आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लहान मुलांचे भावविश्व अनोखे खरेच. गोष्टी, गाणी, खास मुलांसाठीचे साहित्य, कार्टून फिल्म्स या सगळ्या गोष्टी मुलांच्या दुनियेत खास जागा मिळवून असतात. या गोष्टींचे नायक तर त्यांचे खास जिगरी दोस्त असतात. दुष्टांशी लढणारे, अन्याया विरुद्ध दोन हात करणारे हे नायक मुलांमध्येच नाही तर मोठ्या माणसांमध्येही भरपूर लोकप्रिय होतात. बॅटमॅन हे असेच एक पात्र.
परंतु बॅटमॅनचा निर्माता म्हणून ज्याने जगभर कौतुक करून घेतले तो स्वतः त्याचा खरा निर्माता नव्हता. त्याचे नाव बॉब केन. केन हा बॅटमॅनचा निर्माणकर्ता नव्हता हे बॅटमॅन अँड बिल नावाच्या एका डॉक्युमेंटरीने उघड केले. बॅटमॅनच्या गोष्टीत असलेल्या गॉथम सिटी या शहरातील खलनायक जोकर, पेंग्विन, किंवा रीडलर यांच्यापेक्षाही बॉब केन याचे पाप मोठे असल्याचे धक्कादायक सत्य या डॉक्युमेंटरीने उघड केले.
बॅटमॅन वाचकांच्या भेटीला आला तो मे 1939 मध्ये. डिटेक्टिव्ह कॉमिक्स #27 मध्ये बॅटमॅन सर्वप्रथम दिसला. त्यानंतर त्याचा निर्माता म्हणून मिरवणारा केन स्वतः या पात्राइतकाच प्रसिद्ध झाला.
परंतु बॅटमॅनला त्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व लाभले ते दुसऱ्याच एका माणसामुळे. मुळात बॅटमॅनची संकल्पना केन याची असली तरी बॅटमॅन इतका प्रसिद्ध झाला ते त्याच्या खास स्वरूपामुळे, आणि हे स्वरूप त्याला देण्यात केनचा स्वतःचा काहीच वाटा नव्हता. त्याची एकंदरीत वेशभूषा, भारी भारी गॅजेट्सचे त्याचे शस्त्रागार, त्याची गुप्त ओळख तसेच गॉथम सिटी या गोष्टी प्रत्यक्षात साकारल्या त्या दुसऱ्याच माणसाने. त्याचे नाव होते बिल फिंगर.
हा बिल फिंगर बॅटमॅनची गुप्त ओळख असलेल्या ब्रूस वेन याच्यासारखाच पडद्याआड राहिला. वास्तविक बॅटमॅनला त्याचे स्वरूप देण्यात फिंगरचाच हात होता. एवढेच नाही तर रॉबिन, तसेच जोकर, पेंग्विन यासारख्या खलनायकांच्या निर्मितीमध्येही फिंगरचा वाटा होता. परंतु सर्व श्रेय केनला मिळाले. त्यानेही ते लाटले.
फिंगर जिवंत असेपर्यंत आणि तो गेल्यानंतरही पंधरा वर्षांपर्यंत केनने फिंगरला प्रसिद्धी मिळू नये याच्यासाठी जे जे करता आले ते ते केले. तो स्वतः मात्र चैनीचे, मानसन्मानाचे आयुष्य जगत होता. बॅटमॅनचा एकमेव निर्माता म्हणून जगभर मिरवत होता आणि त्याचवेळी त्याचा खरा निर्माता असलेला फिंगर कुठल्याशा कोपऱ्यात जाऊन पडला होता.
तशी बॅटमॅनची मूळ संकल्पना केनचीच होती. पण त्याची स्वतःची क्षमता मर्यादित होती. मनातून त्याला ते ठाऊकही होते. 1939 मध्ये सुपरमॅनच्या लोकप्रियतेने प्रेरित होऊन केनला याच यशाची पुनरावृत्ती करण्याची संधी गवसली होती.
झोरो, लिओनार्दो द विंची यांची रेखाचित्रे आणि 1937 च्या द बॅट व्हिस्पर्स या चित्रपटापासून प्रेरणा घेत केनच्या मनात ‘द बॅटमॅन’ची संकल्पना साकारली होती. पण आपण बघतो तो बॅटमॅन या बॅटमॅनसारखा मुळीच दिसत नव्हता. त्याच्या सुरुवातीच्या आवृत्तीमध्ये बॅटमॅनने लाल रंगाचा जम्पसूट घातलेला होता, डॉमिनो मास्क परिधान केला होता, आणि त्याच्या पाठीला वटवाघळासारखे दोन पंख जोडलेले होते.
हा लाल जम्पसूट घातलेला मनुष्य प्रत्यक्षातल्या वटवाघळाच्या कुठेही जवळपास नव्हता. हे केनलाही समजले होते. आपण चितारलेल्या बॅटमॅनच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करणे आवश्यक आहे याची त्याला कल्पना होती. मग त्याने फिंगरला बरोबर घ्यायचे ठरवले. स्वतः फिंगर एक घोस्ट रायटर होता. तो त्याला एका वर्षापूर्वी एका पार्टीत भेटला होता. त्यावेळी आपले एकंदर व्यक्तिमत्व, शब्दांवरचे प्रभुत्व, आणि कल्पनाशक्ती यांनी त्याने केनला चांगलेच प्रभावित केले होते.
केनने लगेचच फिंगरबरोबर जोडी जमवली. रस्त्या अँड पल्स नावाच्या कॉमिक स्ट्रिपसाठी त्याने फिंगरला सल्लागार म्हणून नेमले. या नातेसंबंधांचे जास्त फायदे केनलाच होऊ लागले. फिंगरच्या सल्ल्यानेच त्याचा बॅटमॅन त्याला मनासारखा साकारता आला, हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा.
सुरुवातीला फिंगरने केनने तयार केलेला बॅटमॅन बघितला तेव्हा त्यात त्याने बरेच बदल सुचवले. सर्वप्रथम त्याने त्याचा पोशाख बदलायला लावला. मूळ कॅरेक्टरला त्याने डोक्यावर टोपी घालायला लावली, हातमोजे दिले आणि त्याच्या सूटचा रंग जास्त गडद करण्याचा सल्ला दिला. याशिवाय फिंगरमुळेच बॅटमॅनला एक गुप्त ओळख मिळाली. ती म्हणजे ब्रूस वेन.
बदलेल्या बॅटमॅनमध्ये काही खास गुणधर्म होते आणि त्यामुळे तो सुपरमॅनपेक्षा वेगळा ठरत होता. याचा केनवर खूप प्रभाव पडला. बॅटमॅन हे पात्र गुप्तहेर म्हणून साकारले गेले. फिंगरने बॅटमॅनचे मूळ गाव गॉथम सिटी हेदेखील तयार केले. या सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा भविष्यात बराच फायदा झाला. बॅटमॅनला एक स्वतंत्र ओळख मिळाली.
एवढे सगळे करूनही बॉब केन यानेच संपूर्ण श्रेय आणि पैसा मिळवला. हे होऊ शकले कारण मुळात फिंगर व्यवहारी मनुष्य नव्हता. पुस्तकी किडा होता तो. आपल्या डोक्यात असलेल्या चित्रविचित्र संकल्पना मांडण्यासाठी तो बरोबर एक छोटीशी वही घेऊन फिरत असे, कामावर त्याचे मनापासून प्रेम होते.
पण प्रत्यक्षात केलेल्या कामाचे वाजवून पैसे घेणे किंवा किमान केलेल्या कामावर आपला हक्क दाखवणे या गोष्टी त्याला फारशा जमल्या नाहीत आणि इथेच बॉब केन त्याच्यापेक्षा सरस ठरला. त्याला प्रसिद्धी आवडत असे. आपल्या चाहत्यांना तो महागडे सूट घालून भेटे किंवा बॅटमॅनसारखा पोशाख करून अभिवादन करत असे. जणू बॅटमॅन म्हणजे तो आणि तो म्हणजेच बॅटमॅन असे समीकरणच बनले होते.
बॉब केनला बॅटमॅनमुळे जी प्रसिद्धी मिळाली त्यातून डीसी कॉमिक्स नावाच्या पब्लिशिंग कंपनीने बॅटमॅनची कॉमिक्स पब्लिश करण्याची त्याला ऑफर दिली. त्यातही केनने फक्त स्वतःचेच नाव पुढे केले. शिवाय त्यातून मिळणारी घसघशीत रॉयल्टीची रक्कम स्वतःच्या खिशात घातली. जोडीला त्याने लेखक म्हणूनही स्वतःच श्रेय घेतले. फिंगरची किंमत आता एका घोस्ट रायटर एवढीच उरली होती.
केनला प्रचंड यश मिळाले तरी फिंगर मात्र कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. नाही म्हणायला एखाददोन टीव्ही प्रोग्रॅम साठी त्याने सहलेखक म्हणून काम केले, पण तितकेच. प्रत्यक्षात बॅटमॅनच्या अतिप्रचंड यशाचा तितकाच प्रचंड फायदा केन यालाच झाला.
त्यात अर्थातच वकील असलेल्या त्याच्या वडिलांच्या सल्ल्याचाही मोठा वाटा होता. केनमुळे बॅटमॅन हा एक बिझनेस बनला. त्याने पुढे अनेक लेखकांना आणि कलाकारांना आपल्या पदरी नोकरीला ठेवले. परंतु त्यांनाही आपल्या कामाचे श्रेय मिळाले नाही. सर्वकाही बॉब केन याच्या खाती जमा झाले.
त्यातच केन याने एक अनपेक्षित गोष्ट केली. त्याने आपल्या चुकीची कबुली दिली. बॅटमॅनच्या निर्मितीमध्ये फिंगर याचा लक्षणीय सहभाग होता असे त्याने मान्य केले. शिवाय गॉथम सिटी हीदेखील फिंगरच्या संकल्पनेतून साकारल्याचेही त्याने कबूल केले.
एवढे होऊनदेखील डीसी कंपनी बिल फिंगर याला बॅटमॅन कॉमिक्सचा सहनिर्माता म्हणून श्रेय द्यायला तयार नव्हती. या प्रकाशनाने त्याचे प्रसंगाप्रसंगांनी कौतुक केले, परंतु त्यांच्या कॉमिक बुक चित्रपट किंवा टीव्ही शो अशा कुठेही बिल फिंगरचे नाव लावायला त्यांनी नकार दिला. जिवंतपणी फिंगर स्वतः केलेल्या कामाचे साधे कौतुकही अनुभवू शकला नाही.
असे असले तरी केनचे योगदानदेखील नाकारता येत नाही. कल्पनाशक्तीमध्ये तो कमी पडत असला, तरीही मार्केटिंग ही त्याची ताकद होती. त्यानेच बॅटमॅन या कॅरेक्टरचा एक संपूर्ण बिझनेस बनवला. कदाचित केन नसता तर बॅटमॅन या कॅरेक्टरला आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी ओळखही मिळाली नसती! फक्त मिळालेल्या यशाचा थोडा वाटा त्याने बिल फिंगर याला द्यायला हवा होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.