आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जागतिक बाजारपेठेमध्ये चीनी मालाला किती मागणी आहे, याबाबत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या दैनंदिन वापरातील असंख्य वस्तू अशा आहेत, ज्यांचं उत्पादन चीनमध्ये घेण्यात आलेलं आहे. जागतिक स्तरावर अमेरिका आणि भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्था चीनी मालाच्या ग्राहक आहेत. भारताचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये चीनी वस्तूंना प्रचंड मागणी आहे.
२०२३ साली भारत-चीन द्विपक्षीय व्यापार सुमारे ११८४ करोड डॉलर्सचा होता. या वर्षी (२०२४) हा व्यापार सुमारे तेवढाच आहे. चीनच्या सीमाशुल्क विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की, चीन जागतिक बाजारपेठेतील किती मोठा प्लेयर आहे.
दुसऱ्या महायु*द्धानंतर विशेषत: शीतयु*द्धाच्या समाप्तीनंतर खुल्या झालेल्या अर्थव्यवस्थांमुळं चीनला हे यश मिळाल्याचं म्हटलं जातं. मात्र, चीनचा इतर देशांशी असलेला व्यापार आणि त्यांचा ‘मेड इन चायना’ हा टॅग आपल्या कल्पेनेपेक्षाही जुन्या असल्याचं निदर्शनास आलं आहे. समुद्रामध्ये सापडलेल्या साधारण ८०० वर्षांपूर्वींच्या एका सिरॅमिक वाटीमुळं ही गोष्ट उघडकीस आली आहे.
हे ‘मेड इन चायना’ सिरॅमिक वाटीचं प्रकरणं नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यापूर्वी आपण जरा चीनच्या ट्रेडिंग हिस्ट्रीचा आढावा घेऊया.
चीननं हान राजघराण्याच्या काळातील एकसंध राज्याच्या निर्मितीपासून ते पंधराव्या शतकापर्यंत परकीय व्यापारात अनेक प्रयोग केले होते. सिल्क रूट हा चायनिज व्यापाराच्या वाढीला कारणीभूत असलेला सर्वात महत्त्वाचा घटक होता.
इसवी सन पूर्व २७००च्या आसपास प्राचीन चीनमध्ये रेशीम म्हणजेच सिल्कचं उत्पादन सुरू झालं होतं. अत्यंत उच्च मूल्याचं उत्पादन म्हणून ओळखलं जाणारं हे कापड सुरुवातीला चिनी शाही दरबाराच्या विशेष वापरासाठी राखीव होतं. त्याचं उत्पादन तंत्र सुमारे तीन हजार वर्षे चीनमध्ये अत्यंत सुरक्षित आणि गुप्त ठेवण्यात आलं होतं. एखाद्या चायनिज व्यक्तीनं जर परदेशी व्यक्तीला सिल्कच्या उत्पादनाची प्रक्रिया सांगितली तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे.
कालांतरानं रोमन साम्राज्याला सिल्कची ओळख झाली. तिथे सिल्क फार लोकप्रिय झालं. सिल्कच्या व्यापारासाठी चीनपासून सिल्क रुटची निर्मिती झाली. पुढे याच मार्गानं विविध वस्तूंच्या व्यापाराला सुरुवात झाली. मात्र, सिल्क रुट आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी अनेक संघर्ष झाले आणि चीनला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज भासू लागली.
त्यामुळे चीननं आपलं लक्ष समुद्राकडे वळवलं. त्यानंतर अल्पावधीतच चीननं समुद्री मार्गानं होणाऱ्या परकीय व्यापारावर वर्चस्व निर्माण केलं. अरबी आणि जावानीज प्रतिस्पर्ध्यांसारख्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धकांच्या तुलनेत चीनच्या सागरी व्यापाराची व्याप्ती फार जास्त होती.
अॅडमिरल झेंग हेच्या (१३७१-१४३३) काळात चिनी सागरी व्यापाऱ्याच्या क्षेत्रात फार यशस्वी झाला. त्यावेळेस चिनी व्यापार मादागास्करपासून कदाचित अमेरिकेपर्यंत पोहोचला होता. याकाळात चीनी पोर्सिलीनला (सिरॅमिक) जगभरात अमाप प्रसिद्धी आणि मागणी होती. ही गोष्ट एका ८०० वर्ष जुन्या चिनी जहाजाच्या अवशेषांमुळं सिद्ध झाली आहे.
१९९० मध्ये एका मच्छिमारानं एक सिरॅमिक वाडगा समुद्रातून बाहेर काढला होता. तेव्हापासून चीन आणि त्यांच्या प्राचीन समुद्री व्यापाराबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. जेव्हा मच्छीमाराला सिरॅमिकची वाटी सापडली होती, तेव्हा ती खूप जुनी असल्याचा अंदाज आला होता. परंतु, ती किती जुनी हे समजलं नव्हतं.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी चीनी व्यापाऱ्यांनी वापरलेल्या मध्ययुगीन काळातील व्यापार मार्गांचे विश्लेषण करून या संभाव्य जहाजाच्या दुर्घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वाटीवर काही माहिती कोरलेली होती. या माहितीच्या विश्लेषणातून असं लक्षात आलं की ती वाटी चीनमधील ‘जियानिंग फू’ येथे तयार करण्यात आली होती आणि ती माहिती म्हणजे एक प्रॉडक्शन टॅग होता.
तेराव्या शतकापर्यंत चीनमध्ये अनेक मोठी शहरं उदयाला आली होती. यातील काही शहरं व्यापाराची केंद्रं होती. जियानिंग फू शहर चीनी पोर्सेलिन अर्थात सिरॅमिकसाठी प्रसिद्ध असल्याचा अंदाज आहे. मानववंशशास्त्रज्ञ लिसा निझिओलेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाराव्या आणि तेराव्या शतकातच या शहराचं नाव जिआनिंग ‘फू’ असं होतं.
त्यानंतर मंगोलांनी त्या प्रदेशावर आक्र*मण केल्यामुळं १२७८ साली हे नाव बदलून जिआनिंग ‘लू’ करण्यात आलं. याचाच अर्थ असा होतो की जहाजाची दुर्घटना आणि सिरॅमिकची वाटी सुमारे ७०० ते ८०० वर्षे जुनी आहे.
२०१८ साली संशोधकांना समुद्रात एक बुडालेल्या जहाजाचे अवशेष सापडले. त्या अवशेषांमध्ये काही सिरॅमिक भांड्याचे बॉक्स होते. त्या भांड्यांच्या बेसवरील प्रॉडक्शन टॅग आणि मच्छिमाराला सापडलेल्या वाटीवर टॅग सारखेच होते. कार्बन डेटिंगवरून हे जहाज आणि त्यातील भाड्यांचं वय शोधण्याचा प्रयत्न केला असते ते ८०० वर्षे जुनं असल्याचं सिद्ध झालं, म्हणजेच १९९० मध्ये सापडलेली वाटी याच बुडालेल्या जहाजातील होती.
सापडलेल्या जहाजाच्या आकारावरून संशोधकांचा अंदाज आहे की, जहाजावर सुमारे एक लाख सिरॅमिक वाट्या होत्या. त्यापैकी जहाजाच्या अवशेषांमध्ये फक्त १२ टक्के वाट्या सापडल्या. याचा अर्थ असा की सुमारे ८८ हजार वाट्या अजूनही जगभरातील समुद्रात आहेत.
जावा बेटांजवळील समुद्रात सापडलेल्या या सिरॅमिकच्या वाटीमुळं चीनचा ‘मेड इन चायना’ हा टॅग अलिकडच्या काळातच नाही तर शेकडो वर्षांपासून जगभरात प्रसिद्ध असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. अजूनही समुद्राच्या तळाशी अशी कितीतरी जहाजं चिरनिद्रा घेत असतील. त्यामध्ये शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वीची मालमत्ता भरलेली असेल. त्यांचा शोध लागल्यास इतिहासातील अनेक रहस्य उघडकीस येऊ शकतात, असंही संशोधकांनी म्हटलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










