आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रवास तो आरामदायक व्हावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यातही तुम्ही जर उच्चभ्रू परिवारातून असाल तर तुमचे हे प्रयत्न यशस्वी होतात.
आज अशाच आरामदायी आणि डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. एक असं कुटुंब जे मुळात कमी प्रवास करतात पण जेव्हा प्रवास करतात तो सुखासीन आणि आरामदायी व्हावा हा त्यांचा अट्टहास असतो. ते कुटुंब आहे, सौदी अरेबिया राजघराणे. सौदी अरेबियाचा राजा – राजा सलमान बिन अब्दुलाझिज याच्या प्रवासाविषयी आणि सुरक्षाविषयी अधिक जाणून घेऊया.
जगातील सर्वात शक्तिशाली पुरुषांपैकी एक, राजा सलमान आपल्या कुटुंबासमवेत फार कमीवेळ प्रवास करतो. आज जवळजवळ ३ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती पाठीशी घेऊन तो गादीवर बसला आहे. जिथे तो जातो तेथे पंचतारांकित हॉटेलांमध्ये राहण्यास प्राधान्य देतो. या राजाला प्रवास करण्यासाठी सर्वांत महागडी विमानं दिमतीला आहेत.
किंगचे विमान बोइंग 747 आहे.
या विमानात ६०० लोकांना सहज बसता येईल अशी त्याची आसनव्यवस्था आहे. जगातील सर्वात मोठे विमान म्हणजे तो आकाशातील राजवाडाच आहे.
यात अत्याधुनिक सर्व सुविधा आहेत. कॉन्फरन्स रूम, स्टेटरूम आणि संपूर्ण सुसज्ज शॉवरसह स्नानगृहांसाठी या विमानात जागा आहे. महागड्या लेदर सीट असणारा एक दिवाण आहे. डोळे दिपवून टाकतील असे आतील डिझाइन आहे.
या राजाच्या प्रवासाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
२०१७ साली इंडोनेशियाच्या भेटीदरम्यान बरीच विमानं (लष्करी परिवहन विमानासहित) राजाच्या दिमतीला होते. त्यामागील एकमेव उद्देश राजाच्या सामानाची वाहतूक म्हणून काम करणं हा होता आणि त्यासाठी अगदी त्याच्या सगळ्या सामानाने प्रथम श्रेणीचा प्रवास केला. इंडोनेशियाच्या याच प्रवासादरम्यान किंगच्या सामानासाठी असलेल्या विमानात सुमारे १००० टन सामान होते ज्यासाठी तब्बल सात अतिरिक्त विमानांनी किंगसोबत उड्डाण केले होते.
तर, मॉस्कोच्या त्याच्या एका प्रवासादरम्यान, जेव्हा तो पहिल्यांदा व्लादिमीर पुतिनला भेटण्यास निघाला होता, तेव्हा राजाने जवळजवळ १००० किलोग्राम अन्न आपल्याबरोबर घेतले होते. याखेरीज, त्याने स्वत:चे सोन्याचे-प्लेट केलेले फर्निचरही आपल्याबरोबर नेले, जे त्याने जिथे ठरविलेल्या ठिकाणी ‘सामान्य’ फर्निचरची जागा घेईल अशी मांडणी होती.
जेव्हा असे सामान असते तेव्हा आपण समजू शकतो की त्या सगळ्या सामानाची व्यवस्था करण्यासाठी माणसं पण तितकीच लागतील आणि राजा जिथे प्रवास करतात तेथे त्याला सुरक्षितपणे नेणे आवश्यक आहे. राजा सलमान स्वतःच्या शेफलाही प्राधान्य देतो आणि जिथे जिथे जाईल तिथे आपल्या १०० वैयक्तिक शेफना पण घेऊन जातो, बाहेर जेवतानासुद्धा तो प्रत्येकवेळी आपल्याकडे असणाऱ्या शेफच्या हातचेच खातो.
त्याच्या गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर, राजा त्याच्या वैयक्तिक आवडत्या मर्सिडीज बेंझ एस ६०० सह उंच वाहनांमध्ये प्रवास करणे पसंत करतो. जपान दौर्यावर, तो त्याच्या बरोबर ५०० लिमोझिनचा ताफा देशातून घेऊन गेला.
त्यानंतर राजा सलमानला त्याच्या पसंतीच्या मार्गावरून नेले जाते. सामान्यत: मुक्कामासाठी तो भेट देत असलेल्या देशातील सर्वात महागड्या आणि उच्च दर्जाच्या हॉटेलांचा समावेश असतो. मॉस्कोच्या त्यांच्या भेटीत त्यांनी मुक्काम करण्यासाठी दोन हॉटेल पूर्ण बुक केली. हॉटेल कर्मचार्यांनी सौदीच्या राजासाठी सर्व खोल्या रिकाम्या केल्या, ज्या लोकांचे आधीच बुकिंग झाले त्यांचेही कॅन्सल केले व जे किंवा हॉटेलमध्ये राहत होते त्यांनाही बाहेर काढण्यात आले. राजा सलमानने काही दिवसांकरिता येथे राहण्यासाठी ३० लाख डॉलर्स खर्च केले.
अमेरिकेच्या त्यांच्या एका भेटीदरम्यान राजा सलमान याने वॉशिंग्टन डीसीमधील प्रसिद्ध फोर सीझन हॉटेल भाड्याने घेतले. तथापि, हॉटेलचे फर्निचर राजासाठी पुरेसे चांगले नव्हते आणि त्यामुळे त्याच्या आवडीनुसार संपूर्ण हॉटेलची पुनर्रचना करण्यात आली. राजाच्या वैयक्तिक कर्मचार्यांनी फर्निचर बदलले, जे सोन्याचे होते, आणि हॉटेलच्या सर्व मजल्यांवर (पार्किंगसहित) लाल रंगाचे कार्पेट बसवून घेतले होते.
राजा सलमान याला स्वत:ला सहाय्यक, मुत्सद्दी व सुरक्षा असलेल्या लोकांभोवती आवडते; त्याच्या १५००हून अधिक लोकांच्या सैन्यात ८०० प्रतिनिधी, २५ सरदार आणि १० मंत्री यांचा समावेश असतो. इंडोनेशियात असताना राजा आणि त्याचे पथक जकार्ताच्या रिट्ज-कार्ल्टन, रॅफल्स जकार्ता आणि जेडब्ल्यू मॅरियट या प्रमुख हॉटेलमध्ये राहण्यासाठी होते.
राजाच्या प्रवासाची भव्यता, त्याने जमा केलेल्या कधीही न संपणाऱ्या संपत्तीचा दाखला आहे. येमेनसारख्या शेजारी देशांना यु*द्ध, दुष्काळ आणि आजाराने बराच त्रास सहन करावा लागत असताना बर्याच लोकांनी राजघराण्याकडे इतके भव्य प्रवास केल्याबद्दल टीका केली होती. असे असूनही, सौदी अरेबियाचे राजघराणे त्यांच्या विलक्षण जीवनशैलीत बदल करण्याची शक्यता कमीच दिसते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










