The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

द डिसायपल – एका मराठी दिग्दर्शकाच्या या चित्रपटाचं जगभर कौतुक का होतंय..?

by सोमेश सहाने
30 April 2024
in विश्लेषण, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


प्रत्येकालाच आयुष्यात नेमकं काय हवंय ते माहिती नसतं, पण काही लोकांना काय हवंय ते उमगलं तरी ते मिळविण्यासाठी लागणारे कौशल्य आपल्याकडे नाहीत हे समजतं. त्या लोकांना आयुष्यभर पुरेल अशी ती खंत असते, तिचं ओझं एवढं असतं की एकवेळ नेमकं काय पाहिजे होतं ते कळालं नसतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागतं.

द डिसायपल ही ती खंत तयार होण्याची, त्या ओझ्यात जगण्याची गोष्ट आहे. ही खंत यातला मूळ धागा असला तरी या धाग्यातून तयार केलेली ही कलाकृती म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतावर केलेलं अभ्यासपुर्ण आणि गहन भाष्य आहे. यातून स्वप्न बघून ते पूर्ण न करू शकणाऱ्या त्या तुलनेने जास्त असणाऱ्या गटाला आरसा दाखवला आहे.

२००६ साली आदित्य नेरुळकर हा २४ वर्षीय तरुण फार प्रसिद्ध नसलेल्या महान ‘अलवर घराण्याचा’ वारसा चालवणाऱ्या त्याच्या गुरूकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे  शिक्षण घेत असतो. वडिलांकडून मिळालेला वारसा, आपण काहीतरी महान करतोय ही जाणीव यातून आदित्य आयुष्यातलं सगळं सोडून जिद्दीने फक्त रियाझ करत असतो. या क्षेत्रात रस, कठोर सराव आणि गुरुप्रति श्रद्धा असं सगळं असूनही त्याला त्याचा सूर गवसत नसतो.

प्रसंगी वृद्ध गुरूंना पैशाची मदत करणे, वैयक्तिक आयुष्यात एकटं राहणे, दुसरी काही नोकरी न करणे असं सगळं त्यात अगदी वयाच्या चाळीशीपर्यंत करूनही त्याला सूर गवसत नाही. एकीकडे काहीतरी महान करताना आपण एकटं, भुकेलं असणं ही पूर्वतयारी वाटते तर दुसरीकडे हाती काहीच लागत नाहीये याची खंत.



कथानकाचं सांगायचं झालं तर एवढंच आहे, पण २ तास जे आपण अनुभवतो तो या छोट्या गोष्टीचा खूप लांब भावनिक परिणाम असतो. “चाळीशीपर्यंत काहीच हाती लागत नाही” हे लिहायला एक वाक्य, दाखवायला काय after 20 years लिहूनही दाखवता आलं असतं, पण ते वैफल्य प्रेक्षकांना जाणवावं, त्याची दाहकता समजावी म्हणून लेखक अक्षरशः या पात्राच्या आयुष्यात घुसलाय. अगदी बाथरूमपर्यंत.

एखाद्या पात्राच्या एवढ्या खोलीत या आधी कुठला भारतीय सिनेमा गेलाय असं आठवत नाही. सिनेमा अर्ध्यात येईपर्यंत एकही शोल्डर शॉट किंवा भावनिक प्रसंग न दाखवता आपण आदित्य नेरुळकर बनलेलो असतो. आपल्याला त्याचं वाट बघणं जाणवायला लागतं.

आदित्य मोडक या संगीतकाराने ही भूमिका खूप संवेदनशीलपणे हाताळली आहे. एकही लाऊड सिन नाही, रडणं नाही, तरी फक्त डोळ्यातून मरत जाणारा उत्साह त्याने स्क्रीनवर साकारला आहे. संगीत नाटकात जसं गाणं येणाऱ्या कलाकारांनाच अभिनय करावा लागायचा, तसंच इथे गायक आदित्य मोडकही करतो, त्याच्या गायनाची छापही आपल्यावर पडते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमधे सुशांतने कसं तंतोतंत हेलिकॉप्टर शॉट साकारलाय किंवा दंगलमधे कसं कलाकार खरी खरी कुस्ती शिकलेत हे किस्से आपण ऐकलेत. पण ‘द डिसायपल’मध्ये असा एखाद-दुसरा सिन, त्यात काही कट्स टाकून मग मागून डब करून गाणं लावलंय आणि कलाकार उगाच हातवारे करताय असा नाटकीपणा अजिबात नाहीए. इथं कॅमेरा न हलता सिंगल टेकमधे सगळं दाखवत असतो. मूळ शास्त्रीय गायनासकट.

कट्यार काळजात घुसलीसारख्या सुमार आणि नाटकी चित्रपटांमधून शास्त्रीय संगीताची जी ग्लॅमरस, रंजक अशी खोटी ओळख सामान्य प्रेक्षकांना झाली होती ती ओळख ‘द डिसायपल’ मिटवतो.

ते सगळं बाजूला सारून त्या क्षेत्रातला सिनेमा नाही तर एक समांतर सत्यच तो आपल्याला दाखवतो. यातलं कळत नसलेले लोक उगाच दाद देतात म्हणून भयंकर गतीने तबल्यावर बोटं आदळणाऱ्या कलाकारांना यातला नायक “रेशमी साड्या आणि डिझायनर कुर्त्यांतल्या प्रेक्षकांसाठी काहीही वाजवणारे” म्हणतो. तर तो गुरू मानतो अशा गायिका म्हणतात की “आपल्याकडे दाद मिळवायला उगाच सुरांची कुस्ती घालणारे लोकही खूप आहेत, ते शास्त्रीय संगीत नव्हे”. हे वाक्य आल्याआल्या माझ्या डोक्यात आलं ते राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचा व्हायरल झालेला तो व्हिडीओ “कानडा राजा पंढरीचा”.

शास्त्रीय संगीताची उपासना करणाऱ्या कित्येकांना मी त्या व्हिडिओवर प्रखर टीका करताना ऐकलंय. ‘प्रसिद्धी आणि दर्जा दोन्ही एकदाच मिळेल असं नसतं’, असं म्हटलं तरी कदाचित ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ती माणसं स्वतःच्या वैफल्यातून जगावर अशी टिकास्त्रे सोडत असतील. सिनेमात अगदी ही समीक्षाही सविस्तर दाखवली आहे. कलेतील आदर्शवाद आणि व्यवहार यातलं भांडण वास्तवात जसं आहे अगदी तसं खरेपणाने यात दिसतं.

पक्की तालीम असलेले गायक आजही दिवाळी पहाट किंवा गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला तुटपुंज्या मानधनासाठी आणि मूठभर प्रेक्षकांसाठी गातात. तर सुमार कौशल्य असणारी पोरं टीव्हीवरच्या कार्यक्रमात चमकून सगळी प्रसिद्धी आणि पैसे लाटतात. यातून मूळ कलाकारांना येणारा कॉम्प्लेक्स हा फक्त या क्षेत्रातच नाही तर प्रत्येक कलाक्षेत्रात आहे.

आणि म्हणूनच हा सिनेमा जे सांगतो ते एका कलेबद्दलची आणि एका व्यक्तीबद्दलची गोष्ट असली तरी ती जगाच्या पाठीवर वेगळं काहीतरी करण्यासाठी धडपत असणाऱ्या प्रत्येकाला आपली वाटेल.

यातली शोकांतिका काही प्रसंगात भीतीदायक वाटते, जर त्या पात्राच्या दृष्टीने बघितलं तर त्याच्या आयुष्याचा हा एक हॉरर सिनेमाचं आहे. इथं जागतिक पातळीवर प्रेक्षकांना समजावं यासाठी गोष्टी सोप्या केलेल्या नाहीत (जसं मीरा नायर यांच्या ‘अ सुटेबल बॉय’मधे केलं गेलं आहे) तर इथं सिनेमाची एक समृद्ध भाषा वापरून मूळ अर्क पोहोचवावा याकडे लक्ष दिलं गेलं आहे.

चैतन्य ताम्हाणे फक्त आपला रिसर्च, गोष्ट, अभिनय यावर विश्वास ठेवून चालणारा दिग्दर्शक नाही. भन्साळीला जसं सगळं सुंदर दिसावं याचा अट्टहास असतो ना त्यापेक्षा जास्त ताम्हाणे यांना दिसतंय ते खरं वाटावं असा अट्टहास असतो.

एका छोट्या प्रसंगातून तो जास्तच जाणवला. २००६ नंतर १२ वर्षांनी बदललेली परिस्थिती दाखवताना बदललेली उपकरणे दाखवणं ठीक आहे, पण त्यानुसार वाढलेल्या उंचच्याउंच इमारती, ट्राफिक आणि हेल्मेटसक्ती इथपर्यंत बारीक काम केलंय. काळानुसार बदलत जाणारी मंचाची सजावट, कुर्त्यांचे डिझाइन्स आणि किमती. तीच काहीशी वृद्ध वयोगटातील मूठभर प्रेक्षकसंख्या अशा फक्त या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या लोकांना कळावेत असे बारकावे या चित्रपटात जागोजागी दिसतात. ज्याला सबटेक्स्ट म्हणावं असे बारकावे समजणाऱ्यांना भावतील याची व्यवस्था इथं आहे. पण बाकीच्यांना आपल्याला समजत नाहीये असा अडथळाही इथं वाटत नाही.

वाईड अँगल, सिंगल कॅमेरा आणि स्टेबल फ्रेम्स हा तर जणू चैतन्यचा व्यक्त होण्याचा कलात्मक स्वभावच वाटतो. सुरू होताच एखाद्या ऑस्करप्राप्त दिग्दर्शकाने बनवलेली आंतरराष्ट्रीय पातळीची कलाकृती पाहतोय की काय असं वाटावं इतकं यातलं प्रत्येक काम सरस असतं.

जागतिक कीर्तीचे महान दिगदर्शक अल्फान्सो क्यूरान हे या सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. या सगळ्यातून भारताची आणि त्यात मराठी कलाकृती जागतिक पातळीवर फक्त गेलीच नाही तर तिथं लोकांची मनं आणि पुरस्कारही जिंकत आहे.

सुमित्रा भावेंच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या काही जुन्या मुलाखती पाहत होतो. तर एका मुलाखतीत त्यांनी नवीन पिढीतील आदर्श काम करणाऱ्या काही तरुणांची नावं घेतली होती. तेव्हा त्यात चैतन्यचंही नाव घेतलं होतं. घेताना त्या म्हणाल्या होत्या की, “या मुलाला मी अजून वैयक्तिक पातळीवर ओळखत नाही, भेट झाली नाही. आणि त्यांचं शेवटचं आणि बहुदा पहिलंच स्क्रीनवरचं अस्तित्व या सिनेमात आपल्याला ऐकता येतं.

एकेकाळची महान गायिका संगीताबाबद्दलचे धडे देताना कोणीतरी ते चोरून रेकॉर्ड केलेले असतात आणि आदित्य ते लपून रात्री रिकाम्या रस्त्यावर गाडी चालवताना ऐकत असतो. सुमित्रा भावेंचा वारसाही असाच आहे, या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करायला आलेल्या तरुणांच्या कानात आत्मविश्वास फुंकणारा. या निमित्ताने त्या डिझर्व करतात अशी श्रद्धांजली त्यांना मिळाली याचा आनंद वाटतो.

कोर्ट या आपल्या पहिल्या सिनेमाच्या तोडीस तोड दर्जेदार सिनेमा चैतन्यने बनवला आहे. पण अजूनही त्याच्या मागे एखादं प्रोडक्शन हाऊस उभं राहिलेलं नाही. विवेक गोम्बरसारखा मित्र त्याला प्रोड्युसर म्हणून लाभला खरा, पण प्रेक्षकांच्या प्रतिसादावर शेवटी नफा ठरतो, आणि त्यातूनच पुढचा सिनेमा बनवायला ताकद मिळते. सध्या थिएटर सुरु नाहीत पण किमान या चित्रपटाच्या दर्जाखातर हा सिनेमा टेलिग्रामवर न बघता नेटफलिक्सवर बघावा ही विनंती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

माणूस जगण्यासाठी काय काय करू शकतो याचं हा माणूस उदाहरण आहे

Next Post

अलार्म क्लॉक परवडायचे नाही म्हणून झोपेतून उठवायला माणूस ठेवायचे

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

अलार्म क्लॉक परवडायचे नाही म्हणून झोपेतून उठवायला माणूस ठेवायचे

फंदफितुरी झाली नसती तर 'राणा सांगा'ने बाबराला हुसकावून लावलंच असतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.