The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका भारतीयाच्या सतार वादनाने ब्रिटनच्या प्रसिद्ध ‘बीटल्स’लाही भारावून टाकलं होतं

by द पोस्टमन टीम
5 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय संगीत आज संपूर्ण जगभरात पोहोचले आहे. पाश्चात्त्य देशांतही पारंपारिक शास्त्रीय भारतीय संगीताचे चाहते आहेत. भारतीय संगीत जगभर पोहोचवण्यात पंडित रवी शंकर यांचे योगदान मोठे आहे. आपल्या सतारवादनातून त्यांनी संपूर्ण जगभर भारतीय संगीताचे सूर पोहोचवले. जगभर त्यांच्या सतार वादनाचे अनेक चाहते होते. यासाठी देश-विदेशातून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

त्यांना तीनवेळा अमेरिकेच्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतातही १९९९ साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानेही पुरस्कृत करण्यात आले होते. शिवाय, १९८६ ते १९९२ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते.

पंडित रवी शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी वाराणसी येथे झाला. वाराणसी म्हणजे भारतातील एक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शहर. त्यांचे वडील बॅरिस्टर होते. पंडित रवी शंकर दहा वर्षांचे असतानाच त्यांची पारंपारिक नृत्य आणि संगीत कलेशी ओळख झाली. त्यांचे थोरले बंधू उदय शंकर हे पॅरीसमध्ये भारतीय नृत्याचे कार्यक्रम सादर करत. त्यांनी आपल्या मोठ्या भावाचे बोट धरून कलेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

पंडित रवी शंकर यांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे संगीताशी जोडले गेले होते.

एका मुलाखतीत त्यांनीच सांगितले, “माझे इतर भाऊ संगीतात खूप रस घेत. कोणी बासुरी वाजवत, तर कोणी सितार. माझे मोठे बंधू उदय शंकर नृत्य सादर करायचे. मी त्यांच्यासोबत पॅरीसला गेलो. त्यांच्या पथकात अनेक मोठमोठे संगीततज्ञ होते, तसेच कलाकारही होते. त्यांच्यासोबत राहूनच मलाही संगीताची आवड निर्माण झाली. त्यांच्यासोबत मी सुरुवातीला नृत्य शिकत होतो. नृत्यात मला फारशी गती नव्हती. परंतु वेगवेगळी वाद्ये वाजवण्यात मला प्रचंड रस होता. सितार, सरोद, तबला, अशी अनेक वाद्ये वाजवण्यास मी लहानपणीच शिकलो.”



संगीताचे प्राथमिक धडे गिरवण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली. अठराव्या वर्षी अल्लाउद्दिन खाँ यांच्याकडून त्यांनी सितारवादनाची दीक्षा घेतली. त्यांच्याकडून सितार वादनाचे शास्त्रीय शिक्षण घेण्यासाठी ते मैहेरमध्ये दाखल झाले.

वेगवेगळ्या प्रकारचे आशियाई संगीत आणि पाश्चिमात्त्य संगीताचा त्यांनी सुंदर मिलाप घडवून आणला. व्हायोलीन वादक येहुदि मेनिहून, बासरीवादक जीनपेअर रामपाल आणि सेक्सोफोन वादक जॉन कॉल्ट्रेन यांनी एकत्र येऊन संगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पाश्चिमात्त्य आणि भारतीय संगीताच्या मिलावटीतून त्यांनी असे एक संगीताची एक नवी परंपरा निर्माण केली. हा अनोखा मिलाप पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य दोन्ही रसिकांसाठी अगदी नवा होता. या संगीताने पृथ्वीच्या दोन अर्धगोलातील संगीत परंपरेला एकाच धाग्यात गुंफण्याचे काम केले.

संगीताच्या भाषेला कोणत्याही देश आणि संस्कृतीच्या सीमेचे बंधन नसते हेच पंडित रवी शंकरजींनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. त्यांना पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य दोन्ही प्रकारच्या संगीतातील चांगली जाण होती.

पंडित रवी शंकर जेव्हा सुरुवातीला पाश्चिमात्त्य रसिकांसमोर आपला संगीत कार्यक्रम सदर करत, तेव्हा रसिकांना त्यांची ही सुरावट काहीशी विचित्र, अनोळखी वाटत असली तरीही या सुरावटीने मनाला एक अद्भुत शांती मिळते, याची प्रचीती रसिक घेत होते.

युरोप आणि अमेरिकेत त्यांनी अनेक संगीत मैफिलींचे कार्यक्रम केले. त्यांच्या या देशोदेशी केलेल्या कार्यक्रमामुळे पाश्चात्त्य लोकांतही भारतीय संगीताचे चाहते निर्माण झाले. या रसिकांना भारतीय संगीताची गोडी लागली.

रवी शंकर यांच्या सतार वादनाने बीटल्स या ब्रिटनच्या प्रसिद्ध संगीत बँडचा प्रमुख हरीसन देखील भारावून गेला. त्याने स्वतः सतार वादन शिकून घेतले. बीटल्स ग्रुपच्या हेल्प या दुसऱ्या चित्रपटासाठी त्याने सितारचे संगीत दिले.

हॅरीसनला सतारबद्दल प्रचंड उत्सुकता होती. खाली एक छोटा भरीव गोल, त्याची लांबलचक दांडी, त्यावर जोडलेल्या सात सुरांच्या तारा ज्यांच्यावरून बोटे फिरवताच वेगवेगळ्या सुरावटींचा जन्म होतो. हे पाहून हॅरीसन सितारच्या प्रेमातच पडला. त्याने सितार वादन शिकून घेतले.

बीटल्सच्या ‘नॉर्वेयन वूड’च्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने सितारचा वापर केला आहे. हॅरीसनच्या अनेक अल्बमना भारतीय संगीतकारांनी संगीत दिले आहे.

१९६० च्या दशकात सितारवादनाला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. १९६७ साली पंडित रवी शंकर यांनी ”मोन्टेरी इंटरनॅशनल पॉप फेस्टिवल”मध्ये सितारवादनाचा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी जमली होती. ज्येष्ठ तबला वादक अल्ला रख्खा आणि सरोद वादक अली अकबर खान यांच्यासोबतही त्यांनी अनेक कार्यक्रम केले.

१९७१ साली बांगलादेशमध्ये चाललेल्या राजकीय धुमश्चक्रीत भरडलेल्या सामान्य लोकांच्या मदतीसाठी हॅरीसनने पंडित रवी शंकर यांच्यासह अल्ला रख्खा आणि अली अकबर खान यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता.

हा कार्यक्रम मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला होता. जॉर्ज हॅरीसनसोबत त्यांनी जॅझ, अभिजात पाश्चात्त्य संगीत आणि लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर काम केले.

१९८२ साली प्रदर्शित झालेली रिचर्ड अटेनबरफ यांच्या गांधी चित्रपटासाठीही पंडित रवी शंकर यांनी संगीत दिले. पंडित रवी शंकर यांची प्रसिद्धी वाढत गेली तसे भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीत यांचा मिलाफ असलेले सांगीतिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. न्यूयॉर्कमध्ये तर वर्ल्ड म्युझिक इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था उभी राहिली. या संस्थेने संगीत क्षेत्राचा कायापालट करून टाकला.

पंडित रवी शंकर अमेरिकेतील रॉक म्युझिकशीही जोडले गेले होते. एका मुलाखतीत याबद्दलचे आपले विचार व्यक्त करताना पंडित रवी शंकर म्हणाले होते, “मी एक बदलते जग पाहत आहे. अशा काळात माझा जन्म झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. हिप्पी चळवळ जरी कृत्रिम वाटत असली तरी, त्यात प्रामाणिकपणा ओतप्रोत भरलेला आहे. या चळवळीत उर्जेचा भरपूर साठा आहे. यांच्यातील एकच गोष्ट मला खटकते, ती म्हणजे हे संगीतासोबत ड्रग्जचा वापर करतात.

ड्रग आणि संगीत यांचे यांनी केलेले मिश्रण मला अजिबात पटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्याबद्दल मला खूप दु:ख होते ते म्हणजे आमच्या शास्त्रीय सांगितला हे लोकं फॅड समजतात. पाश्चिमात्त्य देशात ही गोष्ट अगदी सामान्य समजली जाते.”

“लोक माझ्या कार्यक्रमाला येतात तेव्हा कोक पीत बसतात किंवा आपल्या मैत्रिणीसोबत चाळे करत बसतात. मला हे फारच अपमानास्पद वाटते. अनेकदा मी अशा लोकांसमोरून माझी सितार उचलून उठून जातो.”

“या तरुण मुलांनी व्यवस्थित बसून माझे संगीत ऐकावे यासाठी मी प्रयत्न केला आहे. त्यांना जर उच्चतम अनुभूती घ्यायची असेल तर ती अनुभूती मी माझ्या संगीतातून त्यांना देऊ शकतो. त्यासाठी त्यांना संगीत ऐकत ऐकत ड्रग घेण्याची अजिबात गरज नाही. हे मी त्यांना पटवून दिले आहे.

हे तरुण आजही माझ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात आणि त्यांच्यातील अनेकजण आता व्यसनमुक्त झाले आहेत. त्यांनी ड्रग घेणे बंद केले आहे. या मुलांमध्ये एक समंजसपणा आला आहे, प्रौढत्व आले आहे. हे पाहून मला खरंच खूप आनंद होतो. मी एक वर्तुळ पूर्ण केल्याचे समाधान मला मिळते.”

भारतीय संगीत आणि पाश्चिमात्त्य संगीताचा मिलाप करण्याची प्रेरणा त्यांना काही पाश्चिमात्त्य कलाकारांकडूनच मिळाली. हे कलाकार त्यांचे मोठे बंधू उदय शंकर यांच्या नृत्याचे कार्यक्रम पाहायला येत.

तेव्हा ते लोक म्हणत, “भारतीय संगीत कानांना गोड वाटते, ऐकण्यास मधुर आहे. पण, त्यात एकसुरीपणा जास्त आहे. भारतातील एखाद्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणेच भारतीयांचे संगीत आहे.” ते अत्यंत नम्र भाषेत आपले मत मांडत असले तरी, पंडित रवी शंकर यांना मात्र, त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून राग येत असे.

ते म्हणत यांनी भारतीय संगीताचा एक पदरही उलगडून पाहिलेला नाही. हे लोक अशा प्रकारची प्रतिक्रिया कशी काय देऊ शकतात. भारतीय संगीत किती अगाध, अनंत आहे याची या लोकांना मुळीच कल्पना नाही.

सितारवादन शिकण्याला कशी सुरुवात केली याचीही त्यांनी सांगितलेली कथा खूपच प्रेरणादायी आहे. पंडित रवी शंकर यांना घरीच संगीताचे शिक्षण मिळत होते त्यामुळे त्यांना नेहमी वाटे की, त्यांना संगीताचे खूप ज्ञान आहे. पण, जेव्हा जेव्हा त्यांची अल्लाउद्दिन खान यांच्याशी भेट होई तेंव्हा मात्र त्यांची ही घमेंड उतरत असे.

अल्लाउद्दिन खान त्यांना नेहमी म्हणत, भारतीय संगीत शिकण्यासाठी स्वतःला संगीताला समर्पित करावे लागते. तुझे राहणीमान पाहता तू कधी भारतीय संगीत शिकू शकशील असे वाटत नाही. हे ऐकून पंडित रवी शंकर यांचा अहंकार गळून पडला आणि त्यांनी अल्लाउद्दिन खान यांचे शिष्यत्व स्वीकारले.

पंडितजींचा जन्म भारतात झाला असला तरी त्यांचे बालपण मात्र पॅरीसमध्ये गेले. त्यांची जीवनशैली बऱ्यापैकी पाश्चिमात्त्य होती. पण, ते सगळे सोडून फक्त अभिजात भारतीय संगीत शिकण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन ते भारतात आले.

पॅरीससारख्या शहरात राहिल्यानंतर भारतातील खेड्यापाड्यातून राहणे सुरुवातीला त्यांना खूपच अडचणीचे गेले. पण, संगीत शिकण्याच्या त्यांच्या उर्मीने या सगळ्या अडथळ्यांवर विजय मिळवला.

त्यांनी अल्लाउद्दिन खान यांची मुलगी अन्नपूर्णाशी विवाह केला. पण, हा विवाह जास्त काळ टिकला नाही. त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांनी सुकन्या यांच्याशी दुसरा विवाह केला. सुकन्या आणि पंडित रवी शंकर यांची कन्या अनुष्का शंकर या देखील प्रसिद्ध संगीतकार आणि सितार वादक आहेत.

याशिवाय सो जोन्स या अमेरिकी महिलेशीही पंडित यांचे संबंध होते. त्यांची मुलगी नोरा जोन्स यादेखील संगीतकार आहेत. सो जोन्स यांच्याशी रवी शंकर यांनी विवाह केला नव्हता. त्यांच्या वैयक्तिक जीवनातील या घडामोडीमुळेही ते बऱ्याचदा चर्चेत असत.

१९४९ साली त्यांना ऑल इंडिया रेडीओसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून नेमण्यात आले. १९५० पासून त्यांनी भारताबाहेर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.

१९५४ साली सोव्हिएतमध्ये त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफल होती.

यानंतर लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हापासून संगीत कार्यक्रमांसाठी परदेश दौरे करण्याचा त्यांनी सपाटाच लावला.

१९५६ साली त्यांनी ऑल इंडिया रेडीओतील आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच त्यांनी संगीत दौरे करण्यावरच जास्त भर दिला. हॅरीसन यांच्यासोबतच्या घनिष्ठ मैत्रीने त्यांना मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली.

१९५२ पासून त्यांनी मेनुहिन यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. पाश्चिमात्य जगातही त्यांनी सितारची लोकप्रियता वाढवली. मेनुहिन यांच्यासोबत त्यांनी केलेल्या “इस्ट मीट वेस्ट” या अल्बमचे तीन भाग जगप्रसिद्ध आहेत.

कॉल्ट्रेन यांनी पंडित रवी शंकर यांच्याकडे सितार वादनाचे धडे सुरु केले. त्यांनी भारतीय संगीतातील राग, ताल, या घटकांची प्राथमिक माहिती करून घेतली. भारतीय संगीतातील काही सुधारित तांत्रिक बाबीही शिकून घेतल्या.

पंडित रवी शंकर यांच्या नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव रवी कॉल्ट्रेन असे ठेवले. भारतीय संगीत तत्वज्ञानाचा तर त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता.

पंडित रवी शंकर यांना वेगवेगळ्या संस्कृतीतील संगीताचा मिलाफ करण्याचा छंदच होता. १९७८ साली त्यांनी अनेक प्रख्यात जपानी संगीतकारांसोबत मिळून कार्यक्रम केले. होझान यामामोटो हे एक शाकुहाची वादक (जपानी वाद्य) आणि सुसुमा मियाशिता हे कोटो प्लेअर होते. या जपानी कलाकारांसोबत त्यांनी ‘इस्ट ग्रीट्स इस्ट’ नावाचा कार्यक्रम केला.

पाश्चात्त्य श्रोत्यांना पंडित रवी शंकर आणि त्यांचे हे फ्युजन संगीत फारच कल्पक वाटत असे. अनेक जण भारतीय संगीताचे निस्सीम चाहते बनले. फक्त सितारच नाही तर पाश्चिमात्त्यांना सरोद, तबला, अशा अनेक वाद्यांमध्ये रुची निर्माण झाली.

त्यांनी इतर भारतीय गायकांचेही संगीत शोधले आणि त्यांचे कार्यक्रम भरवले. पाश्चिमात्त्य लोकांत भारतीय संगीताबद्दल प्रचंड ओढ आणि आस्था निर्माण झाली. याचे श्रेय पंडित रवी शंकर यांनाच जाते.

पंडित रवी शंकर यांनी भारतीय संगीतालाच आपले जीवना अर्पण केले होते. समर्पण वृत्ती असेल तरच भारतीय संगीताचे ज्ञान प्राप्त करून घेता येते ही त्यांच्या गुरुंनी दिलेली शिकवण ते जन्मभर विसरले नाहीत. उलट याच वृत्तीने ते जन्मभर भारतीय संगीत सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी झटत रहिले.

त्यांच्या या समर्पण वृत्तीमुळेच जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ११ डिसेंबर २०१२ रोजी अमेरिकेत असताना त्यांचे निधन झाले. भारतीय संगीताचा एक अजरामर सूर अनंतात विलीन झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फायबर ऑपटिक्सचा जनक असणारा हा भारतीय शास्त्रज्ञ आयुष्यभर नोबेलपासून वंचित राहिला

Next Post

चीनची राजधानी बीजिंगच्या खाली वसवण्यात आलंय एक महाकाय शहर!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

चीनची राजधानी बीजिंगच्या खाली वसवण्यात आलंय एक महाकाय शहर!

इंग्रज सरकार भारतीय आरोग्यव्यवस्थेचा अहवाल या महिलेला पाठवून तिचा सल्ला घेत असे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.