The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्लॉग : डॉक्टर हेडगेवार यांचे अखेरचे दिवस

by श्रीपाद कोठे
27 June 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


महापुरुषांची अखेरसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असलेली अनेकदा पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हेदेखील त्याला अपवाद नाहीत. २१ जून १९४० रोजी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्या दिवशी तिथी होती, ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. वय होते अवघे ५१ वर्षे.

धिप्पाड आखाड्यात कसलेला देह त्यांनी अक्षरश: चंदनासारखा झिजवला. त्यांच्या प्रकृतीची ओळख होण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकाता येथे असतानाचा प्रसंग. सुरुवातीचे दिवस होते. खानावळवाला नियमितपणे डबे पाठवीत असे. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्याला सांगितले की, तो पाठवतो तेवढा डबा त्यांना पुरत नाही. डबा जास्त पाठवावा. खानावळवाल्याला शंका आली की, अशी तक्रारवजा मागणी तर अन्य कुणाचीही नाही. न जाणो, दोघांचा डबा एकासाठी मागवून दोघे जेवतील. पैसे वाचवण्यासाठी विद्यार्थी असे करू शकतात.

तेव्हा खानावळवाल्याने अट घातली की, तू येथे तेवढे जेवून दाखव तरच तुला जास्त डबा पाठवीत जाईन. डॉक्टरांनी अट मान्य केली व पूर्ण केली. तेव्हापासून त्यांना जास्त डबा मिळू लागला. असा हा देह अखेरच्या दिवसात जर्जर झाला होता. 

१९२५ च्या विजयादशमीला संघाची स्थापना केल्यानंतर त्या कार्यासाठी केलेली प्रचंड मेहनत, अखंड धावपळ, देहाचे संवर्धन- संरक्षण- पोषण- याविषयीची कमाल अनास्था; यामुळे त्यांचा वज्रासारखा देह आतून पोखरत गेला. शिवाय डोक्याला असलेल्या विवंचना वेगळ्याच.

डॉ. हेडगेवार यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी साधारण दीड वर्ष आधी नागपूर जवळच्या सिंदी या गावी दहा दिवसांची एक दीर्घ बैठक घेतली होती. १९३९ च्या फेब्रुवारीचे अखेरचे दिवस आणि मार्चचे सुरुवातीचे दिवस ही बैठक झाली होती. रोज आठ तास औपचारिक बैठक आणि अन्य वेळात अनौपचारिक चर्चा, अशा स्वरूपाच्या या बैठकीत डॉ. हेडगेवार यांच्यासह नऊ लोक सहभागी झाले होते. संघाची कार्यपद्धती, आज्ञा, प्रार्थना इत्यादी गोष्टींना त्या बैठकीत अंतिम रूप देण्यात आले होते.



त्यानंतर लगेच मार्च महिन्यात गोळवलकर गुरुजींना बंगालमध्ये प्रचारक म्हणून पाठवण्यात आले होते. त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाळासाहेब देवरस यांना देखील बंगालमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर स्वतः डॉ. हेडगेवार बंगालमध्ये संघटनात्मक प्रवासाला गेले होते. परंतु प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना तेथे कार्यक्रम, भाषण आदी करता आले नाहीत. त्यामुळे ते १९४० च्या जानेवारी महिन्यात गरम पाण्याचे झरे असलेल्या बिहारमधल्या राजगीर येथे जल चिकित्सेसाठी गेले. तिथे दोन महिने राहिल्यानंतर ते नागपूरला परतले आणि पुन्हा संघाच्या कामाला लागले.

तब्येत साथ देत नसतानाही लगेचच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते पुण्याला संघ शिक्षा वर्गास भेट देण्यासाठी गेले. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झालेल्या या वर्गात महाराष्ट्रातल्या १३२ गावचे ८०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. डॉक्टर हेडगेवार यांना पाठीचे दुखणे होते. सतत पाठ ठणकत असे. थोडाही वारा लागला तरीही असह्य कळा येत. त्यामुळे उन्हाळा असूनही ते वरून जाड लोकरीचा सदरा घालत. पाणीसुद्धा माठातले थंड चालत नसे. असे असूनही स्वयंसेवकांच्या जिल्ह्याश: बैठका, चर्चा, बौद्धिक वर्ग, परिचय असे सगळे सुरूच होते. वर्गाच्या सगळ्या कार्यक्रमात सहभागीही होत होते. याच वर्गात ११ व १२ मे रोजी महाराष्ट्राच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

पहिल्या दिवशीची बैठक सुरू असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर तेथे आले. डॉक्टर हेडगेवार यांच्या आग्रहावरून त्यांनी बैठकीपुढे छोटेसे भाषणही केले.

या वर्गात डॉ. हेडगेवार यांनी चार भाषणे दिली. त्यात आपले हिंदूराष्ट्र, हिंदूंमधील राष्ट्रीय भावनेचा अभाव या विषयांसोबतच; संघाच्या कामाचे, कार्यपद्धतीचे, वेगळेपणाचे, विशेषतांचे विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले,

‘लोकांशी आत्यंतिक प्रेमाने वागा. काँग्रेस, सोशालिस्ट, हिंदूसभा वगैरे संस्थांतील लोक आपलेच आहेत. आपण त्यांच्याशी शुद्ध मनाने वागा. खोटी वागणूक करू नका व त्यांना फसवू नका. पक्ष भिन्न असले तरी मित्र म्हणून आपण व्यवहारात मोकळेपणाने एकत्र यायला काहीच हरकत नाही. आपणांस आपल्या मतांच्याच लोकांत काम करायचे नाही. विरोधी लोकही आपलेसे करायचे आहेत. त्यासाठी संघाविषयी त्यांची भावना शुद्ध पाहिजे. आपला ध्वज व विचारसरणी त्यांना मान्य नसली तरीही आपण त्यांचा द्वेष करता कामा नये. प्रेम व आदर वाढवीत वाढवीत आपली शक्ती वाढवीत राहिले पाहिजे.’

१५ मे १९४० रोजी डॉ. हेडगेवार पुण्याहून नागपूरसाठी निघाले. दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचल्यावर ते नील सीटी शाळेत सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्गात गेले. या वर्गात देशभरातून १४०० स्वयंसेवक उपस्थित होते. याच दिवशी रात्री वर्गातील स्वयंसेवकांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन आयोजित केले होते. ताप असूनही डॉ. हेडगेवार त्या भजनाला गेले. परंतु अस्वास्थ्यामुळे ते पूर्ण वेळ बसू शकले नाही आणि कोणाला न कळू देता एकटेच तिथून उठून घरी गेले. त्यांच्या घरचे लोकही त्या भजनासाठी गेले होते. त्यामुळे घरीही कोणी मदतीला नव्हते. तेव्हा ते कसेबसे माडीवर गेले आणि अंथरूण घालून पडून राहिले.

त्यांच्या अंगात १०४ अंश ताप होता. दुसऱ्या दिवशीपासून डॉ. हरदास, डॉ. विंचुरे यांचे उपचार सुरू झाले. उतार मात्र पडत नव्हता. पाठीचे दुखणे सुरूच होते. दुसरीकडे मनाची अस्वस्थता प्रचंड होती आणि सतत वाढत होती. त्या मानसिक अस्वस्थतेचा शारीरिक अस्वस्थतेशी मात्र संबंध नव्हता.

देशभरातून स्वयंसेवक नागपुरात आले आहेत.अन् त्यांना भेटता येत नाही. त्यांच्याशी बोलता येत नाही. विचारविनिमय करू शकत नाही. परिचय करून घेऊ शकत नाही. याच गोष्टींनी त्यांचे मन व्यग्र होते. 

कोणीही त्यांना भेटायला येऊ नये अशा सूचना देऊनही लोक भेटायला येत असतच. असे कोणी आल्याची कुणकुण लागली की ते त्याला आत पाठवायला सांगत आणि शक्य तेवढा संवाद करत. २० मे १९४० रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नागपूरला आले. संघ शिक्षा वर्गाला भेट देऊन रात्री नऊ वाजता ते डॉ. हेडगेवार यांच्या घरी त्यांना भेटायला गेले. अंगात १०३ अंश ताप असूनही डॉ. हेडगेवार त्यांना भेटले आणि त्यांच्याशी विस्तृत चर्चाही केली. बंगालच्या तेव्हाच्या परिस्थितीत ‘हिंदू रक्षा दल’ काढण्याचा आपला विचार डॉ. मुखर्जी यांनी बोलून दाखवला आणि मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यावर मदतीसाठी होकार देऊनही, संघाचा परिस्थितीनिरपेक्ष हिंदू संघटनेचा विचार किती महत्वाचा आहे हेही डॉ. हेडगेवार यांनी त्यांना पटवून दिले.

याच चर्चेत संघाने आता राजकारणात उतरावे अशी सूचना डॉ. मुखर्जी यांनी केली असता, क्षणाचाही विलंब न लावता ‘चालू राजकारणात संघ भाग घेत नाही’ हे डॉ. हेडगेवार यांनी त्यांना सांगून टाकले.

८ जून १९४० रोजी नागपूरच्या संघ शिक्षा वर्गाचा जाहीर समारोप झाला. खूप इच्छा असूनही त्यांना समारोपाला जाऊ देण्यात आले नाही. मात्र त्यांच्या जीवाची तडफड पाहून ९ जूनला सकाळी खाजगी समारोप कार्यक्रमासाठी त्यांना नेण्यात आले. त्या कार्यक्रमात त्यांचे अतिशय भावपूर्ण ऐतिहासिक भाषण झाले. कार्यक्रमानंतर थोडा वेळ तिथेच विश्रांती घेऊन ते घरी परतले. तब्येतीला आराम मात्र पडत नव्हता.

अखेर डॉक्टरांच्या सल्ल्याने १५ जून रोजी त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे त्यांची क्ष किरण चाचणी करण्यात आली. पण त्यातूनही काही निदान होऊ शकले नाही. त्याच दिवशी बिछान्यावर पडल्या पडल्या शेजारी बसलेल्या यादवराव जोशी यांना त्यांनी प्रश्न केला – ‘संघाचे सर्वात वरिष्ठ अधिकारी दिवंगत झाले तर त्यांचा अंतिम संस्कार तुम्ही लष्करी थाटाने कराल का?’ यादवराव जोशी यांनी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. ते मनावर न घेता डॉ. हेडगेवार त्यांना म्हणाले, ‘संघ हे एक कुटुंब आहे. ही लष्करी संघटना नाही. त्यामुळे कुटुंबाचा चालक गेल्यावर जसा अंत्यसंस्कार करतात तसेच त्याचे साधे व नेहमीचे रूप असावे.’ काय विलक्षण व्यक्तिमत्व असेल त्यांचे !!

संघटनेचा अतिशय दूरचा विचार करून त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन तर त्यात आहेच. शिवाय स्वत:बद्दलची विलक्षण आत्मविलोपी वृत्तीही त्यात आहे. मी स्थापन केलेली संघटना, माझी संघटना, मी सर्वोच्च प्रमुख, मी रक्ताचे पाणी करून ती नावारूपाला आणली, संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार केला, माझे कर्तृत्व… कशाकशाचाही स्पर्शही मनाला नाही. शिवाय भाबडेपणाने, भक्तिभावाने कोणी तशा भावना बाळगू नये, तशा भावनांचे पोषण होऊ नये यासाठी स्वत:हून तो विषय मार्गी लावून देणे. एखाद्या योग्याला साजेशी अशीच मनाची ही अवस्था म्हणायला हवी.

१८ जून रोजी त्यांची तपासणी पूर्ण झाली आणि त्यांना बाबासाहेब घटाटे यांच्या सिव्हिल लाईन्स भागातील बंगल्यावर नेण्यात आले. तेथे सर्व सोयीसुविधा, त्यावेळची अत्याधुनिक यंत्रे यांची व्यवस्था करण्यात आली. मदतीला गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, संघाचे स्वयंसेवक हे सगळे होतेच. डॉक्टर लोकही सतत लक्ष ठेवून असतच. या ठिकाणीही सगळ्यांसोबत चहा घेण्याचा त्यांचा आग्रह असे.

एकदा यादवराव जोशी यांनी त्यांना चहा दिला पण सोबत कोणीच नव्हते. तेव्हा त्यांनी चहा घेतला नाही. गुरुजी आल्यावर त्यांना हे कळले तेव्हा त्यांनी सगळ्यांना बोलावून आणले आणि मग डॉक्टरांनी सगळ्यांसोबत चहा घेतला. 

मुंबईच्या एका स्वयंसेवकावर शस्त्रक्रिया झाली होती. त्याची विचारपूस करणारे पत्र त्यांनी १९ जून रोजी पाठवले. त्या दिवशीची रात्र चिंतेतच गेली. काही कामानिमित्त नागपूरला आलेले सुभाषचंद्र बोस २० जून रोजी सकाळी त्यांना भेटायला आले. पण डॉक्टरांचा डोळा लागला असल्याने ते न भेटताच परत गेले. सकाळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रकृती पाहिली आणि चिंता व्यक्त केली.

डॉक्टर मंडळींनी पाठीतून पाणी काढण्याचा सल्ला दिला. तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी गोळवलकर गुरुजींना खोलीत बोलावून घेतले आणि सगळ्यांसमोरच ते त्यांना म्हणाले, ‘आता लंबर पंक्चर करण्यापर्यंत वेळ आली आहे. यातून मी राहिलो तर ठीकच. नाही तर यापुढे संघाचे कार्य तुम्ही सांभाळा.’ त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या पाठीतून पाणी काढण्यात आले. त्यावेळी पाण्याची धारच लागली होती. सामान्य स्रावापेक्षा पाणी खूप जास्त निघाले. `रक्ताचे पाणी करणे’ या वाक्प्रचाराचा जणू प्रत्ययच त्यावेळी आला होता.

तासागणिक प्रकृती खालावत होती. रात्री अकरानंतर ताप चढू लागला. रात्री अडीचच्या सुमारास त्यांना मूर्च्छा आली. नंतर ते शुद्धीत आलेच नाहीत. पहाटे डॉ. हरदास, डॉ. ना. भा. खरे यांना बोलावण्यात आले. सगळ्यांनीच आशा सोडली. लगेच फोन करून संघाचे अधिकारी, कार्यकर्ते, स्नेही यांना बोलावून घेण्यात आले. तोवर शेवटची घरघर लागली होती. तासभर ऊर्ध्व सुरू होता.

सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी त्यांनी एकदम मान टाकली. रडारड सुरू झाली तेवढ्यात पुन्हा थोडी हालचाल झाल्यासारखी वाटली. पण अवघ्या दोन मिनिटांनी, ९ वाजून २७ मिनिटांनी डॉ. हेडगेवार यांनी शेवटचा श्वास सोडला. ज्येष्ठ वद्य द्वितीया, २१ जून १९४०.

डॉ. हेडगेवार यांच्या निधनाची वार्ता कळताच मुंबईहून स्वा. सावरकर आणि नाशिकहून धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या तारा आल्या. नागपूरच्या ‘महाराष्ट्र’ने आणि पुण्याच्या ‘काळ’ने विशेष अंक काढून हे वृत्त लोकांपर्यंत पोहोचवले. विदर्भातील स्वयंसेवक आणि अन्य लोक मिळेल त्या वाहनाने किंवा पायीसुद्धा नागपुरात आले. संध्याकाळी पाच वाजता अंत्ययात्रा सुरू झाली. शवयात्रा सुरू झाली तेव्हा सुमारे सव्वा मैल लांब होती.

अंतिम यात्रेत स्वयंसेवकांशिवाय काँग्रेस, हिंदू महासभा, पुरोगामी गट, सोशालिस्ट पक्ष, मजूर वर्ग, सगळ्या जाती जमातीचे लोक सहभागी झाले होते. 

आघाडीवर सायकलस्वारांची पथके अन त्यामागून चार चारच्या रांगेत लोक चालले होते. रात्री नऊ वाजता रेशीमबाग मैदानावर शवयात्रा पोहोचली. डॉ. हेडगेवार यांचे पार्थिव चितेवर ठेवण्यात आले. त्यांच्या या तपोभूमीत त्यावेळी उपस्थित सगळ्यांनी संघाची प्रार्थना म्हटली. डॉ. हेडगेवार यांना अंतिम सरसंघचालक प्रणाम देण्यात आला अन् त्यांचे मोठे भाऊ तात्याजी यांनी त्यांना मंत्राग्नि दिला.

याच ठिकाणी नंतर आठ फूट लांब, साडेपाच फूट रुंद आणि दीड फूट उंच समाधी बांधण्यात आली होती. गांधी ह*त्येनंतरच्या संघबंदीच्या काळात नेत्यांच्या चिथावणीने ही समाधी फोडून उ*द्ध्वस्त करण्यात आली होती.

संघावरील बंदी उठल्यावर समाधी पुन्हा बांधण्यात आली. त्याला लाकडी कुंपण करण्यात आले. कुंपणावर सुगंधित फुलांच्या वेली सोडण्यात आल्या होत्या. अन् या वेलींचा एक मांडवच तयार करण्यात आला होता. १९५९ साली या ठिकाणी पक्के स्मृती मंदिर उभारण्याचे ठरले. त्यानुसार काम सुरू झाले आणि १९६२ च्या वर्षप्रतिपदेला स्मृती मंदिराचे उदघाटन झाले. हेच स्मृती मंदिर आज पाहायला मिळते. यात खाली गाभाऱ्यात समाधी आणि वर डॉ. हेडगेवार यांचा पूर्णाकृती खुर्चीवर बसलेला पुतळा आहे.

या स्मृती मंदिराचा आराखडा पुण्याचे बाळासाहेब दीक्षित यांनी तयार केला होता. ब्रॉन्झची मूर्ती मुंबईचे शिल्पकार नानासाहेब गोरेगावकर यांनी तयार केली होती. या मंदिरासाठी लागलेले गुलाबी दगड आणि संगमरवरी दगड राजस्थानहून मागविण्यात आले होते. अन् काम करणारे २० मुस्लिम कारागीर देखील राजस्थानहूनच आले होते. स्मृती मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी या कारागिरांचा सत्कार गोळवलकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला होता. अन् याच उद्घाटनाच्या कार्यक्रमात श्री. सुधीर फडके यांनी गीत सादर केले होते –

‘लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष,
शतकोटी हृदय के कँज खिले है,
आज तुम्हारी पूजा करने,
सेतू हिमालय संग मिले है’


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

राजस्थानमध्ये चक्क उंदरांचं मंदिर आहे !

Next Post

मंदिरं लुटणाऱ्या खिलजीच्या मुलीने एका हिंदू देवतेच्या प्रेमात स्वतःचा जीव दिला होता

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

मंदिरं लुटणाऱ्या खिलजीच्या मुलीने एका हिंदू देवतेच्या प्रेमात स्वतःचा जीव दिला होता

महिंद्रांनी २०२१च्या 'फादर्स डे'ला वडिलांसोबत शेअर केलेल्या फोटोमागची स्टोरी माहिती आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.