आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
सध्याच्या काळात घटस्फोट, वेगळे होण्याचे दुखः पचवणे अवघड होत चालले आहे. आता जे लोकं खऱ्या अर्थाने प्रेम करत असतात त्यांच्यासाठी अचानक ओढवलेली विभक्ती ही मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत असते. यातून सावरणे अनेकांना अवघड होऊन बसते, यामुळे एकतर लोक नैराश्याच्या आहारी जातात नाही तर प्रतिशोधाच्या अग्नीत जळतात.
आता ही प्रतिशोधाची आग कशा स्वरुपाची असेल याचा काही नेम नाही. घटस्फोट झाल्यावर मुलांच्या ताब्याचा वाद निर्माण होतच असतो. पण एखादा दुखावलेला माणूस यासाठी काय करेल याचा काही नेम नाही.
अमेरिकेच्या कॅन्सास शहरातील एका माणसाने बायकोकडून मुलांचा ताबा मिळवण्यासाठी चक्क प्रसिद्ध इंग्रजी मालिका गेम ऑफ थ्रोन्सच्या पद्धतीने ‘ट्रायल बाय कॉम्बॅट’ पद्धतीचा वापर करायचा घाट घातला आहे.
यासाठी खास जपानी तलवारीच्या वापराची देखील परवानगी ह्या माणसाने मागितली आहे. हा किस्सा ऐकायला जरी मजेदार असला तरी प्रत्यक्षात एक मोठा विचित्रपणा आहे.
‘ट्रायल बाय कॉम्बॅट’ नेमकं आहे तरी काय ?
जॉर्ज आर. आर. मार्टिन ह्या लेखकाच्या कादंबऱ्यांवर आधारित ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ह्या मालिकेची निर्मिती बीबीसी या वाहिनीकडून करण्यात आली होती. ह्या सिरीजमध्ये ‘ट्रायल बाय कॉम्बॅट’ हा शब्द प्रयोग आला आहे. जर दोन लोकात कुठल्याही प्रकारचे वाद असतील तर त्यांना न्याय देण्याची ही एक पद्धत दाखवण्यात आली आहे.
यात दोन्ही बाजूचे लोक एकमेकांशी तलवारबाजी अथवा भाल्याने युद्ध करतात, यात जो शेवटी जगतो त्याला न्याय प्रदान केला जातो. शौर्याच्या आधारावर न्याय केला जाण्याची पद्धत ह्या सिरीजमधील प्राचीन काळातील राजे महाराजे वापरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आजच्या आधुनिक न्यायाववस्थेत असल्या जंगली पद्धतीला कुठलीच थारा देण्यात आलेली नाही.
नेमकं प्रकरण काय आहे ?
एका अमेरिकन वृत्तपत्राच्यानुसार, जपानच्या सामुराई परंपरेचा आदर्श घेतलेल्या आणि सामुराई बनण्यासाठी इच्छुक असलेल्या डेव्हिड ओर्टाम नावाच्या ४० वर्षीय गृहस्थाने अमेरिकेच्या कॅन्सास येथील कोर्टात माहिती देताना म्हटले आहे की, त्यांच्या बायकोसोबत असलेल्या कायदेशीर वादाने त्यांना संपूर्णपणे दिवाळखोरीत काढलं आहे.
त्याने कोर्टाला मागणी केली आहे की त्यांच्या ह्या डिव्होर्स प्रकरणातील कस्टडीचा वाद सोडविण्यासाठी त्यांना एका प्राचीन पद्धतीचा वापर करू द्यावा ज्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानात त्याच्या भूतपूर्व बायकोशी नाही, तर तिच्या वकीलाशी तो तलवार युद्ध करून त्यांच्या आत्म्याला मुक्ती प्रदान करू शकेल.
इतकंच नाहीतर ह्या तलवार युद्धासाठी त्याने जपानी पद्धतीच्या सामुराई तलवारींची मागणी देखील कोर्टाकडे केली आहे, जर तलवारी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत तरी हरकत नाही, त्याला तलवारींचा शोध घेण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्याने केली आहे. काटना आणि वाकीझाशी अशा दोन प्रकारच्या तलवारींची मागणी त्याने केली आहे.
आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ बोलताना ओर्टाम म्हणाला की, अमेरिकेच्या कायद्याच्या इतिहासात कुठेच ट्र्रायल बाय कॉम्बॅट वर बंदी घालण्यात आलेली नाही, त्यामुळे ह्या मार्गाचा अवलंब करू द्यायला कोर्टाला कसलीच हरकत नसावी. मुलांचा ताबा माझ्याकडे असावा ह्या साठी मी वाट्टेल ते करायला तयार असल्याचं त्याने म्हटलं आहे.
त्याने पुढे उदाहरण देताना म्हटलं की ट्रायल बाय कॉम्बॅट पद्धतीने शेवटचा न्याय होऊन फक्त दोनशेच वर्ष उलटली आहेत. १८१८ साली ब्रिटिश सरकारने या पद्धतीच्या आधारावर युद्ध लढलं होतं.
त्यांनी तरी ब्रिटिश पद्धतीच्या तलवारबाजीचा वापर केला होता, मी तर फक्त जपानी पद्धतीच्या तलवारबाजीची मागणी करतो आहे.
एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार बायको सोडून गेल्याच्या दुःखात आणि न्याय व्यवस्थेत भोगायला लागत असलेल्या मनस्तापामुळे त्याला हे नसते उद्योग सुचत असल्याची टीका त्याच्या भूतपूर्व बायकोच्या वकिलाने केला आहे.
त्याचा अशा विचित्र व्यवहारामुळेच त्याच्या बायकोने त्याला नारळ दिलं असल्याची भावना बोलून दाखवली जात आहे. पण ह्या प्रतिक्रियेने भडकलेल्या ओर्टामने वकिलाला सरळ युद्धात बायकोच्या जागी लढायला येण्याची विनंती केली आहे.

कोर्टात बायकोच्या वकिलाने ह्या मूर्खपणाकडे न्यायालयाने लक्ष देण्याची गरज नसून आवेगातून हा माणूस काहीही बरळत सुटला आहे, असं म्हटलं आहे. इतकंच नाही, तर अशा मागणीमुळे त्याला मुलांना भेटण्याची परवानगी देखील नाकरली जावी अशी मागणी त्याच्या बायकोच्या वकिलाने न्यायालयाकडे केली आहे.
सोबतच असे आत्मघातकी प्रकार ज्यात कोणाचा जीव जाण्याची शक्यता आहे, हे रोखण्यासाठी प्रयत्न होण्याचे गरजेचे असून ह्यातून दोघांचा पण जीव जाण्याची शक्यता असल्याने ह्या माणसाला माथेफिरू घोषित करून त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पण हा मुद्दा इथेच संपला नाही, ओर्टामने एक पाउल पुढे जाऊन मुद्दा उपस्थित केला की,’ट्रायल बाय कॉम्बॅट’चा एक नियम असतो ज्यानुसार जर कोणी व्यक्ती लढायला असमर्थता दर्शवत असेल तर तो त्या व्यक्तीचा पराभव समजला जावा. त्या व्यक्तीला गुन्हेगार घोषित करून त्याच्यावर खटला भरून त्याला दोषी सिद्ध करून, ट्रायल बाय कॉम्बॅटची मागणी करणाऱ्याच्या बाजूने न्याय दिला जावा, ह्या नियमानुसार मी निर्दोष सिद्ध होत असून मला माझ्या मुलांची कस्टडी द्यावी.
ओर्टामचं प्रकरण हे २०१५ साली झालेल्या अशाच स्वरूपाच्या प्रकरणाशी निगडित असून ज्यात एका वकिलाने पैशाच्या वादावरून ट्रायल बाय कॉम्बॅटची मागणी केली होती. ओर्टाम म्हणतो की, तो ही मागणी करायला मूर्ख नसून ह्या डिव्होर्सच्या प्रकरणामुळे त्याच्या मुलांना होणारा त्रास त्याला बघवत नाही, यासाठीच तो मुलांच्या सुटकेची मागणी करतो आहे.
ओर्टामला ह्या ट्रायल बाय कॉम्बॅटचा सल्ला देण्याचं काम त्याच्या वकिलाने केलं असून तो गेम ऑफ थ्रोन्स मधील टिरीयन लॅनिस्टर ह्या पात्राचा चाहता असल्याचं त्याने म्हटलं आहे. हे प्रकरण कोर्टात असून याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









