The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणेशोत्सव आणि मंगेशकर भावंडांच्या गणपती विशेष गाण्यांचं अतूट नातं आहे

by द पोस्टमन टीम
9 September 2021
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


ब्लॉग – प्रफुल कुलकर्णी

आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या सणाचा आनंद घेताना आपल्याला दिसतात. घरगुती व सार्वजनिक या दोन्ही प्रकारे हा सण आपण साजरा करत असतो. ज्या घरात गणपती येणार असतो, त्या घरात अगोदरपासूनच लगबग सुरू होते. साफसफाई, रंगरंगोटी, सजावट, पूजेची आणि नैवेद्याची तयारी या सगळ्या उत्साहाने घर भारून जातं. बच्चेकंपनीला यंदा कशा रुपात बाप्पा घरी आणायचा याची ओढ लागलेली असते. तरुण मुलंमुली सजावटीच्या तयारीत गढलेली असतात. महिलावर्ग मोदक आणि इतर पदार्थ करण्यासाठी आवश्यक ती तयारी करत असतात. घरातले आजीआजोबा बाकी सगळ्यांवर लक्ष ठेऊन गरज पडेल तशा सूचना, मार्गदर्शन करत असतात. एकूणच हा सण सगळ्यांना आनंद देतो.

गणेशोत्सव म्हटलं की जसं सजावट, गोड पदार्थ या गोष्टी येतात, तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे गणपतीची गाणी. गणपतीसमोर आपण आरत्या म्हणतो, भजन गातो. गणेशोत्सव म्हटला की, बाप्पाची गाणीही आलीच. अनेक वेगवेगळी गाणी आपण गेली अनेक वर्षं ऐकत आहोत. तरीसुद्धा ती गाणी आजदेखील तितकीच ताजी वाटतात, त्याचा कंटाळा येत नाही. मराठी असो वा हिंदी, त्यांच्याशिवाय गणेशोत्सव अपूर्णच वाटतो. ‘पार्वतीच्या बाळा’, ‘सनईचा सूर’, ‘बाप्पा मोरया रे’, ‘देवा हो देवा’, ‘प्रथम तुला वंदितो’, ‘देवा श्रीगणेशा’, ‘ॐकार स्वरुपा’ वगैरे बरीच गाणी आहेत, पण या सगळ्यात अग्रस्थानी आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली आरती व सोबत असलेली इतर गाणी. 

आजवर किमान दोन-तीन पिढ्यांचा गणेशोत्सव या गाण्यांबरोबरच साजरा झालाय. ‘गणराज रंगी नाचतो’, ‘तुज मागतो मी आता’, ‘उठा उठा सकळीक’ ही गाणी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. ‘गजानना श्री गणराया’ला तर आरतीचा दर्जा प्राप्त झालाय. अनेक आरत्यांच्या पुस्तकांत हे गाणंही छापलेलं दिसतं. साधारण १९७० पासून ही गाणी आपल्याकडे लोकप्रिय झालेली आहेत. पण जर तुम्हांला असं सांगितलं, की लता मंगेशकर यांची ही पहिलीच गणपतीच्या गाण्यांची कॅसेट नाही तर… जाणून घेऊया हा नक्की काय विषय आहे.



तुम्हांला हे माहीत असेल की, ऑडियो कॅसेट्स येण्याआधी आपल्याकडे लॉंग प्ले डिस्क म्हणजे एल.पी. रेकॉर्ड्सचा वापर गाणी ऐकण्यासाठी केला जात असे. ग्रामोफोनवर ही तबकडी लावून त्यावर ती सुई योग्यप्रकारे ठेवली, की गाणं सुरू व्हायचं. या रेकॉर्ड्सवर त्यांच्या आकाराप्रमाणे गाणी रेकॉर्ड केलेली असत. त्याकाळात प्रामुख्याने एच.एम.व्ही (हिज मास्टर्स व्हॉईस) म्हणजे आताची सारेगामा ही कंपनी या रेकॉर्ड्स बाजारात आणत असे. त्याशिवाय इतरही काही कंपन्या त्या काळात होत्या. त्यापैकीच एक होती स्टर्लिंग या नावाची म्युझिक कंपनी.

या कंपनीने सर्वप्रथम गणपतीच्या गाण्यांची एक अशी रेकॉर्ड त्यावेळी बाजारामध्ये आणली होती, ज्यात एकूण चार गाणी होती. ही सर्व गाणी मंगेशकर परिवारातील सदस्यांनीच गायली होती. या गाण्यांचे शब्द हे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे होते, तर संगीत दिलं होतं पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी. ‘आदिनाथाची गाणी’ असं या रेकॉर्डचं नाव होतं. योगायोग असा की, हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुलाचंही नाव आदिनाथ आहे.

पण दुर्दैवाने योग्य प्रमाणात प्रसिद्धी न झाल्यामुळे ही गाणी म्हणावी त्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचली नाहीत. काही काळानंतर स्टर्लिंग म्युझिक कंपनी बंद झाली, त्यामुळे त्या रेकॉर्ड्स बाजारात येणंही थांबलं. गाण्यांचे कॉपीराईट्सही तेव्हा दुसऱ्या कोणाकडे नव्हतेच. त्यामुळे तो अल्बम नीट पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलाच नाही.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

पण नंतर काही वर्षांनी ९०च्या दशकात जेव्हा गणपतीची गाणी यायची नव्यानं सुरुवात झाली, तेव्हा पुन्हा एकदा पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या पुढाकाराने हा अल्बम सर्व गाणी पुन्हा रेकॉर्ड करून प्रदर्शित करण्यात आला आणि आता ही गाणी आपण ऐकतोय. ती चार गाणी पुढीलप्रमाणे –

१. दाता तू गणपती गजानन – लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं आपण गेली बरीच वर्षं ऐकत आलोय. या अल्बमचं सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेलं गाणं बहुधा हेच असावं. या गाण्यावर दक्षिण भारतातल्या प्रसिद्ध ‘वातापी गणपतिं भजेहम’ या रचनेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. या दोन्ही रचना हंसध्वनी या शास्त्रीय संगीतातील रागावर आधारित आहेत. त्याकाळी आतासारखं दुसऱ्या प्रांतातील संगीत आपल्याकडे पोहोचत नसे. त्यामुळे अशी बरीचशी गाणी आपल्याला आजच्या काळात दिसतात, ज्यांचं मूळ हे आपल्या प्रादेशिक संगीतात किंवा लोकसंगीतात आहे.

२. ताल सुर वेद गान – हे गाणं गायिका आशा भोसले यांनी गायलं आहे. संपूर्णपणे शास्त्रीय बाजाचं हे गाणं आपल्या भारतीय संगीतातील ‘धृपद गायन’ या प्रकाराच्या जवळ जाणारं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतात धृपद गायन हा सध्या प्रचलित असलेल्या प्रकारांपैकी सर्वात जुना प्रकार मानला जातो. अकबराच्या दरबारात तानसेन ज्या प्रकारचं गायन करत असे, ते धृपदच होतं असं म्हणतात.

३. गजानन प्रणती गौरीकुमरा – हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायलं आहे. या गाण्यामध्ये मराठी लोकसंगीताबरोबरच गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेल्या दांडिया-गरबाचा तालही पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी वापरलेला आहे. हा अल्बम पुन्हा नव्याने येण्यापूर्वी लता मंगेशकर यांच्या आवाजात असलेलं ‘गजानन जननी तेरी जय हो’ हे हिंदी भजन याच गाण्याच्या चालीवर आलं होतं.

४. आले रे गणपती माझ्या दारी – पं. हृदयनाथ मंगेशकर यांची मुलगी राधा मंगेशकर हिच्या आवाजात हे गाणं आता ऐकायला मिळतं. जुन्या अल्बममध्ये हे गाणं कोणी गायलं होतं, याबद्दल आता नेमकी काही माहिती उपलब्ध नाही. हे गाणं बहुधा तुम्ही ऐकलेलं असेलच. १९८९ साली आलेल्या ‘निवडुंग’ या चित्रपटातलं ‘ना मानोगे तो’ हे आशा भोसले यांनी गायलेलं गाणं याच चालीवर होतं.

आता हा अल्बम अनेक वेगवेगळ्या नावांनी आपल्याला बाजारात दिसतो. काही वर्षांपूर्वी स्वतः गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एका दैनिकाच्या गणपती विशेषांकासाठी लिहिलेल्या लेखात या अल्बमचा उल्लेख केला होता. त्यात त्यांनी ज्या रेकॉर्डबद्दल लिहिलं होतं, त्यावर असलेली गाणी हीच होती याची १००% खात्री देता येत नसली, तरी एकूण गाण्यांच्या चाली पाहता तसं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘पीपल्स कार’ बनवण्यासाठी सरकारने जनतेचे करोडो रुपये अक्षरशः पाण्यात घातले होते

Next Post

या हेराने पाठवलेल्या संदेशाकडे रशियाने दुर्लक्ष केलं आणि जर्मन सैन्य थेट मॉस्कोत पोचलं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

या हेराने पाठवलेल्या संदेशाकडे रशियाने दुर्लक्ष केलं आणि जर्मन सैन्य थेट मॉस्कोत पोचलं

पराभूत होऊनही स्पार्टाकस अन्यायाविरुद्धच्या बंडाचं प्रतीक म्हणून अजरामर झाला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.