आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
या जगात ब्रूस-ली माहिती नाही असा माणूस सापडणं अशक्यच! सगळ्यांनाच ब्रूस-ली माहित आहेच. पण या ग्रेट माणसाचे प्रशिक्षण ज्याच्याकडे झाले तो माणूस क्वचितच कोणाला माहिती असेल. या व्यक्तीबद्दल बऱ्याच चित्रपटांमध्ये काल्पनिक गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. परंतु ब्रूस लीला मार्शल आर्टचं प्रशिक्षण देणाऱ्या या अद्भुत माणसाची खरी कथा आहे तरी काय, याचीच माहिती घेण्यासाठी हा प्रपंच..
खरा ‘कुंग फू’ म्हणून अनेक चाहत्यांमध्ये मुख्यतः ‘एंटर द ड्रॅगन’सह पाच क्लासिक चित्रपटांमधील त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्ध असलेला ब्रूस-ली हा एक सर्वोत्तम मार्शल आर्ट आयकॉन आहे. परंतु त्याच्या कडव्या प्रशिक्षणासाठी त्याच्यासारख्याच एका मार्शल आर्टिस्टचा तितकाच मनोरंजक इतिहास आहे. त्याच्या प्रशिक्षकाचं नाव ‘इप-कै-मॅन’. यालाच ‘इप मॅन’ म्हणूनही ओळखलं जातं. ब्रूसलीचे ‘कुंग फु’बद्दलचे बरेचसे ज्ञान हे ‘इप मॅन’ या प्रसिद्ध चिनी कुंग फू मास्टरकडून आलेले होते.
१८९३ साली चीनच्या फोशान येथे जन्मलेला आयपी मॅन हा “विंग चुन” या यु*द्धकलेचा ग्रँडमास्टर होता. खरंतर कुंग-फुची जुनी शैली रिफ्लेक्स मुव्हमेंट्स किंवा शरीराच्या प्रतिक्रियावादी हालचालींवर आधारित होती. चीनमध्ये राहत असताना, इपने वयाच्या केवळ नवव्या वर्षी ‘विंग चुन’ शिकण्यास सुरुवात केली.
त्याच्या विंग चुन प्रशिक्षकांमध्ये, प्रामुख्याने विंग चुन तज्ज्ञ ‘लेउंग बिक’ आणि ‘चान वाह-शुन’ होते. शिकत असतानाच, त्याच्या विशीतच तो इतरांना कुंग-फु शिकवण्याइतका सक्षम होता. मध्यंतरी वयाच्या पंधराव्या वर्षी इप मॅन हाँगकाँगला गेला. त्याने सेंट स्टीफन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.
हाँगकाँगमध्ये असताना त्याने मार्शल आर्टचे प्रशिक्षणही सुरूच ठेवले होते. इप मॅन अखेरीस वयाच्या चोवीसाव्या वर्षी चीनमधील फोशनला परतला आणि त्याला पोलिस अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. या क्षणी, त्याची विंग चुनचे खाजगी प्रशिक्षण संस्थेत धडे देण्यास सक्षम होता, इतकी त्याची कौशल्ये विकसित झाली होती.
१९४९ साली हुकूमशाही चायनीज कम्युनिस्ट पार्टी सत्तेत आल्यानंतर इप मॅन हॉन्गकॉन्गला पळून आला. तिथे त्याने विंग चुन शाळा उघडली. त्याने प्रशिक्षणासाठी शुल्क आकारले आणि यु*द्धकलेसाठी जिज्ञासा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना सार्वजनिकरित्या प्रशिक्षण देणारा तो पहिला मार्शल आर्ट मास्टर ठरला.
पण इपने प्रशिक्षित केलेले अनेक तरुण लोक हॉन्गकॉन्गच्या रस्त्यांवर हिं*साचार करताना आढळले. खरंतर ‘विंग चुन’ कला त्यांना जीवनाच्या योग्य मार्गावर आणेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल अशी आयपीला आशा होती. याच काही किशोरवयीन मुलांपैकी एक ब्रुस ली होता.
वयाच्या तेराव्या वर्षी कुंग-फु शिकण्याची सुरुवात करणाऱ्या ब्रूस-लीने १९५०च्या उत्तरार्धात इप या ‘मास्टर’ला भेटल्यानंतर तर त्याचे जन्मजात गुण अधिकच वृद्धिंगत केले. भविष्यात त्याने हॉन्गकॉन्ग सोडले, त्यावेळी त्याच्याकडे स्वतःचे ‘कुंग फु’ प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक ती सर्व ‘कुंग-फु’ कौशल्ये होती.
विंग चुनला लोकप्रिय मार्शल आर्ट शैली बनवण्याचे सर्व श्रेय इप मॅनला दिले जाते. त्यांच्यामुळेच विंग चुन यु*द्धकला आज जगभरात शिकवली आणि शिकली जाते. ब्रूस लीवर आणि नंतर, त्याच्याकडून शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर विंग चुनचा प्रभाव आहे. इप मॅनसह ब्रूस लीने ही “आर्ट ऑफ डिटॅचमेंट” शिकली आणि कुंग फूची सखोल, मूलभूत आणि अध्यात्मिक समज विकसित केली.
एखाद्या व्यक्तीने आपले मन निर्विकारी कसे करावे आणि पाण्यासारखे “निराकार” कसे असावे याविषयी दार्शनिक कल्पनांचा प्रचार ब्रूस लीने केला. या सर्व विचारांचे मूळ हे इपने शिकवलेल्या धड्यांमध्ये आहे. अशा या यु*द्धकलेबरोबरच त्याचे मर्म सांगणाऱ्या आणि जगातील सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट निर्माण करणाऱ्या इप मॅनचा २ डिसेंबर १९७२ रोजी मृत्यू झाला.
या माणसाच्या जीवनपटावर आधारित ‘इप मॅन’ ही डॉनी येन अभिनित चित्रपट मालिका २०१० सालापासून प्रदर्शित झाली आहे. या चित्रपट मालिकेत इप मॅनच्या जीवनपटाचा काल्पनिक लेखाजोखा सांगण्यात आला होता. तीन स्वतंत्र बायोपिक्समध्ये इप हे मुख्य पात्र होते. २०१० च्या ‘द लीजेंड इज बॉर्न: इप मॅन’ मध्ये डॉनी येनने मुख्य भूमिका बजावली तर ‘द ग्रँडमास्टर’ आणि ‘इप मॅन: द फायनल फाईट’, या दोन्ही २०१३ साली रिलीज झालेल्या चित्रपटात अनुक्रमे टोनी लेउंग आणि अँथनी वोंग यांनी ‘इप मॅन’ची भूमिका बजावली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.