आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कुणाचा तरी रंग, वर्ण, वंश निव्वळ आपल्याहून वेगळा आहे म्हणून त्याला हिणकस समजण्याची क्रू*र वृत्ती मानवी समाजात कधी निर्माण झाली आणि या अमानुष भेदभावाने कित्येक निष्पाप जीवांचे जगणेच बंदिस्त केले. त्यांना आखून दिलेल्या परिघाबाहेर जाण्यास मज्जाव केला. भेदाभेदाच्या गटार गंगेला अनेकांनी पावित्र्यही बहाल केले. पृथ्वीच्या पाठीवरील प्रत्येक मानवी समाज या पापात बरबटलेला आहे.
अशीच एक गोष्ट आहे १९०४ मधील. ओटा बेंगा या जिप्सी समाजातील तरुणाची, ज्याला निव्वळ तो जिप्सी आहे म्हणून पळवून नेऊन अमेरिकेतील एका प्राणीसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. वर्णभेदाच्या काळ्याकुट्ट इतिहासातील ही कथा आजही आपल्या मानगुटीवर बसून छळते आहे. कारण सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणून एकीकडे शेखी मिरवत असतानाच दुसरीकडे माणसाने अनेकदा असा नीचपणाचा कळस गाठलेला आहे.
सप्टेंबर १९०६ साली न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार,
“एका तरूण जिप्सी मुलाला – जो पिग्मी समाजातील आहे, शहरातील सर्वांत मोठ्या प्राणीसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.” या बातमीला त्यांनी मथळा दिला होता “ब्रॉंक्स पार्कमधील एप्ससोबतच्या पिंजऱ्यातील बुशमन.”
त्याला पाहण्यासाठी एका दिवसात पाचशे लोकांनी गर्दी केल्याचेही या बातमीत नमूद करण्यात आले होते. ५ फुट उंचीचा ओटा बेंगा त्याच्याकडे पाहून हसणाऱ्या त्या लोकांना पाहून अक्षरश: गांगरून गेला होता. तिथे जमलेली लहान मुले त्याला पाहून चित्रविचित्र आवाज काढत होती तर त्यांचे पालक तो तमाशा बघून मोठमोठ्याने हसत होते.
न्यूयॉर्क टाईम्समधील बातमीमुळे दुसऱ्या दिवसापासून त्याला पाहण्यासाठी अधिकच गर्दी वाढू लागली. मग त्याला छोट्या पिंजऱ्यातून मोठ्या पिंजऱ्यात हलवण्यात आले. जेणेकरून एकावेळी त्याला अधिक पर्यटक पाहू शकतील. त्याच्या पिंजऱ्यात त्याच्यासोबत एका ओरांगुटांग ठेवण्यात आला ज्याचे नाव होते डोहांग. जेव्हा लोक त्याला पाहून हसत, चित्रविचित्र आवाज काढत, त्याला पाहून काहीतरी हातवारे करीत तेव्हा बोंगा भांबावून जात असे. इतक्या मोठ्या संख्येने आपल्याकडे बघणाऱ्या या लोकांच्या गर्दीला कसे सामोरे जावे हा प्रश्न त्याला भेडसावत असावा.
गुलामगरीची प्रथा बंद होऊन चार दशके उलटल्यानंतरही अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तींना जनावरांसारखीच वागणूक दिली जात होती. तीही अगदी उघड उघड. ओटा बेंगासोबत चाललेल्या या अन्यायजनक वागणुकीविरोधात काही जण आवाज उठवत होते तर काही जण उघडपणे या अमानुष प्रकाराचं समर्थन करत होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकांनी त्याची ही कथा छापली. मंत्री, वैज्ञानिक, शासकीय अधिकारी, सामान्य नागरिक अशा समाजाच्या सर्व स्तरातील लोक त्याला पाहायला प्राणीसंग्रहालयात येत असत.
ज्या पिंजऱ्यात ओटा बेंगाला ठेवण्यात आले होते. त्या पिंजऱ्यावर लिहिले होते,
आफ्रिकन पिग्मी, ओटा बेंगा, वय २३ वर्षे, उंची ४ फुट १ इंच, वजन १०३ पौंड. सम्युएल पी व्हर्नर यांनी कसाई नदीजवळून आणला. (कांगो फ्री स्टेट, दक्षिण मध्य आफ्रिका)
जेम्स एच गार्डन हे त्यावेळचे प्रभावी कृष्णवर्णीय नेते होते, त्यांनी या ब्रॉंक्स प्राणी संग्रहालयाला भेट देऊन ओटाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. जेम्स गार्डन यांनी घोषणा केली की, “आमच्या जमातीतील एका व्यक्तीला अशाप्रकारे एका प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यात कोंडून ठेवणे अमानुषपणाचे आहे आणि आम्ही याविरोधात आवाज उठवणारच.”
तर या प्राणीसंग्रहालयाचे संचालक म्हणाले की अशा व्यक्तीला प्रदर्शनासाठी ठेवणे हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्यच आहे. या संग्रहालयात आम्ही वांशिक प्रदर्शन भरवले आहे.”
उलट या आधारावर युरोपमध्ये अशा प्रकारे मानवांचे प्रदर्शन भरवण्यात आले पाहिजे, ज्यामुळे जगभरातील संस्कृती आणि संस्कृतीकरण याची माहिती संपूर्ण जगासमोर मांडता येईल असे त्याचे मत होते. आपण जे काही करतो आहोत त्याचा पश्चाताप तर सोडा उलट या माणसाला त्याचा अभिमान वाटत होता.
बेंगाला पाहण्यासाठी दररोज हजारोच्या संख्येने पर्यटक त्या प्राणीसंग्रहालयात गर्दी करत असत. आता तर अशाही अफवा पसरू लागल्या होत्या की ओटा बेंगा हा एकमेव असा न*रभ*क्षक मानव आहे. कोणी म्हणे त्याला जंगलातील इतर न*रभ*क्षक प्राण्यांपासून धोका आहे म्हणून त्याला इथल्या प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. अशा अफवांमुळे ओटाबद्दलचे कुतूहल आणखीनच वाढत होते.
ओटा मात्र दररोजच्या त्या बघ्यांच्या गर्दीला पाहून रोज थोडा थोडा मरत होता. हळूहळू अमेरिकेतील इतर कृष्णवर्णीय लोकांमध्ये ओटा बेंगाला दिल्या जाणाऱ्या या अमानुष वागणुकीवरून संताप उफाळू लागला. अमेरिकन कृष्णवर्णीय रस्त्यावर उतरू लागले. ओटाला स्वतंत्र करण्याची मागणी करू लागले. कृष्णवर्णीयांच्या या आंदोलनामुळे हळूहळू संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते.
पण या सगळ्याचा ओटाला कैद करून ठेवणाऱ्या त्या प्राणी संग्रहालयाच्या संचालकांवर तसूभरही फरक पडला नव्हता.
शेवटी ज्या व्यक्तीने त्याला प्राणीसंग्रहालयात आणले त्यानेच ओटाला प्राणीसंग्रहालयातून पळून जाण्यास मदत केली. सुमारे वीस दिवस तरी ओटाने त्या भयाण पिंजऱ्यात काढले. त्यानंतर त्याला न्यूयॉर्कमधीलच अनाथालयात पाठवण्यात आले. जेम्स गार्डन यांनी त्याला आपल्या अनाथालयात थारा दिला. वीस दिवसांच्या भयानक अ*त्याचारातून होरपळून निघालेल्या ओटोवर मानसिक उपचारही करण्यात आले.
१९१० साली त्याला व्हर्जिनियातील कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. पण त्याला घरची आठवणी अस्वस्थ करत असत. कॉलेजमधील मुलांना तो मासे पकडणे, शिकार करणे, अशा त्याला अवगत असलेल्या कला शिकवत होता. तो कॉलेजमधील मुलांमध्ये मिसळत असला तरी आतून एकटा पडला होता. हा एकटेपणाच त्याच्या घोर निराशेचे कारण ठरला.
शेवटी मार्च १९१६ मध्ये त्याने त्याच्याकडील पिस्तुलीने गोळी झाडून घेऊन आत्मह*त्या केली. यावेळी तो फक्त पंचवीस वर्षांचा होता.
प्राणीसंग्रहालयातून सुटल्यानंतर ओटा परत कांगोला आपल्या गावी, आपल्या कुटुंबात परत गेला असता तरी त्याच्या शेवट असाच झाला असता का?
‘ओटा बेंगा’सोबत घडलेली ही क्रू*र घटना आजही आपल्याला अस्वथ केल्याशिवाय राहत नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










