आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याबरोबरच भारताने आपला एक हिस्सा सुद्धा भारत-पाकिस्तान फाळणीत गमावला. ब्रिटीशांच्या तोडा आणि राज्य करा या नीतीचा दुरगामी परिणाम भारताच्या राजकारणावर झाला. फक्त भौगोलिकच नाही तर, सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा भारत दोन भागांत विभागला गेला. फाळणीवर शिक्कामोर्तब जरी १५ ऑगस्टला झाले असले तरीही विभाजनाची प्रक्रिया आधीच सुर झाली होती.
याच फाळणीच्या वेळी भारत आणि पाकिस्तानचा नवीन नकाशा बनवण्यासाठी भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबेटन याने एका सीमा आयोगाची स्थापना केली. या आयोगाच्या अध्यक्षस्थानी होते सेरिल रॅडक्लिफ. भारतीय भौगोलिक रचनेचा काहीही अभ्यास नसताना दिली गेलेली ही जबाबदारी पार पाडताना त्यांना संकटांना सामोरे जावे लागणार हे साहजिकच होते.
त्यातील एक संकट होते ते म्हणजे हिंदू समाजाचे वर्चस्व असणारे लाहोर हे शहर पाकिस्तानला बहाल करण्यात. लाहोर पाकिस्तानात जाण्यामागचा हा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.
१९४१ साली झालेल्या जनगणनेनुसार लाहोर जिल्ह्याची लोकसंख्या होती ६७१,६५९. यापैकी ६०.६२ % लोकसंख्या ही मुस्लिम होती, तर ३९.३८ % लोकसंख्या ही हिंदू आणि सिख धर्मीय होती.
लोकसंख्या कमी असली तरी लाहोरमधील ८०% संपत्ती ही हिंदू-सिख लोकांच्या मालकीची होती. शहरातील संग्रहालय, इमारती, व्यवसाय, शालेय संस्था, दवाखाने हे सगळे मुख्यत: हिंदू आणि सिख लोकांच्या मालकीचे होते.
लाहोर हा ताकदवान सिख, हिंदू व्यावसायिकांचा, शिक्षणतज्ज्ञांचा जिल्हा होता. पंजाबचे हृदय असलेला हा जिल्हा, शिखांचे कर्तृत्ववान महाराजा रणजित सिंह (ज्यांच्याकडे कोहिनूर हिरा होता) यांच्या काळी राजधानीचे शहर होते.
विभाजनाच्या वेळी रॅडक्लिफला तडकाफडकी ग्रेट ब्रिटनवरुन शिमल्याला बोलवण्यात आले आणि सीमा आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले. जुन १९४७ मध्ये आपले काम सुरू करुन ६ आठवड्यात त्यांनी सीमा अहवाल लॉर्ड माऊंटबेटनसमोर सादर केला.
हा अहवाल रॅडक्लिफनी केलेल्या फक्त एका हवाई यात्रेच्या निरिक्षणांच्या आधारे बनवण्यात आला होता.
१७ ऑगस्ट, १९४७ रोजी हा अहवाल जनतेसमोर सादर केला गेला. रॅडक्लिफ एक हुशार कायदेतज्ञ नक्कीच होता, परंतु भारताच्या बाबतीत त्याचे अज्ञान सीमा विभागणी करण्याच्या कामी आडवे आले.
१९३१ला लाहोरमध्ये जन्म झालेले ज्येष्ट भाजप नेते वी. के. मल्होत्रा यांच्या मते, लाहोरमधील प्रत्येक व्यक्तीला ही खात्री होती की लाहोर भारतात राहील. जेव्हा काही मोठ्या नेत्यांनी स्वत:चे कुटुंब पंजाबच्या पुर्व भागात सुरक्षिततेसाठी घेऊन जाण्यास सुरुवात केली तेव्हा सामान्य नागरिकांना अनपेक्षित धक्का बसला.
अशा वेळी प्रश्न पडतो तो रॅडक्लिफनी लाहोर शहर पाकिस्तानात समाविष्ट का केले?
या प्रश्नाचे उत्तर सापडते ज्येष्ट पत्रकार आणि लेखक कुलदीप नायर यांच्या ‘Scoop : Inside stories from the partition to the present’ या पुस्तकात.
१९७१ साली कुलदीप नायर लॉर्ड माऊंटबेटन यांना भेटण्यासाठी लंडनला गेले असताना त्यांनी लॉर्ड सेरिल रॅडक्लिफची भेट घेतली. त्या भेटीच्या वेळी सीमा आयोगाचे अध्यक्ष असलेल्या रॅडक्लिफने त्यांना हे उत्तर देताना सांगितले-
“मी तुम्हाला लाहोर देणारच होतो. परंतु तेव्हा माझ्या लक्षात आले की मग पाकिस्तानात कोणतेही मोठे शहर राहणार नाही. कोलकत्ता मी आधीच तुम्हाला दिले होते.”
एवढेच नाही तर पाकिस्तानला लाहोर दिले म्हणून पाकिस्तानने मला धन्यवाद म्हणायला हवे असेसुद्धा ते म्हटले होते. भारताच्या हिस्स्याचे लाहोर पाकिस्तानला मिळाले यासाठी पाकिस्तानने माझ्यावर खुश होण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
या प्रश्नाचे उत्तर रॅडक्लिफने एवढे सहजासहजी दिले असले तरी भारतात या निर्णयाचे अतिशय रक्तरंजित परिणाम दिसून आले. स्थलांतर करण्याच्या प्रयत्नात, झालेल्या दं*गलीत लाखो लोकांनी आपले प्राण गमावले.
पंजाबमधील फिरोजपुर आणि गुरदासपुर ही दोन शहरेसुद्धा रॅडक्लिफने पाकिस्तानला दिली होती. लॉर्ड माऊंटबेटनने समजुत घालुन या दोन शहरांना परत भारतात समाविष्ट करण्याचे सांगितले. या निर्णयानंतरसुद्धा या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात दं*गली उसळल्या होत्या.
या रक्तरंजित पडसादांच्या बातम्या ऐकुन रॅडक्लिफला अतिशय दु:ख झाले होते असे सांगितले जाते. यामुळेच त्याने विभाजनाची सगळी कागदपत्रे जाळुन टाकली असं म्हणतात. त्याला देण्यासाठी ठरवली गेलेली ४०,००० रुपयांची रक्कम घेण्यास त्याने नकार दिला.
यानंतर रॅडक्लिफ कधीही भारतात किंवा पाकिस्तानात परत आला नाही. १ एप्रिल, १९७७ रोजी त्याचा मृत्यू झाला.
आज भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले दार्जीलिंग रॅडक्लिफनेच भारतात समाविष्ट केले होते. त्यावेळी सीमा आयोगातील एका व्यक्तीने त्याला ते पाकिस्तानात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता. यामागचे कारण विचारले असता तो व्यक्ती बोलला, “मी आणि माझे कुटुंब दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टीसाठी दार्जीलिंगला जातो. जर दार्जीलिंग भारतात गेले तर मग तिथे जाणे अतिशय अवघड होउन बसेल.”
एवढ्या सहजतेने विभागले गेलेल्या या देशांच्या विभागणीत भौगोलिक तत्वांपेक्षाही सामाजिक तत्वांचा विचार होणे जास्त गरजेचे होते. सामाजिक दृष्टिकोनातून परिपूर्ण विचार करुन झालेल्या विभाजनाने तर कदाचित त्यावेळी पडलेल्या पडसादांची तीव्रता नक्कीच कमी करता आली असती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








