आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
“चाय एक इमोशन हैं।”
सकाळ झाल्यावर दुसरं काहीही न करता पहिलं काम आपण काही करत असू तर ते म्हणजे चहाचं भांडं गॅसवर ठेवणं. थोडं पाणी उकळल्यावर त्यात चहा, साखर, आलं आणि दूध घालून खळखळ उकळून कडक असा चहा घेतल्याशिवाय आपल्यापैकी कित्येकांच्या दिवसाची सुरुवात होतच नाही.
कोणाकडे सोसायटीचा चहा, कुठे वाघबकरी किंवा अजून कोणताही असो पण प्रत्येक घरात चहा अगदी “मस्ट”!
तुम्हाला माहितीये का, काही चहांची किंमत हजार आणि लाखाच्या घरात असते? होय! चक्क लाखो रुपयांचा चहा जगाच्या बाजारात विकत मिळतो. असं काय बरं विशेष असेल या ‘चहापत्ती’मध्ये? जाणून घेऊयात या लेखातून
दा होंग पाओ
चीनमध्ये तयार होणाऱ्या या चहाच्या किंमतीपुढे सोन्याची किंमतसुद्धा फिकी पडेल. २० ग्रॅम चहापत्तीसाठी २८,००० डॉलर (१,८०,००० युआन आणि २३,३०,७४९ रुपये) एवढी किंमत मोजावी लागते. अजूनही पारंपरिक पद्धतीनेच या चहाची लागवड केली जाते म्हणून हा चहा एवढा महाग आहे असं म्हणतात.
पीजी टिप्स डायमंड टी
पीजी टिप्स डायमंड टी हा चहा एका ब्रिटिश चहाच्या कंपनीने त्यांना ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात तयार केला होता. या खास मौक्यासाठी त्यांनी अल्ट्रा लक्स डायमंड चहा बनवायचं ठरवलं आणि या चहाच्या विक्रीतून येणार पैसा एखाद्या गरजू संस्थेला देण्याचं ठरवलं.
एका टी-बॅगची किंमत त्यांनी ठेवली होती तब्बल १५,००० डॉलर्स ! का? कारण त्या टी-बॅग्सवर त्यांनी चक्क हिरे जडवले होते!
आहे की नाही कमाल? चॅरिटीची चॅरिटी आणि कंपनीचं नाव!
पांडा डंग टी
नाव वाचून विचित्र वाटलं ना? आता हा जो चहा आहे तो कुठले साधेसुधे खत वापरून पिकवला जात नाही तर, यासाठी फक्त पांडा या प्राण्याचं शेण वापरलं जातं. चीनच्या शेजवान प्रॉव्हिन्समधल्या टेकड्यांवर या चहाची लागवड केली जाते.
कुठलेही रासायनिक खत न वापरता लागवड केल्यामुळे याची किंमत जास्त आहे असं म्हणतात. किती जास्त?
३५,००० डॉलर (२९,१३,७०५ रुपये) तेही फक्त अर्धा किलो चहासाठी!
व्हीन्टेज नारसिसस व्युऊ उलॉंग टी
हा चहा जगातल्या सगळ्यात जुन्या चहापैकी एक आहे. पन्नास वर्ष जुन्या एका डब्यातल्या या चहाला एका किलोसाठी ७,१६५ डॉलर (५,९६,४९७ रुपये) एवढी किंमत मोजावी लागते.
टाईगुआनयिन
या चहाच्या एका घोटानेच आपली पंचेंद्रिय ॲक्टिव्ह होतात असं म्हणतात. ३,००० डॉलर (२,४९,७५२ रुपये) प्रति किलो असणारा हा चहा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.
सात कप चहा जे काम करतो ते काम या चहाचा एकच कप करतो असं म्हणतात. गुआन यिन या एका बौद्ध योग्याच्या नावावर या चहाला नाव देण्यात आलं आहे.
यल्लो गोल्ड बिड्स
नावातच “गोल्ड” आहे. या चहाच्या पत्तीमधे चक्क खरं सोनं असतं. म्हणूनच या चहाची किंमत ३००० डॉलर (२,४९,७५२ रुपये) प्रति किलो एवढी आहे. पण, हा चहा फक्त आणि फक्त सिंगापूरमध्येच विकला जातो.
एवढंच नाही तर या चहाचं पीक वर्षातून केवळ एकदाच घेतलं जातं आणि जेव्हा त्याची पानं तोडायला जातात तेव्हा ती सोन्याच्या कात्रीने तोडतात.
टीडब्ल्यूजी कंपनीच्या या चहाचे जगभरात फॅन्स आहेत पण लिमिटेड स्टॉक असल्याने काही नशीबवान लोकांच्याच घरी हा चहा बघायला मिळतो.
पू पू टी
पू पू टी हा चहा अठराव्या शतकात शोधला गेला आहे. तेव्हाच्या डॉक्टरांनी या चहात काही औषधी गुणधर्म असल्याचं सांगितलं होतं. हा चहा काही विशेष किड्यांच्या मदतीने बनवला जातो. ते किडे चहाची पानं खातात आणि जी पानं खाली पडतात त्यांना गोळा करून हा चहा बनवला जातो.
आजच्या घडीला या चहाच्या प्रत्येक किलोमागे १,००० डॉलर (८३,२७१ रुपये) एवढी किंमत मोजावी लागते.
ग्योकुरो टी
हा चहा जरा वेगळा आहे. म्हणजे याची कापणी झाली की या चहाच्या पानांना दोन आठवडे उन्हापासून दूर बंद करून ठेवतात जेणेकरून यात अमिनो ॲसिडचं उत्तम सिक्रिशन होतं, यामुळेच या चहाला खास अशी चव येते. या चहाचा रंग जितका डार्क तेवढी याची चव “जगात भारी”!
या चहाची किंमत आहे ६५० डॉलर (५४,१२६ रुपये) प्रति किलो!
तर, ही होती जगातील सर्वांत महाग चहांची यादी! सर्वसाधारण घरात तर हा चहा येणं जरा अवघडच आहे.
पण, तुमचा आवडता चहा कोणता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










