The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोमन साम्राज्याला धक्का देणारी पामायराची राणी झेनोबिया

by द पोस्टमन टीम
19 July 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इजिप्तची राणी क्लिओपात्राबाबत बऱ्याच जणांना माहिती आहे. कित्येक चित्रपटांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये तिचा उल्लेख आला आहे. मात्र, क्लिओपात्रानंतर मध्य-पूर्व आशियामध्येच आणखीन एक महान राणी होऊन गेली. ही राणी क्लिओपात्रापेक्षाही हुशार आणि सुंदर होती असं म्हटलं जातं. मात्र, या राणीबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. ही राणी आहे – झेनोबिया! सुरुवातीला केवळ पामायरा शहराची राणी असलेल्या झेनोबियाने पुढे आपलं साम्राज्य वाढवून अगदी बलाढ्य रोमन साम्राज्यालाही टक्कर दिली होती.

पामायरा हे शहर रोम साम्राज्याच्या तुलनेत अगदी छोटं होतं. मात्र, त्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे रोमची त्याच्यावर कृपादृष्टी होती. पर्शियन साम्राज्य आणि रोमन साम्राज्याला एकमेकांपासून वेगळं करणारं सिरिया प्रांतातील हे शहर लष्करीदृष्ट्या महत्त्वाचं होतं. एवढंच नाही, तर रोमहून मेसोपोटेमिया आणि पूर्वेकडे जाणारा प्रमुख व्यापारी मार्ग पामायरामधून जात होता. त्यामुळं पामायरा हे व्यापाराचं एक मोठं केंद्र म्हणून उदयास आलं होतं.

इसवी सन २६०च्या काळात पामायराची चांगलीच भरभराट झाली होती. पामायरामधील समाजात चांगले स्थान असणाऱ्या ओडेनथसला रोमन सम्राट वॅलेरिअनने पामायराचा राजा केलं होतं. पुढे पर्शियाचा राजा शापूर पहिला याने रोमन साम्राज्यावर ह*ल्ला करत वॅलेरिअन आणि त्याच्या मुलाचा पराभव केला. मात्र, त्याला पामायरा जिंकता आलं नाही.

पर्शियन सैनिकांना पळवून लावल्यामुळे ओडेनथसला किंग ऑफ किंग्स हा सन्मान देण्यात आला होता. रोमन साम्राज्यानेही त्याचा मोठा सन्मान केला. तसेच, काळ्या समुद्रापासून पॅलेस्टाईनपर्यंतचा रोमचा भूभाग ओडेनथसच्या साम्राज्याखाली आणण्यात आला.

पुढे इसवी सन २६७मध्ये ओडेनथस आणि त्याचा मुलगा (हा त्याला पहिल्या पत्नीपासून झाला होता) या दोघांचीही ह*त्या करण्यात आली. ही कोणी केली त्याबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र, झेनोबियानेच ही ह*त्या करण्याचे आदेश दिल्याचा संशय सगळ्यांना होता. कारण ओडेनथसचा रोमन साम्राज्याच्या बाजूने असलेला कल तिला मान्य नव्हता.



ओडेनथसच्या मृत्यूनंतर झेनोबिया पामायराची राणी झाली. झेनोबिया अचानक समोर आली नव्हती. राणी होण्यापूर्वी कित्येक लढायांमध्ये तिने ओडेनथसची साथ दिली होती. असंही म्हणतात की कित्येक वेळा केवळ झेनोबियामुळे ओडेनथसचा विजय झाला होता. मात्र, ती राजाची पत्नी असल्यामुळे विजयाचं श्रेय बऱ्याचवेळा केवळ राजाला देण्यात आलं.

पण, झेनोबियानं थेट राणी म्हणून राज्य केलं नाही. तर, ओडेनथसपासून झालेल्या आपल्या दहा वर्षांच्या मुलाला (वबल्लाथस) तिने गादीवर ठेवलं. तो अल्पवयीन असल्याचं म्हणत, त्याची प्रतिनिधी म्हणून झेनोबियाने कारभार पाहिला. अर्थात वबल्लाथसला कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

झेनोबियाने सुरुवातीचं एक वर्ष ओडेनथसप्रमाणेच राज्यकारभार पाहिला. यादरम्यान तिने पर्शियाच्या बाजूने आपलं शहर सुरक्षित करुन घेतलं. तसेच रोमसोबतही चांगले संबंध ठेवले. झेनोबियाचं साम्राज्य केवढं होतं याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. कारण कित्येक जण असं म्हणतात की तिने केवळ ओडेनथसचं जेवढं साम्राज्य होतं तेवढंच पुढे सांभाळलं. मात्र, इतर काही इतिहासकारांच्या मते तिनं केवळ पामायराच नाही; तर पुढे लेव्हांट आणि इजिप्तही जिंकलं होतं. याच दरम्यान रोमन साम्राज्यही डगमगत होतं. बाहेरच्या शत्रूचा त्रास तर होताच, मात्र साम्राज्यामध्येही फुटणाऱ्या मुलकी यु*द्धामुळे रोम डबघाईस आलं होतं.

इकडे पर्शियाला तर ओडेनथसने आधीच सुरुंग लावले होते. त्यामुळं या दोन्ही साम्राज्यांपेक्षाही मोठं असं साम्राज्य स्थापण्याची महत्त्वाकांक्षा झेनोबियाला निर्माण झाली होती.

इसवी सन २६९ मध्ये तिनं इजिप्त जिंकल्यानंतर स्वतःला इजिप्तची राणी म्हणून घोषित केलं. या दरम्यान तिच्या साम्राज्याचा विस्तार नाईल नदीपासून अगदी युफ्राटिस नदीपर्यंत पोहोचला होता. 

हे तिनं केवळ आपल्या महत्त्वकांक्षेमुळं नाही, तर पामायराच्या सुरक्षेसाठीही केलं होतं. रोम साम्राज्यात आतल्या आत होत असलेल्या यु*द्धांमुळे एकूणच परिसरामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे इथं स्थिरता आणण्यासाठी तिलाच सगळी सूत्रं हाती घेणं भाग होतं. तिनेही ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. कित्येक स्थानिक रोमन प्रशासकांना झेनोबियाचं राणी असणं मान्य नव्हतं. मात्र, तिच्या बळापुढे पराभव पत्कारण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.

इजिप्त ताब्यात घेतलेली झेनोबिया ही क्लिओपात्राच्याच वंश-कुळातील होती असं काही इतिहासकार म्हणतात. मात्र, ती इजिप्शिअन नसून अरब होती असं इतरांचं म्हणणं आहे. तिच्या लहानपणाविषयी किंवा शिक्षणाविषयी अगदी कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, तिला अनेक भाषा अवगत होत्या असं काही इतिहासकार म्हणतात.

सिरिया, पामायरा, इजिप्त अशी मोठी मोठी शहरं जिच्या हाताखाली होती, त्या झेनोबियाला थांबवणं जणू अशक्यच होतं. कित्येक राजे पराभवाच्या भीतीमुळे तिला शरण आले होते. रोम आणि पर्शियाही तिला थांबवू शकत नव्हतं. या दोन साम्राज्यांपेक्षा मोठं साम्राज्य तिने उभारलं नसलं, तरी आपला एक ठसा तिने नक्कीच उमटवला होता. याचवेळी इसवी सन २७० मध्ये लुसिअस डॉमिटिअस ऑरेलियन्स रोमन साम्राज्याच्या राजपदावर आला. त्यानं रोमन लष्करामध्ये मोठे बदल घडवले, ज्यामुळं रोमन सैन्य हे पुन्हा शक्तिशाली होऊ लागलं. तो सैनिकांसोबत स्वतःही यु*द्धात सर्वात पुढं राहत असे. त्यानं हजारो लोकांना ठार केल्याचं त्याच्या “कौतुकात” म्हटलं जातं.

त्याच्या अवघ्या चार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये त्यानं गॉथ लोकांसोबत झालेलं यु*द्ध जिंकलं होतं, इटलीने केलेला ह*ल्ला परतवून लावला होता आणि गौल, ब्रिटानिया व हिस्पानियामधील रोमन साम्राज्य पुन्हा प्रस्थापित केलं होतं. मात्र, या सर्वांसोबतच, त्यानं झेनोबिया नावाच्या वादळालाही थांबवलं होतं हे विशेष!

झेनोबियाच्या घोडदौडीमुळे आतापर्यंत रोमन प्रशासनाला तिच्याबद्दल माहिती झालं होतं. इसवी सन २७१ मध्ये तर तिने आपल्या मुलाला ‘सीजर’ ही पदवीही दिली होती. केवळ रोमच्या राजांनाच ही पदवी देता येत होती. झेनोबियाच्या या निर्णयामुळं ऑरेलियन्सचं लक्ष तिच्याकडे गेलं. आपल्या साम्राज्यामध्ये एक विदेशी येते (कारण झेनोबिया अरब होती), आणि कित्येक वर्षं राज्यकारभार पाहते म्हणजे काय? असं म्हणत ऑरेलियन्सने अधिकृतरित्या झेनोबियाच्या हातून राज्यकारभार काढून घेतला असल्याचं जाहीर केलं. यानंतर त्याने झेनोबियाच्या सैन्यावर हल्ला केला. सुरुवातीला तिच्या सैन्याने चांगली लढत दिली. मात्र, ऑरेलियन्सच्या सैन्यापुढे आपला टिकाव लागत नाही पाहून ते सर्व पामायराला पळून गेले. या सैनिकांचा पाठलाग करत ऑरेलियन्सचे सैनिक पामायराच्या वेशीवर दाखल झाले.

झेनोबियाला याची खात्री होती, की आपले सैनिक ऑरेलियन्सला थोपवण्यात यशस्वी होतील. तसेच, तिच्या आत्मविश्वासाचं दुसरं कारण होतं पामायराचं हवामान. रोमन सैनिकांना पामायराच्या कडेने असलेल्या वाळवंटी भागात राहण्याची सवय नव्हती. त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या तब्येतीवर होणार होता, जे झेनोबियासाठी फायद्याचं होतं. ऑरेलियन्सने जेव्हा तिला शरण येण्यास सांगितलं, तेव्हा तिने पाठवलेला संदेश तिच्या ‘रॉयलनेस’ची प्रचिती देतो. “पूर्वेची राणी झेनोबियाकडून, ऑरेलियन ऑगस्टससाठी… तू मला शरण येण्यास सांगत आहेस. जसं की तुला माहितीच नाही, क्लिओपात्रानं शरण येण्यापेक्षा एक राणी म्हणून मरणं पसंत केलं होतं.” 

एका महिलेनं अशा प्रकारे प्रत्युत्तर दिल्यामुळं ऑरेलियन चांगलाच चिडला. त्यानं दुप्पट त्वेषानं पामेरियावर ह*ल्ला केला. यानंतर मग झेनोबियानं पर्शियाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, युफ्रेटस नदीच्या जवळ ती पकडली गेली.

झेनोबियाच्या एकूण आयुष्याप्रमाणेच तिचा मृत्यूही एक गूढच आहे. काही अरब इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार तिनं आत्मह*त्या केली. तर रोमन इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ऑरेलियन्सने तिला कैदी बनवून रोमला आणलं. झेनोबियाच्या आयुष्यातील कित्येक घटनांबाबत इतिहासकारांमध्ये दुमत असलं, तरी एक गोष्ट मात्र सर्वच इतिहासकार मान्य करतात. झेनोबियानं – एका राणीनं रोमन साम्राज्याला मोठा धक्का दिला होता; आणि तिचं आयुष्य थोडं अधिक असतं, तर नक्कीच तिनं रोमच्या तोडीस तोड साम्राज्य उभं केलं असतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जगभरातील फॅन्सनी जेव्हा एकत्र येत एका स्टुडिओला चित्रपट पुन्हा बनवायला लावला..!

Next Post

झिम्बाब्वेच्या खेळाडूने फाटक्या बुटांचं एक ट्विट केलं आणि त्यांना पुमाने स्पॉन्सरशिप दिली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

झिम्बाब्वेच्या खेळाडूने फाटक्या बुटांचं एक ट्विट केलं आणि त्यांना पुमाने स्पॉन्सरशिप दिली

या व्यक्तीने जगभरातील लोकांच्या नाश्त्यामध्ये क्रांती घडवून आणली..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.