आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९३३ साली हि*टल*रने जर्मनीची सर्वंकष सत्ता आपल्या हातात घेतली. जर्मनीमधे निरंकुश सत्ता प्राप्त होताच हि*टल*रला संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा खुणावू लागली. त्यासाठी हि*टल*रने एकेका देशावर हल्ले करायला सुरुवात केली. हि*टल*रच्या या महत्त्वाकांक्षेपोटी संपूर्ण जग दुसऱ्या महायु*द्धाच्या खाईत लोटले गेले. सगळे सत्ताधीश एक तर आपले साम्राज्य वाचवण्यात गर्क झाले होते किंवा दुसऱ्याचे साम्राज्य बळकावण्याच्या अहमहमिकेचा भाग झाले होते. यात काही जणांना प्रादेशिक सत्तेत रस होता तर काही लोकांना त्यांच्या बाजारपेठेत रस होता.
कोका-कोला या अमेरिकन कंपनीनेही १९३०च्या सुमारास जर्मनीत प्रवेश केला होता. १८८६ साली डॉ. जॉन पेम्बरटन यांनी कोकचा शोध लावला होता. पाच सेंटला एक ग्लास कोक अशा दराने ते हा कोक अटलांटा फार्मसीला विकत असत.
कोकाच्या पानापासून आणि कोला नावाच्या बियांपासून हे पेय बनवले जात असल्याने या दोन्हींचे नाव एकत्र करून या पेयाला कोका-कोला हे नवीन नाव मिळाले.
कोका-कोलातील हे दोन्ही पदार्थ नशिले होते. त्यामुळे ग्राहकांना कोका-कोलाची चव आणखीनच आवडू लागली. नव्हे त्यांना या ड्रिंकची सवयच लागून गेली. १८९५ पर्यंत तर या ड्रिंकने अमेरिकेतील सर्व राज्ये आणि त्यातील सर्व प्रदेश व्यापले होते. आता कोका-कोलाच्या सीईओनी कोका-कोला ब्रँडचा जगभर प्रसार करण्याचा निश्चय केला होता.
संपूर्ण युरोपात कोका-कोलाने बाजारपेठ काबीज केली होतीच. हि*टल*रच्या उदयाच्या काळातच कोका-कोलाने जर्मनीत पाऊल रोवले. जर्मनीतील कोका-कोला ब्रांचची धुरा कंपनीने मॅक्स काईट यांच्याकडे सोपवली. काईट एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व होते, त्यांच्या स्वभावात थोडासा अरेरावीपणा आणि धाक होता. देखण्या पण तापट काईट यांनी कोका-कोला जर्मनची जबाबदारी स्वीकारताच जर्मनीतही हे ड्रिंक कसे सर्वदूर पोहोचेल यासाठी प्रयत्न सुरु केले.
त्यांच्या नियोजनबद्ध जाहिरात तंत्रामुळे हळूहळू जर्मनमध्येही हे पेय चांगलेच लोकप्रिय ठरले. जर्मनीतील ग्राहक वर्ग वाढला. काईट यांनी यासाठी खूप मेहनत घेतली होती. कोकाच्या जाहिरातीसाठी पत्रके वाटणे, होर्डींग्ज लावणे, पेपर, रेडीओवरून जाहिरात प्रसारित करणे, अशा हरेक प्रकारे त्यांनी प्रत्येक जर्मन नागरिकांपर्यंत कोका-कोला पोहोचवला होता. अमेरिकेतील मुख्यालयात जर्मनीतील या प्रगतीचा आनंद साजरा केला जात होता. दहा वर्षांत कंपनीने जर्मनीत चांगलाच जम बसवला होता.
काईट यांनी जर्मनीत कोका-कोलाचे प्रोडक्शन प्लांट उभारले होते. त्यांनी जमर्नीतच या ड्रिंकचे उत्पादन घेण्यासाठी अमेरिकन कंपनीनेही त्यांना परवानगी दिली होती. कोका-कोला बनवण्यासाठी नऊ प्रकारचे घटक लागतात, यातील सात घटकांची माहिती काईट यांना होती पण उरलेले दोन घटक कंपनी अमेरिकेतून पाठवत असे. जर्मनीतील प्रत्येक शहरात कोकचे आउटलेट होते.
जर्मन सैन्य ज्या देशात जाईल तिथे तिथे काईटनी कोका-कोला देखील पोहोचवला होता. इटली, फ्रांस, हॉलंड, एकामागून एक अशा सगळ्या युरोपियन देशांत कोका-कोला पोहोचला होता.
१९४०च्या दशकात तर कोका-कोला हा जर्मनीतील एक अतिशय लोकप्रिय सॉफ्ट-ड्रिंक बनले होते. हि*टल*र देखील अमेरिकन सिनेमासोबत कोकाकोला एन्जॉय करत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
पर्ल हार्बरवर ह*ल्ला झाला आणि आतापर्यंत महायु*द्धाकडे तटस्थ दृष्टीने पाहणाऱ्या अमेरिकेलाही महायु*द्धात प्रत्यक्ष भाग घेणे आवश्यक झाले. यु*द्धातील शत्रू राष्ट्राशी असलेले व्यापारी किंवा इतर संबंधाना तत्काळ पूर्णविराम देणे भाग होते. यु*द्ध नीतीचाच एक भाग म्हणून ‘कोक’ला जर्मनीतून माघार घेणे भाग होते.
ना*झी सैन्याने जर्मनीने जिंकलेल्या प्रदेशात शत्रू राष्ट्रांची जी काही संपत्ती होती त्याची नासधूस करण्यास सुरूवात केली होती. काईट यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून या सगळ्या प्रदेशात कोकाची जी काही संपत्ती होती ती शाबूत राहील याची दक्षता घेतली.
जिथे कोका-कोलाचे बॅनर लावण्यात आले होते ते उतरवण्यात आले. कोका-कोलाने ना*झी प्रदेशातील आपल्या उत्पादनाचा पुरवठा बंद केला. त्यांनी काईट यांच्याशीही संबंध तोडले आणि त्यांना कोका-कोला बनवण्यासाठी जे दोन घटक पुरवले जात होते त्यांचा पुरवठाही बंद केला.
काईट यांचे सगळे प्लांट बंद पडले. त्यांनी कोका-कोलाच्या निर्मितीसाठी अनेक ठिकाणी मोठी गुंतवणूक केली होती. अचानकच सगळा व्यवहार ठप्प झाल्याने काईट दिवाळखोर झाले. पण, ते स्वस्थ बसले नाहीत. जर्मन नागरिकांना कोका-कोलाची सवय झालीच होती. त्यांना ‘कोक’ऐवजी एखादे दुसरे पेय दिल्यास त्यालाही तितकीच पसंती मिळेल हे काईट यांना चांगलेच माहित होते. म्हणून त्यांनी स्वतः अशा प्रकारचे पेय बनवता येते का याची पडताळणी सुरु केली. तसेही सॉफ्ट ड्रिंक बनवण्यासाठी लागणाऱ्या सात घटकांची त्यांना माहितीच होती. दुसरे जे दोन घटक होते त्यांची माहिती मिळवणे गरजेचे होते आणि ते त्याच्या शोधात होते.
यु*द्धाचा वणवा संपूर्ण जगभर पसरला होता. सगळीकडेच अनेक प्रकारची चणचण भासत होती. ड्रिंक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचीही चणचण भासू लागली. त्यामुळे काईट यांच्यासमोर आता आवश्यक असणारा कच्चा माल कसा उपलब्ध करायचा हा प्रश्न होता. तेव्हा त्यांनी खाद्य पदार्थांच्या निर्मितीतून जो काही शिल्लक माल राहील त्यापासून हे ड्रिंक बनवण्यास सुरुवात केली. साखरेचा आणि इतर साहित्याचा तुटवडा निर्माण झाला होता. काईट यांनी रेशनिंगच्या या तुटवड्यावर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लृप्त्या लढवल्या.
खाद्यपदार्थ तयार केल्यानंतर जो राहिलेला सगळा माल असतो त्याचा पुनर्वापर करून त्यांनी या ड्रिंकची निर्मिती केली. सायडर बनवून राहिलेली सफरचंदाची साले, त्याचा लगदा आणि चीज बनवल्यानंतर त्यातील जे घटक निरोपयोगी ठरतात ते, अशा सगळ्या उरल्या सुरल्या पदार्थापासून एक नवे पेय तयार केले.
वेगवेगळ्या कल्पना लढवून हे पेय तयार करण्यात आलेल्या या पेयाला फांटास्टिक या जर्मन शब्दाचा शॉर्टफॉर्म म्हणून ‘फँटा’ हे नाव देण्यात आले.
या नव्या ड्रिंकमुळे काईट यांनी कोका-कोलाचा विस्तार करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा जर्मन आणि ना*झी व्याप्त जर्मनीत उभारल्या होत्या त्या सगळ्यांची नासधूस होण्यापासून बचाव झाला. शिवाय,जर्मन लोकांच्या राष्ट्रवादी भावनांना हात घालत त्यांनी एक अस्सल देशी म्हणजे पूर्णत: जर्मन-निर्मित पेय तयार केले होते. त्यांचा ग्राहकवर्ग आधीच तयार होता. त्यामुळे फँटाच्या विक्रीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.
जर्मनीत व्यापार किंवा कोणताही व्यवसाय करायचे म्हटल्यास ना*झी सरकारशी हातमिळवणी करणे भाग होते. तशी व्यवसायाची गरज म्हणून काईट यांनीही ना*झींशी हातमिळवणी केली, पण ते कधीच ना*झी पक्षाचे सदस्य झाले नाहीत. जर्मनीपेक्षाही ते कोका-कोला कंपनीशी जास्त बांधील होते.
दुसऱ्या महायु*द्धात निर्माण झालेल्या राजनीतिक पेचप्रसंगामुळे जर्मनीत कोका-कोलाचा पुरवठा बंद झाला. यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून फँटाचा जन्म झाला. फँटाच्या जन्म-कहाणीवरून हे सत्य जास्त ठळकपणे समोर येते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










