The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातलं पहिलं मनगटी घड्याळ नेपोलियनच्या बहिणीने मनगटावर धारण केलं होतं..!

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


काळाइतकं गतिमान होऊन या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मानवाची अविरत धडपड गेली कित्येक वर्षे चालूच आहे. हनुमंतासारखा ‘काळ केला देशधडी’ म्हणण्याइतपत जरी मानव विकसित झालेला नसला तरी त्याने सावकाश का होईना काळासोबत बदलायला सुरुवात केली होती. चंद्र आणि सूर्य या कालगणनेच्या साधनांपासून त्याने दिवस व रात्र अशी परिमाणे ठरवली. यथावकाश त्यात बदल होत प्रहर, तासिका, घटका मोजल्या जाऊ लागल्या आणि वेळ मोजण्याची नवनवी साधने विकसित होऊ लागली.

संदर्भग्रंथांनुसार पहिलं घड्याळ महान संशोधक आर्कीमिडीजने बनविल्याचं सांगण्यात येतं मात्र त्यात खरी अचूकता आली ती सतराव्या शतकात, जेव्हा ख्रिस्तियन हायगन्स या डच संशोधकाने पेंडुलम क्लॉकची निर्मिती केली. कालांतराने पोकेटवॉचेसही निर्माण झाले ज्याचा वापर प्रामुख्याने पुरुषांकडून होत होता, अगदी विसाव्या शतकापर्यंत. मात्र, इथेही बऱ्याच वर्षांपूर्वी स्त्रियांनी एक दागिना म्हणून रिस्टवॉचेस वापरायला सुरुवात करून एक पाऊल पुढेच टाकलं होतं!

रिस्टवॉचेसच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली ती एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी!

सन १८१० मध्ये अब्राहम-लुईस ब्रिगेटने नेपल्सच्या राणीसाठी जगातलं सगळ्यात पहिलं मनगटी घड्याळ बनवलं. नेपोलिअनची लहान बहीण असलेली ही राणी मनगटी घड्याळ वापरणारी ही पहिली व्यक्ती ठरली. 

मनगटी घड्याळांची खरी सुरुवात मात्र सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला झाल्याचं मानण्यात येतं आणि त्यासाठी पहिल्या एलिझाबेथला रॉबर्ट डडली या तिच्या प्रियकराने भेटवस्तू म्हणून दिलेल्या ‘आर्मवॉच’चा दाखला देण्यात येतो.



एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अनेक नवनवी मनगटी घड्याळं ‘ब्रेसलेट’चा नवा प्रकार म्हणून स्त्रीवर्गामध्ये विशेष लोकप्रिय झाली आणि स्त्रियांनीही हा ‘हातावर बांधलेला काळ’ मोठ्या दिमाखात मिरवला. त्यावेळी पुरुष अजूनही कोटाला जोडलेल्या साखळीच्या पोकेटवॉचेसमध्ये रममाण होते. त्याचवेळी विसाव्या शतकाकडे या जगाची वाटचाल सुरु असताना लष्कराने मनगटी घड्याळांचा वापर करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला कारण प्रतिकूल परिस्थितीत, हातघाईच्या लढायांमध्ये पॉकेटवॉचेस कुचकामी ठरत असल्याचं निष्पन्न झालं होतं.

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटींचा सामना करण्यासाठी बंडखोरांची, क्रांतिकारकांची फौज आता सज्ज झाली होती. हे बंड थोपवण्यासाठी ब्रिटीशांना भरमसाठ फौजफाटा आणि शस्त्रसामग्रीसोबतच संपूर्ण कार्यप्रणालीत सुसूत्रता आणणेही महत्त्वाचे झाले होते. त्यावेळी ही मनगटी घड्याळ ब्रिटीश सैन्याच्या पाठीशी दत्त बनून उभी राहिली.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

नोव्हेंबर १८८५ मध्ये घडलेल्या तिसऱ्या बर्मा यु*द्धामध्ये ब्रिटीश सैन्याने सर्वप्रथम या मनगटी घड्याळांचा वापर करत पुरुषांसाठीही मनगटी घड्याळं बनवण्याच्या कल्पनेला अप्रत्यक्षरीत्या चालनाच दिली. मनगटावर बांधता येण्याजोग्या चामड्याच्या पट्ट्यांवर बसवलेले हे पॉकेटवॉचेस त्यांच्या उपयुक्तता आणि शानदार शैलीमुळे लष्करातील अधिकाऱ्यांच्या पसंतीस पडले.

‘मॅपिन अँड वेब’ या इंग्लिश कंपनीने पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या घड्याळांचं उत्पादन वाढवलं. यातली काही घड्याळं ‘कॅम्पेन वॉच’ म्हणून सैनिकांमध्ये विशेष लोकप्रिय होती. 

पहिल्या महायु*द्धानंतर लष्करी कारवायांमध्ये अचूकता, शिस्तबद्धता आणि सुसूत्रता वाढावी यासाठी मनगटी घड्याळांचा खप वायुवेगाने वाढू लागला. १९१७ साली ब्रिटीश सैन्यातील प्रत्येक सैनिकाला युनिफॉर्मसोबतच मनगटी घड्याळही दिले जाऊ लागले. सुरुवातीला चार शिपायांमध्ये एक घड्याळ वापरण्याची पद्धत जाऊन १९३० पर्यंत आता प्रत्येक सैनिकाकडे एक मनगटी घड्याळ दिसू लागलं होतं. काळाची गरज म्हणून बाजारात आलेलं हे उत्पादन आता पौरुषत्वासोबतच ऐश्वर्य आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जाऊ लागलं होतं.

लष्करासाठी गरजेच्या असलेल्या वस्तूला जनसामान्यांसाठी चैनीची वस्तू बनवता येऊ शकते असा विचार करून विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्विस कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि सर्वांनाच सहजगत्या वापरता येतील अशी मनगटी घड्याळं बनवायला सुरुवात केली. १९०५ साली, हान्स विल्सडॉर्फ या जर्मन उद्योजकाने लंडनमध्ये अल्फ्रेड डेव्हीस या आपल्या नातेवाईकासोबत ‘विल्सडॉर्फ अँड डेव्हीस’ या कंपनीची स्थापना करून उत्तम दर्जाच्या घड्याळांची सर्वांना परवडतील अशा किंमतीत विक्री चालू केली. पुढे १९०८ मध्ये याच कंपनीचं नामांकन ‘रोलेक्स’ असं करण्यात आलं, जी आज आपल्या अतिशय महागड्या आणि सर्वोत्कृष्ट घड्याळांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे! 

पुढे १९२३ मध्ये घड्याळांसाठी सेल्फ-वाईंडिंग तंत्रज्ञान विकसित केलं गेलं. जॉन हार्वूड या इंग्रज तंत्रज्ञाने लावलेला हा शोध भविष्यातील ऑटोमेटिक (स्वयंचलित) आणि इलेक्ट्रिक (विद्युत) घड्याळांच्या उत्पादनाची मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. १९५०च्या सुरुवातीला सोलेनॉईडवर चालणारी इलेक्ट्रिक घड्याळं बाजारात आली. कालांतराने या घड्याळांच्या तांत्रिक संरचनेत ‘ज्युअल बेअरिंग’ आलं, ज्यामुळे घर्षणाची शक्यता कमी होऊन या घड्याळांचं आयुष्य वाढलं. घड्याळाच्या किंमतीनुसार अतिशय हलक्या दर्जाच्या लहान नैसर्गिक रत्नांपासून ते पाचूसारखी महागडी रत्ने यात वापरली जाऊ लागली. पुढे या घड्याळांची मागणी इतकी वाढली होती की तो कालखंड ‘ज्युअल क्रेझ’ म्हणून ओळखला जातो. या काळात आपल्या महागड्या घड्याळांसाठी प्रसिद्ध असलेल्या कैक स्विस कंपन्या भरभराटीला आल्या.

‘ज्युअल क्रेझ’मुळे मालामाल झाल्यानंतर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ज्यावेळी स्विस कंपन्या आपल्या पारंपारिक घड्याळांच्या उत्पादनात मग्न होत्या, तेव्हा पूर्ण जगाचं लक्ष जपानमधल्या घड्याळनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे लागलं होते.

१९५९ मध्ये ‘सेको’ या जपानी कंपनीने आपल्या अखत्यारीतील ‘इप्सन’ या कंपनीसोबत मिळून ‘क्वॉर्ट्झ’ तंत्रज्ञानावर आधारित घड्याळ बनवण्याची घोषणा केली. डिजिटल क्रांतीची सुरुवात होत असलेल्या या पर्वात ‘सेको’ने ‘ऍस्ट्रॉन’ हे पहिलंवहिलं क्वॉर्ट्झ घड्याळ १९६९ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

खरंतर या तंत्रज्ञानात जपानसोबतच अमेरिकी व स्विस कंपन्यांनीही आपलं योगदान दिलं असल्याने याच्या पेटंटसाठी कुणीही पुढाकार घेतला नाही, त्यामुळे सर्वच कंपन्यांनी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत ‘क्वॉर्ट्झ’ घड्याळांची मोठी बाजारपेठच उभी केली.

१९८०पर्यंत या घड्याळांनी जुन्या, तांत्रिकदृष्ट्या किचकट असलेल्या घड्याळांची मक्तेदारी संपवली. परंतु सुरवातीला ही घड्याळं अतिशय कमी फ्रिक्वेन्सीवर काम करत असल्याने त्यांच्यातील अचूकता सदोष होती, पण वर्षानुवर्षे हा दोष दूर करण्यासाठी कित्येक प्रयत्न केले गेले.

आजच्या घडीला हाय फ्रिक्वेन्सीवर चालणारी ‘क्वॉर्ट्झ’ घड्याळं सहजगत्या उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे वर्षागणिक वेळ दाखवण्याची अचूकतेतही सुधारणा दिसून येत आहे. या ‘क्वॉर्ट्झ’ तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन अधिक प्रगत घड्याळं बनवण्याच्या कल्पनांना धुमारे फुटू लागले आणि ‘डिजिटल क्रांती’ला खरा अर्थ मिळवून देणारं घड्याळ बनवायची चुरस निर्माण झाली.

पहिलं ‘क्वॉर्ट्झ’ घड्याळ वर्षाचं होतं न होतं तोच १९७० मध्ये LED डिस्प्ले असलेलं पहिलं डिजिटल इलेक्ट्रॉनिक घड्याळ ‘पल्सर’ या कंपनीने बनवलं. त्यानंतर ‘योहान्स’ कंपनीने रेडीओ-कंट्रोल्ड तंत्रज्ञान असलेल्या मनगटी घड्याळांची निर्मिती केली, जे आज कित्येक घड्याळांमध्ये वापरलं जातं. या तंत्रज्ञानानुसार वेळेची अचूकता दररोज रेडीओ सिग्नल्सद्वारे बदलणं शक्य झालं होतं; याउलट २०१३ मध्ये आलेली ऑटॉमिक मनगटी घड्याळं त्यातील तंत्रज्ञानामुळे अधिक अचूक मानली जातात. 

आजकाल सर्रास वापरलं जाणारं स्मार्टवॉच हे या डिजिटल घड्याळांच्या पिढीतलं अद्ययावत उत्पादन मानलं जातं. सुरुवातीला कंप्युटर्ससाठी बनवले जाणारे हे स्मार्टवॉचेस आता स्मार्टफोन्सची जागा घेत आहेत. फक्त वेळ बघण्यासाठी मर्यादित असलेलं घड्याळ एकोणिसाव्या शतकात एक दागिना म्हणून स्त्रियांच्या मनगटावर स्थिरावलं. विसाव्या शतकात त्याने लष्कराला पदोपदी साहाय्य करत आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आणि एकविसाव्या शतकात ते अधिकच स्मार्ट होऊन अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांच्या जोडीला स्थान मिळवू पाहतंय..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या खटल्यामुळे ऑफिसमध्ये महिलांसोबतच्या वर्तनासाठी कायदा होऊ शकला

Next Post

जतीन परांजपेंनी विराट कोहलीला नायकीचा पहिला कॉन्ट्रॅक्ट ऑफर केला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

जतीन परांजपेंनी विराट कोहलीला नायकीचा पहिला कॉन्ट्रॅक्ट ऑफर केला होता

भारत-बांगलादेशचा सीमावाद असलेलं हे बेट ग्लोबल वार्मिंगमुळे अखेर समुद्रात बुडालंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.