आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
१९५२ साली ज्यावेळी एकीकडे स्वतंत्र भारताचे पहिले इलेक्शन लढवले जाणार होते, त्यावेळी मुंबईच्या विक्रोळीमधील एका कारखान्यात काही कामगार इतिहास रचत होते. ते कामगार बॅलेट बॉक्सेसची निर्मिती करत होते, ज्यांचा वापर मतदानासाठी केला जाणार होता. गोदरेज कंपनीच्या कारखान्यात रात्रीचा दिवस करून त्या कामगारांनी देशाच्या पहिल्या इलेक्शनसाठी फक्त चार महिन्याच्या कालावधीत तब्बल १२.८३ लाख बॅलेट बॉक्सेस तयार केले होते.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या यशस्वी निवडणुकीचे श्रेय होते तत्कालीन इलेक्शन कमिशनर आणि थोर गणिततज्ज्ञ सुकुमार सेन आणि त्यांच्या टीमच्या अथक परिश्रमाचे. त्यांच्याइतकेच श्रेय होते गोदरेज आणि बोयस कंपनीच्या कामगारांचे, ज्यांनी अथक परिश्रम घेऊन निवडणुकीच्या आधी बॅलेट बॉक्सेसची पूर्तता केली होती.
पहिल्या निवडणुकीसाठी इलेक्शन कमिशनरांनी पार्टीचे चिन्ह वापरण्याची नामी शक्कल लढवली होती, यामुळे तत्कालीन भारतातील अशिक्षित अडाणी जनतेला निवडणूकीत पक्षाच्या चिन्हावरून सहज मतदान करता येईल.
रेडियो, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदानाविषयक जनजागृती केली जात होती. अधिकारी सर्वप्रकारे लोकांच्या घरोघरी जाऊन मतदानाविषयक जनजागृती करत होते. इतकंच नाही तर त्या लोकांना मतदान कसे करावे याचे धडे देखील देत होते.
मतदानाविषयक तयारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडली जात होती, तेव्हा अचानक एक नवाच पेच अधिकाऱ्यांच्या समोर निर्माण झाला तो म्हणजे मतदानासाठी उत्तम बॅलेट बॉक्सेसची निर्मिती कशी करून घ्यायची ?
इलेक्शन कमिशनर यांनी देशभरातील आघाडीच्या निर्मात्यांकडे याविषयी प्रस्ताव सादर केला आणि बॅलेट बॉक्सेस संबंधित अटीदेखील त्या निर्मात्यांना सांगितल्या. इलेक्शन कमिशनला अत्यंत अल्पदरात, उत्तम बनावटीचे आणि कुठल्याही प्रकारे कुठलाही गैरप्रकार घडू शकणार नाही असे बॅलेट बॉक्सेस हवे होते. यात अजून एक मागणी अशी देखील होती की, बॅलेट बॉक्सेसला कुलुपाची गरज पडायला नको होती. अनेकांच्या मते त्यावेळी इलेक्शन कमिशनचं बजेट फारच कमी होतं, त्यामुळे काटकसर अत्यावश्यक होती.
कमी कालावधीत अशाप्रकारचे बॉक्स कोण तयार करून देईल याचा शोध इलेक्शन कमिशन घेत होती. अखेरीस गोदरेजच्या कारखान्यात काम करणारा एक कामगार, नथ्थालाल पांचाल समोर आला आणि त्याने ५० प्रकारच्या वेगवेगळ्या मॉडेलचे बॉक्स इलेक्शन कमिशनच्या समोर निवड करण्यासाठी ठेवले. आता यापैकी उपयोग्य असा बॅलेट बॉक्स निवडायचे काम इलेक्शन कमिशनला करायचे होते. इलेक्शन कमिशनकडून एका बॅलेट बॉक्सची निवड करण्यात आली.
या बॉक्सची एक खासियत होती, या बॉक्सला एक हॅन्डल होते आणि त्याला उघडण्यासाठी अजून एका हॅन्डलचे घट्ट आवरण त्यावर होते, याचाच अर्थ जर कोणाला हा बॉक्स उघडायचा असेल तर त्याला वरचे हॅन्डल तोडावे लागणार होते, यामुळे जर समजा कोणी मतदानात अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला तर लगेच लक्षात येत होतं.
पुढे इलेक्शन कमिशनचा हिरवा कंदील मिळाल्यावर, गोदरेज आणि बोयेस प्रायव्हेट लिमिटेडच्या पहिल्या कारखान्यात याच्या निर्मिंतीची प्रक्रिया आरंभ करण्यात आली. या कारखान्याच्या व्यवस्थापनाचे काम के. आर. ठाणावाला नावाच्या व्यक्तीकडे होते. ठाणावाला यांनी कारखान्याच्या कामगारांच्या तीन शिफ्ट केल्या. कामगारांनी बॅलेट बॉक्सेसची निर्मिती करायला सुरुवात केली.
आधी धीम्यागतीने सुरु असलेले काम मग जलद गतीने होऊ लागले, १५ हजार बॉक्सेसची निर्मिती एका दिवसात केली जात होती. काही दिवसांनी एका दिवसात २२ हजार बॉक्सेसची निर्मिती केली जाऊ लागली.
निश्चित कालावधीत या बॉक्सेसची डिलीव्हरी करण्याची जबाबदारी ठाणावाला यांच्या खांद्यावर होती. त्यांनी कामगारांशी चर्चा करून शिफ्टची वेळ मध्य रात्रीपर्यंत वाढवून घेतली. मोठ्या संख्येने कामगार या बॅलेट बॉक्सेसच्या निर्मितीत स्वतःला गुंतवून घेत होते. या कामात कुठली दिरंगाई अथवा कुठल्याही प्रकारचा दोष अपेक्षित नसल्यामुळे विशेष काळजी घेतली जात होती.
या कारखान्यात फक्त बॅलेट बॉक्सच नाही तर गोदरेज कंपनीच्या इतर मालाची देखील निर्मिती केली जात होती. यात कपाट, तिजोरी आणि कुलपांचा समावेश होता. या सर्व मालाची निर्मिती करत करत कामगार बॅलेट बॉक्स तयार करत होते.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आर. के. ठाणावाला यांनी सांगितले की, ते सकाळी ७च्या आसपास कारखान्यात यायचे आणि मध्यरात्री कारखान्यातून बाहेर पडायचे. सर्व कामगार अगदी व्यवस्थितपणे या बॅलेट बॉक्सच्या निर्मितीचे कार्य करत होते.
कंपनीचे तत्कालीन मालक फिरोजशहा गोदरेज रोज दुपारी ३च्या सुमारास कारखान्यात दाखल व्हायचे, कामगारांची विचारपूस करायचे. त्यांच्या समस्या जाणून घेत होते. ते प्रत्येक बॉक्स व्यवस्थितपणे तपासून बघत, त्यांच्यात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही याचा आढावा घेत असत. त्याच्या उघड-बंद प्रक्रिया समजून घेत असत. त्यांना स्वतःच्या कामगारांवर प्रचंड विश्वास होता.
कामगार अतिरिक्त वेळ खर्ची घालून बॅलेट बॉक्सेसची निर्मिती करत होते. वेळेच्या बंधनाचे अगदी व्यवस्थितपणे पालन करत होते. त्या काळात स्टीलचा तुटवडा होता. परंतु असं असून देखील त्या बॉक्सेसच्या निर्मितीत ८२ हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या या एका बॅलेट बॉक्सचा खर्च हा ५ रुपये इतका होता.
खरंतर, सुरुवातीला १२.२४ लाख बॉक्सेसची ऑर्डर देण्यात आली होती. पण कामगारांनी १२.८३ लाख बॉक्सेसची निर्मिती केली. याचं कारण होतं, गोदरेज व्यतिरिक्त ज्या इतर कंपन्यांना या बॉक्सेसची निर्मिती करण्यास सांगितलं होतं, पण त्यांना ते करता आलं नाही.
बॅलेट बॉक्सेसच्या निर्मितीनंतर पुढचा टप्पा होता, त्या बॉक्सेसचा भारताच्या २३ राज्यात वितरणाचा. यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरश: रात्र रात्र जागरण केले होते. सर्व बॅलेट बॉक्सेसचे विक्रोळी स्टेशनवर वेगवेगळ्या राज्यात जाणाऱ्या इलेक्शन स्पेशल ट्रेनमध्ये लोड करण्यात आले आणि त्यांच्या गंतव्य स्थानी त्यांची रवानगी करण्यात आली.
१९५०पासून ते १९६०पर्यंत, या एकूण १० वर्षांच्या मोठ्या कालावधीत गोदरेज कंपनीने बॅलेट बॉक्सेसची निर्मिती केली होती.
आज भारताने अत्याधुनिक ईव्हीएमचा पर्याय स्वीकारला आहे. परंतु असे असून देखील बॅलेट बॉक्सच्या वापराची मागणी केली जात असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.









