आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कोणत्याही देशातील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आणि त्या त्या देशाची संसद यांना सर्वोच्च सुरक्षा दिली जाते. मात्र, अमेरिकेत एक अशी इमारत आहे जिच्याभोवती व्हाईट हाउसपेक्षाही कडक आणि काटेकोर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ३० हजार सैनिकांची एक तुकडी इथे सतत पहारा देत असते. दिवसरात्र शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स या इमारतीभोवती घिरट्या घालत असतात. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच.
आता तुम्ही म्हणाल, असं काय आहे या इमारतीत नेमकं? काय सोन्याचा खजिना ठेवलाय का? हो! अगदी बरोबर! अमेरिकेतील या इमारतीत जगातील सर्वांत मोठा सोन्याचा खजिना ठेवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या केंटुकी राज्यातील फोर्ट नॉक्स या लष्करी तळावर, १,०९,००० एकर जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली आहे. १९३२ साली अमेरिकेतील सोने साठवण्यासाठी अमेरिकन सैन्यानेच ही इमारत बांधली होती. १९३७ पासून ही इमारत वापरात आणली.
या इमारतीत ४२ लाख किलो सोन्याचा साठा ठेवण्यात आला आहे. याखेरीज अब्राहम लिंकन यांनी लिहिलेला संविधानाचा पहिला मसुदा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे मूळ घोषणा पत्र, गुटेनबर्गमधील बायबल, अमेरिकेच्या संविधानाची मूळ प्रत अशा अनेक मौल्यवान वस्तू इथे जपून ठेवण्यात आल्या आहेत.
अमेरिका हा जगातील सर्वांत जास्त सोन्याचा साठा असलेला देश आहे. अमेरिकेकडे किमान ८१३३.५ टन सोन्याचा साठा असेल असा अंदाज वर्तवला जातो. त्यातील काही साठा फोर्ट नॉक्समधे ठेवण्यात आलेला आहे. या इमारतीचे छत संपूर्णत: बॉ*म्बप्रुफ करण्यात आले आहे. म्हणजे या इमारतीवर कुणी बॉ*म्ब टाकले तरी या इमारतीचे काहीही नुकसान होऊ शकत नाही. शिवाय इमारतीच्या चारही बाजूला अलार्म सिस्टीम लावण्यात आली आहे.
फोर्ट नॉक्समधील सोन्याचा साठा हा १६८ अब्ज डॉलर इतक्या किमतीचा आहे. एखाद्या सोन्याच्या खाणीतही सापडणार नाही इतका साठा या इमारतीत आहे.
सैनिक, शस्त्रे आणि सशस्त्र हेलिकॉप्टर यांशिवाय इमारतीतील सोन्याच्या साठ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. ज्या तिजोरीत हे सोने साठवण्यात आले आहे, त्याला उघडण्यासाठी वेगवेगळ्या पासवर्ड्सचा वापर केला जातो.
या इमारतीत काम करणाऱ्या चार लोकांनाच याचा पासवर्ड माहित आहे आणि विशेष म्हणजे यातील प्रत्येकाचा पासवर्ड वेगवेगळा आहे. चौघांचे पासवर्ड काय आहेत ते एकमेकांनाही माहिती नाही. इतकी गोपनीयता ठेवली जाते. इथली सुरक्षा व्यवस्था इतकी काटेकोर आहे की, मानवी ह*ल्लाच नाही तर नैसर्गिक आपत्तीपासून या इमारतीच्या बचाव करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.
भूकंप, महापूर, त्सुनामी अशा सगळ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यापासून बचावाच्या सगळ्या उपाययोजना आणि यंत्रणा इथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात रडारदेखील बसवण्यात आले आहेत. एखादे बाहेरचे विमान सोडा, ड्रोन जरी या परिसरात आले तरी लगेच अलार्म वाजतो. इमारतीच्या आजूबाजूला जमिनीत स्फो*टके पेरण्यात आली आहेत.
एखाद्या दरोडेखोर किंवा चोराने या इमारतीच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला तरी तिथल्या तिथेच त्याच्या मृत्यू ओढवू शकतो. या इमारतीचा दरवाजाच २० टनपेक्षा जास्त वजनाचा आहे, जो तोडणे निव्वळ अशक्य आहे.
आजपर्यंत कुणीही या इमारतीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्नही केलेला नाही. इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा तामझाम बघितला तर कुणी स्वप्नातही असा प्रयत्न करण्याचे धाडस करणार नाही. पण १९६४ साली जेम्स बॉंड चित्रपट मालिकेतील एका चित्रपटात या एका चोराने स्वतः श्रीमंत होण्यासाठी चीनच्या मदतीने ही इमारत लुटण्याचा प्रयत्न केला होता असे दाखवण्यात आले होते. चीन-अमेरिका संबंधातील तणाव त्यांच्या चित्रपटातून व्यक्त नाही झाले तर नवलच!
फक्त फोर्ट नॉक्सच नाही तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीतही भरपूर सोने ठेवण्यात आलेले आहे. न्यूयॉर्कमधील या बँकेत ८० फुट उंचीच्या तिजोरीत हे सोने साठवण्यात आले असून ही तिजोरी जमिनीच्या आत सुरक्षित ठेवण्यात आली आहे. फोर्ट नॉक्सप्रमाणेच फेडरल बँकेची सुरक्षा व्यवस्थाही एकदम कडक आणि काटेकोर आहे. या तिजोरीच्या सुरक्षेसाठीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सैनिकांची तुकडी तैनात असते. फेडरल रिझर्व्ह बँकेकडे फक्त अमेरिकाच नाही तर वेगवेगळ्या देशांचे सोने जमा आहे.
जगात सर्वाधिक सोने असणाऱ्या दहा देशांची यादी बनवली तर अमेरिका त्यातील पहिल्या स्थानावर असेल. या यादीत भारताचा दहावा क्रमांक लागतो. भारतातील सोन्याचा साठाही भारताच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या ताब्यात आहे.
प्राचीन काळापासून सोन्याकडे मौल्यवान धातू म्हणून पहिले गेले आहे. आजच्या काळातही आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोन्याचीच मदत घेतली जाते. पूर्वीच्या काळी व्यापार-विनिमयासाठी सोन्याचाच वापर केला जात असे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चलन वापरले गेले. आज प्रचलित चलनाचे रूप संपूर्णत: बदलेले आहे. तरीही सोन्याची झळाळी कोणत्याही अर्थाने कमी झालेली नाही.
भारतासारख्या देशात चलन निर्मितीसाठी सेन्ट्रल रिझर्व सिस्टीमचा वापर केला जातो. यात सरकारला जितके चलन छापायचे असेल तितक्या किमतीचे सोने तारण ठेवावे लागते. सोन्याला सर्वांत जास्त मागणी ही भारतातच असते.
मात्र सोन्याचा सर्वात मोठा साठा अमेरिकेच्या फोर्ट नॉक्समधे आहे. म्हणूनच याठिकाणी अगदी काटेकोर आणि कडक सुरक्षा व्यवस्था दिली जाते. हा साठा जर चुकीच्या व्यक्तींच्या किंवा संघटनांच्या हाती लागला तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणून तर अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाने या इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.
इतकी काटेकोर सुरक्षा व्यवस्था असताना कोणी स्वप्नात तरी इथे चोरी करण्याचा विचार करेल का? शक्यच नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










