आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
आताचा काळ हा स्त्री-पुरुष समानतेचा काळ आहे. कुठलंही क्षेत्र घ्या, स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं, खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. मग ती एखादी ऑफिसची नोकरी असो, बसमधील कंडक्टर असो किंवा अगदी पोलीससुद्धा. व्यवसायातदेखील फुलवाली, भाजीवाली ते अगदी डॉक्टर, वकील किंवा मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे स्त्रियाही आपल्याला काम करताना दिसतात. प्रसंगी आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळतात. स्त्रिया करत नाहीत, असं एखाददुसरंच काम उरलं असेल आता.
मात्र काही दशकांपूर्वीचं चित्र असं नव्हतं. त्या काळात बाई म्हणजे चूल आणि मूल एवढंच माहिती होतं. स्त्रीवर अनेक प्रकारची बंधनं लादली गेली होती. पण त्याच काळात काही महिला अशा होऊन गेल्या, ज्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण जगभरात आपलं नाव पोहोचवलं. सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, मदर तेरेसा ही उदाहरणं आपल्याला माहीत आहेतच.
याच मालिकेतील अजून एका कर्तृत्ववान स्त्रीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत, जी केवळ २१ वर्षांच्या वयात आपल्या जिद्दीच्या जोरावर इंग्रजांच्या राजवटीतही भारतातील ‘पहिली’ महिला वैमानिक बनली. सरला ठकराल असं आहे त्या महत्त्वाकांक्षी महिलेचं नाव.
सरला यांचा जन्म ८ ऑगस्ट १९१४ रोजी नवी दिल्लीत झाला. पहिल्यापासून काही वेगळं करायची जिद्द असलेल्या त्यांनी १९२९ साली दिल्लीतील फ्लाईंग क्लबमध्ये विमान चालवायचं प्रशिक्षण घेतलं. त्या ठिकाणी त्यांची भेट झाली, पी. डी. शर्मा (भारताचे पहिले एअरमेल लायसन्स असलेले वैमानिक) यांच्याशी. शर्मा यांनी त्या लायसन्सवरती पहिलं विमान कराची ते लाहोर दरम्यान उडवलं होतं. फक्त सोळाव्या वर्षी सरला यांचं शर्मा यांच्याशी लग्न झालं.
लग्न होऊन त्या शर्मा परिवारात आल्या. तिथे जवळपास ९ लोक वैमानिकच होते, त्यामुळे सरला यांना त्यांचे सासरे व नवऱ्याकडून नेहमीच प्रोत्साहन मिळत गेलं. त्यांनी जोधपूर फ्लाईंग क्लबमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण घेतलं.
वयाच्या एकविसाव्या वर्षी एका मुलीची आई असूनदेखील सरला यांनी १९३६ मध्ये नवा इतिहास रचला. लाहोरच्या फ्लाईंग क्लबमधून त्यांनी जिप्सी मॉथ नावाचं दोन सीट्सचं विमान उडवलं होतं.
हातमागावरची खादीची साडी नेसून हेल्मेट चढवून त्या कॉकपिटमध्ये जाऊन बसल्या आणि पुढच्या काही क्षणांत त्यांनी भरारी घेतली. जेव्हा विमान यशस्वीपणे उतरवून त्या परतल्या, तेव्हा तिथं असलेल्या सगळ्यांनीच त्यांचं खूप कौतुक केलं.
अर्थात काही जणांना हे पटलं नाहीच. या पुरुषांच्या क्षेत्रात एका महिलेने पुढे येणं त्यांना रुचेना. मग त्यातूनच काही जणांनी कॅप्टन शर्मा यांना उगाचच टोमणे मारायला सुरुवात केली, पण त्यांनी अशा लोकांना अजिबात महत्त्व न देता त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं.
सरला यांच्याकडे १००० तासांचा विमान चालवण्याचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांना ‘ए’ ग्रुपचं लायसन्स मिळालं, पण कमर्शियल वाहतुकीसाठी ‘बी’ ग्रुपचं लायसन्स असणं गरजेचं होतं म्हणून त्याची तयारी त्यांनी सुरु केली.
१९३९चं वर्षं सरला यांच्यासाठी अत्यंत दुःखदायक ठरलं. एका विमान अपघातामध्ये कॅप्टन शर्मा यांचं निधन झालं. सरला आपल्या दोन मुलींकडे पाहून कसंबसं स्वतःला धीर देत होत्या, पण त्यांचा निश्चय मात्र मुळीच ढळला नव्हता. कमर्शियल पायलट व्हायचं स्वप्न अजूनही त्यांना खुणावत होतं. सरला कमर्शियल लायसन्स मिळवायला जोधपूरला गेल्या, आणि नेमकी दुसऱ्या महायु*द्धाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्व उड्डाणं रद्द करण्यात येऊ लागली. हे असं आता कधीपर्यंत चालणार, याचीही काही कल्पना नव्हती. यातच सरला यांचं स्वप्नही तसंच अपूर्ण राहून गेलं. पण तरीदेखील हिंमत न हरता या परिस्थितीतूनही त्यांनी मार्ग काढला.
त्यावेळी सरला लाहोरमध्येच होत्या. तिथं त्यांनी ‘मेयो स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये प्रवेश घेतला. तिथं पेंटिंग, हँडीक्राफ्ट, कॅलिग्राफी, ज्वेलरी डिझायनिंग व कॉस्च्युम डिझायनिंग हे सगळं शिकून घेतलं. फाईन आर्ट्सचा डिप्लोमा पूर्ण करून सरला यांनी ज्वेलरी डिझायनिंग व कॉस्च्युम डिझायनिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यातसुद्धा त्यांना भरपूर यश मिळालं.
ज्या काळात इतर महिला पुरेसं शिक्षणदेखील घेऊ शकत नव्हत्या, त्या काळात सरलाने आपल्या करिअरचा विचार केला.
एवढेच नाही तर, त्या आर्य समाजाच्या सदस्याही होत्या. जेव्हा स्वातंत्र्यानंतर भारत-पाकिस्तानची स्वतंत्र विभागणी झाली, तेव्हा सरला भारतात परतल्या. दिल्लीत त्यांची भेट आर. पी. ठकराल यांच्याबरोबर झाली.
आर्य समाजासोबत जोडलेल्या असल्यानं सरला यांना दुसरं लग्न करण्यात काहीच अडचण आली नाही. १९४८ साली ठकराल यांच्यासोबत लग्न करून त्या सरला शर्मा वरून सरला ठकराल बनल्या. जवळपास ९४ वर्षांचं दीर्घ आयुष्य त्यांना लाभलं. शेवटपर्यंत स्वतःची सगळी कामं त्या स्वतःच करत होत्या. अगदी जेवण बनवणं, घरातली बाकीची कामं ते ज्वेलरी डिझायनिंग व कॉस्च्युम डिझायनिंग या सर्व गोष्टी त्यांनी एकटीनेच केल्या.
त्यांच्या व्यवसायाअंतर्गत दिल्लीत असलेल्या राष्ट्रीय नाट्यप्रशिक्षण संस्था (एन. एस. डी) येथे त्या काही काळ कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत होत्या. दि. १५ मार्च २००८ रोजी त्यांचं निधन झालं.
सरला ठकराल यांचा एकूण जीवनप्रवास पाहिला तर त्यांची अतूट जिद्द दिसून येते. या जिद्दीनेच त्यांना पायलट बनवलं, नंतरच्या आयुष्यातही अनेक खचवून टाकणारे प्रसंग आले, तरी त्या जिद्दीमुळेच एक संपूर्णतः वेगळी अशी वाट निवडून सरला मार्गावर त्या यशस्वी झाल्या.
आज एकीकडे आपण सगळीकडे स्त्रियांना पुढे येताना पाहतो पण अजूनही अशा बऱ्याच जणी असतात, ज्यांना कायम हे वाटत असतं की, ‘लग्नानंतर माझ्या करिअरचं काय होणार?’ अर्थात आताची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारलेली आहे. एकट्याच्या पगारात परवडत नाही म्हणून पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही घराबाहेर पडून पैसे कमवू लागल्या आहेत. त्यात जर घरच्यांची योग्य साथ मिळाली तर कित्येकजणी यशस्वीपणे प्रगती करताना दिसतात. पण या सगळ्याचं मूळ असतं ते इच्छाशक्तीत! ती जर मजबूत असेल, तर अशक्य असं काहीही नसतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










