आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
तुम्ही जेव्हा देशातील काही प्रमुख शहरात फेरफटका मारायला निघतात त्यावेळी काही विदेशी नागरिक भगवे वस्त्र धारण करून ‘हरे रामा, हरे कृष्ण’ नामाचा जाप करताना दिसले असतील. खरंतर भारतीय नसलेल्या लोकांचा भगवान श्रीकृष्णाशी संबंध काय? हा प्रश्न तुम्हाला पडतच असेल. तर, आज तुम्हाला आम्ही इंग्रज, अमेरिकन आणि युरोपियन लोकांना कृष्णभक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या एका संताची कथा सांगणार आहोत, ज्याने असंख्य लोकांच्या आयुष्यावर आपला प्रभाव टाकला आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे अभय चरणावृंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. इस्कॉन या संस्थेचे ते सर्वेसर्वा होते.
स्वामी प्रभुपाद दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत, एक त्यांच्या निस्सीम कृष्णभक्तीमुळे आणि त्यांनी विश्वभरात केलेल्या कृष्णभक्तीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यामुळे !
१९६६ साली प्रभुपाद यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस’ अर्थात इस्कॉनची स्थापना केली. केवळ ५३ वर्षे जुन्या असलेल्या या संस्थेने जगभरात ८५० मंदिरे आणि १५०हून अधिक मठांची स्थापना केली आहे. इस्कॉनमध्ये भगवान श्रीकृष्णाची आराधना करण्यात येते.
१८९६ साली कोलकाता येथील एका उद्योजकाच्या घरात प्रभुपाद यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांचे पालनपोषण फार धार्मिक वातावरणात केले. इथेच त्यांना कृष्णभक्तीचा व्यासंग जडला.
प्रभुपाद २६ वर्षांचे असताना त्यांची सरस्वती गोस्वामी यांच्याशी गाठ पडली. गोस्वामी यांना प्रभुपाद यांनी आपला गुरु मानले. ३७व्या वर्षी प्रभुपाद यांनी विधिवत दीक्षा घेऊन त्यांचे शिष्यत्व प्राप्त केले.
प्रभुपाद यांना अनेक गुरु लाभले होते. सरस्वती ठाकूर या त्यांच्या एका गुरूंनी त्यांना इंग्रजी भाषेतून ज्ञानप्रसार करण्याचे आदेश दिले. या काळात प्रभुपाद यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर टीका केली आणि गौडीया मठात काम केले.
१९४४ साली त्यांनी कुठल्याही सहायतेविना इंग्रजी पत्रक काढायला सुरूवात केली. या पत्रिकेच्या संपादनापासून टंकलेखनापर्यंत सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी एकट्याने पार पाडल्या. बॅक टू गॉडहेड ही त्यांची पत्रिका युरोपियन देशात मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. या पत्रिकेचे तीसपेक्षा जास्त भाषेत भाषांतर करण्यात आले.
गौडीया मठाद्वारे प्रभुपाद यांना त्यांच्या कार्यासाठी ‘भक्तिवेदांत’ ही उपाधी देण्यात आली होती.
१९५९ मध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि अठरा हजार श्लोक असलेल्या भागवत पुराणाचे इंग्रजीत भाषांतर व रसग्रहण केले. आपल्या भागवत पुराणाच्या तीन खंडांचे प्रकाशन करायला प्रभुपाद अमेरिकेला गेले.
१९६५ मध्ये अमेरिकेत जाताना त्यांच्याकडे पुस्तकं आणि कपडे यांच्याव्यतिरिक्त काहीच नव्हते. त्यांच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. तिथे त्यांनी अशा परिस्थितीत देखील दीड वर्षात कृष्णभक्तांचा एक ग्रुप उभा केला.
१९६६ साली त्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनची स्थापना केली. आपल्या जीवनातील शेवटचे दशक त्यांनी ही संस्था उभी करण्यात व्यतित केले होते. त्यांच्या व्यक्तित्त्वामुळे इस्कॉनने अल्पावधीत मोठे यश मिळवले. ते संन्यासी असल्याने त्यांच्या निस्वार्थपणाकडे अमेरिकन लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले होते. १९६६ मध्ये इस्कॉनच्या नावात कृष्ण चेतनेऐवजी इश्वर चेतना असा उल्लेख करण्याची मागणी त्यांना करण्यात आली पण त्यांनी कृष्ण चराचरात आणि सर्व प्रकारचा परमेश्वरात व्यापलेला आहे, असे म्हणून मागणी धुडकावून लावली होती.
भक्तांच्या मदतीने त्यांनी १९६७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये मंदिराची स्थापना केली. त्यांनी आपल्या शिष्यांसमवेत अमेरिकेत पदयात्रा केली. या पदयात्रेत त्यांनी असंख्य अनुयायी जमवले. आपल्या कीर्तन, पुस्तक वितरण आणि सार्वजनिक भाषणांच्या माध्यमातून त्यांनी इस्कॉनच्या कार्याचा प्रसार केला होता.
१९७७ पर्यंत त्यांनी १०८ मंदिरांची निर्मिती केली. ही सर्व मंदिरे कृष्ण आणि बलरामाची आहेत. इस्कॉनच्या स्थापनेनंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या काही भक्तांना प्रभुपाद यांनी लंडनला आणि पॅरिसला पाठवले. याच ठिकाणी प्रसिद्ध रॉकबँड बीटल्सचे सहकारी इस्कॉनच्या कार्याच्या संपर्कात आले.
बीटल्सच्या जॉर्ज हॅरिसन यांनी इस्कॉनच्या मंदिरात बराच काळ घालवला होता. लंडनच्या राधाकृष्ण मंदिराला मोठ्या संख्येत भक्त यावेळी भेट देऊन गेले होते.
इस्कॉनच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी स्वामी प्रभुपाद यांनी अनेक द्वीपकल्पांचा प्रवास केला. अनेक देशात यात्रा केल्या होत्या. १९७७ मध्ये वृदांवन येथे त्यांचा मृत्यू झाला. आज इस्कॉन वैष्णव धर्माचा प्रसार करणारी एक आघाडीची संस्था म्हणून कार्यरत आहे, याचे सर्व श्रेय प्रभुपाद यांचे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










