आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दादा कोंडके, नाना पाटेकर अशा काही कलावंतांनी जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे नाव झळकावले आहे. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर व शंकर महादेवनसारख्या कलाकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असेच एक मराठी संगीत क्षेत्रातील नाव जे बऱ्याच मराठी लोकांच्या ओठांवर अजुनही आहे.
ते घराघरात पोहचलेले मराठी नाव म्हणजे श्री. सुधीर फडके अर्थात सगळ्यांचे लाडके बाबूजी.
सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै, १९१९ रोजी कोल्हापुरात झाला. संगीताचे प्राथमिक शिक्षण त्यांनी वामनराव पाध्ये यांच्याकडून कोल्हापुरमध्येच घेतले.
सुधीरजींना लोक प्रेमाने बाबुजी म्हणून हाक मारत. सुरुवातीला त्यांनी संगीत शिकवण्यास चालू केले. हा काळ त्यांच्यासाठी अतिशय हलाखीचा होता. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. पुरस्कार आणि संगीताचे कार्यक्रम यातून मिळणारा पैसा हाच काय त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग.
पण, त्यांनी केलेल्या संगीतरचना लोकप्रिय होऊ लागल्या होत्या. त्याच्याच जोरावर त्यांना ‘हिज मास्टर्स वॉईस’च्या (HMV) संगीत विभागात नोकरीची संधी मिळाली. इथेच त्यांची ओळख अजून एका संघर्ष करणाऱ्या कलाकाराशी झाली, ते म्हणजे- स्नेहल भाटकर. पुढे दोघांनी एकत्र काम केले आणि जिगरी दोस्त बनले. सुधीर फडकेंनी १९४३-१९४५ पर्यंत ‘हिज मास्टर्स वॉईस’मध्ये काम केले.
त्यांना पहिली मोठी संधी मिळाली ती प्रदीप पिक्चर्सच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ (१९४६) या चित्रपटात. चित्रपटाचे दिग्दर्शक होते प्रसिध्द दिग्दर्शक बाबुराव पेंटर.
चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या रत्नमाला, चंद्रकांत आणि दुर्गा खोटे यांनी. त्यांची रचना असलेले ‘मैं तारो की ओढ चुनरीया’ संगीत प्रेमींना खूप आवडले. या चित्रपटात त्यांनी संगीत रचनाकार म्हणून स्नेहल भाटकर यांच्याबरोबर काम केले.
त्याच वर्षी त्यांना चित्रपटात स्वतंत्र काम करण्याची संधी मिळाली. प्रभात चित्रपट कंपनीच्या गोकुल (१९४६) या चित्रपटात त्यांना संगीतरचनाकार म्हणून काम मिळाले.
या चित्रपटात त्यांनी रचलेले ‘हम तोडेंगे बंधन आझाद होंगे’ अतिशय गाजले.
प्रभात चित्रपट कंपनीत काम करण्याची संधी त्यांना पुन्हा एकदा मिळाली ती ‘आगे बढो ‘ या चित्रपटात. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली ती देव आनंद यानी. तर गायक म्हणून काम केले त्यावेळी प्रसिध्द असलेल्या खुर्शिद यांनी.
फडकेंनी सितार आणि व्हायोलिनचा अप्रतिम संगम साधत ‘सावन की घटा धीरे धीरे आना’ हे खुर्शिद आणि मन्ना डे यांच्या आवाजातील अजरामर गीत रचले. खुर्शिद यांच्या आवाजातील आणखी एक गझल ‘ तकदीर मे लिखा हैं मेरी ठोकरें खाना’ त्यावेळी चांगलीच गाजली होती.
१९४९ च्या ‘अपराधी’ चित्रपटात त्यांनी काही गाण्यांची रचना केली. ‘प्यार करने वालो के लिये हैं ये दुनिया’, ‘मेरा दिल चुराने वाले’ आणि ‘दिल रो रहा हैं और हम गा रहे हैं’ ही या चित्रपटातील काही गाजलेली गाणी आहेत. परंतु लोकांच्या पसंतीस सगळ्यात जास्त पडलेले गीत होते – ‘जान पेहचान ना साहब सलाम ना’. जी. एम. दुर्राणी यांनी गायलेले ‘जिंदगी का मजा शादी मे हैं’ हे गीतसुध्दा खूप गाजले.
याच दरम्यान त्यांनी काही पौराणिक कथांवर आधारित चित्रपटांत काम केले. सीता स्वयंवर (१९४८), संत जनाबाई (१९४९), जय भीम (१९४९), राम प्रतिज्ञा (१९४९) आणि माया बाजार (१९५०).
“जय भीम”साठी त्यांनी मराठी पध्दतीचं संगीत रचले. त्यातील काही ठळक गीत होते – मंद मंद पावन चाले (गायक-सरस्वती राणे), हम दोनो पंछी उडे जा रहे हैं एक दिशा की ओर (गायिका-ललिता देवळकर). एवढेच नाही तर त्यांनी ललिता देवळकर यांच्याबरोबर ‘चली ना जाईयो मोहे छोड कर’ हे गीत गायले. पुढे १९४९ मध्ये त्यांनी ललिताजींशीच लग्न केले.
त्यांनी त्यांच्या चित्रपटात बऱ्याच वेळी नविन गायकांना संधी दिली. माया बाजार (१९४९) या चित्रपटात त्यांनी दुर्गा खोटे आणि शाहू मोडक मुख्य भूमिकेत होते.
याच चित्रपटात माणिक वर्मा यांनी त्यांच्या गाजलेल्या गीतांपैकी एक ‘बिरहा सताये बैरी’ हे गीत गायले.
सुधीर फडके यांची सगळीच गाणी गाजली पण त्यातही २ चित्रपटांचं नाव प्रामुख्याने. पहिला चित्रपट म्हणजे संत जनाबाई. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली ती हंसा वाडकर, शकुंतला आणि गणेश अभ्यंकर. त्यांनी या चित्रपटात तब्बल २२ गीतांची रचना केली.
मन्ना डे यांनी त्यांचे प्रसिद्ध भक्तीगीत ‘प्रभात वंदना कराया जाओ हे हरा’ याच चित्रपटात गायले.
संत जनाबाई हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला तो हंसा वाडकर यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनयामुळे. चित्रपटातील रफीजींच्या आवाजातले भजन ‘भज मन कमल नयन कम्लेश’ चांगलेच गाजले. फडकेंनीसुध्दा या चित्रपटात काही गाणी गायली. ‘सपने मे संपदा जो पाई’, ‘सुनिये पंढरीनाथजी’, ‘बिन बजा कर नारद हारे’, ‘नयनो मे मन मे समाये’ ही गाणी त्यांनी स्वत: गायली.
दुसरा चित्रपट होता, मालतीमाधव (१९५१). भावभुतीच्या संस्कृत कादंबरीवर आधारित असलेला मालतीमाधव या चित्रपटात दुर्गा खोटे आणि अनंत ठाकुर यांनी मुख्य भूमिका साकारल्या. पंडीत नरेंद्र शर्मा यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. लताजी पहिल्यावेळी सुधीरजींबरोबर काम करत होत्या.
त्यांनी गायलेले ‘मन सौंप दिया अंजाने मे’ हे गीत खूप गाजले. फडकेंनी तबला आणि सितार यांचा वापर करून सुंदर अशी रचना तयार केली.
लताजी आणि सुधीरजींनी या चित्रपटात आणखी गीतांवर एकत्र काम केले. त्यातील काही गाणी लताजींच्या कारकिर्दीतील प्रसिध्द गाण्यांमध्ये गणले जातात. ‘बंध प्रीती फूल दूर’ हे गाणे लताजींनी कलकत्ता संगीत उत्सवात ( १९५२) गायले त्यावेळी त्या कार्यक्रमास उस्ताद बडे गुलाम अली खाँसाब उपस्थित होते. या चित्रपटातील ‘मैं यौवन वन की कली’ आणि ‘कोई बना आज अपना’ ही गाणी अजरामर झाली. याच चित्रपटात त्यांनी लताजींबरोबर ‘मन में अंगारे हैं’ हे गीत गायले.
‘मुरलीवाला’ चित्रपटात त्यांनी हवाईयन गिटारचा वापर करून ‘चंदा चमके नील गगन मे’ हे लताजींनी गायलेले गीत रचले. ब्रज रास पध्दतीने रचलेली ‘रास रचाओ सखी’ आणि पुर्वी रंगात रचलेले ‘मैया मोरी रे’ ही गाणीसुध्दा गाजली.
‘जैसी करनी वैसी भरनी’ या गाण्यात पहिल्यांदा आशा भोसले यांच्याबरोबर ते गायले.
मास्टर किशन राव यांच्या निधनानंतर फडके प्रभात चित्रपट कंपनीचे कायमस्वरुपी संगीत रचनाकार झाले. ‘गज गौरी’ (१९५८) या चित्रपटात त्यांनी संगीत दिले. चित्रपटाचे दिग्दर्शन केले राजा ठाकूर यांनी. चित्रपटात सुलोचना, रत्नमाला आणि शाहू मोडक यांच्या मुख्य भूमिका होत्या. मन्ना डे यांनी चित्रपटात ‘जय आर्य देवता, हे सुर्य देवता’ हे भक्तीगीत गायले.
सुधीर फडके यांनी ‘पहली तारीख’ या चित्रपटातसुध्दा काम केले. किशोर कुमार यांनी त्यांचे सुप्रसिध्द ‘खुश हैं जमाना आज पहली तारीख हैं’ याच चित्रपटात गायले होते.
फडकेंनी मीना कुमारीच्या ‘भाभी की चुडीया’ या चित्रपटास दिलेले संगीत अजरामर झाले. पंडीत नरेंद्र शर्मा यांनी गाण्यांचे बोल लिहिले होते. ‘ज्योती कलश छलके’ हे भूप रागातील लताजींनी गायलेले गीत वर्षानुवर्षे लोकांच्या ओठांवर राहिले. सितार आणि सनईचा उत्तम मेळ साधत त्यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. अनेकांच्या मते, ‘भाभी की चुडिया’ हे त्यांनी आजवर दिलेले सर्वोत्कृष्ट संगीत होते. दुर्दैवाने यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळाली नाही.
प्रसिध्द मराठी लेखक आणि कवी ग. दि. माडगुळकरांच्या ‘गीत रामायण’ या महाकाव्याला संगीत देण्याचे काम सुधीर फडके यांनीच केले. गीत रामायण ‘ऑल इंडिया रेडिओ’वरुन संपूर्ण एका वर्षासाठी प्रसारित करण्यात आले. संपूर्ण भारतात सुधीर फडकेंना त्यांच्या श्री रामाच्या पात्रासाठी ओळखले जाऊ लागले.
गोवा मुक्ती चळवळीत देखील त्यांचा सहभाग होता.
सुधीर फडके यांनी १११ मराठी आणि २१ हिंदी चित्रपटांना संगीतबध्द केले. संगीतातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार १९९१ साली देण्यात आला. तसेच १९९३ साली त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुढे त्यांच्या मेंदुत रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली म्हणून त्यांना उपचारासाठी हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले. जुलै २९, २००२ रोजी त्यांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला. सावरकर मेमोरियल हॉलमध्ये त्यांचं पार्थिव दर्शनाकरिता १ दिवस ठेवण्यात आले होते.
३० जुलै, २००२ रोजी त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
भारतीय संगीत क्षेत्राला आपल्या प्रकाशाने दिपवून टाकणाऱ्या एका महान कलाकाराचे भारतीय कलाक्षेत्र नेहमीच ऋणी राहील!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








