आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगात झालेलं पहिलं महायु*द्ध आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या यु*द्धादरम्यान अनेक छोट्या-मोठ्या लढाया झाल्या. अनेक देशांचं अतोनात नुकसान झालं.
२८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ हा पहिल्या महायु*द्धाचा कालावधी! पहिल्या महायु*द्धात अनेक देश सहभागी झाले होते. या चार वर्षांच्या कालावधीत जगभरातल्या शंभराहून अधिक देशांवर या यु*द्धाचा वाईट परिणाम झाला. जगभरात अनेक ठिकाणी मोठी यु*द्ध, लहान-लहान लढाया चालूच होत्या. त्यातलीच एक लढाई म्हणजे “टांगाची लढाई”. याच टांगाच्या लढाईला “मधमाश्यांची लढाई”, (battle of bees) म्हणूनही ओळखलं जातं.
पण या लढाईला असं नाव नेमकं कशावरून पडलं? या लढाईत “bees” चा म्हणजेच मधमाश्यांचा नक्की संबंध काय??
ही गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला १९१४ सालात जावं लागेल. जगात काही देशात फारच धुसफूस चालू होती, जग पहिल्या महायु*द्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं होतं.
त्याच काळात नोव्हेंबर १९१४ मध्ये पूर्व आफ्रिकेत ही “टांगाची लढाई” झाली. त्या काळी आफ्रिकेतला जास्तीत जास्त भाग हा ब्रिटनच्या प्रभावाखाली होता; पण असं असूनही पूर्व आफ्रिकेतला काही भाग हा जर्मन लोकांनी स्वतःच्या हाताखाली ठेवला होता. जर्मनांच्या हातात असलेल्या या भागातला एक भाग म्हणजे “जर्मन पूर्व आफ्रिका”. तेव्हाचं जर्मन पूर्व आफ्रिका म्हणजे आत्ताचा टांझानिया देश होय.
जर्मन पूर्व आफ्रिकेच्या किनारी भागावर टांगा शहर वसलेलं आहे. हे टांगा शहर तेव्हा एक अत्यंत महत्त्वाचं बंदर होतं. “ब्रिटिश पूर्व आफ्रिका” (आत्ताचं केनिया) पासून टांगा बंदर ५० मैल दूर होतं.
टांगा हे एक महत्त्वाचं शहर, आणि त्याकाळी सर्वात व्यस्त असलेलं आणि अगदी मोक्याच्या जागी असलेलं बंदर होतं. पहिलं महायु*द्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांना हे टांगा बंदर जिंकून घ्यायचे वेध लागले. त्यासाठी त्यांनी लागलीच प्रयत्न सुरू केले.
ब्रिटिश पूर्व आफ्रिकेच्या गव्हर्नरने ब्रिटिश सरकारकडे मदतीची विनंती केली. शेजारीच असलेल्या जर्मन लोकांशी दोन हात करण्यासाठी ब्रिटिश पूर्व आफ्रिका हळूहळू सज्ज व्हायला लागली.
ब्रिटिश सरकारने तब्बल ८००० माणसांची फौज पूर्व आफ्रिकेत पाठवून देण्याची तयारी सुरू केली. या ह*ल्ल्याची जबाबदारी ५३ वर्षीय “मेजर जनरल आर्थर एडवर्ड एटकेन” याच्यावर देण्यात आली. मेजर एटकेन हा एक ब्रिटिश-इंडियन आर्मी ऑफिसर होता, तो त्यावेळी पुण्यात कार्यरत होता.
८००० लोकांची फौज सोबतीला असल्यामुळे मेजर एटकेनला ही लढाई आपणच जिंकू असा विश्वास होता. ही फौज आठ हजारांची असली तरी त्यातल्या सैनिकांना लढाईचं फारसं प्रशिक्षण देण्यात आलेलं नव्हतं. त्यांच्याकडे लढाई जिंकण्यासाठी अद्ययावत अशी यु*द्धसामग्रीही नव्हती. मेजर एटकेनला लढाई जिंकण्याचा विश्वास असला तरी त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लढाई हरण्याची चिंता सतावत होती. त्या अधिकाऱ्यांनी, आफ्रिकेतले जर्मन सैनिक हे अतिशय चांगलं प्रशिक्षण घेऊन यु*द्धासाठी सज्ज आहेत, असंही मेजर एटकेनला समजावलं पण त्याचा काहीएक परिणाम झाला नाही.
अखेर १६ ऑक्टोबर १९१४ रोजी ४५ जहाजांचा काफ़िला मुंबईहून निघाला. हा २ आठवड्यांचा प्रवास सगळ्याच सैनिकांसाठी अतिशय त्रासदायक ठरला. जहाजांवर त्या गर्दीत आणि त्या उन्हात त्यांना मळमळू लागलं, अनेकांना उलट्या झाल्या.
२ नोव्हेंबरला ही जहाजं टांगा बंदरात पोहोचली. २ ब्रिटिश एजंट्सना टांगाच्या किनारपट्टीवर ठेवण्यात आलं.
त्यातल्या एकाला दिसताक्षणी गोळ्या घालण्यात आल्या. दोन दिवसांनी जखमी अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. हा टांगाच्या लढाईतला पहिला मृत्यू!!
जर्मनीच्या बाजूने कमांडर पॉल वॉन लेटाव वोर्बेककडे लढाईची जबाबदारी होती. त्याने लगेचच टांगा शहरात आपलं सैन्य रेल्वेने धाडून दिलं.
इकडे ब्रिटिश पूर्व आफ्रिकेचा मेजर एटकेन आपल्या सैनिकांना कुठे उतरवायचं या विचारात होता. त्यासाठी त्यांना त्या जागेची माहिती असणं आवश्यक होतं पण त्यांना या जागेबद्दल काहीच माहिती नव्हती. आधी कोणी ती जागा बघितलीही नव्हती. अशा वेळी आपलं सैन्य एका अनोळखी जागी उतरवणं म्हणजे ब्रिटिश सैन्यासाठी एक मोठा धोकाच होता.
अखेर त्यांनी एक जागा निवडली जिथे फारशी खारफुटीची झाडं नसतील, अडथळे नसतील. २-३ नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी आपलं थोडं सैन्य तिथे उतरवलं. प्रत्येकाने ठरल्याप्रमाणे आपापली जागा घेतली.
ब्रिटिश पूर्व आफ्रिकेचे सैनिक हे फारसे प्रशिक्षित नव्हते. त्यात त्यांनी २ आठवड्यांचा अतिशय दमवून टाकणारा असा प्रवास केला होता. जहाजात अत्यंत गर्दी, गर्मी आणि आजारपणाचा सामना त्यांना करावा लागला होता. जहाजावर दिलं गेलेलं जेवणही चांगल्या प्रतीचं नव्हतं. अनेक रात्री न झोपता काढल्या होत्या.
हे सगळं कमी म्हणून की काय जिथे लढाई लढायची त्या ठिकाणाची पुरेशी माहितीही त्यांच्याकडे नव्हती, आपला शत्रूपक्ष किती ताकदवान आहे याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. एक लढाई हरण्यासाठी अजून काय हवं असतं!!!
२ दिवसांनी म्हणजेच ४ नोव्हेंबरला दुपारी मेजर एटकेनने आपल्या सैन्याला टांगा शहराकडे कूच करण्याचा हुकूम दिला.
काही ब्रिटिश-इंडियन सैन्याला टांगा शहराकडे जाताना आगीचा सामना करावा लागला तर काहींवर तलवारीने वार करण्यात आले. याच दरम्यान शहराच्या दक्षिणेकडे एक वेगळीच घटना घडली.
शहराच्या दक्षिणेकडे बरीच झाडं होती. या झाडांवर मोठमोठे मधमाश्यांचे पोळे लटकले होते. लढाईत चालवल्या गेलेल्या रायफल्स आणि मशीन गन्समधून निघालेल्या काही गोळ्या या मधमाश्यांच्या पोळ्याला जाऊन लागल्या. ज्या क्षणी या पोळ्यांना धक्का बसला त्या क्षणी हजारो मधमाश्या सैनिकांवर धावून गेल्या.
ब्रिटिश पूर्व आफ्रिका आणि जर्मनी अशा दोन्ही बाजूच्या सैनिकांना या अचानक ओढवलेल्या संकटाचा सामना करावा लागला. एका सैनिकाच्या डोक्यात तर ३०० मधमाश्यांनी दंश केल्याची नोंद आहे!
याखेरीज या लढाईत अनेक मेजर, लेफ्टनंट, कर्नल आणि मोठमोठे अधिकारी मारले गेले. लढाईत किती सैनिक मारले गेले हे तर मोजायलाच नको! आपण ही लढाई जिंकणं शक्य नाही हे ब्रिटिश पूर्व आफ्रिकेला समजताच ५ नोव्हेंबर रोजी जर्मनीसोबत तहाची बोलणी करायला एका अधिकाऱ्याला पाठवण्यात आलं.
या यु*द्धात ब्रिटिश-इंडियन आर्मीचे ८४७ सैनिक जखमी झाले. या ८४७ सैनिकांपैकी ३६० जणांचा मृत्यू झाला.
याउलट जर्मन सैन्याचे १४८ सैनिक जखमी झाले तर त्यातली ६८ जणांचा मृत्यू झाला. लढाई संपल्यानंतर ब्रिटिश-इंडियन सैन्याच्या मशीन गन्स आणि रायफल्सचा मोठा साठा जर्मन सैन्याने ताब्यात घेतला. या लढाईनंतर जर्मनीचा पॉल वॉन लेटाव वोर्बेक तर हिरो बनला. दिवसेंदिवस त्याची प्रसिद्धी वाढतच गेली. “कधीही कोणतीही लढाई न हरलेला” माणूस म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं.
‘ब्रिटिश ऑफिशियल हिस्ट्री ऑफ द वॉर’नुसार टांगाच्या लढाईला ‘ब्रिटिश मिलिटरीच्या इतिहासातला सर्वात मोठा पराभव, लढाईत आलेलं अपयश’ मानलं जातं.
तर अशी होती ही पुरेशा नियोजनाअभावी लढवली गेलेली टांगाची लढाई म्हणजेच “The battle of bees”. या लढाईमुळे ब्रिटिश-इंडियन सैन्याची जगात चांगलीच नाचक्की झाली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










