आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१९४९ साली चीनची प्रजासत्ताक सत्ता कोसळली आणि हुकूमशाही, साम्यवादी सरकार सत्तेत आले. ‘सेंचुरी ऑफ ह्युमिलिएशन्स’चा सूड उगवण्यासाठी चीनच्या धोरणकर्त्यानी विस्तारवादी, आक्रमक धोरणाचा स्वीकार केला. राज्यव्यवस्था साम्यवादी असली, तरी चीनने भांडवलशाही आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून द्विध्रुवीय जगात एक नवा पायंडा घालून दिला. विस्तारवादी चीनने सूडाच्या भावनेने संपूर्ण जगावर प्रभुत्व स्थापन करण्याचा निश्चय केला असला तरी चीन सावधपणे आपली पावलं उचलत आहे.
पाकिस्तानसारखे ‘उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशी गडबड न करता चीनने गांभीर्याने धोरणाची आखणी केली. सन १९७८ साली ‘व्हा जिओफिन्ग’च्या नेतृत्वाखाली चीनच्या विकासाच्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरवण्यात आला. याच प्राधान्यक्रमानुसार चीन त्या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणार होते. पण हा प्राधान्यक्रम ठरवताना चीनच्या सरकारकडून एक मोठी चूक झाली. या चुकीला चीनची सर्वांत मोठी चूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
चीनने ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार, तंत्रज्ञानाचे शिक्षण, कृषिविकास, औद्योगिकीकरण आणि उत्पादन-क्षमतेत वाढ, सैन्य या चार क्षेत्रांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार होते. तर सैन्य क्षेत्रात पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात चीनचे भूदल, पीपल्स लिबरेशन एअर फोर्स अर्थात चीनचे हवाई दल आणि पीपल्स लिबरेशन नेव्ही अर्थात चीनचे आरमार असा प्राधान्यक्रम देण्यात आला होता.
हीच ती चीनची सर्वांत मोठी चूक. जर चीनने हा प्राधान्यक्रम उलटून पहिले प्राधान्य पीपल्स लिबरेशन नेव्ही अर्थात चीनच्या आरमाराला दिले असते आणि त्यानंतर चीनचे हवाई दल किंवा भूदलाचा विचार केला असता तर आज चीनकडे अमेरिकेइतक्याच विमानवाहू युद्धनौका, युद्धनौका आणि पाणबुड्या असत्या.
भारतीय नौदल, ऑस्ट्रेलियन नौदल, न्यूझीलंड नौदल, जपानी नौदल, ब्रिटन नौदल, अमेरिकी नौदल या इंडो-पॅसिफिक भागातील सहा मोठ्या नौदलांचा सामना चीन पुढच्या सुमारे २५ वर्ष करू शकत नाही. तसेच चीनला ‘साऊथ चायना सी’, ‘इस्ट चायना सी’, ‘स्ट्रेट ऑफ मलाका’ आणि ‘इंडो-पॅसिफिक महासागरांचा भाग’ यांना सुरक्षा देऊन आपला व्यापार आणि इंधनाची वाहतूक सुलभ करणे शक्य झाले असते.
पण तसे न होता ‘साऊथ चायना सी’, ‘इस्ट चायना सी’, ‘स्ट्रेट ऑफ मलाका’ आणि ‘इंडो-पॅसिफिक महासागरांचा भाग’ यांच्यावर प्रभुत्व राहतं ते प्रामुख्याने भारतीय नौदलाच, जपानी नौदलाच, ऑस्ट्रेलियन नौदलाच आणि अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडच्या नौदलाचं. आपल्या सीमेवर असलेल्या प्रत्येक राष्ट्राबरोबरच्या संघर्षामुळे चीन आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत ‘खलनायक’ म्हणून समोर येतो.
अनेक वर्षे भारतावर केलेल्या कुरघोडींमुळे चीनला सहजासहजी समुद्रातून आखाती देशांकडे आपली जहाज वळवता येत नाहीत. त्यात भर म्हणजे आता ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्या QUAD नौदलाच्या उपस्थितीमुळे चीनला समुद्रातून व्यापार करणे जवळ जवळ अशक्यच झाले आहे.
चीनचे बहुतांशी इंधन आणि इतर नैसर्गिक संसाधने प्रामुख्याने आखाती देशांमधून येतात, म्हणूनच चीनला समुद्रमार्गे होणारा व्यापार अतिशय महत्वाचा आहे. पण समुद्र मार्ग कदाचित कायमचाच बंद झाल्याने चीनला जमिनीवरील मार्गाची गरज भासली. यासाठीच चीनने २०१३ साली एका आंतरराष्ट्रीय मार्गाची घोषणा केली. हा मार्ग काही नवा नव्हता. प्राचीन आणि मध्ययुगीन जगात या मार्गाचा अवलंब अनेक लोक प्रवासासाठी करत असत. चीनने ज्या ‘ओबीओआर’ (वन बेल्ट वन रोड) मार्गाची घोषणा केली तो एकेकाळी ‘सिल्क रूट’ म्हणून ओळखला जात.
या सिल्क रूटद्वारे युरोपातील आणि काही आखाती देशांतील व्यापारी, प्रवासी, सैन्य हे चीन आणि दक्षिण अशियाकडे येत असत. आधुनिक चिनी ओबीओआर आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडांमध्ये पसरलेल्या अनेक देशांना एकत्र जोडण्यावर आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करतो. ओबीओआर’ मार्ग सुमारे ७८ देशांत पसरला आहे. या प्रकल्पात रस्ते, रेल्वे, सागरी बंदरे, पॉवर ग्रीड, तेल आणि वायू पाइपलाइन आणि संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांचे जाळे तयार करणे समाविष्ट आहे.
भारताने ओबीओआरला समर्थन दिलेले नाही. वादग्रस्त काश्मीरमधून (प्रचलित: पीओके) ‘सीपीईसी’ (चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर) प्रकल्प उभारण्याच्या माध्यमातून चीन भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करतो हे उघड असल्याने, भारताचा खंडवर्ती ओबीओआर आणि सागरी ओबीओआरला विरोध आहे.
यावरून प्राचीन आणि मध्ययुगीन सिल्क रूटचे महत्व आपल्या लक्षात आलेच असेल. सिल्क रूट हा एकच मार्ग नव्हता, तर शेकडो वर्षांपासून मध्य युरोपाला आशियाशी जोडणारे एक जीवंत व्यापारी जाळे होते. यामुळे दूरवर असलेल्या संस्कृतींचा एकमेकांशी संबंध आला. उंट आणि घोड्यावरून प्रवास, व्यापारी, भटके लोक, मिशनरी, योद्धा आणि मुत्सद्यांनी केवळ विदेशी वस्तूंची देवाणघेवाण केली नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, औषध आणि धार्मिक संस्कृतींचे हस्तांतरण केले यामुळेच प्राचीन संस्कृतींना वेळोवेळी नवा आकार मिळाला.
‘सिल्क रूट’ हा शब्द सन १८७७ साली जर्मन भूगोलवेत्ता ‘फर्डिनांड फ्रीहरर वॉन रिचथोफेन’ यांनी दिला होता. याच मार्गाने प्राचीन चिनी हान साम्राज्य (इसवी सन २०६ ते इसवी सन २२०) आणि रोमन साम्राज्य यांच्यातील भरभराटीच्या रेशीम व्यापारावर सकारत्मक प्रभाव पडला होता. सतराव्या आणि अठराव्या शतकात मोठ्या प्रमाणावर सागरीमार्गांचा अवलंब व्यापार आणि वाहतुकीसाठी होईपर्यंत ‘सिल्क रूट’ हा ‘आंतरखंडीय’ व्यापारासाठी अत्यंत महत्वाचा होता असे मत अनेक आधुनिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
सिल्क रूटद्वारे होणारा व्यापार नेमका कोणत्या गोष्टींचा होता, आणि या वस्तूंच्या व्यापारामुळेच प्राचीन आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित झाले, अशा प्रमुख आठ वस्तू जाणून घेऊ.
१. रेशीम: सिल्क रूटला ‘सिल्क’ हे नाव का पडले हे कदाचित तुम्हाला समजले असेलच. चीनमध्ये इसवी सनाच्या ३००० वर्षांआधी व्यापारी आणि मुत्सद्दी प्रवाशांसाठी रेशीम हा अत्यंत महत्वाचा घटक होता, असे मत प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये मध्ययुगीन चीन आणि आशियाच्या इतिहासाचे अभ्यासक शिन वेन यांचे आहे.
रोमन उच्चभ्रू लोकांमध्ये चीनी रेशीम एक लक्झरियस, पातळ कापड म्हणून प्रसिद्ध झाले आणि नंतर, जेव्हा रेशीम बनवण्याचे तंत्रज्ञान भूमध्यसागरात आणले गेले, तेव्हा दमास्कसमधील कारागीरांनी ‘दमास्क’ म्हणून ओळखले जाणारे उलट विणलेले रेशीम कापड तयार केले. पण रेशमाचे महत्व एक ‘कापड’ इतकेच नव्हते. तर पूर्व चीनमधील तुर्फानच्या महत्त्वाच्या सिल्क रूटवरील वस्तीत, रेशीम चलन म्हणून वापरले जात आणि तांग राजवटीत (इसवी सन ६१८ ते ९०७) रेशीम हे कर स्वरुपात गोळा केले गेले.
२. घोडे: इसवी सनाच्या ३७०० वर्षांआधी मध्य आशियामध्ये घोड्यांचे पालन केले गेले आणि पुढे मध्य आशियातील भटक्या जमातींनी घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर करून चीन, भारत, पर्शिया आणि भूमध्य समुद्राच्या सीमेला लागून असलेल्या मोठ्या प्रदेशांमध्ये शिकारी आणि आक्रमणे केली.
घोडे हे सिल्क रुटवरील एक उच्च किमतीची, कमी वजनाची आणि युरोपीय लोकांसाठी एक ‘लक्झरियस’ गोष्ट होती. चीनी सम्राट किन शी हुआंगच्या (इसपू २५९ ते २१०) प्रसिद्ध थडग्यात केवळ ८००० टेराकोटाच्या मातीने तयार केलेल्या योद्ध्यांच्या मूर्तीच नाहीत तर ५२० रथांना जुंपलेले घोडे आणि १५० घोडदळातील घोड्यांचे पुतळे आहेत. यावरून आपल्याला घोड्याचे तत्कालीन महत्व समजलेच असेल.
३. कागद: दुसऱ्या शतकात चीनमध्ये शोधला गेलेला कागद बौद्ध धर्माच्या बरोबरीनेच संपूर्ण आशियात पसरला असे सांगितले जाते. इसवी सन ७५१ साली तलासच्या युद्धात तांग साम्राज्याबरोबर अरब फौजा लढल्यानंतर इस्लामी जगाला कागद माहित झाला. सिल्क रूटवर प्रवास करणाऱ्या लोकांनी स्वतःजवळ एक पासपोर्ट-सदृश कागद बाळगला होता.
भटक्या जमातींच्या हिंस्त्र देशांना पार करण्यासाठी किंवा सिल्क रूटवर एखाद्या ठिकाणी थांबून रात्र घालवण्यासाठी ते या कागदाचा वापर करीत. पण यापेक्षाही कागदाचे सर्वांत महत्वाचे काम म्हणजे कागद हे ग्रंथरूपाने एकमेकांना बांधले गेले होते. हे ग्रंथ नव्या विचारांना वाहून नेण्यासाठी आणि मुख्यतः धर्मप्रचारासाठी वापरले जाऊ लागले.
४. मसाले: सिल्क रूटवरून वाहून नेल्या जाणाऱ्या मसाल्यांना स्वयंपाकात वापरण्यासाठी, धार्मिक समारंभांसाठी आणि औषध म्हणून देखील मोलाची किंमत होती. ज्याप्रमाणे रेशीम किडे जिवंत राहिले तरच कापड बनू शकते, त्याप्रमाणेच मसालेसुद्धा विशिष्ट वातावरणात वाढलेल्या वनस्पतींपासूनच उत्पादित केले जात असत. याआधी मसाले प्रामुख्याने प्राचीन सागरी सिल्क रूट वरून वाहून नेले जात. हा सागरी मार्ग बंदराच्या शहरांना इंडोनेशिया पासून पश्चिम दिशेने भारत आणि अरबी द्वीपकल्प द्वारे जोडतो.
५. जेड: हे स्फटिकासारखे हिरवे रत्न, चिनी संस्कार संस्कृतीचे केंद्र होते. इसवी सन पूर्व ५००० वर्षांपूर्वी चीनमध्ये जेडचा पुरवठा कमी झाल्यानंतर चिनी साम्राज्याने खोतान येथील इराणी साम्राज्याशी व्यापारी संबंध स्थापन केले. या साम्राज्याच्या नद्या न्रेफाईट जेडच्या साठ्यांनी समृद्ध होत्या. या रत्नाचा उपयोग मुर्त्या आणि दागिने घडवण्यासाठी केला जात. सिल्क रूटच्या माध्यमातून मोती आणि जेडसारख्या रत्नांचा व्यापार भरभराटीस आला.
६. काचेच्या वस्तू: बहुतांश पाश्चात्त्य लोकांच्या मते सिल्क रूट सुदूर पूर्वेपासून भूमध्य आणि युरोपपर्यंत प्रवास करतो. पण सिल्क रूटवरील व्यापार सर्व दिशांना गेला. पुरातत्त्वशास्त्रज्ञांना चीन, कोरिया, थायलंड आणि फिलिपिन्समध्ये उत्खननादरम्यान रोमन काचेच्या वस्तू सापडल्या आहेत. रोममध्ये तयार केलेल्या सोडा-लाईम काचेच्या प्रकाराचा रेशमी कापडांच्या व्यापारासाठी उपयोग केला गेला असावा असे मानण्यात येते.
७. फर: तैगा हे सदाबहार जंगल सायबेरियापासून ते पश्चिमेकडे विस्तारत पार उत्तर अमेरिकेतील कॅनडा पर्यंत जाते. या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोल्हे, सेबल, मिंक, बीव्हर आणि एर्मिन पेल्ट्स हे फरयुक्त प्राणी होते. यामुळेच चिनी राजवंशानी इतर युरेशियन उच्चभ्रूंना लक्झरियस फरचे कोट आणि टोप्या पुरवल्या. चंगेज खानने त्याच्या सुरुवातीच्या राजकीय युतींपैकी एक युती सेबल कोटची भेटवस्तू देऊन सुरु केली होती. सिल्क रूटद्वारे चिनी क्वीन्ग राजवंशातील शासक सायबेरियन ट्रॅपर्सकडून फर खरेदी करू शकत होते.
८. गुलाम: गुलाम लोक हे सिल्क रूटवरून वाहून नेणाऱ्या अनेक सामानांपैकी एक होते. छापा टाकणारे सैन्य युद्धकैद्यांना आणि इतर कैद्यांना घेऊन व्यापाऱ्यांना विकत असत. या सैनिकांना पश्चिमेकडील डब्लिन ते पूर्व चीनमधील शेडोंग पर्यंत दूरच्या बंदरांमध्ये आणि विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये खरेदीदार सापडत असत.
हे गुलाम राजदरबारांसाठी नोकर, करमणूक करणाऱ्या केवळ वस्तू बनून राहिल्या. त्यांना कोणतेही मानवी अधिकार दिले गेले नाहीत. प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये मध्ययुगीन चीन आणि आशियाच्या इतिहासाचे अभ्यासक शिन वेन म्हणतात, “गुलाम हे सिल्क रुटवरून व्यापार करणाऱ्या उच्चभ्रू लोकांच्या जीवनाचे अलंकार होते.”
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










