट्स गेट स्टारटेड..
सर्व प्रथम आयर्लंडचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊयात.
युनायटेड किंगडमच्या वायव्य दिशेला आयर्लंड हे बेट आहे. सुरुवातीपासून हे बेट स्वतंत्र होतं पण १७९८ साली आयर्लंडने ब्रिटिश सरकार विरोधात उठाव केला या घटनेला १७९८ चा आयरिश उठाव असे म्हणतात. हा १७९८ चा आयरिश उठाव ब्रिटिश सरकारने मोडून काढला आणि १८०० साली “Acts of Union of 1800” या कायद्याअंतर्गत आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा अविभाज्य भाग आहे असं ब्रिटिश संसदेने जाहीर केलं.
नंतर एकोणिसाव्या शतकात आयर्लंडमध्ये तेथील मूळ रहिवाशांचं राज्य प्रस्थापित व्हावं म्हणून “होम रुल चळवळ” चालू होती. या चळवळीचा उद्देश आयर्लंडमध्ये स्वराज्य स्थापन व्हावं हा होता. अखेर ११ एप्रिल १९१२ साली तिसऱ्या होम रुल कायद्यामुळे आयर्लंडला त्यांचं स्वतःचं राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. पण आयर्लंडमध्ये असाही एक गट होता जो युनायटेड किंगडमला पाठिंबा देत होता. या गटाला “युनियनिस्ट” असं म्हणतात. या युनियनिस्ट लोकांनी तिसऱ्या होम रुल कायद्याचा विरोध केला आणि असं जाहीर केले की डबलीन येथील आयर्लंडच्या संसद जे कुठले कायदे करेल त्याचा आम्ही (म्हणजेच युनियनिस्ट) विरोध करू व संसदेने आयरिश जनतेवर लावलेले कोणते ही कर आम्ही भरणार नाही.
तिसऱ्या होम रुल कायद्याचा विरोध करण्यासाठी युनियनिस्ट गटाने “उलस्टर व्हॉलंटियर फोर्स” (UVF) ही आघाडी तयार करून हिंसक पावलं उचलली. UVFला प्रत्युत्तर देण्यासाठी आयरिश व्हॉलंटियर्स (IV) ही आघाडी तयार करण्यात आली. त्याच दरम्यान पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि फायदा घेऊन “ईस्टर रायसिंग” नावाचा अजून एक सशस्त्र उठाव ब्रिटिश सरकार विरोधात आयर्लंडमध्ये झाला. अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी IV आणि UVF च्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करायचे ठरवले पण ती चर्चा फोल गेली.
डिसेंबर 1918 मध्ये आयर्लंडमध्ये निवडणूका घेण्यात आल्या. ज्यामध्ये IVचे नेते सिन फाईन (Sinn Fein) यांना बहुमत मिळालं. एवढं होऊन ही IV आणि UVF मध्ये सशस्त्र संघर्ष चालू होता. अखेर गव्हर्मेंट ऑफ आयर्लंड ॲक्ट १९२० नुसार आयर्लंड बेटाचं उत्तर आयर्लंड व दक्षिण आयर्लंड असं विभाजन झालं. आणि ६ डिसेंबर १९२१ रोजी आंग्ल-आयरिश तहाप्रमाणे उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडममध्ये सामील झालं व दक्षिण आयर्लंड हे आजचं आयर्लंड म्हणून ओळखले जाते. जरी आयर्लंडचं विभाजन झालं असलं तरीही दोन्ही भागातील लोकं एकमेकांशी भावनीकदृष्ट्या जोडले गेले आहेत.
आता ही फाईव्ह नेशन चॅम्पियनशीप नक्की काय आहे ते जाणून घेऊ.
पाश्चात्य देशांत फुटबॉल प्रमाणेच रग्बी हा खेळ ही खूप लोकप्रिय आहे. या रग्बीची सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणजे “फाईव्ह नेशन चॅम्पियनशीप”. ही स्पर्धा आधी १८८३ ते १९१० च्या दरम्यान “होम नेशन चॅम्पियनशीप” या नावाने ओळखली जायची कारण या स्पर्धेत इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, आणि आयर्लंड हे देश सहभागी व्हायचे.
१९१० पासून या स्पर्धेत फ्रान्सने ही सहभाग घ्यायला सुरुवात केली म्हणून आता या स्पर्धेला फाईव्ह नेशन चॅम्पियनशीप असं म्हणतात. ही स्पर्धा वर्षातून एकदाच होते. या स्पर्धेची सुरुवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होते तर स्पर्धेची सांगता ही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात होते. या स्पर्धेत एकूण १६ सामने खेळले जातात. या स्पर्धेत जो संघ सर्व सामने हरतो त्यांना “वूडन स्पून” या विशेषणाने संबोधलं जातं. जो संघ या स्पर्धेत सर्वच्या सर्व सामने जिंकतो त्याला “ग्रँड स्लॅम” असं म्हटलं जातं. जेव्हा इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, आणि वेल्स हे एकमेकांविरुद्ध तिन्ही सामने जिंकतात त्यावेळी विजेत्याला “ट्रिपल क्राउन” असं म्हंटलं जातं.
वरील परिच्छेदात आपण फाईव्ह नेशन चॅम्पियनशीप या स्पर्धेबद्दल जाणून घेतलं. आता “ब्लडी संडे” हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणाचे परिणाम काय झाले हे आता जाणून घेऊ. नॉर्दन आयर्लंड हा युनायटेड किंगडमचा भाग आहे हे तर आपल्याला कळलंच. ऑगस्ट १९७१ रोजी नॉर्दन आयर्लंडमधील वाढता हिं*साचार कमी करण्यासाठी तिथे एक नवीन कायदा अमलात आणला गेला, ज्याअंतर्गत ज्या व्यक्तीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका आहे अशा व्यक्तींना त्यांच्यावर कोणताही खटला न चालवता त्यांना तुरुंगात कैद करण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला दिले गेले आहेत.
या कायद्याचा विरोध करण्यासाठी नॉर्दन आयर्लंडमधील डेरी या शहरात आंदोलन सुरू झाले. कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला सरकारने परवानगी दिली नव्हती तरी ही आंदोलने सुरू होती. ३० जानेवारी १९७२ रोजी आंदोलन चालू होते व ब्रिटिश आर्मीने बॅरीकेडिंग केलं होतं. आंदोलकांना पोलिसांनी डेरी कॉर्नर येथे जाऊन आंदोलन करण्याची विनंती केली. काही आंदोलकांना तिथे जायचं नव्हतं व त्यावरून पोलीस, ब्रिटिश आर्मी, आणि आंदोलक यांच्यात झटापट सुरू झाली. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिटिश आर्मीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये १३ आंदोलक मारले गेले. या घटनेला “ब्लडी संडे” असं म्हणतात.
आता नॉर्दन आयर्लंड आणि आयर्लंड यांचं विभाजन जरी झालं असलं तरीही आयरिश लोकं ही भावनिकदृष्टया एकमेकांशी जोडले गेलेत. या घटनेला प्रत्युत्तर म्हणून २ फेब्रुवारी १९७२ रोजी डबलिन येथील ब्रिटिश दूतावासावर ह*ल्ला केला गेला. ब्लडी संडेच्या घटनेची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने वीजरी आयोगाची स्थापना केली. या आयोगाने ब्लडी संडे घटनेची चौकशी करून सर्व आरोपी ब्रिटिश सैनिकांची निर्दोष मुक्तता केली. पण त्या १३ मयत लोकांच्या परिवाराने या घटनेची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली.
ब्लडी संडेच्या घटनेमुळे अगोदरच आयर्लंड आणि ब्रिटनमधील वातावरण पेटून उठलं होतं. याच दरम्यान फाइव्ह नेशन चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होती. तेवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच आयर्लंडची टीम अंतिम फेरीत पोहोचली होती. पण ब्लडी संडेमुळे तापलेल्या वातावरणामुळे आयर्लंडमध्ये आयोजित केलेल्या सामन्यात सुरक्षेच्या कारणामुळे कोणताही संघ खेळायला तयार नव्हता.
सुरक्षेचं कारण लक्षात घेऊन २६ फेब्रुवारी १९७२ चा आयर्लंड विरुद्ध स्कॉटलंड आणि आयर्लंड विरुद्ध वेल्स असे दोन्ही सामने रद्द करण्यात आले. यामुळे वेल्स संघाचं सलग दुसऱ्यांदा ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. हे दोन महत्त्वाचे सामने रद्द झाल्यामुळे १९७२ ची फाइव्ह नेशन चॅम्पियनशिप ही स्पर्धा रद्द करण्यात आली.
१९९७ साली टोनी ब्लेअर ब्रिटनचे पंतप्रधान झाले. १९९८ साली टोनी ब्लेअर यांनी सॅव्हील आयोग स्थापन करून ब्लडी संडे या घटनेची नव्याने चौकशी सुरू केली. १९९८ पासून ते २०१० पर्यंत अशी तब्बल १२ वर्षे सॅव्हील आयोगामार्फत ब्लडी संडेची चौकशी सुरु होती. अखेर २०१० साली सॅव्हील आयोगाने त्यावेळी पंतप्रधान असलेल्या डेव्हिड कॅमेरून यांना त्यांचा अहवाल सोपवला. या अहवालात सॅव्हील आयोगाने ते १३ नागरिक निर्दोष होते व त्यावेळी त्यांच्या पासून कायदा व सुव्यवस्थेला काही धोका नव्हता असा निष्कर्ष मांडला आहे.
गोळ्या झाडण्यापूर्वी आंदोलकांना कोणतीही ताकीद दिली गेली नव्हती हे या अहवालात नमूद केलेलं आहे. डेव्हिड कॅमेरून यांनी या घटनेची निंदा केली आहे व ब्रिटनकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










