The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कपिल देव आणि ‘झी’च्या सुभाष चंद्रांनी सुरु केलेली ‘ICL’ BCCI ने दमदाटी करून बंद पाडली

by द पोस्टमन टीम
13 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘क्रिकेट’ हा काहींसाठी फक्त एक खेळ आहे तर काहींसाठी पॅशन. काहीजण याही पलिकडे जाऊन क्रिकेटला धर्म समजतात. मात्र, जगामध्ये असे देखील काही लोक होते ज्यांनी क्रिकेटकडे फक्त खेळ, पॅशन आणि धर्म म्हणून न पाहता व्यवसायाची संधी म्हणून पाहिलं. तसं पाहिलं तर खेळ आणि व्यवसाय यांचं एक अतूट नातं आहे.

क्रिकेट हा सर्वांत किफायतशीर व्यवसाय ठरू शकतो, ही गोष्ट सर्वांत पहिल्यांदा एका ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाच्या मनात आली. ती व्यक्ती होती ऑस्ट्रेलियन मीडिया टायकून ‘केरी पॅकर’. त्यानं पहिल्यांदा क्रिकेटमधून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वी देखील झाला.

केरी पॅकरनं आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हाताशी धरून वर्ल्ड सिरीज क्रिकेट सुरू केली. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारतामध्ये देखील २००७ साली झी टेलीफिल्म्सनं इंडियन क्रिकेट लीगची (आयसीएल) संकल्पना मांडली. ही गोष्ट इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यापूर्वीची आहे.

आयसीएलची ही संकल्पना काय होती आणि तिचं पुढे काय झालं? याबाबत सविस्तर माहिती देणारा हा लेख…

आयसीएलबद्दल जाणून घेण्यापूर्वी त्याची प्रेरणा असलेल्या केरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीजची आपण तोंडओळख करून घेऊ. केरी पॅकरला आपल्या ‘9 नेटवर्क’ चॅनलवर उच्च दर्जाचं क्रिकेट प्रसारित करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यानं प्रयत्न केले. १९७६ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं पॅकरला कसोटी सामने प्रसारित करण्याचे हक्क नाकारले. तेव्हा त्यानं सर्वांच्या नकळत जगातील काही अव्वल क्रिकेटपटूंसोबत करार केला. यामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार ग्रेग चॅपल, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाइव्ह लॉईड, इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेग आणि पाकिस्तानचा भावी कर्णधार इम्रान खान यांचा देखील समावेश होता.



केरी पॅकरनं या खेळाडूंना हाताशी धरून वर्ल्ड सिरीज क्रिकेट सुरू केली. क्रिकेट हे टेलिव्हिजन जगतासाठी मोठ्या कमाईचा स्रोत आहे हे दाखवण्याव्यतिरिक्त, वर्ल्ड सिरीज क्रिकेटनं खेळाचा एकदम चेहरामोहरा बदलून टाकला. विविध रंगसंगतीच्या जर्सी, डे-नाईट गेम्स, हेल्मेट, क्षेत्र रक्षणावरील निर्बंध आणि आधुनिक खेळाचा अत्यावश्यक भाग असलेल्या इतर अनेक गोष्टी सगळ्यात अगोदर वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये सादर केल्या गेल्या. विशेष म्हणजे त्या प्रचंड लोकप्रिय देखील झाल्या.

ज्यावेळी वर्ल्ड सिरीज क्रिकेट, खेळामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणत होती त्याच काळात भारतातसुद्धा क्रिकेट सर्वांत जास्त लोकप्रियता असलेला खेळ झाला होता. १९८३ चा वर्ल्डकप जिंकल्यानंतर १९८७ साली भारतानं विश्वचषकाचं यजमानपद भूषवलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. १९९०च्या दशकात जेव्हा मार्क मॅस्कारेन्हासच्या ‘वर्ल्डटेल’नं १९९६ च्या विश्वचषकासाठी मीडिया राईटस् विकत घेतले तेव्हा गेममध्ये पैशांचा खऱ्या अर्थानं प्रवाह सुरू झाला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

जेव्हा मॅस्कारेन्हासनं सचिन तेंडुलकर सोबत २५ कोटी रुपयांचा जाहिरात करार केला तेव्हा क्रिकेटच्या मदतीनं किती पैसा मिळवता येऊ शकतो याची सर्वांना कल्पना आली.

दरम्यानच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय क्रिकेट बिरादरीमध्ये सर्वांत श्रीमंत बोर्ड म्हणून उदयास आलं. बोर्डानं सर्व सीझनमध्ये सर्वात जास्त व्यस्त वेळापत्रकाचा आनंद लुटला. क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचा हक्क विकत घेण्यासाठी अनेक व्यवसायिकांकडून मोठमोठ्या ऑफर देण्यात आल्या होत्या.

भारतातील अग्रगण्य टीव्ही चॅनेल्सपैकी एक असलेली ‘झी टेलिफिल्म्स’ ही कंपनी प्रसारण हक्क मिळवण्याच्या शर्यतीत खूप पूर्वीपासून प्रयत्न करत होती. परंतु जगमोहन दालमियांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या बीसीसीआयनं प्रसारणाचे हक्क सुभाष चंद्रांच्या ‘झी’ला विकण्यास नकार दिला होता. एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर बीसीसीआय नाव कमवत होती तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा काहीशा दुर्लक्षित झाल्या होत्या. त्यामागं अनेक कारणं होती. बर्नआउटच्या भीतीनं आंतरराष्ट्रीय स्टार्स देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होत नव्हते. भारताची प्रमुख देशांतर्गत स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीला योग्य पद्धतीनं टीव्ही कव्हरेज मिळत नव्हतं.

जेव्हा भारतात देशांतर्गत स्पर्धा संकटात सापडल्या त्यावेळी जगभरात मात्र, क्रिकेटमध्ये क्रांती सुरू होती. २००३ मध्ये इंग्लंडमध्ये टी-ट्वेंटी क्रिकेटची सुरुवात करण्यात आली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डनं (ईसीबी) याला क्रिकेट कार्निव्हल असं नाव दिलं. क्रिकेटच्या या नवीन आणि लहान स्वरुपानं इंग्लंडमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी खेचली. पुढील काही वर्षांतच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटी क्रिकेट सुरू केलं.

२००७ मध्ये, टी-ट्वेंटी क्रिकेटची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्डकप पार पडला. या फॉरमॅटबाबत आक्षेप असूनही बीसीसीआयनं आपला एक युवा संघ दक्षिण आफ्रिकेत पाठवला आणि ही स्पर्धा जिंकली.

ज्या फॉरमॅटबद्दल देशातील लोकांना काहीही माहिती नाही, अशा क्रिकेट फॉरमॅटध्ये सहभागी होऊन भारतानं ती स्पर्धा जिंकली होती. त्यामुळं भारतीयांच्या मनात त्याबद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झालं होतं. ही गोष्ट ‘झी टेलिफिल्मस्’नं हेरली होती. म्हणून त्यांनी भारतात स्थानिक पातळीवर ‘इंडियन क्रिकेट लीग’ नावाची टी-ट्वेंटी स्पर्धा सुरू केली.

झी टेलिफिल्म्सचे मालक, सुभाष चंद्रा यांनी अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात केली. बीसीसीआयनं तत्काळ लीग आणि त्यासाठी साइन अप केलेल्या खेळाडूंना बंडखोर म्हणून घोषित करून टाकलं. इतकंच नाही तर बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय दबदब्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांनी देखील हाच निर्णय आपापल्या देशांमध्ये लागू केला. मात्र, सुभाष चंद्रा बीसीसीआयच्या दबावापुढे हार मानणार नव्हते. त्यांनी आयसीएल खेळवण्याचा ठाम निश्चयचं केला होता.

नोव्हेंबर २००७ मध्ये आयसीएलचा पहिला हंगाम सुरू झाला. पहिल्या वहिल्या भारतीय चॅम्पियनशिपमध्ये सहा देशांतर्गत संघ होते. त्यात काही भारतीय आणि काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा होता. गणपती विघ्नेश, अंबाती रायुडू, अझहर महमूद आणि इयान हार्वे यांसारख्या खेळाडूंनी या स्पर्धेतून आपला क्लास दाखवला. त्याचा त्यांना फायदा देखील झाला. ​अटीतटीचे सामने आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही आयसीएल भारतीय चाहत्यांच्या मनाचा ताबा घेऊ शकलं नाही.

दरम्यान, बीसीसीआयनं देखील स्वतःची टी-ट्वेन्टी लीग सुरू करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. ललित मोदीच्या डोक्यातून निघालेली ही ‘इंडियन प्रिमियर लीग’ नावाची संकल्पना २००८ मध्ये थेट भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनामध्ये घर करून गेली. मोठमोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या आयपीएलला अल्पावधीत प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

बीसीसीआयच्या आयपीएलसमोर चंद्रांची आयसीएल तग धरू शकली नाही. ज्यांनी आयसीएल स्पर्धा पाहिली होती त्यांच्या मनातून देखील तिच्या आठवणी धूसर झाल्या आहेत. जगभरातल्या असंख्य गोष्टींचे व्हिडीओ असणाऱ्या इंटरनेटवरसुद्धा या स्पर्धेतील एखादी व्हिडिओ क्लिप किंवा स्कोअरकार्ड शोधणं कठीण झालं आहे. टीव्हीवरील क्रिकेटपंडित याबद्दल कधीच बोलत नाहीत जणू काही ही लीग कधी अस्तित्वातच नव्हती.

बीसीसीआयनं आपला प्रभाव वापरून आयसीएल संपवल्यानं झी आणि बीसीसीआयचा वाद वाढतच गेला. पण आयसीएलमध्ये काही त्रुटी नक्की होत्या मात्र, त्यामुळं भारताच्या देशांतर्गत क्रिकेट संरचनेत व्यावसायिकता आली हे सत्य नाकारता येणार नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आयसीएलचा धसका घेऊन बीसीसीआयने देशांतर्गत खेळाडूंच्या मानधनामध्ये अमूलाग्र बदल केला आणि त्यांना बंडखोरी करण्यापासून रोखण्याच्या प्रयत्न केला.

आयसीएलमुळं देशांतर्गत क्रिकेटला एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दुसऱ्या महायु*द्धात एक पोस्ट ऑफिस जर्मन सैन्याचा सामना करण्यासाठी पुढे सरसावलं होतं

Next Post

आपण युट्युबवर रात्रभर जागून घरं बांधणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बघतो ते कोण आहेत..?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

आपण युट्युबवर रात्रभर जागून घरं बांधणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बघतो ते कोण आहेत..?

काही लोकांच्या मते जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे या कुटुंबाचा हात असतो

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.