आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अमेरिका आज जागतिक महासत्ता म्हणून ओळखत असले तरी हा महान देश देखील गृहयुद्धाच्या महाविनाशकारी पर्वातून गेलेला आहे. १७७५-१७८३ च्या अमेरिकन राज्यक्रांतीनंतर ज्यावेळी हा देश अस्तित्वात आला त्यावेळी हा पुढे कसे जाणार हा प्रश्न सर्वांच्या समोर होता. या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता १८६१चे साल उजाडले आणि अमेरिकेत गृहयुद्धाला तोंड फुटले. या गृहयुद्धामुळे असंख्य लोक बेघर झाले होते. पण यानंतर अमेरिकेची एका वेगळ्या वाटेवर वाटचाल सुरु झाली होती.
अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या पर्वावर एक दृष्टिक्षेप टाकूया..
अमेरिकन राज्यक्रांतीनंतर अमेरिका विकासाच्या वाटेवर वेगाने निघाला होता. पण उत्तर व दक्षिण अमेरिकन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता होती. जिथे उत्तरेकडे औद्योगिकरण वेगाने चालू होते तिथेच दक्षिणेकडे याउलट परिस्थिती होती. दक्षिणेकडील लोक शेतीकरून पोट भरत होते.
शेतीसाठी हे लोक कृष्णवर्णीय मजुरांवर अवलंबून होते. त्यांना गुलाम म्हणून वागवले जात होते. त्यावेळी या कृष्णवर्णीय गुलामांच्या मुक्ततेसाठी अमेरिकेत एक मोहीम छेडण्यात आली होती.
एकीकडे उत्तरेकडील राज्ये व्यापारी नीतीचा फायदा उचलत असताना दक्षिणेकडे मात्र दुष्काळ होता. या विषमतेमुळे अमेरिका महाशक्ती बनू शकत नव्हता. परंतु याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. दक्षिणेकडे लोक कृष्णवर्णीय गुलामांच्या वेठबिगारीतून मुक्ततेचा संपूर्ण विरोधात होते. त्यांना नवीन व्यापारी नीतीवर देखील आक्षेप होता. ते लोक म्हणू लागले की कुठल्या नीतीचा स्वीकार करायचा आणि कुठल्या नीतीचा नाही, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कृष्णवर्णीय लोकांची गुलामगिरी सुरु ठेवण्याची परंपरा कायम सुरु ठेवली.
गुलामगिरीवरून संघर्ष अजूनच गडद होत गेला. एकीकडे उत्तरेकडील राज्य गुलामगिरी नष्ट करू पाहत होते तर दक्षिणेकडे ही प्रथा कायम ठेवण्याची तयारी सुरु होती. दक्षिणेकडे गुलामगिरीच्या समर्थनार्थ सभा देखील घेतल्या जाऊ लागल्या. याच दरम्यानच्या काळात काँग्रेसमध्ये कॅन्सस नेब्रास्का कायदा पारित करण्यात आला. यात गुलामगिरीवर कायदेशीर बंदी घालण्यात आली होती.
मात्र, हा निर्णय दक्षिणेकडील राज्यांच्या पचनी पडला नाही. त्यांनी या कायद्याचा विरोध करण्यास सुरुवात केली. पुढे या विरोधाने हिंसक रूप धारण केले. अनेक राज्यांनी घोषणा केली की जर गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली तर ते अमेरिकेपासून विभक्त होतील. दिवसेंदिवस हे प्रकरण चिंतेचा विषय बनत चालले होते. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्यास सुरुवात झाली. यावेळी एक पब्लिक ओपिनियन तयार करण्यात आले की सिनेट कुठल्याही प्रकारे गुलामगिरी नष्ट करू शकत नाही.
याच वेळी रिपब्लिकन नावाचा एक नवीन राजनैतिक समूह आकारास आला. गुलामगिरी नष्ट करण्याच्या विचारावर त्यांनी एक नवीन गटाची निर्मिती केली. अब्राहम लिंकन या गटाचे प्रमुख होते. त्यांनी राज्यनिहाय गुलामगिरी नष्ट करण्याला परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयाने दक्षिणेकडील राज्य नाराज झाले.
१८६० मधे लिंकन आपल्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले आणि विजयी झाले. त्यांनी विजयानंतर केलेल्या भाषणात ‘घरात जर फूट असेल तर ती अधिक काळ तशी राहाणार नाही’, अशी घोषणा केली. त्यांनी घोषणा केली की अमेरिकेला काळे आणि गोरे यांच्यात वाटता येणार नाही. अमेरिका हा एकसंध देश आहे. लिंकन यांच्या या भाषणानंतर दक्षिणी कॅरोलिनाने एक संमलेन बोलवले आणि अमेरिकेपासून वेगळं होण्याचा प्रस्ताव पारित केला.
१८६१ च्या फेब्रुवारीपर्यंत जॉर्जिया, फ्लोरिडा, अल्बमा, मिसिसिपी, लुईझियाना आणि टेक्सस या राज्यांनी अमेरिकेपासून वेगळं होण्याची घोषणा केली. यातून लिंकन यांचा विरोध करण्यास सुरुवात करण्यास सुरुवात झाली. वॉशिंग्टनमधील सत्ता कमकुवत होऊ लागली. यामुळे गृहयुद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. प्रचंड विरोधानंतर फेब्रुवारी १८६१ साली वॉशिंग्टन येथे एका शांती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. यातूनच कुठलाच उपाय निघाला नाही.
१२ एप्रिल १८६१ ला विद्रोही राज्यांनी चार्ल्सटन बंदराची शांतात भंग केली. येथे फोर्ट सुमटरवर गोळीबार करण्यात आला व अमेरिकन राज्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली. यामुळे सर्वत्र गदारोळ उडाला. समुद्र, मिसिसिपी नदी आणि पूर्व तट हे युद्धाचे प्रमुख केंद्र होते. सैन्याची अस्सल शक्ती संघीय अमेरिकन राज्यांकडेच होती. पण ते एकत्रित नव्हती.
दुसरीकडे विद्रोही राज्यांनी दक्षिणेकडीक तटाला वेढा घातला होता. हे एक असे स्थान होते जिथून कपडे, दारुगोळा आणि औषधांची आयात करण्यात येत होती. अमेरिकन सैन्याने काही काळातच दक्षिणेच्या न्यू ऑरलेन्स शहराला गुडघे टेकवत ताब्यात घेतले. दक्षिणेच्या विद्रोही सैन्यासाठी हा मोठा झटका होता. यानंतर त्यांचे सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आणि अमेरिकन राज्यांची विजयी मालिका सुरु झाली.
मिसिसिपीच्या युद्धात अमेरिकन राज्यांच्या सेनेने विद्रोही राज्यांच्या सेनेचा पराभव केला.
काही काळाने व्हर्जिनियाचा देखील पाडाव करण्यात आला. १८६३ मधे मात्र दक्षिणेकडील राज्यांनी जोरदार सुरुवात केली. पण त्याही वेळी त्यांचा पराभव झाला. १८६४ मधे युद्ध समाप्त होण्यापर्यंत येऊन ठेपले होते. अमेरिकन राज्यांनी विद्रोही सैन्याचा सर्वनाश केला होता.
पुढे दक्षिणी कॅरोलिनाच्या पाडावानंतर चार्ल्सटन बंदर मुक्त करण्यात आले. अखेरीस दक्षिणेकडच्या रॉबर्ट इ ली या सेनापतीला सरेंडर करावे लागले. यानंतर वॉशिंग्टन येथे विजयाचा उत्सव साजरा कऱण्यात आला. या युद्धात अमेरिकेच्या लाखो नागरिकांनी आपले प्राण गामावले होते. खासकरून दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. गेली अनेक वर्षे अमेरिकन या युद्धाच्या आठवणी विसरू शकले नाहीत.
गृहयुद्ध समाप्तीनंतर दक्षिणेकडील राज्यांवर कठोर धोरण आखले जाईल असा अनुमान होता. पण त्यांना सन्मानाने वागणूक देण्यात आली. यानंतर संविधानात बदल करत कृष्णवर्णीय गुलामांची गुलामगिरीतून सुटका करण्यात आली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.