The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लक्ष्मणराव किर्लोस्कर हे खऱ्या अर्थाने भारताच्या उद्योगाचे ‘पप्पा’ होते.

by रविकुमार सुभाषराव
21 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


एक सायकल चालवताना माणूस बघितला अन् थेट व्हीजेटीआयची नोकरी सोडून हा माणूस १८८८ साली सायकल विकायचे दुकान बेळगावच्या रस्त्यावर टाकून बसला. बाहेरून सायकली विकत आणायच्या आणि भाऊ रामू अण्णाच्या मदतीने त्या गावात विकायच्या. त्याकाळात तो लोकांना सायकल शिकवण्याचे पंधरा रुपये घ्यायचा.

ज्या पस्तीस रुपये महिन्याची नोकरी याने सोडली होती त्यापेक्षा जास्त पैसे तर तो तीन माणसांना सायकल शिकवून कमवायचा. ही ताकद असते उद्योगधंद्याची याची चुणूक त्याला तेव्हाच जाणवली होती. पुढे त्याच बेळगावमधील रस्त्याला त्याचं नाव दिलं गेलं.

यंत्रावर आणि रंगावर असलेलं प्रेम त्याला यंत्र निर्मितीकडे ओढत होतं. रंगाधळेपणामुळे रंगावरील प्रेम अर्ध्यावर सोडावे लागले. पण यंत्रावरचं प्रेम काही सुटत नव्हतं. त्याकाळात “अमेरिकन मशिनिस्ट’ आणि “सायंटिफिक अमेरिकन” नावाचे मॅॅगजीन नियमित चाळणारा हा माणूस पुढे त्यातून काय जन्माला घालणार होता याचा वेध त्यालासुद्धा लागला नव्हता.

पण अचानक एके दिवशी त्यातच चारा कापणी यंत्र बघून याचे डोळे दिपले अन् त्याने पुस्तकातून वाचून १९०१ साली चाराकापणी यंत्राला जन्म दिला. हा माणूस होता लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर.

आपल्या नावातच “लकाकी” असलेला हा माणूस. डोक्यावर गांधी टोपी, अंगावर खादी. स्वदेशीचा पुरस्कर्ता, नाकावर हॅरी पॉटरसारखा बसवलेला चष्मा अन् पूर्णतः शेतकरी पेहराव असलेला हा मनुष्य आर.के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनसारखाच वाटायचा. पण हा उद्योगपती आधी होवून गेला अन् कॉमनमॅन नंतर.



याने फोर्डसारखे मोठे शोध लावले नाहीत पण जे शोध लावले ते सर्वसामान्यांच्या आयुष्यावर तितकाच परिणाम करणारे होते. त्यात नांगरी फाळाचा जन्म ही भारताच्या औद्योगिक इतिहासातील सर्वात क्रांतीकारी घटना होती. सुमारे सत्तावीस प्रकारच्या वातावरणात काम करणारा आणि शेकडो प्रकारच्या मातीत मिसळून तिला सुपीक करणारा किर्लोस्कर नांगर हा त्या काळात कुठल्याही जादुई चमत्कारापेक्षा कमी नव्हता.

सुरुवातीला लोखंडी नांगर जमिनीत विष पेरतो या अंधश्रद्धेने शेतकऱ्यांनी सुरुवातीचे दोन वर्षे एकही नांगर विकत घेतला नाही. पुढे जी मागणीची बोंब उठली की ज्यामुळे किर्लोस्कर नांगर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावच्या बारदाण्यात जाऊन पडला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पुढे मळणी यंत्र, ऊसगाळप यंत्र, लेथ मशीन, मोटार पंप, कॉम्प्रेसर आणि हातपंप यांचं उत्पादन सुरू झालं. किर्लोस्करांचा हा पसारा बघून टिळक प्रभावित होवून उद्गरले “लक्ष्मणराव तुम्ही देशकार्य करत आहात. स्वतंत्र देशाला अशा उद्योगांची गरज आहे.” म्हणत पाठीवर शाबासकीची थाप दिली.

‘कमीत कमी नफा अन् जास्तीत जास्त बाजारपेठा दर्जेदार उत्पादनांनी काबीज करायच्या अन् उद्योग वाढवायचा’ हा किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा लक्ष्मणरावांनी दिलेला मूलमंत्र. हे सगळं घडत होतं किर्लोस्करवाडीत. जे औद्योगिक शहर कुंडल रेल्वे स्थानकाच्या जवळ बेळगावातून बस्तान उठल्यानंतर औंधच्या राजांनी दान दिलेल्या बत्तीस एकर जमिनीवर उभारले होते. कारण राजा किर्लोस्करांच्या औंध येथील यमाई देवीच्या गाभाऱ्यासाठी केलेलं चांदीचे धातूकाम अन् मंडपकाम बघून प्रभावित झाले होते.

किर्लोस्करवाडी हे शहर लक्ष्मणरावांनी वाचलेल्या, बघितलेल्या आणि अनुभवलेल्या युरोपीय औद्योगिक शहरासारखे होते. त्या शहरात जातीभेद आणि अस्पृश्यतेला थारा नव्हता. त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कामगाराच्या लग्नास मंत्र उच्चारण करण्यास ब्राम्हणांनी नकार दिल्यानंतर किर्लोस्करांनी त्यांच्या मित्राला हे लग्न पार पाडण्यास सांगितले. त्यांनी उद्योगाला एक कुटुंब अन् स्वतःला त्याचा विश्वस्त समजून काम केले.

एकदा अमेरिकेच्या बोस्टन शहरातून परतल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले ” बोस्टन आणि किर्लोस्करवाडीत तुम्हाला काय फरक वाटला?” ते उत्तरले ” वाहणारे पाणी, स्ट्रीट लाईट, शाळा, नाट्यगृह, खेळाचे मैदान आणि बाग यापैकी काहीच बोस्टनमध्ये नाही पण हे सगळं किर्लोस्करवाडीत आहे.” हे सगळं किर्लोस्करांनी त्यांचा भाऊ रामू अण्णा, इंजिनियर शंभूराव जांभेकर, के.के. कुलकर्णी म्हणून एक नापास विद्यार्थी, अनंतराव फळणीकर नावाचा शाळा सोडून दिलेला अर्धवट विद्यार्थी जो पुढे अनुभवातून अभियंता बनला आणि मंगेशराव रेगे हा बिना कॅल्क्युलेटर हिशोब करणारा क्लर्क यांच्या मदतीने साकारले.

यात आलेले चढ उतार त्यांनी त्यांचे मित्र श्रीमंत बाळासाहेब पंत आणि रामभाऊ गिंडे यांच्या मदतीने पार केले. टाटांनी जेव्हा कोयना धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत सोडून दिले होते तेव्हा ते पूर्ण करण्याचा निर्धार किर्लोस्करांनी तडीस नेला. पहिल्या महायु*ध्दात जेव्हा कच्च्या लोखंडाची कमतरता भासत होती तेव्हा त्यांनी सोलापूरच्या राजाच्या निकामी झालेल्या गड किल्ल्यांवरील तोफा वितळवून उत्पादन सुरूच ठेवले. ते स्वतःला घिसडी म्हणून घेण्यात कमीपणा वाटून घेत नव्हते.

जेव्हा भयानक दुष्काळ पडला होता अन् सकाळच्या परुळेकरांनी लक्ष्मणरावांना मदतीचे आवाहन केले. तेव्हा त्यांनी बँकेत असलेले सगळेच्या सगळे तब्बल आठ हजार रुपये उपासमारीने व्याकुळ लोकांना वाचवण्यासाठी दिले. किर्लोस्करांचा उद्योग हा एक सामाजिक उपक्रम होता. त्यात पत्ते पिसण्याऐवजी क्रिकेट अन् फुटबॉल खेळण्याला प्राधान्य होते.

नाट्यगृहात बाबुराव पेंटरांनी सजवलेल्या मंचावर सामाजिक संदेश देणारी नाटकं चालायची. तिथल्याच प्रिंटिंग प्रेसमध्ये किर्लोस्कर खबर, मनोहर आणि स्त्री उत्थानासाठी छापलेले “स्त्री” हे मासिक छापले जायचे. प्रगत शेती करून द्राक्ष पिकवली जायची. तिथे निवडुंगातून बागा फुलवण्याचे संस्कार दिले जायचे. तिथे स्वतः खादीचे कपडे घालून स्वदेशीचा संदेश दिला जायचा. त्यांच्या प्रत्येक उद्योगात लोककल्याणाचा संकल्प केला जायचा.

आश्चर्य म्हणजे तुकाराम रामोशी आणि पिऱ्या मांग हे शिक्षा झालेले गुन्हेगार सुधारणेच्या अटीवर किर्लोस्करवाडीचे वाॅचमन म्हणून नेमले होते. नेहरूंनी किर्लोस्करवाडीला भेट दिल्यानंतर प्रभावित होवून “औंधसारख्या चिमुकल्या संस्थानाने प्रगती आणि दानशूरपणाचे उत्कृष्ट उदाहरण देशासमोर सादर केले आहे” अशी प्रतिक्रिया दिली. याच दरम्यान पत्नी राधाबाई आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होत्या तेव्हा लक्ष्मणराव रामापूर येथे प्लेगच्या रोग्यांची सेवा करत होते.

तुम्हाला नोकरी करायची असेल तर तीस वर्षांचा विचार करावा अन् उद्योग उभारायचा असेल तर पुढच्या हजार वर्षांचे नियोजन करावे. या ध्येयातून लक्ष्मणरावांनी मुलगा शंतनू अन् पुतण्या माधवला मॅसाच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियरिंगसाठी पाठवले. तिथून पास होणारे हे दोघे पहिले भारतीय होते. पुढे हा निर्णय किर्लोस्कर ग्रुपसाठी घेतलेला सर्वांत महत्त्वाचा निर्णय ठरला. शंतनू किर्लोस्करांनी या उद्योगाला वैभव प्राप्त करून दिलं. जेव्हा हरीहर येथून लक्ष्मणरावांना शंतनूने पुण्याच्या फॅक्टरीला बघायला बोलावलं तेव्हा तापट स्वभावाच्या किर्लोस्करांनी पहिले ऑईल इंजिन उत्पादन झाल्यावरच फॅक्टरीला भेट देईल अशी अट टाकली.

पुढे १९४८ साली त्यांनी पुण्याच्या मुख्यालयाला भेट दिली. बंगळूर येथून विमानाने पुण्याला जाताना आभाळातून किर्लोस्करवाडी बघितली तेव्हा या आधुनिक ब्रह्मदेवाला “त्याने काय घडवलं!” याचा अभिमान वाटून गेला असेल.

असा हा सर्वव्यापी माणूस जो भारताच्या उद्योगविश्वाची मुहूर्तमेढ रोवत असताना सामाजिक बांधिलकी जपत होता. जो काळाच्या पुढचा होता. पुरोगामी होता. एकाचवेळी उद्योगपती, देशभक्त, हाडाचा शेतकरी आणि कुटुंप्रमुख असलेला हा अवलिया आपल्यामागे एक ओळ सोडून गेला जी आजही वाढतच आहे. आज किर्लोस्कर ग्रुप जिथे ऊभा आहे त्याचा पाया हा बापमाणूस उर्फ “पप्पा” आहे ज्याचा कळस अजूनही उंचावत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कोरोनासाठी केली जाणारी न्यूक्लिक एसिड टेस्ट काय आहे..?

Next Post

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

बुद्धमय झालेल्या या चीनी प्रवाशाने भारताच्या इतिहासाच्या महत्वाच्या नोंदी केल्या आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.