आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेट. संपूर्ण जगात सगळ्यात जास्त खेळला जाणारा. क्रिकेटचे सामने आणि त्या सामन्यांत केलेले विक्रम यावर क्रिकेटप्रेमी तासन्तास गप्पा मारू शकतात. क्रिकेटच्या सामन्यातील विचित्र किस्सेही काही कमी नाहीत. मग तो ३ धावांमध्ये पूर्ण टीम बाद झाल्याचा किस्सा असो किंवा ट्रॅविसचा एका बाॅलमध्ये २० धावा काढल्याचा किस्सा असो.
फक्त किस्सेच नाही तर अशा अनेक आख्यायिका देखील क्रिकेटमध्ये सांगितल्या जातात. हि*टल*रने जर्मनीची पूर्ण क्रिकेट टीम मारून टाकली होती, खरं तर झालं असं होतं की जर्मनीच्या टीमवर फक्त बंदी घालण्यात आली होती.
असाच एक किस्सा आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आता हा किस्सा मानला तर खरा नाही तर एक आख्यायिका!
हा किस्सा आहे एका बॉलमध्ये २८६ धावा काढल्याचा! बरोबर वाचलं! २८६ धावा ते ही एका बॉलमध्ये!
ही गोष्ट घडली होती बनबरी, पश्चिम ऑस्ट्रेलियात. ऑस्ट्रेलियाच्या उच्चवर्णीय खेळाडूंची विक्टोरियन टीम आणि बनबरीजवळील भागातील ‘स्क्रॅच xi’ नावाची टीम यांच्यात हा सामना होता. सामना सुरु झाला. विक्टोरियन टीमचे खेळाडू सर्वप्रथम फलंदाजी करायला उतरले. ‘स्क्रॅच xi’च्या गोलंदाजाने पहिला बॉल टाकला आणि विक्टोरियन टीमच्या खेळाडूने असा फटकारा मारला की बॉल जवळच्याच एका मोठ्ठ्या झाडाच्या फांद्यांवर जाऊन अडकला.
‘स्क्रॅच xi’च्या टीमने बॉल हरवला असं घोषित करण्यासाठी अपील केलं पण अंपायरनी बॉल दिसतो आहे त्यामुळे हरवलेला नाही असं सांगून त्यांची अपील रद्द केली.
आता आली पंचाईत! कारण बॉल हरवला नाहीये त्यामुळे विक्टोरियन टीमचे खेळाडू धावा काढायला लागले. आणि इकडे आपल्या होमटीमला झाडावरून बॉल आणणार कसा? हा प्रश्न भेडसावू लागला.
त्यांनी एक कुऱ्हाड मागवली आणि डायरेक्ट झाडच कापून टाकायचा निर्णय घेतला! पण खूप शोधूनही कुऱ्हाड काही सापडली नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी एक रायफल आणली आणि गोळ्या झाडून तो बॉल खाली पाडण्याचे प्रयत्न सुरु झाला.
अनेक शॉट असफल झाल्यावर शेवटी एकदाचा बॉलला शॉट लागला आणि तो बॉल खाली पडला!
तोपर्यंत विक्टोरियन टीमच्या आपल्या कार्यकर्त्यांनी “कदमों का बेहतरीन इस्तमाल” करून तब्बल २८६ धावा काढल्या होत्या!
एवढ्या धावा काढून त्यांनी सामना जाहीर केला. साहजिकच तेच विजयी ठरले.
ही गोष्ट तर संपली. आता प्रश्न असा येतो की हे खरंच घडलं होतं का?
ही गोष्टं पहिल्यांदा छापून आली ती १५ जानेवारी १८९४ साली, लंडनच्या पॉल मॉल गॅझेट नावाच्या एका मॅगझीनमध्ये. आता जर किस्सा लंडनमध्ये घडला होता तर तिथल्या पेपरमध्ये आधी का नाही आलं?
अर्थात, नंतर काही महिन्यांनी इतरही काही मासिकांत हा किस्सा आला पण सगळ्यांचा स्त्रोत एकच! पॉल मॉल गॅझेट आणि खुद्द ऑस्ट्रेलियन मिडीयात जेव्हा ही “बातमी” आली तेव्हा त्यांनीसुद्धा याला एका मिथकाचं नाव दिलं. त्यामुळे हा किस्सा की दंतकथा हे कळायला काहीच मार्ग नाही.
खरं खोटं त्या पॉल मॉल गॅझेटलाच माहिती पण असे रसभरीत किस्से क्रिकेटप्रेमी जमले की गप्पा रंगवायला नक्कीच कामात येतात!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










