आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
एप्रिल २०१९मध्ये गुगलने त्यांचा गुगल प्लस (Google+) हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद केला. बऱ्याच दिवसांपासून हे बंद होणार असल्याच्या चर्चा चालू होत्याच. एका छोट्याशा ‘बग’मुळे जवळपास ५० हजार लोकांचा पर्सनल डाटा लिक झाल्याने शेवटी त्यांना गुगल प्लस बंद करावं लागलं.
आज आपण गुगल प्लसच्या मागे असलेल्या भारतीय व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
सिलिकॉन व्हॅलीमध्ये विक गंडोत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवेकचा जन्म मुंबईला झाला. डॉन बॉस्कोमधून शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने आयआयटी चेन्नईमधून बीटेक पूर्ण केलं. त्यानंतर तो अमेरिकेतच स्थाईक झाला.
१९९१ साली मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना त्याने अनेक प्लॅटफॉर्म्सवर काम केलं. काही काळाने तो प्लॅटफॉर्म इव्हँजेलिझमचा जनरल मॅनेजर बनला. असं म्हणतात की, त्याने विंडो लाइव्ह ऑनलाईन सर्विसवर काम केलं, जेणेकरून गुगल ॲप्लीकेशन्सला टक्कर देता येईल.
अनेक वर्षं मायक्रोसॉफ्टमध्ये काम केल्यानंतर २००७ साली त्याने गुगलचा सोशल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नोकरी स्वीकारली. इथेच त्याने ब्रेडले होरोवीट्जसोबत गुगल प्लसची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली.
२०११ साली गुगल प्लस लाँच करण्यात आलं. गुगलच्या गुगल बझच्या जागी या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला जवळपास ४५० मिलियन लोक हे वापरायला लागले. पण हळूहळू गुगल प्लसचे युजर्स कमी होण्यास सुरुवात झाली. २०१५ साली हा आकडा ११ करोडवर आला.
दिवसेंदिवस ही संख्या घटत गेली. यामुळेच २०१९ साली गुगलने गुगल प्लस बंद करण्याची घोषणा केली.
याशिवाय गुगल मॅप्स आणि गुगल आयओच्या सुरुवातीच्या एडीशन्सवरही त्याने काम केलं होतं. २०१४ साली विवेकने गुगलचा राजीनामा दिला.
११ नोव्हेंबर २०१५ रोजी, विक गंडोत्राने त्यांच्या गुगल+ प्रोफाइलवर घोषणा केली की तो अॅलाइव्हकॉर कंपनीचे सीईओ म्हणून काम करणार आहे. एवढंच नाही तर, २००३ साली वयाच्या अवघ्या ३५व्या वर्षी जगातील टॉप १०० इनोवेटर्सच्या यादीत त्याचं नाव आलं होतं पण, १७ जानेवारी २०१९ रोजी असे वृत्त आले की काही वैयक्तिक कारणांमुळे तो अॅलाइव्हकॉरमधून देखील राजीनामा देत आहे.
विंडोज, गूगल मॅप्स, गूगल सर्च, यूट्यूब, गूगल फोटोज यांसारख्या टीमसोबत काम करणाऱ्या मुंबईकराचा आम्हाला अभिमान आहे!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










