आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सिनेमात दाखवतात ते काही खरं नसतं हे आता जवळपास सगळ्यांनाच माहिती झालं आहे. एवढंच काय, अगदी वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेंट – म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईमध्येही जे दाखवतात ते खोटं असतं हे लोकांना समजलं आहे. मात्र, कित्येक स्टार्स आणि दिग्दर्शक सिनेमातील स्टंट आणि ऍक्शन सीन्स अधिकाधिक खरे वाटावेत यासाठी प्रयत्न करत असतात. कित्येक वेळा हे स्टार्स आपले स्टंट स्वतः करतात. मात्र, हे करण्याच्या नादात ते जखमीही होतात. कुली सिनेमाच्या शूटींगदरम्यान बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन जखमी झाल्याची गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
मात्र, हॉलिवूडमध्ये एक अशी फाईट झाली होती ज्यामुळे एका अभिनेत्याला हॉस्पिटलमध्ये नऊ दिवस काढावे लागले होते. हा अभिनेता होता, सिल्वेस्टर स्टॅलोन; आणि चित्रपट होता – रॉकी!
१९८५ साली सिल्वेस्टर स्टॅलोनने त्यांच्या रॉकी-४ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. रॉकी या सिरीजचा हा चौथा भाग होता. रॉकी ३ या चित्रपटाचा येणारा सिक्वेल होता. बॉक्सिंगवर आधारित असणाऱ्या या चित्रपटात सिल्वेस्टर स्टॅलोन हे ‘रॉकी’ नावाच्या प्रमुख पात्राच्या भूमिकेत होते. तर खरेखुरे वर्ल्ड कराटे चॅम्पियन डॉल्फ लुन्डग्रेन हे त्याच्या विरुद्ध कटकारस्थान करणारं ‘इवान ड्रॅगो’ नावाचं खलनायकी पात्र रंगवत होते.
सोव्हिएत संघाच्या या इवान ड्रॅगोकडून रॉकीचा मित्र अपोलो क्रिड मारला जातो. त्यामुळे मित्राच्या मृत्यूने आणि देशभक्तीने पेटून उठलेला रॉकी स्वतःच या भांडणात उडी घ्यायचं ठरवतो, अशी सर्वसाधारणपणे चित्रपटाची कथा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच चालला. यातून त्यांची तीनशे मिलियन डॉर्लर्स इतकी प्रचंड कमाई झाली होती.
परंतु अजून एका वेगळ्याच कारणामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला. त्याची सुरुवात झाली चित्रपटाच्या चित्रीकरणापासून. त्या दिवशी सेटवर बॉक्सिंग फाईटचे सीन चित्रित केले जात होते. हिरो आणि व्हिलन यांची फाईट ही स्क्रिप्टेड किंवा खोटी न वाटता त्यात तितकाच खरेपणा यावा ही सिल्वेस्टर स्टॅलोन यांचीच आयडिया होती. मार्विन हॅगलर आणि टॉमी हर्नस बॉक्सर्सची सुप्रसिद्ध फाईट पाहूनच सिल्वेस्टर यांच्या डोक्यात ही भन्नाट कल्पना आली होती. मात्र, ही आयडिया सुचवताना आपण आपल्याच पायावर मोठा धोंडा मारुन घेतो आहोत याची सिल्वेस्टर यांना तेव्हा कल्पनाही नव्हती.
सिल्वेस्टर यांनी डॉल्फ यांना बोलावून घेतले आणि “तू मला पूर्ण ताकदीनिशी मार” हे सांगितले. पहिल्या काही मिनिटाच्या आतच डॉल्फ यांनी डिरेक्टर साहेबांच्या आज्ञेचं पालन करत धडाधड रॉकीच्या म्हणजेच सिल्वेस्टर यांच्या छातीत बुक्क्या मारल्या. वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या माणसाने तुम्हांला चुकून जरी मारलं, तरी त्याचा हात किती लागत असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. इथे तर समोरूनच “जोरात मार” असं सांगण्यात आलं होत. अर्थातच सहन न झाल्यामुळे एका मिनिटाच्या आताच सिल्वेस्टर “कट-कट” म्हणून ओरडले आणि तो सीन संपला. इतक्या लगेचच सीन कसा संपला हे जेव्हा डॉल्फ यांनी विचारलं, तेव्हा सिल्वेस्टर यांनी सांगितलं, की सीन संपल्यामुळे नाही, तर सहन न झाल्यामुळे संपवला आहे.
चित्रपटासाठी एक सुपरहिट सीन मिळाला असला, तरी सिल्वेस्टर यांच्यावर त्याचा झालेला परिणाम संपला नव्हता. त्या रात्री सिल्वेस्टर यांचा रक्तदाब २६० पर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब दवाखाना गाठला. सिल्वेस्टर यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना कळत होतं त्यांना विमानातून नेण्यात येत होतं. जेव्हा ते शुद्धीवर आले त्यावेळी ते अतिदक्षता विभागात होते, आणि त्यांच्या आजूबाजूला सिस्टर्स काम करत होत्या. डॉक्टरांनी सांगितलं, की त्यादिवशी डॉल्फ यांच्याकडून सिल्वेस्टर यांच्या छातीच्या बरगड्यांना छेद देत हृदयाला मार बसला होता. त्यामुळे हृदयाला सूज येण्यास सुरुवात झाली होती.
डॉक्टर म्हणाले होते की कार अपघातात डोक्याला ज्याप्रमाणे मार बसतो, तशाच प्रकारची जखम स्टॅलोन यांना झाली होती. त्यावर स्टॅलोनही चेष्टेने म्हणाले होते, की मलाही एक ट्रकच येऊन धडकला होता – त्याचं नाव इवान ड्रॅगो ट्रक होतं.
याबद्दल डॉल्फ लुन्डग्रेन यांना प्रश्न विचारल्यावर ते सुद्धा मस्करीमध्ये सांगत, की ‘मी फक्त मला जे सांगितलं तेच ऐकत होतो आणि करत होतो’. मात्र प्रत्यक्षात डॉल्फ हे कोणाला खरोखरच मार लागू नये यासाठी प्रयत्न करत होते. एवढं होऊनसुद्धा सिल्वेस्टर स्टॅलोन आणि डॉल्फ हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
मुळात ज्यावेळी सिल्वेस्टर यांनी पहिल्यांदा डॉल्फ यांना पाहिलं होत त्याचवेळी इवान ड्रॅकोसाठी योग्य माणूस कोण असेल याची खात्री त्यांना पटलेली. धिप्पाड आणि उंच शरीरयष्टी असलेले डॉल्फ हे एका रशियन खेळाडूच्या भूमिकेला साजेसे होते.
रॉकी ४ चा पुढे १९९० मध्ये सिक्वेल देखील आला. रॉकीची लोकप्रियता पाहता २००७ मध्ये रॉकी बल्बोआ नावाची व्हिडिओ गेमसुद्धा बनविण्यात आली होती. राहिला प्रश्न पुरस्कारांचा तर २०१३च्या सीनेरॉकॉम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सिल्वेस्टर स्टॅलोन आणि डॉल्फ लुन्डग्रेन दोघांनाही लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. इतरही अनेक मानाचे समजले जाणारे पुरस्कार रॉकी ४ आणि त्याच्या कलाकारांना मिळाले आहेत.
जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०२० मध्ये रॉकी ४ या चित्रपटाला पस्तीस वर्षं पूर्ण झाली आणि रॉकीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ती अशी – लवकरच सिल्वेस्टर दिग्दर्शकाच्या नजरेतून रॉकी कसा होता , कसा घडला आणि चित्रपट बनवताना काय काय गमतीजमती झाल्या, अडचणी आल्या हे सांगणार आहेत. रॉकी-४ डिरेक्टर्स कट याच्या प्रदर्शनाची तारीख समोर आलेली नसली, तरी हा एक रोमांचकारी अनुभव असणार हे नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










