आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
इतिहास हा सर्व प्रकारच्या आठवणींनी भरलेला असतो. त्यात जशा काही चांगल्या, सुखद आठवणी असतात, तशा काही वाईट, वेदनादायी अशा दुःखद आठवणीही असतात. आपल्याकडे इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांनी गाजवलेला पराक्रम, अटकेपार लावलेला झेंडा अशा सुखद आठवणी आहेत तसंच छत्रपती संभाजी महाराजांचा वेदनादायी मृत्यू, पानिपत युद्धातला पराभव, स्वातंत्र्यसंग्राम, त्यात बलिदान दिलेले अनेक हुतात्मे अशा दुःखद आठवणीही आहेत. अनेक चळवळी व आंदोलनांतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं.
आपल्या इतिहासात पंजाब येथील ‘जालियनवाला बाग ह*त्याकांड’सारखी घटनादेखील होऊन गेली आहे, ज्यात शेकडो निरपराधांना आपला जीव गमवावा लागला. अशीच एक जागतिक इतिहासामधील दुःखद घटना म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान घडलेलं तुर्की देशामधील अर्मेनियन ह*त्याकांड.
अर्मेनियन लोकांनी युरेशिया या देशामध्ये आपली वसाहत वसवली होती. त्यावेळी ते संपूर्ण स्वतंत्र होते. युरेशिया हा चौथ्या शतकात संपूर्णतः ख्रिस्ती असलेला जगातला पहिला देश होता. मात्र या देशाचा बराचसा भाग कायम कुणाच्या ना कुणाच्या अधिपत्याखाली असायचा. १५व्या शतकात हे राष्ट्र ऑटोमन या साम्राज्यात विलीन करण्यात आलं.
हे सत्ताधीश मुस्लिम होते, तरीही अर्मेनियन लोकांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याची मुभा त्यांनी दिली होती. पण नंतरच्या काळात मात्र अर्मेनियन लोकांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करून त्रास देण्यास, त्यांच्याकडून ज्यादा करवसुली करण्यास सुरुवात करण्यात आली.
एवढं सगळं होऊनही अर्मेनियन समाज तिथे टिकून राहिला. त्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन आपली प्रगती करायला सुरुवात केली,आणि नेमकी हीच गोष्ट तुर्की सरकारच्या नजरेत येऊ लागली. हे लोक आपली साथ न देता ख्रिस्ती साम्राज्यासोबत जातील, असा संशय त्यांना येऊ लागला. अठराव्या शतकात जेव्हा ऑटोमन साम्राज्य कमजोर होऊ लागलं, तेव्हा आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हे आश्वासन दिलं की, अर्मेनियन लोकांवर झालेला अन्याय दूर करून त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. प्रत्यक्षात मात्र १८९४ साली अर्मेनियन लोकांच्या आंदोलनाला दडपून टाकण्याच्या प्रयत्नात अर्मेनियाच्या ८००० गावांमध्ये तुर्की सैन्याकरवी शेकडो लोकांची हत्या करवण्यात आली.
१९०८ साली जेव्हा सत्तापालट झाला, तेव्हा अर्मेनियनांना अपेक्षा होती की आतातरी आपले दिवस बरे येतील, पण त्यांची ही आशाही फोलच ठरली. नवीन सरकार हे संपूर्णतः तुर्की लोकांच्या बाजूने होतं. जे तुर्की नसतील, त्यांना थेट देशातून हाकलून लावलं जाईल, अशी या सरकारने घोषणा केली. याच दरम्यान पहिलं महायु*द्ध सुरू झालं, ज्यात तुर्की जर्मनीसोबत होता. याचवेळी अर्मेनियन लोकांनी नेमकी तुर्कीच्या विरुद्ध असलेल्या रुसची साथ दिली, आणि नेमकी हीच गोष्ट त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरली.
२४ एप्रिल १९१५ हा अर्मेनियन लोकांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी तुर्की सत्ताधीशांकडून सरळ अर्मेनियन लोकांची ह*त्या करायला सुरुवात झाली. अत्यंत अमानुष अ*त्याचार त्यांच्यावर करण्यात आले. बहुतेक अर्मेनियन लोकांना मेसेपोटॅमियाच्या वाळवंटात बिना अन्नपाण्याचे तडफडवून मारण्यात आलं.
त्यांना तेथे पूर्ण विवस्त्र करून टळटळीत उन्हात मरेस्तोवर चालायला लावत. त्यातूनही जे वाचतील त्यांना सरळ गोळी घालून ठार मारलं जाई.
काही लोक खोल नदीत बुडवून, काहींना उंचावरून ढकलून तर काही चक्क जिवंत जाळून मारण्यात आले. यासाठी तुर्कीनं एक वेगळं सैन्य स्थापन केलं होतं. अगदी मृत्यूचे दूतच होते त्यातले सैनिक!
याच दरम्यान तुर्की सरकारनं मेलेल्या अर्मेनियन मुलांना पळवून नेऊन त्यांचं जबरदस्ती धर्मांतर केलं. त्यांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडून नंतर त्यांचा गुलाम म्हणून वापर सुरू केला. १९२२ साली जेव्हा हे ह*त्याकांड संपलं, तोवर सुमारे २० लाख निष्पाप अर्मेनियन मृत्युमुखी पडले होते. तुर्कीत केवळ ३,८८,००० अर्मेनियन लोक शिल्लक होते.
तुर्की सरकारनं कधीही या सर्व घटनेची जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे अर्मेनियासोबत त्यांचे नेहमी तणावपूर्ण संबंध राहिले आहेत. उलट अर्मेनिया व अझरबैझान देशांदरम्यान झालेल्या संघर्षात तुर्की अझरबैझानच्या बाजूनं होता. मात्र हल्लीच अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रसंगी तुर्कीच्या विरोधात जाऊन अर्मेनियन ह*त्याकांडाला अधिकृतरित्या मान्यता दिली आहे. यामुळे अमेरिकेत राहत असलेल्या अर्मेनियन नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
यापूर्वी तुर्कीसोबतचे संबंध बिघडण्याच्या भीतीने एकाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षानं हे धाडस केलं नव्हतं. मात्र बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असतानाच या मुद्द्याचा वापर आपल्या प्रचारासाठी केला होता. अर्मेनियन लोकांना त्यांनी हे आश्वासन दिलं होतं की, ते हे हत्याकांड झाल्याचं घोषित करतील. ही घोषणा करण्यापूर्वी त्यांची तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चाही झाली, त्यावेळी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी बायडनना असं न करण्याची विनंती केली. मात्र ती मान्य न करता बायडन यांनी जनतेला दिलेलं आपलं वचन पूर्ण केलं. यामुळे भडकलेल्या तुर्की सरकारने तिथले अमेरिकन राजदूत डेव्हिड सॅटर्फिल्ड यांना बडतर्फ केलं आहे.
तुर्कीच्या मते, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना कायद्यानं असा कोणताही अधिकार दिलेला नाही की, त्यांना अशा प्रकारची घोषणा करता येईल. यामुळे दोन्ही देशांतले संबंध कायमस्वरूपी बिघडणार आहेत.
दुसऱ्या महायु*द्धादरम्यान हि*टल*रने घडवून आणलेल्या ज्यू लोकांच्या ह*त्याकांडाची आजही जगभर चर्चा होत असते, मात्र पहिल्या महायु*द्धावेळी गेलेल्या या निष्पाप अर्मेनियन बळींची दखलही कोणी घेत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










