The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ब्रिटिश संशोधकामुळे भारतीय इतिहासातील कित्येक घटना प्रकाशात आल्या

by Heramb
8 September 2023
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपण जितकं इतिहासात डोकावू तितकं आपलं भविष्य उज्ज्वल असतं याचा प्रत्यय भारतीय इतिहास अभ्यासल्यास आपल्याला येऊ शकेल. वेळोवेळी इतिहास विसरून एकाच चुकीमुळे अनेक लढायांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आजमितीस काही दीडशहाणे इतिहासाला जातीच्या चष्म्यातून बघतात आणि आपापसातच संघर्ष पेटवून देतात. जातीपातींच्या राजकारणामुळे या कुकृत्यात अनेक राजकारणीही सामील असतात.

पण इंग्रजांनी धर्म-जात-निरपेक्ष इतिहासाचा अभ्यास केला, जेणेकरून त्यांना या देशावर राज्य करणं सोपं जावं. मॅनेजमेंटच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करून स्वॉट (SWOT) ॲनॅलिसिस (शक्ती, दुर्बलता, संधी आणि संभाव्य धोका यांचा अभ्यास)  केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र, ‘शिवाजी: द ग्रँड रेबेल’ या पुस्तकातून समोर आणणारा डॅनिस किंसेड हा तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेंसीचा ब्रिटिश अध्यक्ष होता. याने लिखित स्वरूपात महाराजांचा समग्र इतिहास समोर आणला.

तर मराठा साम्राज्याचा आणि महाराष्ट्राचा इसवी सन १००० पासूनचा समग्र इतिहास ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ या पुस्तकातून लिहिणारा सुद्धा एक ब्रिटिश, ग्रॅण्ट डफ होता. राजस्थानचा समृद्ध इतिहास ‘अनेल्स अँड अँटिक्स ऑफ राजस्थान’ या पुस्तकातून विलियम क्रूक आणि जेम्स टोड या दोन ब्रिटिशांनी लिहिला.

थोडक्यात आपल्याला शस्त्रं चालवता आली, पण शास्त्र वापरून लेखणी चालवणं आपल्याला जरा अवघडच गेलं. अण्णाभाऊ साठे आणि राजवाड्यांसारख्या थोर इतिहासतज्ज्ञांनीच काय तो इतिहासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. पण फक्त काही बोटांवर मोजता येण्याइतक्या तज्ज्ञांनी अभ्यास करून भागत नाही. संपूर्ण व्यवस्थेत तो खरा इतिहास पोहोचवून मागच्याला लागलेली ठेच पुढच्याला लागू नये म्हणून प्रयत्न करायचे असतात. म्हणूनच छत्रपतींनी सुद्धा कवींद्र परमानंदांच्या मदतीने ‘शिवभारत’ रचून घेतला. दरम्यानच्या काळात ‘शिवभारत’ही हरवला होता, पण कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नावाच्या व्यक्तीच्या प्रयत्नांतून १९२७ साली तंजावर येथील सरस्वती महाल पुस्तकालयातून मिळाला.

त्यासाठी प्रयत्न करत असताना दिवेकरांनी जगभर पत्रव्यवहार केला. जर्मन ओरिएंटल सोसायटी, लिपझीग संस्थेने एक पत्र दिवेकर यांना, “Catalogues Catalogorum by Theodor Aufrech” या नावाने उपलब्ध संस्कृत हस्तलिखितांची मोठी सूची सर्व युरोपीय देशांनी प्रसिद्ध केलेली आहे. या हस्तलिखित सूचीचे काही भाग हे पुण्याच्या आनंदाश्रम संग्रहालयात आहेत. जिज्ञासूंनी याचा पुढील शोध घ्यावा. बर्नेल या इंग्रज लेखकाने इसवी सन १८७९ मध्ये लंडन येथे प्रसिद्ध केलेल्या तंजावरच्या सरस्वती महल लायब्ररीतील या संस्कृत हस्तलिखितांच्या सूचीवरूनच आमच्या जर्मनीच्या सूचिकाराने आपण सूचित केलेल्या या शिवभारत ग्रंथाचे नाव समाविष्ट केले होते”, असे पत्र पाठवले.



जर्मनीवरून आलेल्या पत्राच्या आधारे शोध घेत असताना दिवेकर यांना पुण्याच्या आनंदाश्रम संग्रहालयात सापडलेल्या संस्कृत हस्तलिखित प्रतीत कवींद्र परमानंदांचे आणखी काही उल्लेख सापडले. दिवेकर यांनी जर्मनीवरून आलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या बर्नेल याची सूची तपासायला सुरवात केली. सूची पाहताना या शिवभारत ग्रंथाचे नाव मिळाले व त्याच्या हस्तलिखितांचा क्रमांक B. No. 1409 असा दिलेला आढळला. दिवेकर यांनी बर्नेलच्या सूचित सापडलेला B. No. 1409 हा नंबर तंजावरच्या सरस्वती महल ग्रंथालयास पाठविला आणि चौकशी करण्याबद्दल लिहिले. शोध घेतला असता सदर क्रमांकाचा संस्कृत हस्तलिखित ग्रंथ संग्रहालयास सापडला. त्यांनी दिवेकर यांना पत्र पाठवून संस्कृत हस्तलिखित सापडल्याचे कळविले.

दिवेकर यांनी तंजावर येथील परिचयातील एका व्यक्तीस सांगून या सापडलेल्या कवींद्र परमानंदाचे संस्कृतमधून लिहिलेले अस्सल शिवभारत हस्तलिखिताची शुद्ध नक्कल मागवून घेतली आणि आज हा ग्रंथ जगासमोर आला. म्हणजे अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असलेला लिखित स्वरूपातील इतिहासही आपल्याला नीट सांभाळता आला नाही.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

पण ब्रिटिशांचे अनेक अधिकारी भारतीय इतिहासाचा आणि साहित्याचा अभ्यास करत. जेम्स प्रिन्सेप हा त्यातीलच एक. जेम्स प्रिन्सेप रॉयल सोसायटीचा सदस्य होता. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचा संस्थापक असलेला जेम्स एक इंग्रजी विद्वान, प्राच्यविद्याशास्त्री आणि पुरातत्वशास्त्रज्ञ होता. त्याने भारतातील खारोस्थी आणि ब्राम्ही लिपींचा अभ्यास करून त्यांचा उलगडा केला. त्याने बनारस येथील टांकसाळेत परख मास्टर म्हणून भारतातील कारकीर्द सुरू केली. त्याचबरोबर त्याने संख्याशास्त्र, धातुशास्त्र आणि हवामानशास्त्राचाही अभ्यास केला. त्यांचे दस्तऐवजीकरण केले आणि त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.

जेम्स प्रिंसेप हा जॉन प्रिंसेप आणि त्याची पत्नी सोफिया एलिझाबेथ ऑरीओल यांचं सातवं अपत्य आणि दहावा मुलगा होता. १७९९ साली ब्रिटनमध्ये त्याचा जन्म झाला. स्वतःकडे काहीच नसताना जॉन प्रिन्सेप १७७१ मध्ये भारतात आला होता आणि एक यशस्वी ‘इंडिगो प्लांटर’ म्हणजेच नीळ उत्पादक शेतकरी बनला होता. १७८७ मध्ये ४० हजार युरोजच्या संपत्तीसह तो इंग्लंडला परतला आणि स्वतःला ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी म्हणवून घेतले. पुन्हा तोटा झाल्यावर तो १८०९ मध्ये क्लिफ्टनला गेला. सहकाऱ्यांमुळे सर्व मुलांसाठी काम मिळण्यास मदत झाली आणि प्रिन्सेप कुटुंबातील अनेक सदस्य भारतातच उच्च पदावर पोहोचले. जॉन प्रिन्सेप संसद सदस्य बनला.

जेम्स शिक्षणासाठी सुरुवातीला क्लिफ्टनमधील बुलॉकने चालवलेल्या शाळेत गेला होता. शाळेत जात असतानाच त्याला त्याच्या घरी त्याच्या मोठ्या भावंडांकडून शाळेपेक्षा अधिक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये तपशीलवार रेखाचित्र (डिजाईन) आणि मेकॅनिकल आविष्कारासाठी एक प्रतिभा होती आणि यामुळे त्याने सुप्रसिद्ध आर्किटेक्ट ऑगस्टस पुगिनबरोबर आर्किटेक्चरचा अभ्यास केला.

मात्र अज्ञात संक्रमणामुळे त्याची दृष्टी अधू झाली आणि तो आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करू शकला नाही. जेम्सच्या वडिलांना भारतातील एका टांकसाळेत पारखणी विभागात नोकरी उपलब्ध असल्याचे कळाले होते. मग त्यांनी जेम्सला एका हॉस्पिटलमध्ये रसायनशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले आणि नंतर ब्रिटनच्या राजकीय टांकसाळेत (रॉयल मिंट) परख मास्टर म्हणून काम करणाऱ्या रॉबर्ट बिंगले याचा प्रशिक्षणार्थी म्हणूनही पाठवले.

प्रिन्सपला कलकत्ता टांकसाळेत परख मास्टर म्हणून नोकरी मिळाली आणि १५ सप्टेंबर १८१९ रोजी आपला भाऊ हेन्री थोबीसह त्याने  कलकत्ता गाठले. कलकत्ता येथे एका वर्षाच्या आत त्याच्या वरिष्ठाने त्याला बनारस टांकसाळेत परख मास्टर म्हणून काम करण्यासाठी पाठवले. त्याचे वरिष्ठ प्रख्यात ब्रिटिश प्राच्यविद्याशास्त्री होरेस हेमन विल्सन होते. १८३० मध्ये तो टांकसाळ बंद होईपर्यंत तो बनारसमध्ये राहिला. त्यानंतर तो परत कलकत्त्याला डेप्युटी परख मास्टर म्हणून गेला आणि १८३२ मध्ये विल्सनने राजीनामा दिला तेव्हा त्याला परख मास्टर म्हणून नेमण्यात आले.

परख मास्टर म्हणून काम करताना त्याला वैज्ञानिक अभ्यासही करावा लागत असे. भट्टीत उच्च तापमान अचूकपणे मोजण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. १८२८ मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या तत्त्वज्ञानिक सत्रातील त्याच्या तंत्राच्या प्रकाशनामुळे रॉयल सोसायटीने त्याची ‘फेलो’ म्हणून निवड केली. १८३३ मध्ये त्याने भारतीय मोजमापातील उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या नवीन चांदीच्या रुपयावर आधारित एकसमान नाणे देण्याची बाजू मांडली. धान्याचा तीन-हजारावा भाग मोजता येण्याइतका संवेदनशील वजन-काटाही तयार केला.

जेम्स प्रिंसेपने बनारस येथील वास्तुकलेत रस घेतला. आपली दृष्टी परत मिळवून त्याने मंदिराच्या वास्तुशास्त्राचा अभ्यास केला आणि ते सचित्र केले, बनारस येथे नवीन टांकसाळ इमारत तसेच एक चर्चही त्याने डिझाइन केले. १८२२ मध्ये त्याने बनारसचे सर्वेक्षण केले आणि एका मैलासाठी ८ इंच या प्रमाणात अचूक नकाशा तयार केला. या नकाशाची इंग्लडमध्ये लिथोग्राफी करण्यात आली आहे.

त्याने बनारसमधील स्मारके आणि उत्सवांच्या वॉटर कलर्सने रेखाटलेल्या चित्रांची मालिकाच तयार केली. १८२९ मध्ये लंडनला पाठवली गेली आणि १८३० ते १८३४ दरम्यान ‘बनारस इलुस्ट्रेटेड’ नावाच्या चित्रांच्या मालिकेत प्रकाशित झाली. त्याने स्थिर सरोवरे काढण्यासाठी आणि बनारसच्या दाट लोकवस्तीच्या भागात स्वच्छता सुधारण्यासाठी कमानी बोगदा तयार करण्यास मदत केली आणि करमांसा नदीवर दगडी पूल बांधला.

जेव्हा तो पुन्हा कलकत्त्याला गेला, तेव्हा त्याने त्याचा भाऊ थॉमसने आखलेला एक कालवा पूर्ण करण्यास मदत करण्याची ऑफर दिली, पण १८३० मध्ये काही कारणास्तव ते काम अपूर्ण राहिले. हा कालवा कलकत्त्यातील हुगळी नदीला गंगेशी जोडण्याचे काम केले.

१८२९ मध्ये, कॅप्टन जेम्स डी. हर्बर्टने ग्लेनिंग्ज इन सायन्स या जर्नलची मालिका (सिरीयल) सुरू केली. १८३० मध्ये कॅप्टन जेम्स डी. हर्बर्टला अवधच्या राजाकडे खगोलशास्त्रज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले होते, जर्नलचं संपादकपद जेम्स प्रिंसेपच्या हाती आलं, कारण जेम्सने या जर्नलला विशेष योगदान देऊ केलं होतं.

१८३२ मध्ये त्यानी एच.एच. विल्सन यांच्यानंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचे सचिव म्हणून काम केले आणि सोसायटीने ग्लेनिंग्ज इन सायन्स जर्नल ताब्यात घेऊन एशियाटिक सोसायटीचे जर्नल तयार करावे असे त्याने सुचवले. प्रिन्सेप या जर्नलचा संस्थापक संपादक बनला आणि त्याने रसायनशास्त्र, खनिजशास्त्र, संख्याशास्त्र आणि भारतीय पुरातन वस्तूंच्या अभ्यासावर लेखांचे योगदान दिले.

त्याला हवामानशास्त्र आणि देशभरातील हवामान डेटाचे विश्लेषण करण्यातही खूप रस होता. आर्द्रता आणि वातावरणाचा दाब मोजण्यासाठी त्यांनी उपकरणांच्या कॅलिब्रेशनवर काम केले. नाणी प्रिन्सेपची पहिली आवड होती. त्यांनी बॅक्ट्रिया आणि कुशाण साम्राज्यामधील नाण्यांचा तसेच भारतीय मालिकांच्या नाण्यांचा अर्थ लावला, यामध्ये गुप्त साम्रज्याच्या मालिकेतील आहत नाण्यांचा समावेश आहे. त्याने कालांतराने आहत नाणी ही पूर्व भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असल्याचा अहवाल दिला. 

१८३८ मध्ये आजारी पडेपर्यंत त्याने जर्नल संपादित करणे सुरू ठेवले. आजारपणामुळे त्याला भारत सोडून जावे लागले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.

एशियाटिक सोसायटीच्या जर्नलचे संपादक असून प्रिंसेपने केलेलं कार्य संपूर्ण भारतात पोहोचलं. शिलालेखांच्या आणि विविध नाण्यांच्या प्रती त्याला संपूर्ण भारतातून पाठवण्यात आल्या. त्याने त्या उलगडल्या, अनुवादित केल्या आणि प्रकाशित केल्या.

ब्राह्मी लिपीचा उलगडा करण्याचे पहिले यशस्वी प्रयत्न १८३६ मध्ये नॉर्वेजियन विद्वान ख्रिश्चन लासेन यांनी केले, त्यांनी इंडो-ग्रीक राजे (यौवन) अगाथोकल्स आणि पँटालेऑन या द्विभाषिक ग्रीक-ब्राह्मी नाण्यांचा वापर करून अनेक ब्राह्मी अक्षरे अचूक ओळखली. त्यानंतर हे काम अलेक्झांडर कनिंघमच्या मदतीने प्रिंसेपने पूर्ण केले.

तसेच भारताच्या वायव्येला सापडणाऱ्या नाण्यांमध्ये आणि शिलालेखांमध्ये खरोस्थी लिपी होती. कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकारम, भारतीय एपिग्राफीचा संग्रह करण्याची कल्पना प्रथम प्रिन्सेपने सुचवली होती आणि १८७७ मध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांनी या कामाची औपचारिक सुरुवात केली होती. शिलालेखांवरील त्यांच्या अभ्यासामुळे अँटिओकस आणि इतर ग्रीक लोकांच्या संदर्भांवर आधारित भारतीय राजवंशांची तारीख निश्चित करण्यात मदत झाली.

प्रिन्सेपचे संशोधन आणि लेखन फक्त भारतापुरते मर्यादित नव्हते. त्याने अफगाणिस्तानच्या प्राचीन इतिहासाचा शोध घेतला आणि त्या देशातील पुरातत्वीय शोधांवरअनेक कलाकृती तयार केल्या, यामुळे अफगाणिस्तानचा खरा इतिहास बाहेर येण्यास मदत झाली.

प्रिन्सेप आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करीत होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. १८३८ पासून त्याला डोकेदुखीसदृश आजार होऊ लागले, यामुळे इच्छा नसतानाही त्याला काम सोडावे लागले. नोव्हेंबर १८३८ मध्ये तो इंग्लंडला रवाना झाला. आजारी स्थितीतच तो ब्रिटनला गेला, पण बरा होऊ शकला नाही.

अखेरीस २२ एप्रिल १८४० रोजी त्याची बहीण सोफियाच्या घरी त्याचा मृत्यू झाला. १८४३ मध्ये डब्लू. फित्झगेराल्डने त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पॅलेडियन पोर्च डिझाईन केले. हुगळी नदीच्या किनाऱ्यावरील प्रिंसेप घाट या ठिकाणी ते उभारण्यात आले आहे.

प्रिन्सेपसारख्या अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी भारताच्या दीर्घकालीन इतिहासाचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास आणि संशोधन केले. पण शाळा-महाविद्यालयांत मात्र फक्त गुलामगिरीचा इतिहास शिकवला गेला. आपण आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात असूनही त्या अभ्यासक्रमात विशेष असा बदल झाला नाही. म्हणजे बहुतांश भारतीय समाजाला ब्रिटिशांकडून ऐषारामी जीवनमान सोडलं तर काहीही शिकता आलं नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. हे सगळं होत असताना इतिहासाची वाईट पुनरावृत्ती होणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इंग्रजी कौन बनेगा करोडपतीमध्ये ‘चीटिंग’ करून जिंकला आणि आर्मीतून बेदखल झाला

Next Post

फ्लश टॉयलेट्समुळं हानोई शहरात उंदरांचं मोठं ह*त्याकांड घडलं होतं..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

फ्लश टॉयलेट्समुळं हानोई शहरात उंदरांचं मोठं ह*त्याकांड घडलं होतं..!

९/११चा ह*ल्ला झाला तेव्हा अमेरिकेला धार्मिक द*हश*तवादाच्या गंभीर समस्येची जाणीव झाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.