आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गावाच्या किंवा शहराच्या एखाद्या चौकात चाललेला डोंबाऱ्याचा खेळ. गर्दी आकर्षित करण्यासाठी जोरजोरात ओरडाणारा एखादा बाप्या, एखादं वाद्य वाजवून त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देणारी स्त्री आणि त्याच वेळी चार बांबूंना बांधलेल्या दोरीवर हातात एक काठी घेऊन तोल सावरत चालणारी मुलगी…हे दृश्य कधीतरी आपण पाहिलच असेल.
पोटापाण्यासाठी डोंबारी समाजातील लोक अशा कसरती करून लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. यात मला सगळ्यात जास्त कौतुक कशाच वाटत माहितीये? त्या दोरीवर चालणाऱ्या मुलीचं! तशा प्रकारे फक्त एका दोरीवर चालून ती लहानगी मुलगी भल्या थोरल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला थेट आव्हान देत असते. निसर्गाच्या काही शक्तींना आव्हान देणं खरंच कठीण काम असतं मात्र, ती मुलगी अगदी लिलया ते पार पाडते.
या मुलीप्रमाणचं आणखी एक व्यक्ती आहे जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला आव्हान देते. मायकल ग्रॅब असं त्याचं नाव. आता हा मायकल ग्रॅबसुद्धा डोंबाऱ्याचा खेळ करतो की काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? फिकर नॉट मी सांगते ना तो काय करतो!
आपण साधा एखादा दगड वरती फेकला तरी तो क्षणात खाली येतो. यामागे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हे वैज्ञानिक कारण आहे. मायकल ग्रॅब मात्र, या दगडांची कलात्मक रचना करून या निर्जीव दगडांना हवेत संतुलन साधण्यास भाग पाडतो.
मायकल हा एक बॅलन्स आर्टीस्ट आहे. आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचं संतुलन साधून विविध कलाकृती करण्याची किमया त्याला करता येते. विशेषत: गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन दगड संतुलित करण्यात आणि रॉक स्कल्पचर बनवण्यात तो तरबेज आहे. मायकलला जादुगार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण त्यानं अगदी नजाकतीनं उभारलेल्या दगडाच्या कलाकृती पाहिल्या की, व्यक्ती अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो.
रॉक बॅलन्सिंग किंवा स्टोन बॅलन्सिंग ही एक कला आहे. ज्यात विविध चिटकवण्याची साधनं, वायर, रिंग्ज किंवा इतर कोणत्याही कृत्रीम आधाराचा वापर न करता नैसर्गिकरित्या एकमेकांवर खडक किंवा दगडांचं संतुलन साधलं जातं. अलिकडच्या काळात जगभरात या कलेचा प्रसार होताना दिसत आहे. टेक्सासमधील ऍन्युयल लयानो अर्थ आर्ट फेस्टिव्हलमध्ये लयानो नदीच्या काठावर आयोजित ‘रॉक स्टॅकिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये रॉक बॅलन्सिंगची स्पर्धा भरवली जाते. अँड्रियन ग्रे, अँडी गोल्डवर्दी, बिल डॅन ही या क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. याच्यामध्ये मायकल ग्रॅबचा देखील समावेश होतो.
रॉक बॅलन्सिंग, फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीमध्ये निष्णात असलेल्या मायकलचा १९८४ मध्ये कॅनडातील एडमॉन्टन येथे झालेला आहे. त्यानं २००७ साली कोलोरॅडो विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी मिळवलेली आहे. सध्या तो कोलोरॅडोतील बोल्डरमध्ये स्थायिक झाला आहे. २००८ पासून त्यानं रॉक बॅलन्सिंगचं काम सुरू केलं आहे. मायकल ग्रॅबनं बोल्डर क्रीक(पाण्याचा ओढा)मध्ये त्याच्या कलेचा सराव करण्यास सुरुवात केली होती. अजूनही त्याच्या बहुतांशी कलाकृती तो याच भागात तयार करतो. याशिवाय त्यानं स्वित्झर्लंड, स्वीडन, स्कॉटलंड आणि जर्मनीमध्ये आपल्या रॉक बॅलन्सिंग कला लोकांना दाखवलेली आहे. क्रोएशिया, इटली, बेल्जियम आणि फ्रान्समध्ये देखील त्यानं अनेक प्रकारच्या खडकांचं संतुलन साधून दाखवलं आहे.
सहसा दुर्गम भागात आणि निसर्गाच्या सानिध्यात असेलेल्या ठिकाणी मायकल ग्रॅब आपल्या कलाकृती तयार करतो. आतापर्यंत त्यानं नद्यांचे किनारे, सागरी किनारे, डोंगर दऱ्या आणि इतर काही निसर्गरम्य ठिकाणी दगडांचं संतुलन साधून दाखवलेलं आहे. रस्त्यावरील पदपथांवर (साईडवॉक्स) देखील त्यानं आपल्या कलाकृती उभारल्या आहेत.
विशेष म्हणजे त्यांना पाण्याखाली देखील रॉक बॅलन्सिंग करून दाखवलेलं आहे. ट्रेल एथिक्सच्या ‘लीव्ह नो ट्रेस’ या तत्त्वाचं तो मायकल पालन करतो. त्यामुळं बर्याचदा तो स्वत:चं त्याच्या कलाकृती नष्ट करून टाकतो. कधीकधी दगड कोसळताना तो त्यांची व्हिडीओग्राफी देखील करतो. त्याचं हे काम त्याच्या स्वत:च्याचं छायाचित्रणामुळं लोकप्रिय झालं आहे. कलाकृती तयार करतानाचे, तयार झाल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओज् तो त्याच्या ‘ग्रॅव्हिटी ग्लू’ या वेबसाइटवर पोस्ट करतो.
काही महिन्यांपूर्वी (२२ मार्च २०२१) मायकल राहत असलेल्या बोल्डर प्रांतातील एका सुपर मार्केटमध्ये एका २१ वर्षीय मुलानं अंदाधुंद गोळी*बार केला होता. त्या घटनेत एका ऑन ड्युटी ऑफिसरसह १० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या निष्पाप मृत जीवांना मायकलनं अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली होती. त्यानं बोल्डर क्रीकजवळ लहान-लहान दगडांचे दहा मनोरे तयार करून गोळी*बाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त केल्या होत्या.
दगडांच्या संरचना तयार करण्यासाठी आणि खडक संतुलित करण्यासाठी, मायकल कोणत्याही प्रकारचा कृत्रीम आधार वापरत नाही. दगडांच्या संरचनेबाबत त्याच्याकडे असलेले तपशील आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम या दोन गोष्टींवर या कलाकृती उभ्या राहतात. मायकेलच्या मते, अशा कलाकृती तयार करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. त्यासाठी तुमच्याकडे क्षणात समस्या सोडवण्याचं कौशल्य, मनाची व हातांची स्थिरता आणि कमालीची सहनशीलता आवश्यक आहे.
अनियमित पृष्ठभागासह वस्तूंचा समतोल साधण्याचा एक महत्त्वाचा पैलू या कलेमध्ये आहे. दगडांचं संतुलन साधण्यासाठी त्यांचे योग्य बिंदू शोधणं आवश्यक असतं. यासाठी बील डॅननं मायकलला काही वर्षांपूर्वी मार्गदर्शन केलं होतं. एकदा एखादी रचना पूर्ण केली की, त्याकडं शक्य तितक्या वेगवेगळ्या कोनांतून बघण्यात थोडा वेळ घालव. मग ती रचना नष्ट करून थोड्या अधिक गुंतागुंतीसह ती पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला बीलनं मायकलला दिला होता.
दगडांच्या या कलाकृती तयार करण्यासाठी आपल्याला श्वास मंद करणं, मन एकाग्र करण जमलं पाहिजे याशिवाय जास्त प्रमाणात निवांत असणं देखील आवश्यक असतं. मायकलच्या मते, ही प्रक्रिया व्यक्तीला कमालीचं मानसिक स्थैर्य देते. त्यामुळं तो आपल्या या कलेला एक प्रकारचा योगाभ्यास देखील मानतो.
तुम्ही जर मानसिक तणावात असाल किंवा दैनंदिन कामाला कंटाळले असाल तर एखाद्या निवांत ठिकाणी जाऊन स्टोन बॅलन्सिंगचा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे. काय सांगावं तुमच्यापैकी एखादा भविष्यातील मायकल ग्रॅबही होऊ शकतो!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










