The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जे स्विस कंपन्यांना जमलं नाही ते टायटनने करून दाखवलंय

by द पोस्टमन टीम
20 December 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेखक– मनोज शेडबाळकर

टायटन!!!

हे नाव ऐकले की ती सुप्रसिद्ध ट्यून डोक्यात वाजू लागते. ती प्रेमळ आजीबाई आणि तो मुलगा. आपल्यापैकी बहुतेक जणांच्या मनगटावर ‘टायटन’ मानाने विराजमान झालेले असेल. सोनाटा, फास्टट्रॅक, रागा, रिगालिया, नेब्युला ही याचीच भावंडे!

जगातली पाचव्या क्रमांकाची मनगटी घड्याळाची कंपनी, भारतीय बाजारपेठेमधला प्रचंड हिस्सा, ९००० कोटींचा टर्नओव्हर आणि २०११ साली Favre-Leuba या जवळपास ३०० वर्षे जुन्या स्विस कंपनीला विकत घेणे या अचाट गोष्टी केवळ २५ वर्षांत घडल्या आहेत, यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही. पण या अविश्वसनीय गोष्टींमुळे मनगटी घड्याळांच्या जागतिक बाजारपेठेमध्ये टायटनने आपले आणि पर्यायाने भारताचे नाव मानाने कोरले आहे.



“घड्याळांच्या विश्वामध्ये परंपरा न लाभलेल्या भारतासारख्या देशामधील एक नवखी कंपनी हे सगळं अल्पावधीत साध्य करते” ही वस्तुस्थिती टायटनच्या यशाला एक विशेष आयाम प्राप्त करून देते.

या घडामोडींमागे एक द्रष्टा माणूस आहे – झेरसेस देसाई. ऑक्सफर्डमध्ये शिक्षण सुरू असताना सुट्टीवर भारतात आलेले देसाई (शिक्षण सोडून!) १९६१ साली टाटा ग्रुपमध्ये सहभागी झाले. टाटा केमीकल्स, टाटा इंडस्ट्रीज, इंडीयन हॉटेल्स (ताज) आणि टाटा प्रेस अशा वेगवेगळ्या टाटा कंपन्यांसोबत काम केल्यानंतर १९८५ साली टाटा आणि तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एकत्रित पुढाकारातून स्थापना झालेल्या टायटनमध्ये त्यांची रवानगी केली गेली, तिथून पुढे १५ वर्षे देसाई आणि टायटन ही नावे एकत्र घेतली गेली.

झेरसेस देसाई जरी २००२ मध्ये रिटायर झाले असले तरी टायटनच्या आजच्या यशामध्येही त्यांचे योगदान आहे!

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

thepostman
Mr. Xerxes Desai

१९८५ साली एका फ्रेंच कंपनीच्या मदतीने टाटांनी घड्याळाच्या क्षेत्रात पाऊल टाकले ते टायटन या नावाने! सुरूवातीला घड्याळाच्या मशीनपासून संपूर्ण घड्याळ तयार करण्यापर्यंत सर्व तंत्रज्ञान फ्रेंच कंपनीने पुरवले. मे १९८७ पासून टायटनने व्यावसायिक उत्पादन सुरू केले व उण्यापुर्‍या पाच वर्षांमध्ये संपूर्ण तंत्रज्ञान, सर्व बारकावे इत्यंभूत अवगत करून घेऊन फ्रेंच तंत्रज्ञानापेक्षा उत्तम प्रतीची घड्याळे आपण बनवू शकतो हा आत्मविश्वास कमावला.

यानंतर दोन वर्षे अविरत संशोधन करून टायटनने आपले स्वतःचे पहिले-वहिले मशीन (Watch Movement) बनवले. जागतिक मानांकनाच्या सर्व चाचण्या या मशीनने पार पाडल्या. आता टायटन घड्याळे भारतीय प्रमाणवेळ “भारतीय” मशीनने दाखवू लागले. हे साल होते १९९३-१९९४.

यादरम्यान आलेली टायटनची घड्याळे जर कोणाला आठवत असतील तर हे सहज लक्षात येईल की ही घड्याळे बटबटीत व आजच्या तुलनेने बेढब असली तरी हळूहळू लोकप्रिय होत होती. एचएमटी व त्यादरम्यानच्या बाकीच्या घड्याळांच्या तुलनेत टायटनचे नाव अल्पावधीतच प्रसिद्ध होत होते.

१९९३-९४ च्या दरम्यान टाटा ग्रुपने नवीन अध्यक्ष रतन टाटांच्या नेतृत्वाखाली एकसंधतेकडे वाटचाल सुरू केली होती. टाटा ग्रुप अजून एकसंध झाला नसल्याने टायटनच्या डोक्यावर असलेला टाटांचा हात जाहिरातींमधून दिसावा तितका दिसला नव्हता. त्यामुळे “टायटनच्या त्यावेळच्या यशामध्ये टाटा फॅक्टरचा फारसा वाटा नसावा, संपूर्णपणे गुणवत्तेवर व एचएमटीच्या तुलनेमध्ये वेगळे व सुंदर असण्यामुळे टायटनने बाजी मारली असावी” (हा अंदाज आहे.)

thepostman
टायटनची सुरूवातीची घड्याळे

घड्याळांच्या विश्वामध्ये काही ठोकताळे आहेत, कित्येक वर्षे यामध्ये काहीही बदल झाले नाहीयेत. जगातल्या कोणत्याही क्षेत्रात कितीही सुधारणा झाली व कोणत्याही देशाने कितीही प्रगती केली तरी घड्याळांच्या विश्वामध्ये अंतिम शब्द हा ‘स्विस’ घड्याळांचा. स्विस डिझाईन्स, स्विस तंत्रज्ञान आणि स्विस दबदबा. या दबदब्याला आजपर्यंत आव्हान मिळालेले नव्हते. जगातली सर्व अद्ययावत घड्याळे स्विस घड्याळांवरून प्रेरीत असतात आणि लेडीज घड्याळे ही जेंट्स घड्याळांची छोटी आवृत्ती असते, हा अलिखीत नियम वर्षानुवर्षे चालत आला होता. टायटनची सुरूवातीची घड्याळेही याला अपवाद नव्हती.

१९९४ साली झेरसेस देसाईंना एक नवीन कल्पना सुचली. शक्य तितक्या कमी जाडीचे घड्याळ तयार करायचे. हे घड्याळ इतके पातळ हवे होते की संपूर्ण घड्याळाची अपेक्षित जाडी होती ३.५ मिलीमीटर, अगदी काचेपासून ते क्राऊन (ज्या गोलाच्या सहाय्याने आपण पूर्वी घड्याळाला किल्ली द्यायचो व सध्या वेळ ठीकठाक करतो) आणि मागच्या कव्हरपर्यंतचा सर्व भाग ३.५ मिलीमीटरमध्ये बसतील इतके पातळ घड्याळ व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट हवे होते.

जगभरातल्या या प्रकारच्या घड्याळांचा आढावा घेतल्यानंतर ‘टीम टायटनच्या’ एक गोष्ट लक्षात आली की या मोजमापाचे घड्याळ आत्तापर्यंत बनलेच नाही, तसेच अशी घड्याळे एकतर अल्ट्रास्लिम असतात किंवा वॉटर रेझिस्टंट. दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र उपलब्ध नसतात.

“अल्ट्रास्लिम” याप्रकारात जी घड्याळे बनतात ती फक्त “कन्सेप्ट वॉच” असतात. कल्पनेतल्या वस्तूंप्रमाणे ही घड्याळे बनतात व लगेचच घड्याळांच्या म्युझियममध्ये किंवा एखाद्या घड्याळ तयार करणार्‍या कारखान्याच्या शोकेसमध्ये जावून बसतात. रोजच्या वापरासाठी, वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अशी घड्याळे बनत नाहीत आणि टायटनला नेमके हेच करायचे होते.

“काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन, काहीतरी अशक्य” या आपण घेतलेल्या ध्यासाने “टायटन” आपली छाप जगावर सोडणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. अगदी टीम टायटनलाही नसेल!

या टीम टायटनमध्ये होते बी. जी. द्वारकानाथ (चीफ टेक्नॉलॉजी ऑफीसर), सुब्रमण्य भट्ट (हेड ऑफ वॉच मूव्हमेंट अँड R&D), बी. व्ही. नागराज (हेड ऑफ प्रॉडक्ट इंजीनीयरींग), हरी राव (चीफ मॅन्युफॅक्चरींग ऑफीसर), रफीक अहमद (जनरल मॅनेजर – केस मॅन्युफॅक्चरींग) आणि झेरसेस देसाई.

त्यावेळच्या परंपरेप्रमाणे ही टीम स्वित्झर्लंडमध्ये; घड्याळांच्या भूमीमध्ये गेली, “Slimmest Water Resistant Watch” इतकीच कल्पना डोक्यात ठेवून. तिथून त्यांना नि:संदिग्ध उत्तर मिळाले, “कोणतेही घड्याळ एकतर अल्ट्रास्लिम असेल किंवा वॉटर रेझिस्टंट. दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र शक्य नाही” आणि जी मोजमापे टायटनला हवी होती ती आजपर्यंत कुणीही कल्पनेतसुद्धा विचारात घेतली नव्हती. एका वेगळ्या कल्पनेवर निरूत्साही उत्तर मिळाल्याने निराश झालेली टीम भारतात परतली पण याच मुद्द्यावर देसाईंची लढाऊ वृत्ती जागी झाली.

“स्विस हे करू शकत नाहीत म्हणजे आपणसुद्धा हे करू शकणार नाही” या विचारधारेचे त्यांनी खंडन केले, “स्विस एखादी गोष्ट करू शकत नसतील तर तीच गोष्ट आपण करून दाखवूया!” या विचारधारेने. अजाणतेपणे ‘टीम टायटन’ने स्विस घड्याळांच्या दबदब्याला आव्हान द्यायचे, सर्व अलिखीत नियम बदलण्याचे ठरवले. मात्र कोणताही गाजावाजा न करता. अगदी स्वतःच्याही नकळत!!

झेरसेस देसाईंचा अनुभव, टायटनकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, टायटनचे वेगवेगळ्या विभागातले तज्ञ आणि सर्वांचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्यांनी पहिले लक्ष्य ठेवले “एक अल्ट्रास्लिम घड्याळाचे मशीन (Watch Movement) तयार करणे”. या मशिनचे वैशिष्ट्य? संपूर्ण मशीनची जाडी फक्त १.१५ मिलिमीटर. अशा प्रकारचे मशीन बनवणे हे एक अशक्य कोटीतले काम होते.

thepostman
घड्याळाच्या मशीनचा एक फोटो

 

टायटनसाठी तर हे जबरदस्त आव्हान होते, कारण? कंपनीचे वय फक्त नऊ वर्षे (त्यातही उत्पादनाचे वय सात वर्षे), जगातल्या ‘व्हूज व्हू’च्या तुलनेमध्ये कंपनीचे नाव दूर दूरपर्यंत दृष्टीक्षेपात नाही. कंपनीकडे घड्याळांच्या उत्पादनाचा कोणताही मोठा अनुभव पाठीशी नव्हता. घड्याळांच्या जगातले कोणतेही मोठे नाव कंपनीसोबत जोडले गेलेले नाही आणि हे सर्व घडते आहे अशा देशामध्ये ज्या देशाचा तंत्रज्ञानाबद्दल फारसा नावलौकीक नाही.

१९९४ च्या दरम्यान आर्थिक संकटातून सावरणारा देश अशीच आपली प्रतिमा होती. अशा देशातून एक नवखी कंपनी, जिने अजून स्वतःला कोणत्याही आघाडीवर सिद्ध केलेले नाहीये ती कंपनी असा विचार करत होती की “जे आत्तापर्यंत कोणालाही जमले नाही ते आम्ही करू!” हे थोडेसे हास्यास्पद, थोडे अतिआत्मविश्वासाचे, बरेचसे अतिशयोक्तीचे विचार वाटत असतील.

पण या विचारांमागेसुद्धा एक दृढनिश्चयी विचार होता. जगातल्या आघाडीच्या कंपन्यांसोबत जर टायटनचे नाव घेतले जावे असे वाटत असेल तर फक्त बाजारपेठेतील हिस्सा, विक्रीचे अधिक्य वगैरे गोष्टींपेक्षा महत्त्वाची गोष्ट असेल “तंत्रज्ञान!” तंत्रज्ञानातील आघाडी टायटनला मानाचे स्थान मिळवून देईल व बाकी सर्व गोष्टी सहजरित्या साध्य होतील!!

पण तंत्रज्ञानामध्ये मदत कोण करणार? टायटनने हे भलेमोठे आव्हान अगदी जोशात स्वीकारले असले तरी त्यांच्या पाठीशी आत्तापर्यंत केवळ एक मशीन बनवण्याचा अनुभव होता. दुसरे मशीन बनवताना त्यांना तोच अनुभव वापरावा लागणार होता. पण या दोन मशीनमधला फरक लक्षात घेता त्यांना शून्यापासून सुरूवात करावी लागली.

स्विस कंपन्यांकडून मदत मिळण्याची शक्यता संपुष्टात आली असताना त्यांना सर्व गोष्टी इथेच उपलब्ध साधनांमध्येच तयार कराव्या लागणार होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीम टायटन अशा गोष्टीबाबत विचार करत होती जी यापूर्वी कधीच घडली नव्हती.

झेरसेस देसाईंनी मशीनचे मोजमाप दिले, मशीनची जाडी १.१५ मिलीमीटर. आत्तापर्यंत बनलेले सर्वांत स्लिम मशीन होते ३.४ मिलीमीटरचे. नवीन मशीनची जाडी उपलब्ध मशीनपेक्षा अर्ध्याहून कमी हवी होती. घड्याळाच्या मशीनला लागणार्‍या सर्व किचकट भागांचे अनेकवेळा मूल्यमापन केले गेले. सर्व छोटे भाग आणखी छोटे करणे व अपेक्षीत मोजमापांमध्ये बसवणे कागदावर शक्य दिसत होते.

मुख्य अडचण समोर आली ती बॅटरी/सेलची. घड्याळाचे चलनवलन सुरू ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सेलच्या बाबतीत एक साहजिक गोष्ट होती की, सेल जितका लहान तितका त्याचा पॉवर बॅकअप कमी. ‘टायटन एज्’-ला वॉटर रेझिस्टंट ठेवण्यामागे सेलचा मोठा वाटा होता. जर सेल बदलण्यासाठी बॅक कव्हर वारंवार काढावे लागणार असेल तर घड्याळ वॉटर रेझिस्टंट राहीलच याची खात्री नव्हती. लहान सेलमुळे ही अडचण भेडसावणार होती.

खूप शोधाशोध करून अमेरिकेतील एक पुरवठादार सापडला, त्याने एक लहान परंतु थोडाफार जास्ती पॉवर बॅकअप देणारा सेल डिझाईन केला. टीम टायटन तरीही खुष नव्हती, घड्याळाच्या मशीनमध्ये सर्वांत जास्त पॉवर खाणारी गोष्ट म्हणजे ‘स्टेप मोटर’. सरतेशेवटी अथक प्रयत्नांनी त्यांनी स्टेप मोटरसाठी एक सिलीकॉन चीप विकसित केली व हा प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी ठरला. त्या लहान परंतु जास्त पॉवर बॅकअप देणार्‍या सेलची क्षमता तितकीच असूनही पॉवर बॅकअप दुप्पट झाला.

अथक परिश्रमाने तयार केलेले मशीन होते १.१५ मिलीमीटर जाडीचे! टायटनने एक मोठा टप्पा गाठला होता. आता त्यांना दुसरा तितकाच मोठा टप्पा खुणावत होता. घड्याळाची केस तयार करणे. केसींगचे तंत्रज्ञान जरी साधे वाटले तरी ते खूप किचकट असते. घट्ट बसणारे बॅक कव्हर, काच आणि केसींगमधली अत्यंत कमी परंतु आवश्यक जागा, डायल, काटे आणि क्राऊन यांचा समतोल वगैरे बाबींमध्ये काम करताना प्रचंड काळजी घ्यावी लागते, कारण आवश्यक प्रमाणात जागा उपलब्ध नसते. क्लीअरन्स खूप कमी असतो. एज्-च्या बाबतीत क्लीअरन्स होता १०० मायक्रॉन्स. (एका मानवी केसाइतका फरक)

हे मशीन घेऊन टीम पुन्हा स्वित्झर्लंडला गेली. Basel येथे भरणार्‍या जगप्रसिद्ध वॉच फेअरमध्ये त्यांनी या अल्ट्रास्लिम मशीनसाठी अल्ट्रास्लिम केसची शोधाशोध सुरू केली. “हे तुम्ही तयार केले आहे?” या प्रश्नाला टीम टायटनला अनेक ठिकाणी सामोरे जावे लागले. मोठ्या कंपन्याच्या मोठ्या लोकांनी हा प्रश्न विचारताना त्यातून डोकावणारा अविश्वास टीमला सुखावत होताच!

मातब्बर घड्याळ कंपन्यांचा ‘एज्’च्या कल्पनेवर याआधी विश्वास बसला नव्हता, आता मात्र त्यांनी आपली असमर्थता उघडपणे व्यक्त केली. त्यांनी या प्रकारच्या घड्याळासाठी केस बनवणे हे आपल्या क्षमतेबाहेर आहे हे कबुल केले. टीम टायटन पुनश्च: नकार घेवून भारतात परतली. ओघानेच त्यांनी घड्याळाची केस भारतात बनवण्याचा निर्णय घेतला.

केस बनवण्याची सुरूवात करण्याआधी टीम टायटनला प्रमुख समस्या भेडसावत होती ती घड्याळाच्या काचेची. सर्वसाधारणप्रमाणे घड्याळाच्या काचेची जाडी १.३ मिमी असते, टायटनला गरज होती ०.३ मिमी काचेची. काचेची जाडी जितकी कमी असेल तितकी ती नाजूक होणार याची जाणीव ठेवून, या मोजमापामध्ये बसणार्‍या, घड्याळाला शोभणार्‍या परंतु दैनंदिन वापरायोग्य अशा काचेचा शोध सुरू झाला.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात काचेने तग धरला पाहिजे ही घड्याळ वापरणार्‍यांची अत्यंत वास्तव अपेक्षा असणार होती. ही काच इतकी पातळ असूनही तितकीच मजबूत हवी होती. घड्याळाची केस व काचेमधून पाणी पाझरणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक होते. सेलप्रमाणे प्रचंड शोधाशोध करून एक उपाय सापडला “सफायर काच”. ही विशिष्ट काच स्वित्झर्लंडमधून आयात केली गेली.

काचेचा प्रश्न सुटल्यानंतर दुसरा प्रश्न समोर आला घड्याळाच्या क्राऊनचा. कारण इतक्या कमी जाडीच्या केसमध्ये क्राऊनसाठी ड्रिल करणे हे ही अवघड काम होते. ०.१ मिमीच्या मेटलमध्ये ड्रिल करण्यासाठी टायटनने खास उपकरणे बनवली.

घड्याळाच्या पट्ट्याच्या बाबतीतही हीच कथा. खूप स्लिम, परंतु तितकाच पातळ असा चामड्याचा पट्टा तयार करण्यासाठी जगभरचे पुरवठादार आपली असमर्थता व्यक्त करत असताना शेवटी भारतातला एक जण तयार झाला. आज जगभरामध्ये या प्रकारच्या घड्याळांना पट्टे पुरवण्याचे काम त्याच्याकडे आले आहे. सरतेशेवटी एकूण जाडी ३.५ मिमी असलेले टायटन एज तयार झाले. मशीनमधल्या सेलपासून काचेपर्यंत सर्वच बाबींमध्ये नवे शोध लावून टायटन ने जे साध्य केले त्याचा आजपर्यंत कधीही विचार झाला नव्हता. आजपर्यंत कुणालाही असे घड्याळ तयार करणे जमले नव्हते.

thepostman
Titan Edge

स्वित्झर्लंडमधल्या “Fleurier Quality Foundation” या Independent Horological Testing Agency’ कडे ही घड्याळे रवाना केली गेली. अतिउष्ण/अतिथंड तापमान, तापमानातील अचानक बदल अशा अनेक चाचण्यांसोबतच शॉक टेस्ट, बंप टेस्ट, ड्रॉप टेस्ट अशा अनेक चाचण्या यशस्वीपणे पार पाडून टायटन एज् ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले, वापरण्यायोग्यतेच्या प्रमाणपत्रासह टायटन एज् ‘वॉटर रेझिस्टंट’ आहे असेही प्रमाणपत्र मिळाले.

thepostman
Titan Edge

या चाचण्या लीलया पार पाडण्यामागेही टीम टायटनची एक हुषारी कारणीभूत होती. टेस्टसाठी घड्याळे पाठवण्याआधी ‘इन हाऊस टेस्टींग सेंटर‘मध्ये त्यांची अत्यंत खडतर प्रकारे परीक्षा घेतली गेली होती आणि त्या परीक्षा यशस्वी पार पाडल्यानंतरच पुढची पाऊले उचलली गेली.

thepostman
टायटन एज् ची दुसरी पिढी

वॉल टेस्ट (घड्याळ भिंतीवर फेकून मारणे), फ्लोअर टेस्ट (वेगवेगळ्या दिशेने घड्याळ जमिनीवर पाडणे), पूल टेस्ट (घड्याळ एका स्विमींग पूलमध्ये बुडवून ठेवणे) आणि बेंगलोर-होसूर रोड टेस्ट (गाडीच्या मागच्या शॉक अ‍ॅब्सॉर्बरला घड्याळ बांधून बेंगलोर-होसूर मधला २०० किमीचा खड्ड्यांचा रस्ता अनेकदा पार करण्यात आला) या चमत्कारिक टेस्ट्स करण्यामागे बी. जी. द्वारकानाथांचा साधा विचार कारणीभूत होता. एजन्सीमध्ये केल्या जाणार्‍या टेस्ट्मध्ये “रिअल लाईफ सिच्यूएशन” तयार करता येत नाही. मजेदार गोष्ट म्हणजे टायटन एज् ने याही चाचण्या व्यवस्थीत पार पाडल्या.

अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता बाजारपेठेमध्ये आलेल्या या “Slimmest Water Resistant Watch” ने भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला.

ओमेगा आणि इतर कंपन्यांनी टायटन एज् इतकीच किंवा त्याहूनही स्लिम घड्याळे तयार केली आहेत, परंतु ती घड्याळे वॉटर रेझिस्टंट आणि दैनंदिन वापरायोग्य नाहीत.

सतराव्या शतकापासून सुरू असलेल्या या घड्याळांच्या विश्वामध्ये प्रवेश करून, स्थापनेपासून पंचविशी दरम्यान ‘जगातली पाचव्या क्रमांकाची घड्याळ उत्पादक कंपनी‘ ही टायटनने मारलेली मजलही एज्-च्या कथेप्रमाणे अचाटच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: titantitan edge
ShareTweet
Previous Post

निवृत्तीच्या वयात खेळायला सुरु करणारा भारताचा पहिला कसोटी कर्णधार हा मराठी होता

Next Post

आजच्या लिव्ह इन रिलेशनची सुरुवात राजस्थानच्या नातं लग्न प्रथेमध्ये सापडते

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

आजच्या लिव्ह इन रिलेशनची सुरुवात राजस्थानच्या नातं लग्न प्रथेमध्ये सापडते

याच्या इतका क्रू*र सीरिअल किलर आजवर झाला नसेल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.