आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
एखाद्या कलाकाराच्या नजरेनं ‘चित्रकला’ या विषयाला पाहिलं तर, चित्रकला हा विषय कल्पना आणि भावनांची अभिव्यक्ती वाटतो. विशिष्ट सौंदर्यात्मक गुण हे टू डायमेंन्शनल लँग्वेजच्या रुपात कॅन्व्हासवर उतरवले जातात. विविध प्रकारचे आकार, रेषा, रंग, टोन आणि टेक्चर हे या चित्रकलेच्या भाषेतील मुळाक्षरं ठरतात. याच कलात्मक मुळाक्षरांचा वापर करून काही लिओनार्दो दा विंची, मायकेल एंजेलो, पाब्लो पिकासो आणि व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांसारखे चित्रकार जगाच्या इतिहासामध्ये अजरामर झाले आहेत. त्यांच्या चित्रांना कोट्यवधी रुपयांच्या किमती मिळालेल्या आहेत.
अशाच चित्रकारांमध्ये थॉमस गेन्सबरो या ब्रिटिश चित्रकाराचा समावेश होतो. थॉमसचं ‘द ब्लू बॉय’ नावाची पेंटिंग एकेकाळी जगातील सर्वात महागडी पेंटिंग ठरली होती. ओरिजलनली ‘ए पोर्ट्रेट ऑफ अ यंग जेंटलमन’ असं नाव असलेलं थॉमस गेन्सबरोची ही आयकॉनिक पेंटिंग १७७०च्या रॉयल अकॅडमी एक्झिबिशनमध्ये सर्वात प्रथम सादर केली गेली होती. या पेंटिंगसाठी गेन्सबरोला खूप प्रशंसा झाली. अल्पावधीतच ती प्रचंड लोकप्रिय झाले आणि १७९८ पर्यंत तिला ‘द ब्लू बॉय’ हे टोपणनाव मिळालं. तेव्हापासून ही पेंटिंग प्रचंड लोकप्रिय आहे. अगदी अलीकडच्या काळातसुद्धा पॉप कल्चर आणि व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून या पेंटिंगचं उदात्तीकरण सुरू आहे.
‘द ब्लू बॉय’बाबत अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण त्याच्या निर्मात्याची म्हणजे थॉमस गेन्सबरोची थोडी ओळख करून घेऊया.
थॉमस गेन्सबरो हा 18व्या शतकातील ब्रिटिश लँडस्केप पेंटर होता. समकालीन प्रतिभावान कलाकारांप्रमाणेच, गेन्सबरोनं आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात रोकोको शैलीमध्ये पोर्टफोलिओ तयार केला होता.
असं असलं तरी त्यानं स्वत:ची एक अद्वितीय शैली विकसित केली होती. ही शैली रोमॅन्टीसिझम काळातील कलाकारांसाठी प्रेरणास्त्रोत बनली. गेन्सबरोला त्याच्या ‘द ब्लू बॉय’ पोर्टेटमुळं जगप्रसिद्धी मिळाली असली तरी निसर्गचित्रं हीच त्याची खरी आवड होती. त्यानं आपल्या कलेला प्रसिद्धीच नाही तर फक्त उपजिवीकेचं साधनं मानलं होतं.
थॉमस गेन्सबरोच्या ‘द ब्लू बॉय’ पेंटिंगबद्दल बोलायचं झाल्यास, ही सुमारे ४८ इंच (१२० सेमी) रुंद आणि ७० इंच (१८० सेमी) उंच असलेलं मोठं पेंटिंग आहे. उंची कपडे घातलेला, कपाळावरती रुळणारे दाट भुरके केस आणि काळेभोर डोळे असलेला एक तरुण मुलगा उभा असल्याचं पेंटिंगमध्ये दिसतं. त्याच्या उजव्या हातात काळी टोपी आहे आणि त्याचा डावा हात आपल्याच कपड्यांमध्ये गुरफटलेला दिसतो आहे. त्याचे गाल आणि ओठांवर गुलाबी छटा पसरलेली आहे.
हा मुलगा टिपिकल गेन्सबरो-एस्क वादळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभा केलेला आहे. मुलाच्या पाठीमागे डावीकडील क्षितिजावर अंधुकसा प्रकाश दाखवण्यात आलेला आहे. असं मानलं जातं की हे पेंटिंग खास १७७०च्या रॉयल अकॅडमी एक्झिबिशनसाठी तयार केलं गेलं होतं. पेंटिंगमध्ये उभा असलेला हा मुलगा कोण होता, याबाबत अनेक अंदाज लावण्यात आले आहेत. काहीच्या मते, या पेंटिंगचा विषय तिचा सर्वात सुरुवातीचा मालक जोनाथन बट्टल होता तर काहींच्या मते हा मुलगा गेन्सबरोचा पुतण्या, गेन्सबरो ड्युपॉन्ट होता.
या पेंटिंगमध्ये निळ्या रंगाच्या विविध शेड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. कदाचित त्यामुळंच या चित्राला ‘द ब्लू बॉय’ हे नाव पडलं असावं. चित्रातील मुलानं घातलेले कपडे हा ‘हिस्टॉरिकल कॉस्च्युम स्टडिज’ या विषयामध्ये अभ्यासाचा भाग ठरलेले आहेत.
मुलानं फॅन्सिफुल नी-ब्रीचेस आणि दुहेरी लेस कॉलरसह स्लॅश केलेला अंगरखा घातलेला आहे. हा अंगरखा, ब्रीचेस आणि क्लोक हे चमकदार निळ्या सॅटिनपासून तयार केलेले आहेत. चित्रातील पोषाख रंगवताना अल्ट्रामॅरिन, स्माल्ट, पर्शियन ब्लू आणि अझुराइट रंगांचा वापर करण्यात आलेला. निळ्या रंगाच्या अंगरख्याखाली खाली पांढरा शर्ट दिसतो आहे. निळ्या कपड्यांवर चांदीची बटणं आणि गार्टर्स उठून दिसतात. चित्रातील मुलानं घातलेले कपडे हे १७व्या शतकातील फ्लेमिश चित्रकार अँथनी व्हॅन डायक यांच्या कामातून प्रेरणा घेऊन रेखाटले असल्याचं म्हटलं जातं.
वरकरणी पाहताना हे चित्र अतिशय ‘परफेक्ट’ दिसतं. मात्र, हे रेखाटताना गेन्सबरोनं चांगलाच स्ट्रगल केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एक्स-रेमध्ये असं दिसून आलं आहे की, द ब्लू बॉय एका वृद्ध व्यक्तीच्या अपूर्ण पेंटिंगवर पेंट करण्यात आलेलं आहे. याशिवाय गेन्सबरोनं मुलाच्या पायाजवळ दिसणाऱ्या खडकांच्या जागी अगोदर कुत्रा रंगवला होता. मात्र, नंतर तो कुत्रा खडकांच्या खाली लपवण्यात आला.
१७७६पर्यंत हे चित्र हार्डवेअर व्यापारी जोनाथन बट्टलच्या ताब्यात होतं. त्यानंतर राजकारणी जॉन नेस्बिट आणि पोर्ट्रेट पेंटर जॉन हॉपनर यांच्याकडे काही दिवस हे चित्र होतं. १८०९ मध्ये, द ब्लू बॉयनं अर्ल ग्रोसव्हेनॉरच्या संग्रहात प्रवेश केला आणि १९२१ पर्यंत त्याच्या वंशजांकडेच राहिलं. द ब्लू बॉयच्या लोकप्रियतेमध्ये ग्रॉसव्हेनॉर कुटुंबानं मोठी भूमिका बजावली. त्यांनी वारंवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्याचं प्रदर्शन केलं.
त्यानंतर अमेरिकन रेल्वेरोड टायकून आणि कला व दुर्मिळ पुस्तकांचा संग्राहक असलेल्या हेन्री एडवर्ड्स हंटिंग्टननं सात लाख २० हजार डॉलर्सपेक्षा जास्त किमतीत ‘द ब्लू बॉय’ खरेदी केलं. सध्याच्या मुल्यानुसार ही रक्कम सुमारे ९३ लाख डॉलर्स इतकी आहे.
१९२२ मध्ये कॅलिफोर्नियाला रवाना होईपर्यंत, या चित्रासाठी एक आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मोहीम राबवण्यात आली होती. लंडनमधील नॅशनल गॅलरीमध्ये ‘द ब्लू बॉय’ प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथे सुमारे ९० हजार लोकांनी ही पेंटिंग पाहिली होती. हंटिंग्टनच्या प्रभावशाली संग्रहात भर घालण्यासाठी पेंटिंगने दक्षिण कॅलिफोर्नियामधील हंटिंग्टन इस्टेटमध्ये प्रवेश केला. गेल्या शंभर वर्षांपासून हे चित्र कॅलिफोर्नियातील सॅन मारिनो येथील हंटिंग्टन लायब्ररी, आर्ट म्युझियम आणि बोटॅनिकल गार्डन्स येथील थॉर्नटन पोर्ट्रेट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
शंभर वर्षांपूर्वी ‘द ब्लू बॉय’नं युरोप सोडलं होतं. शतकभराच्या काळानंतर ही पेंटिंग पुन्हा युरोपियन भूमीवर आली आहे. सध्या लंडनमधील नॅशनल गॅलरीमध्ये सुरू असलेल्या ही पेंटिंग प्रदर्शानासाठी परत आणली गेली आहे. १५ मे २०२२ पर्यंत ही ब्लू बॉय लंडनमध्ये राहणार असून त्यानंतर ती पुन्हा हंटिंग्टन लायब्ररीमध्ये पाठवली जाणार आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










