आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज समाजात स्त्रिया फक्त चूल आणि मुल एवढ्यापर्यंतच मर्यादित राहिलेल्या नाहीत. आज स्त्रिया विविध क्षेत्रांत आपली नवीन ओळख निर्माण करत आहेत. पण एक काळ असा होता ज्यावेळी स्त्रियांना चूल आणि मूल एवढेच आयुष्य होते. त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारीचे ओझे लादून त्यांची स्वप्ने जखडली जात असत. अशाच काळात रखमाबाई राउत संघर्ष करून डॉक्टर झाल्या होत्या. पितृसत्ताक मानसिकतेच्या समाजाच्या आखलेल्या परिघाला छेदण्यात त्यांना यश मिळाले होते.
१८६४ साली मुंबई येथे रखमाबाई राउत यांचा जन्म झाला. त्यांच्या विधवा आईने वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचा विवाह लावून दिला. त्याकाळी बालविवाह करणे हे फार सामान्य होते. त्यावेळी मुंबईत इंग्रजांच्या प्रभावामुळे शिक्षणाचे क्षेत्र रुंदावले असले तरी प्रत्येकाला विशेषत: स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. रखमाबाई राउत यांच्या आईचा बालविवाह करण्यात आला होता आणि त्या वयाच्या सतराव्या वर्षी विधवा झाल्या होत्या. पण त्यांच्या आईशी डॉ. सखाराम राउत या एका समाजसुधारकाने पुनर्विवाह केला. हे देखील त्याकाळी एक क्रांतिकारी पाउलच होते.
आपल्या दुसऱ्या पित्यामुळे रखमाबाईंना देखील वैद्यकशास्त्रात रस निर्माण झाला पण वयाच्या अकराव्या वर्षी विवाह करण्यात आल्यामुळे त्यांचा स्वप्नांना ब्रेक लागला. लग्न झाले तरी प्रथेप्रमाणे त्या सासरी गेल्या नाहीत, त्यांनी आपल्या पित्याचा घरी राहून आपले शिक्षण पूर्ण केले.
वयाच्या १२व्या वर्षी रखमाबाई यांनी आपल्या पुराणमतवादी नवऱ्यासोबत नांदायला नकार दिला. रखमाबाई यांना तो विवाह मंजूर नव्हता, त्यांना त्या नात्यातून मुक्तता हवी होती, पण फक्त आपल्या आईच्या दबावापोटी त्यांना त्या विवाहाचा स्वीकार करावा लागला होता. रखमाबाईंचा नवरा देखील त्यांच्यावर वैवाहिक जीवनासाठी दबाव टाकत होता. पण त्यांच्या मनात आपल्या दुसऱ्या पित्याप्रमाणे डॉक्टर होण्याचे स्वप्न मोठे होत असल्याने रखमाबाईंनी त्यांच्या पतीला व विवाहाला विरोध केला. पितृसत्ताक व पुराणमतवादी मानसिकतेच्या लोकांमध्ये राहून आपल्या विद्रोही भूमिकेवर ठाम राहून रखमाबाईनी आपल्या खमकेपणाचे दर्शन घडवले.
रखमाबाईंचा नवरा दादाजी भिकाजी त्यांच्या वागणुकीविरोधात मुंबई कोर्टात गेला. त्यावेळी हे प्रकरण इतके गाजले की तत्कालीन थोर पुढारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापर्यंत ते जाऊन पोहचले. टिळकांनी मात्र या प्रकरणात पुराणमतवादी विचारांची बाजू घेतली. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात रखमाबाई यांना नवऱ्यासोबत राहण्याचे आदेश दिले.
जर त्या नवऱ्यासोबत राहिल्या नाहीत तर त्यांना तुरुंगात पाठवण्यात येईल, असा अजब न्याय कोर्टाने त्यावेळी केला.
रखमाबाईनी धीरोदात्तपणे आपल्या पतीविरोधात निकराचा लढा दिला. अखेरीस त्यांच्या पित्याने हस्तक्षेप करून त्यांच्या नवऱ्याला काही रक्कम देऊन घटस्फोट घडवून आणला आणि रखमाबाई या लादलेल्या नात्यातून मुक्त झाल्या.
रखमाबाई यांना या काळात सर्वांत मोलाची साथ दिली ती त्यांच्या वडिलांनी आणि थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांनी!
रखमाबाई यांनी या काळात टाईम्स ऑफ इंडियात दोन लेख देखील लिहिले होते. ‘द हिंदू लेडी’ हे शीर्षक असलेल्या या लेखांमधून त्यांनी भारतीय पितृसत्ताक मानसिकतेवर टीकास्त्र सोडले. त्यांनी त्या लेखात बालविवाहाच्या अमानुष प्रथेने त्यांचे आयुष्य नष्ट केले असल्याचे म्हटले होते. त्यांना या व्यवस्थेने कुठलीही चूक केलेली नसताना अपराधी घोषित केल्यामुळे या व्यवस्थेवर टीका केली होती. पुराणमतवादी व्यवस्था हा एक मानसिक विकार असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
नवऱ्याच्या जाचापासून मुक्त झाल्यावर रखमाबाईनी आपल्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला आकार देण्याचा निर्धार केला. त्यांना यासाठी मुंबईच्या कामा रूग्णालयाच्या एडिथ फिजीसन यांनी खूप मदत केली होती. त्यांनी रखमाबाईंना इंग्रजीचे धडे दिले. यानंतर रखमाबाई लंडन स्कूल ऑफ मेडिसीनला पुढील शिक्षण घेण्यासाठी रवाना झाल्या. त्याठिकाणी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या भारतात परतल्या आणि त्यांनी इथे वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे त्या भारतातील वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून नावारूपास आल्या.
त्यांनी भारतात परतल्यावर देखील येथील पुराणमतवादी व पितृसत्ताक मानसिकतेच्या विरोधात आपला संघर्ष सुरु ठेवला. खरंतर आनंदीबाई जोशी यांच्याकडे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर असण्याचा किताब आहे. परंतु डॉक्टर झाल्यावर काही काळातच त्यांचे गंभीर आजारपणामुळे निधन झाले, त्यामुळे त्यांना समाजाला वैद्यकीय सेवा देण्याची संधी मिळाली नव्हती.
रखमाबाईनी समाजाला फक्त वैद्यकीय सेवा पुरवली नाही तर आज आपल्या आजूबाजूला आपण इतक्या महिला डॉक्टर्स यशस्वीपणे उपचार करताना बघतो आहोत, याचे श्रेय देखील रखमाबाईंच्या संघर्षाला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










