The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीयांबद्दल आस्था असलेला व्हाईसरॉय…!

by रविकुमार सुभाषराव
7 June 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“बंगाली स्त्रिया अज्ञानी आहेत. त्या त्यांच्या नवऱ्यांना दुर्लक्षित करतात त्यामुळे निराश झालेले त्यांचे नवरे अर्थात बंगाली बाबू त्याचा राग न्याय देताना आमच्यावर काढतील.” हा युक्तिवाद, इल्बर्ट बिलास विरोध करताना त्या काळात सगळ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्रिटिश लोकांच्या बायकांचा होता. यावर रागात आलेल्या बंगाली स्त्रियांनी प्रतिवाद करत “तुमच्यापेक्षा संख्येने जास्त पदव्या बंगाली स्त्रियांकडे असून आम्ही तुमच्यापेक्षा जास्त सुशिक्षित आहोत.” असे म्हणत इल्बर्ट बिलास समर्थन दिलं. त्याचं म्हणणं तर्काच्या तराजूवर तोलून बघितलं तर योग्यच होतं कारण तेव्हा कलकत्ता विद्यापीठात स्त्रियांना पदवीसाठी प्रवेश होता, त्याचवेळी ब्रिटनच्या स्त्रियांसाठी विद्यापीठात शिक्षण घेणं हे एक दिवास्वप्न होते.

तो काळ होता १८८३चा.

तोपर्यंत भारतीय न्यायाधीशांना फक्त भारतीय वादी-प्रतिवादींचे खटले चालवण्याचा अधिकार होता. त्यांना युरोपीयन लोकांचे खटले चालवण्याचा अधिकार नव्हता. इल्बर्ट बिल भारतीय न्यायधीशांना युरोपीय न्यायाधीशांच्या पंगतीत बसवणार होते. याला विरोध म्हणून गोऱ्या युरोपीय लोकांनी एक जोरदार आंदोलन उभारले. त्यात चहामळ्याचे मालक, जुटपासून सुंभाचे बंडल विकणारे, भूमाफिया, जंगल माफिया आणि बँकवाले या सगळ्यांनी मिळून स्वतःच्या ब्रिटिश सरकार विरोधात उठाव पुकारला.

त्यांचा म्होरक्या जॉन बीम्स या एका अनुभवी सरकारी अधिकाऱ्याने तर सरळ सरळ, “हे बिल म्हणजे ब्रिटिश साम्राज्याविरोधात क्रांती घडवून आणण्यासाठीचा कट असून त्यात इल्बर्ट सोबत व्हाईसरॉयसुद्धा सामील झाला आहे” असा घणाघात केला.

हा गोऱ्यांनी त्यांच्या सरकारविरोधात केलेला एकप्रकारे ‘व्हाइट म्यूटीनी’ टाईप प्रकार होता. गोरे फिरंगी हवालदिल झाले होते.



“हे काळे आता आमचा न्याय करणार का?” “हे आमच्या बायकांवर बला*त्कार करून त्यांना त्यांच्या घुसलखाण्यात गुलाम म्हणून ठेवतील, त्यानंतर जेव्हा ब्रिटिश स्त्री एका काळ्या न्यायाधीशापुढे न्यायाची भीक मागेल तेव्हा तो त्या बला*त्कारापेक्षा तिच्यावर केलेला मोठा अन्याय असेल.” “आमचं म्हणणं खोटं वाटत असेल तर १८५७ च्या बंडात झालेला छळ लक्षात नाही का?” “यापेक्षा हे ब्रिटिश साम्राज्य उ*ध्वस्त झालेले बरे नाही का?”

असे प्रश्न ब्रिटनच्या सरकारला त्यांची माध्यमे विचारू लागली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इथल्या युरोपियांनी जे “संरक्षण संघ” स्वतःची मनमानी चालू ठेवण्यासाठी बनवले होते त्यांचा वापर व्हाईसरॉयच्या पहारेकऱ्यांना हटवून त्याला बंदी बनवून त्याला इंग्लंडला पाठवायचे अशी योजनाही ठरली. त्यांनी त्यासाठी दीड लाख रुपये जमवले. आसामच्या मळेमालकांनी व्हाईसरॉय शिकारीला आला की त्याचे अपहरण करायचे असा कट रचला.

खुद्द क्राऊन क्वीन व्हिक्टोरिया युरोपीय आंदोलकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली. तिने व्हॉइसरॉयच्या हेतूवर शंका घेतली. याच काळात युरोपीय आणि बंगालच्या लोकांमध्ये कलकत्त्यात दंगेसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. पण भारतीयांना व्हॉईसरॉयवर विश्वास होता.

या सगळ्या विद्रोही वातावरणाचे मूळ होते भारतीय मजूरांचा होणारा अतोनात छळ. युरोपियन चहामळेवाले भारतीय मजुरांना विनापगारी उपाशी मारत. तोंडातून शिव्यांची लाखोली अन् हाताने काठ्यांचा मार हे सगळे राक्षसी अ*त्याचार मजुरांना सोसावे लागत. एवढं करूनही युरोपियन कोर्टातून मोकाट सुटत असत. एकमेकांशी असलेले लागेबांधे, वशिले, भ्रष्टाचार अन् भारतीयांना जनावर म्हणून वागणूक देण्याचा असलेला दृष्टिकोन, यामुळे ब्रिटिश न्यायाधीशांकडून न्यायाची अपेक्षा म्हणजे पाण्यावर रेघ मारण्याचा प्रकार होता.

हा सगळा प्रकार बघून बिहारीलाल गुप्ता या कचर जिल्ह्याच्या कलेक्टरने हा अन्याय दूर करावा यासाठी भारताच्या व्हाईसरॉयला गळ घातली. त्यानेही हा अन्याय दूर झाला पाहिजे म्हणून आपला कायदे सल्लागार कर्टनी इल्बर्टला कायदा बनवण्यास सांगितले. तो व्हॉईसरॉय होता लॉर्ड रिपन.

लॉर्ड रिपन हा ब्रिटनच्या पंतप्रधानाचा दुसरा मुलगा म्हणून १० डाऊनिंग स्ट्रीट या घरात जन्माला आला. त्याने कुठल्याही कॉलेजात किंवा शाळेत न जाता सगळं शिक्षण घरीच पूर्ण केलं. भारताच्या व्हाईसरॉयपदी विराजमान होण्याआधी ४-५ वेळा संसद सदस्य, २-३ वेळा भारतीय खात्यासंबधी मंत्रीपदे त्याने सांभाळली होती.

१८८० साली ग्लॅडस्टन जेव्हा पंतप्रधान झाला तेव्हा त्याने लिटनने अफगाण यु*द्धात ब्रिटनची केलेली नाचक्की मिटवावी, अफगाणांशी करार करावा म्हणून रिपनला भारतात पाठवले. रिपनने ही जबाबदारी नीट पार पाडत राणीच्या साम्राज्याची लाज राखली. पण रिपन हा पुढे विलीयम बेन्टीकच्या जातीतला व्हाईसरॉय निघाला. त्याने सुधारणांचा इतका धडाका लावला की भारतीयांना त्याच्याकडून आता मोठ्या बदलांची अपेक्षा वाढायला लागली.

त्याने लॉर्ड लिटनने पास केलेल्या ‘व्हर्नाकुलर प्रेस ऍक्ट’ला १८८२ रोजी तिलांजली देऊन भारतीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी बंद केली. पुढे जनता त्याचा “वृत्तपत्रांचा मुक्तिदाता” म्हणून गौरव करू लागली.

रिपन आयर्लंडमधील होमरूल आंदोलनाचा समर्थक असल्याने त्याचा स्थानिक लोकांच्या स्वशासनाच्या अधिकारास पाठिंबा होता. ज्याकाळात भारतीयांनी अशी कुठली मागणीही केली नव्हती त्याकाळात रिपनने त्रिस्तरीय बोर्ड स्थापन करून त्यात निवडून आलेल्या प्रतिनिधींना निधी खर्च करण्याचे अधिकार दिले. हे सगळं नवीन होतं.

त्याने १८८२ साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावाने एक ठराव पास करून भारतात पंचायती राजव्यवस्थेचा पाया रचला. त्यामुळे भारतीयांना पहिल्यांदा स्वातंत्र्य काय असतं याची चव कळली.

स्वयंशासनाचा रिपनचा प्रयोग पुढे “प्रतिक्रियावादी” कर्झनच्या इतका जिव्हारी लागला होता की, तो रागात म्हटला “मी जर भारताचा व्हाईसरॉय नसतो तर मला कलकत्ता महानगरपालिकेचा महापौर व्हायला आवडले असते”, इतके अधिकार रिपनने महापालिकांना दिले होते. पुढे चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस हेही त्या पालिकेत महापौर झाले होते. जगातली दुसऱ्या क्रमांकाची जुनी मद्रास महानगरपालिकासुद्धा याला अपवाद नव्हती. आजही तिच्या इमारतीला रिपन बिल्डिंग म्हटले जाते.

रिपनच्या सुधारणांचा वारू चौफेर उधळत होता. त्याने बंगालमधील कष्टकरी शेतकऱ्यांना जमीनदारांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी बंगाल टेनन्सी कायदा पास करण्यास पुढाकार घेतला. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्याने वुड्सच्या खलित्याचा भारतीय शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम झाला यासाठी हंटर आयोगाची स्थापना केली. त्यानुसार शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून शासकीय शाळांना अधिकाधिक सक्षम करण्यावर भर दिला.

त्याने १८८१ साली पहिला फॅक्टरी कायदा पास करून लहान मुलांना फॅक्टरीत काम करण्यास सक्त बंदी, कामाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था तसेच मजुरांच्या कामाचे तास निश्चित केले. हा भारतीय उद्योग विश्वात केला गेलेला नवा प्रयोग होता. आजही हा कायदा आदर्श मानला जातो. पहिली नियमित जनगणना ही १८८१ साली रिपनच्या कार्यकाळात केली गेली.

त्याचा भारतातील हा काळ बघून ही भारताच्या सुवर्ण युगाची सुरुवात आहे असे गौरवोद्गार फ्लॉरेन्स नाईटेंगलने काढले होते. तो कुठल्याच दृष्टिकोनातून साम्राज्यवादी नव्हता. पुढे इल्बर्ट बिलाचा वाद चिघळत गेला. रिपनला गोऱ्यांच्या दबावाखाली झुकावे लागले. विधेयकाच्या मूळ गाभ्यात बदल करून “ट्रायल बाय इंडियन ज्युरी” हे युरोपियन लोकांच्या इच्छेनुसारच असेल असा बदल केला गेला. इथे त्या विधेयकाचा आत्मा मारला गेला.

१८५७ नंतर ही पहिलीच घटना होती ज्यामुळे भारतीयांचे डोळे उघडले होते. त्यांना इंग्रजी सत्ता झुगारून देण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. भारतीयांना ब्रिटिश अन्यायी आहेत याची जाणीव झाली. यावर अर्नांड व्हाईटने उद्विग्नपणे, “रिपनने भारत गमाविण्याचा मार्ग मोकळा करून दिला” अशी प्रतिक्रिया दिली. (तेही तितकेच खरे होते कारण त्यानंतर दोनच वर्षात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली जिने ब्रिटिश सत्तेची पाळंमूळं हालवली.) यानंतर भारतीय खजिन्यातून इजिप्तचे यु*द्ध लढण्याला विरोध दर्शवत इल्बर्ट विधेयकाच्या मागे घेण्याने नाराज झालेल्या रिपनने राजीनामा दिला.

कलकत्त्यातील पहिल्याच भाषणात “माझे मूल्यमापन शब्दावरून नव्हे तर कामावरून करा” असे तो बोलला. तो गेल्यानंतर इथल्या नोकरशाहीने त्याच्या सगळ्या निर्णयास हरताळ फासण्यास सुरुवात केली. पण त्याच्या कामावर बोलताना सुरेंद्रनाथ बॅनर्जी उद्गरले “रिपनने खूप यश मिळवले म्हणून त्याचे स्मरण केले जाते असे नाही तर त्याचे उद्देश्य पवित्र होते, ध्येय महान होते, धोरण स्पष्ट होते आणि तो वर्णभेदाचा तिरस्कार करीत होता.”

भारतीयांना दुर्लक्षित करणे, त्यांचा द्वेष करणे किंवा त्यांना टाचेखाली दाबून धरणे ही राजकीय चूक होईल असे रिपनचे मत होते. स्वशासन हाच सगळ्यात मोठा राजकिय सिद्धांत आहे असे तो मानत असे.

रिपनच्या परत जाण्याने ‘आपला माणूस गेला’ अशी भारतीयांची भावना होती. ॲलन ह्युम आणि विलियम वेडरबर्न इतकंच प्रेम त्या काळातल्या भारतीयांना रिपनवर जडले होते. त्याच्या नावाने आजही चेन्नईत “लॉर्ड रिपन इंगल अप्पा” म्हणजे ‘लॉर्ड रिपन आमचा पिता’ हे गीत गायले जाते. कर्नाटकात एका मोठ्या गावाला रिपनपेठ असे नाव दिले आहे.

अशी माणसं थोड्याच कालावधीत आपला ठसा उमटवणारी असतात. त्यांची तत्त्वं देश, ठिकाण आणि माणूस बघून बदलत नाहीत. ते माणसाचा रंग माणूसकीच्या आडवा येऊ देत नाहीत. ते कुणालाच अडाणी समजत नाहीत. किंबहुना, त्यांचा भौतिक शिक्षणापेक्षा मानवाच्या बुद्धिमत्तेवर जास्त विश्वास असतो. ते त्यांच्या पावलांचे ठसे उमटवण्यासाठी मऊ मातीवर चालण्यापेक्षा खडतर वाट धरतात जेणेकरून त्यांच्या मागून येणाऱ्या लोकांना जास्त झगडावे लागू नये.

आपल्या परिघाबाहेर जगणारी अशी माणसं त्यांच्या प्रकाशाचा व्यास उंचावत असतात. आपण ज्यांचे दुरून कुणीही लागत नसलो तरी आपल्याला त्यांचा ‘आपला माणूस’ बनता आलं पाहिजे हे त्यांचं तत्त्व असतं. आपलेच ज्ञान स्वतःसाठी वापरून मोठी झालेली अगणित लोकं या जगात आहेत. पण आपलं तत्त्वज्ञान लोकांच्या भल्यासाठी वापरून आपल्याला ‘रिपन’ होता आलं पाहिजे.

रिपन भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्याचा दिवा पेटवून गेला. जो पुढे सहा दशके स्वतःच्या न्याय आणि हक्कांसाठी धगधगत होता. लंडनला गेल्यानंतर त्याने जे शेवटचं विधायक काम केलं ते म्हणजे भारतीयांच्या बाजूने मोर्ले मिंटोच्या १९०९ च्या सुधारणांना मत दिले. इतिहासाने रिपनची दखल घेतली पण त्याच्या नावाने पाने भरून लिहायला मात्र कुणाला जमलं नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

तिरंग्यासाठी हुतात्मा झालेल्या बिहारच्या या सात पुत्रांचा इतिहास आपल्याला माहित असायलाच हवा

Next Post

या ब्रिटीश महिलेने भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास देखील भोगलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या ब्रिटीश महिलेने भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास देखील भोगलाय

या कॉमेडी ग्रुपने आपलं इंटरनेट कॉर्पोरेट्सच्या घशात जाण्यापासून वाचवलं आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.