आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्रत्येक खेळाडूची स्वत:ची एक विशिष्ट शैली असते. क्रिकेटचा विचार केला तर, प्रत्येक गोलंदाजाची बॉल फेकण्याची वेगळी पद्धत असते. प्रत्येक फलंदाजाचा स्टान्स वेगळा असतो. कुठल्या हातानं फलंदाजी करायचे हे देखील अगोदरच ठरलेलं असतं. साधारण ज्या हातानं आपण जेवतो आणि लिहितो त्याच हातानं फलंदाजी केली जाते. त्यात ऐनवेळी बदल करणं महाकठिण काम आहे. मात्र, सुनिल गावसकर यांनी एकदा अचानक डाव्या हातानं फलंदाजी केली होती! गावसकर यांनी हा निर्णय स्वेच्छेनं घेतला नव्हता तर त्यामागे एक गोलंदाज कारणीभूत होता. हो, एका गोलंदाजाच्या माऱ्यापासून स्वत:चा बचाव करून संघाला विजय मिळवून देण्यासाठी गावसकर यांनी डाव्या हातानं फलंदाजी केली होती.
सुनिल गावसकर यांच्यासारख्या कसलेल्या फलंदाजाला डाव्या हातानं खेळण्यास भाग पाडणारा तो गोलंदाज होता तरी कोण? रघुराम भट, असं या गोलंदाजाचं नाव.
माजी भारतीय खेळाडू अडवाई रघुराम भट यांचा जन्म १६ एप्रिल १९५८ रोजी पुत्तूर या ठिकाणी झाला होता. त्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी धडाकेबाज गोलंदाजी केलेली आहे. रघुराम भट यांनी शालेय आणि कनिष्ठ स्तरावरील क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर रणजीमध्ये त्यांची एन्ट्री झाली होती. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर १९७९-८० च्या हंगामात तामिळनाडूविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये भट यांनी पदार्पण केलं. पदार्पणाचा सामना त्यांच्यासाठी विशेष ठरला नाही. त्यात फक्त एक विकेट घेता आली.
त्यानंतर आपल्या सहाव्या प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी केरळविरुद्धच्या सामन्यात ९ विकेट्स घेतल्या. उपांत्यपूर्व फेरीत पंजाबविरुद्ध देखील त्यांनी ९ विकेट्स घेत कर्नाटकला उपांत्य फेरी गाठण्यास मदत केली होती.
१९८१-८२ च्या रणजी हंगामात भट यांनी अनेक फलंदाजांना त्रस्त केलं होतं. अगदी सुनिल गावसकर देखील यातून सुटले नव्हते. उपांत्य फेरीत मुंबईविरुद्धच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. १९८१-८२ रणजी ट्रॉफीचा उपांत्य सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई आणि कर्नाटक यांच्यात खेळला गेला होता. मुंबईच्या संघात तत्कालीन भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंचा समावेश होता. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, अशोक मांकड, संदीप पाटील, रवी शास्त्री आणि बलविंदर संधू यांच्या उपस्थितीमुळं मुंबईच्या संघाला बलाढ्य समजलं जाई.
सुनिल गावसकर मुंबईच्या रणजी संघाचे कर्णधार होते. नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुलाम पारकरसह डावाची सुरुवात करून गावसकर यांनी संघाला ६२ धावांपर्यंत नेलं. त्यानंतर रघुराम भट गोलंदाजीसाठी आले आणि त्यांनी मुंबईच्या कर्णधाराला ४१ धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर आलेले दिलीप वेंगसरकर देखील अगदी कमी धावा काढून माघारी गेले.
गुलाम पारकर यांनी एका बाजून गड राखण्याचं काम सुरू केलं होतं. संदीप पाटील आणि पारकर यांनी १०१ धावांची भागीदारी केली. मात्र, जम बसवलेल्या गुलाम पारकर यांना चकवण्यात रघुराम भट यांना यश आलं. पारकर झाल्यानंतर मैदानात आलेल्या अशोक मांकड यांना देखील भटनी लवकर माघारी पाठवलं. त्यावेळी मुंबईची अवस्था ५ बाद १८४, अशी होती. त्यानंतर आलेल्या सरू नायक यांना बाद करून रघुराम भट यांनी आपली हॅट्रीक पूर्ण केली.
आणखी तीन विकेट्स मिळवून रघुराम भटनं त्यावेळची आपली सर्वोत्तम कामगिरी केली. १२३ धावांच्या बदल्यात त्यांनी ८ विकेट्स घेतल्या होत्या. मुंबईचा पहिला डाव २७१ धावांवर आटोपला गेला.
त्यानंतर कर्नाटकनं आपल्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. सुधाकर रावच्या सुरेख शतकामुळं आणि ब्रिजेश पटेलच्या ७८ धावांच्या जोरावर कर्नाटकनं मुंबईला सहज ओव्हरटेक केलं. त्यानंतर सय्यद किरमानी आणि रघुराम भट यांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळं कर्नाटकचा संघ ४७० धावांपर्यंत पोहोचला.
मुंबईचा दुसरा डाव सुरू होईपर्यंत खेळपट्टीची अवस्था फारशी चांगली राहिली नव्हती. ती स्पिनर्सला अनुकुल झाली होती. रघुराम भट यांचा फॉर्म पाहता मुंबईच्या चिंतेत वाढ झाली होती. डावाची सुरुवात करण्यासाठी गुलाम पारकर यांच्यासोबत दिलीप वेंगसरकर यांना पाठवण्यात आलं. दोघांनी ७२ धावांची सलामी दिली.
दुसऱ्या डावातही भट यांनी दिलीपच्या रुपात पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर लगेच सरू नायकला बाद केलं. रघुराम भट आणि बी. विजयकृष्ण या कर्नाटकी जोडगोळीनं मुंबईची अवस्था ६ बाद १६० करून ठेवली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईचा सलामीवीर आणि कर्नधार सुनील गावसकर आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले.
भटची गोलंदाजी पाहून सुनिल यांनी डाव्या हातानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळं सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी रघुरामसाठी डाव्या हातानं तर विजयकृष्णसाठी उजव्या हातानं फलंदाजी केली. त्यांचा हा निर्णय काहीसा योग्य सिद्ध झाला.
जवळपास तासभर अशा पद्धतीनं गावसकर यांनी दोन्ही बाजूंनी फलंदाजी केली होती. मात्र, सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व असलेल्या कर्नाटकनं हा सामना जिंकला. या सामन्यात एकट्या रघुराम भट यांनी या १३ विकेट्स मिळवल्या होत्या.
पुढील वर्षीचा रणजी हंगाम देखील भटसाठी फलदायी ठरला. कर्नाटकनं पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईला हरवून तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात भट यांनी ४ विकेट्स घेतल्या होत्या. ते त्यावर्षीचा इराणी करंडक देखील खेळले आणि त्यात त्यांनी ७ विकेट्स मिळवल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीमुळं प्रसिद्धी मिळाली आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी त्यांची निवड झाली.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर रघुराम भटनं पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. त्यांची पहिलीच कसोटी विकेट जावेद मियांदादची होती. नंतर त्यांनी मुदस्सर नजरची विकेटही घेतली. भारतानं तो सामना बरोबरीत सोडवला होता. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध ते आपला दुसरा कसोटी सामना खेळले. त्या सामन्यात त्यांनी क्लाईव्ह लॉयड आणि गस लॉजीच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर मात्र, त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी अनेक पदांवर काम केलेलं आहे. अंपायर, प्रशासक आणि प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत होते. जुलै २०११ मध्ये त्यांची गोवन क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
स्थानिक क्रिकेटमध्ये रघुराम भट यांच मोलाचं योगदान आहे. कर्नाटकमधील नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं त्यांनी काम केलं. त्यांना आणखी संधी मिळाली असती तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगली कामगिरी केली असती, हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










