आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सध्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळलं जातं. त्यातून खेळाडूंना अल्पावधीत अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळते. पूर्वी असं नव्हतं. जगभरात फक्त कसोटी क्रिकेट खेळला जाई. त्यात खेळाडूंच्या सर्व क्षमतांचा कस लागत असे. कसोटी क्रिकेटमध्ये बॅटींग करण्यासाठी फक्त चांगलं बॅट्समन असून चालत नाही. तुमच्याकडे ‘something extra’ पाहिजे. विशेषत: तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तर खेळाडूचं कौशल्य आणि संयमाची ‘कसोटी’ लागते.
क्रिकेटमध्ये एक वाक्प्रचार फार प्रसिद्ध आहे, ‘form comes and goes, but class remains’. दिलीप वेंगसरकर नावाची व्यक्ती हा वाक्प्रचार अक्षरश: जगली आहे.
६ एप्रिल १९५६ रोजी रत्नागिरीतील राजापूरमध्ये दिलीपचा जन्म झाला. दिलीप बळवंत वेंगसरकर असं त्यांचं पूर्ण नाव. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. ‘ड्राइव्ह शॉट्स’ खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांना मानाचं स्थान आहे. संघातील खेळाडू दिलीप यांना ‘कर्नल’ या टोपण नावानं हाक मारत. तर विश्वविजेता कर्णधार कपील देव यांच्यासाठी दिलीप ‘छोटे नवाब’ होते. सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासोबत मिळून ७० आणि ८०च्या दशकात दिलीप यांनी जगभरातील क्रिकेट रसिकांना भारतीय फलंदाजीचं श्रेष्ठत्त्व मान्य करण्यास भाग पाडलं.
१९७५-७६ (डिसेंबर आणि जानेवारी) साली भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्या संघात दिलीप यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना खेळण्याची संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, ऑकलंड येथील सामन्यात भारतानं सलामीवीर म्हणून दिलीपला मैदानात उतरवलं. हे त्यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पहिलं पाऊल होतं. ऑकलंडमधील कसोटी भारतानं जिंकली. मात्र, आपल्या पहिल्या सामन्यात दिलीप फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
नंतर त्यांना गरज पडेल तसं तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. विशेषत: तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्यांनी धावांचा पाऊस पाडला.
१९७९ मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला येथे आसिफ इक्बालच्या पाकिस्तानी संघाविरुद्ध दिलीपनी अविस्मरणीय खेळी केली. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींमध्ये तिचा नक्कीच समावेश करावा लागेल. कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी ३९० धावांची आवश्यकता होती. दिलीप यांनी धडाकेबाज खेळी करत संघाला विजयाच्या अगदी जवळ आणलं होतं. मात्र, इतरांची साथ न मिळाल्यानं त्यांना यश आलं नाही. भारतीय संघाला ३६४ धावांपर्यंतच मजल मारता आली. विजयासाठी २६ धाव कमी पडल्या.
ब्रेकनंतर यशपाल शर्मा, कपिल देव आणि रॉजर बिन्नी पाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतले होते. तेव्हा वेंगसरकरने आपल्या हातात सूत्रे घेत फटकेबाजी केली. त्या सामन्यात दिवसअखेर दिलीप १४६ धावांवर नाबाद राहिले.
७० आणि ८०च्या दशकात वेस्ट इंडिज फास्ट बॉलर्सची जागतिक क्रिकेटमध्ये द*हश*त होती. अनेक कसलेल्या खेळाडूंना मार्शल, मायकल होल्डिंग अँडी रॉबर्ट्स सारख्या बॉलर्सचा सामना करणं कठीण जाई. मात्र, दिलीप यांना कधीच फारशी अडचण आली नाही. ते अगदी आरामात या गोलंदाजांचा आपल्या बॅटनं समाचार घेत. कारकिर्दीतील १७ कसोटी शतकांपैकी ६ शतकं त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध काढली आहेत.
१९७८-७९मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील एक सामना कलकत्त्यात खेळवण्यात आला होता. त्यात सुनील आणि दिलीप या मराठमोळ्या जोडीनं ३००पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. दोघांनी शतके ठोकली होती. १९८३ च्या विश्व विजेत्या भारतीय संघाचे दिलीप सदस्य होते. मात्र, स्पर्धेमध्ये त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. १९८५ ते १९८७ या काळात त्यांनी अप्रतिम खेळ करत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्ध शतके ठोकली होती.
पुढे १९८७च्या विश्वचषकानंतर वेंगसरकर यांनी कपिल देव यांच्याकडून कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते काहीसे वादात सापडलेले होते. सी फुडच्या ऍलर्जीमुळे दिलीप यांना सेमी फायनल खेळता आली नव्हती आणि तो सामना भारतानं गमावला होता. टीका होत असतानाही त्यांनी कर्णधार म्हणून पहिल्याचं मालिकेत दोन शतकं ठोकली. कर्णधारपदाचा काळ त्यांच्यासाठी त्रासदायक ठरला. १९८९च्या सुरूवातीच्या काळात निराशाजनक वेस्ट इंडीज दौर्यानंतर ते पदावरून पायऊतार झाले.
लॉर्ड्स स्टेडिअमला क्रिकेटची पंढरी आणि मक्का समजलं जातं. याचं मैदानावर सलग तीन दौऱ्यांमध्ये कसोटी शतकं झळकावणं दिलीप वगळता जगातल्या कोणत्याही फलंदाजाला शक्य झालेलं नाही.
लॉर्ड्सवर सलग तीन शतकं झळकावणारा दिलीप वेंगसरकर हे जगातील एकमेव फलंदाज आहे. सुनील गावसकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दिग्गजांना आपल्या कारकिर्दीत याच लॉर्डसवर एकही शतक झळकावता आलेलं नाही.
१९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून भारतानं इतिहास रचला होता. त्या मालिकेत ३६० धावा करून दिलीप यांनी मालिकावीराचा किताब मिळवला होता. त्यांच्या कामगिरीमुळं १९८७ मध्ये त्यांना ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ दी इयर’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्याच वर्षी भारत सरकारनं त्यांना ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान दिला.
कूपर आणि लिब्रँड यांनी क्रिकेट खेळाडूंची रेटिंग पद्धती सुरू केली. या पद्धतीतील पहिला सर्वोत्तम फलंदाज म्हणून दिलीप यांना मान मिळाला होता. २ मार्च १९८९पर्यंत सलग २१ महिने ते फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होते. हा एक विक्रमचं आहे. ८०च्या दशकात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दिलीप वेंगसरकर तिसर्या क्रमांकावर होते.
बॉर्डर आणि मियांदादनंतर त्यांनी १२ शतकं आणि २३ अर्धशतकांसह ४६.०५ च्या सरासरीनं ४६५२ धावा केल्या होत्या. एकाच कसोटी सामन्यात शतक आणि शून्यावर बाद होणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये देखील दिलीप आहेत. याशिवाय एकाच सामन्यात ओपनिंग करून त्यांनी गोलंदाजी देखील केलेली आहे. ५ हजारपेक्षा जास्त धावा करून क्षेत्ररक्षण करताना त्यांनी ५० खेळाडूंना बाद केलेलं आहे, ही बाब अतिशय कमी जणांना माहिती आहे.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दिलीप वेंगसरकर यांनी ईएलएफ-वेंगसरकर अकॅडमी सुरू केली. सध्या ते मुंबईत दोन व पुण्यात एक अकॅडमी चालवतात. या अकॅडमींमध्ये कौशल्याच्या बळावर निवडलेल्या खेळाडूंना विनामूल्य क्रिकेट प्रशिक्षण दिलं जातं. अलीकडेच त्यांनी स्वतःची वेबसाइट देखील सुरू केली आहे. भारतातील नवोदित खेळाडूंना मदत करणं हा त्यामगचा हेतू आहे. सध्या ते ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ तेलंगणा’चे मुख्य सल्लागार आहेत. याशिवाय सेलिब्रेटी क्रिकेट लीगच्या पाचव्या सिझनमध्ये ते ‘तेलुगु वॉरिअर्स’ संघाचे प्रशिक्षक होते.
भारताचे माजी कर्णधार असलेल्या दिलीप यांना कधीच प्रकाशझोतात राहणं आवडलं नाही. त्यांचा कसदार खेळ मात्र, त्यांना कायम दुनियेच्या नजरेत आणत राहिला. मराठमोळ्या वेंगसरकरांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं होतं. आता देखील भारतीय क्रिकेटला प्रतिभावंत खेळाडू मिळावेत म्हणून ते झटत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










