आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जगभरात अवैध तस्करीचे अनेक मार्ग वापरले जात असतात. अनेक लोक आपल्या शरीरातून देखील अवैधरित्या तस्करी करताना पकडले जातात हे आपण बघतोच. पण आपल्याला माहिती आहे का सैनिकांच्या शरीरातून अंमली पदार्थांची तस्करी करणारा देखील एक मोठा तस्कर या पृथ्वीच्या पाठीवर होऊन गेला आहे? आश्चर्य वाटलं ना पण हे खरंच आहे.
अमेरिकेन सुप्रसिद्ध अंमली पदार्थ तस्कर फ्रॅंक लुकस याने हा पराक्रम केला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले काम फत्ते करण्यासाठी तो प्रसिद्ध होता. भले त्यासाठी कोणाचा जीव जरी घ्यावा लागला तरी तो त्या गोष्टीची परवा करत नसे. लुकसच्या काळात करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आजही संघटित गुन्हेगारीचा उत्तम नमुना मानले जाते.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलीनामध्ये वास्तव्यास असलेल्या फ्रँकच्या आयुष्याची सुरुवात फार कष्टदायक होती.
तो ज्याठिकाणी वास्तव्यास होता त्या ठिकाणी गरिबी आणि अ*त्याचाराचे साम्राज्य होते. रोज त्याला कुठे न कुठे चोरी तर कुठे खू*न-द*रोडे अशा कथा ऐकायला मिळायच्या. याचा परिणाम फ्रॅंकवर होऊन तो गुंडगिरीचा एक भाग बनला.
तो सहा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या एका भावाचा त्याच्या समोर निर्घृण खू*न करण्यात आला.
ही घटना फ्रॅंकच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती. फ्रॅंकच्या घरात कमाई करणारा कोणी शिल्लक नव्हता आणि त्याचे आयुष्य दिवसेंदिवस वाईट होत चालले होते. अशावेळी त्याने घरचा भार स्वतःचा खांद्यावर घेतला आणि बालपणीच गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला. तो या मार्गावर चालू लागला आणि त्याने कधी मागे वळून बघितलं नाही.
काळ पुढे गेला तसा फ्रॅंक मोठा आणि अट्टल गुन्हेगार बनत गेला. तो एक मोठा चोर बनला, लोकांची घरं आणि दारूची दुकानं लुटणं म्हणजे त्याच्यासाठी अतिशय सोपं काम होऊन बसलं होतं. अशा चोऱ्या करुन तो आर्थिकदृष्ट्या सबल तर झाला नाही, पण त्याने आपल्या घरच्यांच्या पोटाचा प्रश्न मिटवला.
फ्रॅंक एका ठिकाणी नोकरी करत होता. मालक दुकानात नाही याचा फायदा घेऊन फ्रॅंक ४०० डॉलर घेऊन लंपास झाला. घटनेनंतर मालकाने पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस फ्रॅंकच्या मागे लागले पण तो नंतर कधी पोलिसांच्या हाती लागला नाही.
घरून पळून आल्यानंतर फ्रॅंक न्यूयॉर्कच्या दिशेने रवाना झाला. त्याकाळी न्यूयॉर्क हे अमेरिकेतील गुन्हेगारीचे केंद्र बनले होते. न्यूयॉर्कच्या मोठ्या गुन्हेगारात फ्रॅंकचा समावेश झाला.
न्यूयॉर्कमध्ये फ्रॅंक मोठे गुन्हे करायला लागला. गुन्हेगारी विश्वात तो एक एक पायरी चढत होता, त्याचवेळी त्याची भेट कुप्रसिद्ध अशा गुन्हेगाराशी झाली ज्याचे नाव होते जॉन्सन.
फ्रँकच्या गुणांना बघून जॉन्सनने त्याला आपला खाजगी ड्रायव्हर बनवले. फ्रॅंकला कधीच वाटले नव्हते की एक दिवस आपण अमेरिकेतील सर्वांत मोठ्या गुन्हेगाराचा ड्रायव्हर बनू. ड्रायव्हर म्हणून काम करताना तो जॉन्सनबरोबर अनेक ठिकाणी जायचा. यामुळे त्याने गुन्हेगारी विश्वात अनेक लहान लहान कड्या तपासल्या आणि त्याला गुन्हेगारी विश्वाचा हळूहळू परिचय होऊ लागला.
जॉन्सन स्वतः फ्रॅंकला गुन्हेगारी विश्वाची मोठी माहिती सांगायचा. जॉन्सनमुळे फ्रॅंकचे गुन्हेगारी विश्वात उठणे-बसणे वाढले आणि तो प्रसिद्ध होत गेला.
तब्बल १५ वर्षे त्याने ड्रायव्हरची नोकरी केली. १९६८ साली अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जॉन्सन मृत्युमुखी पडला आणि संधी साधत फ्रॅंकने जॉन्सनची जागा बळकावली.
फ्रॅंकने जॉन्सन गेल्यानंतर बिझनेस आपल्या हाती घेतला. इतकंच नाही तर त्याने जॉन्सनच्या अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्याला एका वेगळ्या उंचीवर पोहचवले.
त्याने मोठ्या संख्येने अमेरिकेत तस्करी करण्यास सुरुवात केली. त्याने अमेरिकेच्या गल्लोगल्ली तरुणांना या अंमली पदार्थांची विक्री करण्यास सुरुवात केली. अख्खी एक तरुण पिढी त्याने व्यसनांच्या आहारी घातली.
या धंद्यांतून त्याने मोठ्या प्रमाणात पैसा कमावला, पण यापेक्षा पण जास्त पैसे कमवण्याकडे त्याचे लक्ष लागून होते. त्याच्या ड्र*ग्जच्या व्यवसायातील बरीच कमाई साखळीतील मधले लोक खात होते. यांच्या मदतीनेच फ्रॅंक अंमली पदार्थांची तस्करी इतर देशातून करत होता.

पैसे कमवायचे असतील तर यांना संपवले पाहिजे, असं ठरवून फ्रॅंकने साखळीच्या मधल्या सर्व लोकांचा खू*न केला. आता तो स्वतः डीलरशी चर्चा करून तस्करी करू लागला.
आपल्या श्रीमंतीच्या या हव्यासापोटी त्याने अनेक शत्रू देखील निर्माण केले आणि अनेकांना संपवलेसुद्धा!
मध्यस्थ संपवल्यानंतर फ्रॅंकने बहुतांश अंमली पदार्थांचा व्यापाराचा ताबा आपल्या हातात घेतला होता. परंतु अजूनही त्याचे समाधान झाले नाही कारण अमेरिकन पोलीस त्याच्या अंमली पदार्थांच्या साम्राज्याला खिंडार पाडत होते. अशात फ्रॅंकला परदेशातून तस्करी करण्यात मोठी अडचण होत होती. त्याला तस्करीसाठी एका अशा मार्गाची आवश्यकता होती, ज्याच्या बळावर तो पोलिसांना फसवू शकेल. पण त्याला तो मार्ग सापडत नव्हता.
तो काळ व्हिएतनाम यु*द्धाचा होता, त्यामुळे दक्षिण आशियातून अंमली पदार्थांची तस्करी करायला अडचण निर्माण झाली होती. फ्रॅंक लगेच दक्षिण आशियात गेला आणि त्याने तिथल्या डीलर्सकडे शुद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ब्लु मॅजिक’ नावाच्या ड्र*गची मागणी केली. अशा पदार्थासाठी लोक मोठ्या प्रमाणावर पैसे मोजायला तयार असल्याने त्या पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड उडायची.
यातून मिळणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन फ्रॅंकने अमेरिकेतील ओळखीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने व्हिएतनाममधून येणाऱ्या “सैनिकांच्या शवपेटीतून ब्लु मॅजिकच्या तस्करीसाठीचा मार्ग प्रस्थापित केला”.
त्याने यु*द्धात मृत्यू पावलेल्या तब्बल ५०० सैनिकांच्या शवांचा वापर ‘ब्लु मॅजिक’च्या तस्करीसाठी केला.
ब्लु मॅजिक अमेरिकेत लोकप्रिय झाले. लोक वाट्टेल तितके पैसे मोजून हे ड्र*ग विकत घ्यायचे, अनेक तरुण या अंमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर सेवन करायचे. अतिसेवनाने लोक मरायला सुरुवात झाली मग पोलीसांना या ब्लु मॅजिकच्या व्यापारावर संशय निर्माण झाला आणि त्यांनी कारवाई केली. पोलिसांनी अखेर फ्रॅंकला बेड्या ठोकल्या. न्याय व्यवस्थेने फ्रॅंकोला ७० वर्षांचा कारावास ठोठावला. आज फ्रॅंक अमेरिकेच्या जेलमध्ये आयुष्य काढतोय.
शेवटी वाईटाचा मार्ग कितीही श्रीमंती देणारा असला तरी तो चिखलातच रुतवतो हे फ्रॅंकच्या एव्हाना लक्षात आलं असेल .
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








