आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
७ जानेवारी २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले होते. रिटायर्ड जनरल लेफ्टनंट पी. एन. हून यांचे निधन झाले त्यासंदर्भात त्यांच्या कार्याची आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची स्तुती करताना मोदी यांनी म्हटले होते “राष्ट्राला बळकट करण्यात हून यांनी अतुलनीय योगदान दिलेले आहे.”
आता हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल पी. एन. हून यांनी कुठली कामगिरी केलेली होती?
पी. एन हून भारत-पाकिस्तान-चीन सरहद्दीजवळील सियाचीन ताब्यात घेण्यासाठी जे ऑपरेशन मेघदूत भारत सरकारने राबवले त्या ऑपरेशनचे प्रमुख होते.
ऑपरेशन मेघदूत हा भारताच्या लष्करी इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला अध्याय आहे.
आता सियाचीन नक्की कुठे आहे?
तर भारताच्या उत्तर सीमेजवळील NJ9842 पॉईंटपासून ते काराकोरम खिंडीला लागून असलेला हा भाग. NJ9842 पॉइंट काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी पार्श्वभूमी तपासून पाहावी लागेल. भारताची फाळणी झाल्यावर पाकिस्तान तर बनला पण पाकिस्तानचे काश्मीरला आपल्याकडे घ्यायचे मनसुबे सरदार वल्लभभाई पटेल यांनी धुळीला मिळवले.
पाकिस्तानने काश्मीरवर ह*ल्ला केल्यानंतर राजा हरिसिंग यांनी भारताकडे मदत मागितली आणि काश्मीरची स्वायत्तता अबाधित ठेवत काश्मीर भारतात सामील व्हायला तयार झाला. तसा करारही भारत सरकार आणि राजा हरिसिंगमध्ये झाला. यानंतर स्वतंत्र भारताच्या फौजा काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सेनेचा बीमोड करण्यासाठी पाठवण्यात आल्या.
भारत – पाक यु*द्ध काश्मीर प्रांतात सुरु झाले. शेवटी नेहरूंनी UNला मध्यस्थी करण्याची मागणी केली आणि १ जानेवारी १९४९ रोजी भारत पाकिस्तानमध्ये सीजफायर झाले म्हणजे यु*द्ध थांबवले गेले. या दोन्ही देशाच्या सरहद्दीवर एक रेषा आखली गेली.
ही रेषा ज्या ठिकाणी संपते त्याला NJ9842 पॉइंट असे म्हटले गेले.
या पॉइंटच्या उत्तरेला हिमनदीचा भाग येत होता. ही जमीन राहण्यायोग्यच नाही. कारण पूर्ण भाग हा हिमनदीचा बनलेला आहे. मात्र यु*द्धाच्या आणि टेहळणीच्या दृष्टीकोनातून हा भाग भारतासाठी अत्यंत महत्वपूर्ण होता.
आपल्याला तर ठाऊक आहेच निंदकाचे घर असावे शेजारी हे म्हण दुर्दैवाने भारताच्या बाबतीत तर १००% खरी ठरली आहे. भारताचे शेजारी भारताचे फक्त निंदकच नाहीत तर भारतात सतत कारवाया करून आपली अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था कशी भंग करता येईल हे पाहणारे अत्यंत विखारी शत्रू आहेत. पाकिस्तान आणि चीन हे सख्खे शेजारी तर कायम आपली डोकेदुखी वाढवण्याचे काम करत असतात.
त्यामुळे या शेजाऱ्यांबरोबर भारताचे अगदी जुन्या काळापासून सरहद्दीचे वाद चालत आलेले आहेत. ज्या सियाचीनबद्दल आपण बोलत आहोत, ही जागा तसं पाहायला गेली तर अतिशय दुर्गम आहे, जिथे माणसाला श्वास घेणेही अवघड. पण याच जागेवरून पाक-व्याप्त काश्मीर, शक्सगम व्हॅली आणि चीन-व्याप्त काश्मीरवर देखील नजर ठेवता येते, कारण हा त्या भागातील उंचवटा आहे, शिवाय या पॉईंटमुळे भारताच्या सीमेजवळ चीन आणि पाकव्याप्त काश्मीर एकमेकांपासून दूर ठेवले जातात. जर या जागेवर पाकिस्तानने कब्जा केला असता तर चीन आणि पाकिस्तान एकदम जवळ आले असते आणि ती भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरली असती आणि ती तशी ठरायला सुरुवात झाली.
१९६२ साली भारत चीन यु*द्धानंतर पाकिस्तान आणि चीन भाई- भाई झाले. भारत एकटा पडला. या यु*द्धानंतर पाकिस्तानने आपल्या पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग, शक्सगम व्हॅली – चीनला देऊन टाकला. जिथे चीन आणि पाकिस्तानच्या भारताविरुद्ध संयुक्त कारवाया सुरु झाल्या.
१९६२ नंतर पाकिस्तानची मुजोरी इतकी वाढले कि त्यांनी आपल्या इकडे येणाऱ्या विदेशी पर्यटकांना व गिर्यारोहकांना NJ9842 च्याही पलीकडे जाण्याची परवानगी द्यायला सुरुवात केली. नकाशामध्ये देखील हा भाग पाकव्याप्त प्रदेशाचा हिस्सा आहे हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली.
१९७१ च्या भारत- पाकिस्तान यु*द्धात परिस्थिती थोडी बदलली. त्यानंतर इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात जो शिमला करार झाला त्यात सिजफायर लाईनचे नाव बदलून ते Line Of Control असे करण्यात आले. काश्मीर प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ही सरहद्द रेषा मानली जाईल असे या करारात म्हटले गेले मात्र त्यानंतरही सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापती काही थांबल्या नाहीत.
१९७७ साली काही जर्मन लोकांचा कंपू गिर्यारोहण करण्यासाठी भारतीय सरहद्दीजवळ आला. त्यांना हिमालयातील साल्तोर रिजवर ट्रेकिंग करायची होती त्यांच्याजवळ जो नकाशा होता त्यात सियाचीनचा संपूर्ण भाग पाकव्याप्त आहे आहे दाखवत होता.
हा नकाशा पाहून त्यावेळचे सरहद्दीजवळ असलेले कर्नल बुल कुमार चमकले. तो नकाशा घेऊन ते दिल्लीला मिलिटरी ऑपरेशनचे डायरेक्टर मनोहर लाल छीब्बर यांना भेटले व आपल्या जवळचा नकाशा दाखवला.
त्यानंतर अनेक विदेशी नकाशे चेक केले गेले त्यात सियाचीनला पाकिस्तानचा भाग दाखवलेला पाहून भारतीय गोटात खळबळ माजली.
भारतीय सैन्याला प्रत्यक्ष ताबा रेषे जवळ जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले गेले. तिथे जाऊन पाहणी केल्यावर पाकिस्तानची घुसखोरी भारतीय सैन्याच्या लक्षात आली.
त्यादरम्यान भारतीय सैन्याला एक टीप मिळाली की साधारण १७ एप्रिल १९८४ पर्यंत पाकिस्तान ऑपरेशन अबाबील राबवून सियाचीनवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. याला उत्तर म्हणून पाकिस्तानच्या विरुद्ध सियाचीनला ताब्यात घेण्यासाठी ऑपरेशन मेघदूतची तयारी भारतीय सैन्याने केली. याचे नेतृत्व अर्थात पी. एन हून यांनी केले. याला इंदिरा गांधी यांनी परवानगी दिली.
पाकिस्तानने गिर्यारोहकाच्या वेशात आपल्या सैनिकांना सियाचीनला नेण्याची तयारी केली होती. त्यांना आपल्या या ऑपरेशनची चाहूल भारतीय सैन्यांना लागणार नाही असे वाटले त्यामुळे ते निर्धास्त होते.
इकडे भारतीय सैन्याने आपली तयारी सुरु केली. सगळीकडे बर्फ असणाऱ्या भागावर ताबा मिळवायचा म्हटल्यावर काही खास इक्वीपमेंट लागणार होते. ते इक्विपमेंट युरोपवरून मागवण्यात आले पण ज्या सप्लायरकडून ते मागवण्यात आले त्या सप्लायरकडे पाकिस्तानने देखील अशाच खास सामानाची मागणी केल्याचे पत्र भारतीय सैन्याला प्राप्त झाले. आता गाफील राहून चालणार नव्हते.
एप्रिल महिन्यात सियाचीनला प्रचंड बर्फ पडते. भारतीय सैन्याने हा महिना निवडला. १३ एप्रिल १९८४. संपूर्ण भारतात या दिवशी होळीचा सण साजरा केला जाणार होता. त्यामुळे या दिवशी भारतीय सैन्य काही हालचाल करणार नाही म्हणून पाकिस्तान गाफील राहिले.
पण १३ एप्रिल च्या सकाळी भारताच्या चिता हेलिकॉप्टरने आपल्या जवानांना उंच दुर्गम भागातील सियाचीन भागात पोचवण्यास सुरुवात केली. ३० सैनिकांच्या तुकडीने आरामात सियाचीन भागात असलेल्या बिलाफोंड खिंडीवर कब्जा मिळवला.
१६ एप्रिल १९८४ ला सियाला नावाचा अजून एक भाग भारताच्या ताब्यात आला! हे पाकिस्तानला कळल्यावर त्यांची बोबडी वळली नसली तर नवलच! भारताने पाकिस्तानला एप्रिल महिन्यात एप्रिल फुल करून जबरदस्त चेकमेट दिला.
तरीही पाकिस्तानने भारताच्या ताब्यातील सियाचीन घेण्यासाठी आपले ऑपरेशन अबाबील जून १९८४मध्ये लाँच केले पण त्यांना भारतीय सैन्यासमोर हार खावी लागली. ऑगस्ट १९८४ पर्यंत ग्यांगला खिंड भारताच्या ताब्यात आली आणि सर्वार्थाने सियाचीन वर भारताने कब्जा मिळवला.
तेंव्हापासून आजपर्यंत भारताने या सर्वात उंच आणि अत्यंत दुर्गम थंड प्रदेशावर आपला कब्जा टिकवला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत आपले सैनिक सियाचीनवर आज सुद्धा पहारा देत उभे असतात. त्यांच्या शौर्याला, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या निष्ठेला, त्यांच्या मातृभूमीवरील प्रेमाला मानाचा मुजरा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








