आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
असे म्हणतात की निसर्गाने प्रत्येकाच्याच झोळीत काही ना काही दान दिलेले आहे. कुणाकडे आरस्पानी सौंदर्य आहे, तर कुणाला अफाट बुद्धिमत्तेची देणगी.. कुणाच्या हातात एखादी कला, तर कोणाकडे आपल्या वक्तृत्वाने जग जिंकण्याची क्षमता! टॅलेंट मात्र प्रत्येकाकडे आहे. अगदी वरवर सामान्य वाटणाऱ्या माणसाच्या अंगी पण एखादे कौशल्य किंवा अशी प्रतिभा असते, की भलेभले तोंडात बोटे घालतील.
याच जातकुळीतला एक अवलिया म्हणजे किम पीक नावाचा मनुष्य. त्याचे विशेष काय असे विचाराल तर त्याची अफाट स्मरणशक्ती, जी त्याला नैसर्गिकरीत्या लाभलेली देणगी होती. त्याच्या या अचाट स्मरणशक्तीच्या जोरावर तो अक्षरशः जगप्रसिद्ध झाला. त्याच्या जीवनावर आधारित रेन मॅन हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. कोण होता हा मनुष्य? आणि त्याला एवढी प्रचंड स्मरणशक्ती कुठून प्राप्त झाली? आणि त्याच्याच बरोबरीने त्याच्या आयुष्याची दुसरी बाजू किती वाईट होती? अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह करणारा हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.
किम पीकचा जन्म १९५१ साली झाला. तो जन्मला त्याच वेळी डॉक्टरांच्या लक्षात आले की त्याचे डोके इतर शरीराच्या मानाने बरेच मोठे आहे. वैद्यकीय परिभाषेत या स्थितीला ‘मॅक्रोसिफॅली’ असे नाव आहे. मग डॉक्टरांनी अजून एक पाऊल पुढे जात त्याच्या मेंदूचे परीक्षण केले. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की त्याच्या लहान मेंदूला काहीतरी इजा झाली आहे. त्याचप्रमाणे मेंदूच्या दोन अर्धगोलांना जोडणारा मज्जातंतूंचा जुडगा देखील गायब आहे.
अशा परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांच्या दृष्टीने जे करायला पाहिजे होते ते केले. त्यांनी किमच्या आई-वडिलांना भविष्याची स्पष्ट कल्पना दिली. त्यांच्या मते किम आयुष्यभर चालू किंवा बोलू शकणार नव्हता. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला एखाद्या संस्थेत दाखल करणे हेच व्यवहार्य आणि शहाणपणाचे होते. मात्र किमचे सुदैव असे की त्याच्या पालकांनी या वैद्यकीय सल्ल्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. त्यांनी किमचा आहे तसा स्वीकार करायचे ठरवले.
दिवसागणिक तो मोठा होऊ लागला. आश्चर्याची गोष्ट ही की त्याची स्मरणशक्ती अफाट होती. अवघा एक वर्षाचा असताना त्याने आई-वडिलांनी केवळ एकदाच वाचून दाखवलेली पुस्तके संपूर्णपणे लक्षात ठेवण्याची क्षमता विकसित केली होती. अजून थोडा मोठा झाल्यावर वाचून झालेली पुस्तके तो त्याच्या कपाटात उलटी ठेवत असे, जेणेकरून ती पुस्तके त्याच्या मेंदूत पूर्णपणे शोषली गेली आहेत आणि ती परत वाचून दाखवण्याची गरज नाही हे त्याच्या पालकांना लक्षात येत असे. अशाप्रकारे एकदा वाचून झालेली पुस्तके शेल्फमध्ये उलटी ठेवण्याची सवय किमने आयुष्यभर अनुसरली. तो सात वर्षाचा झाला तोपर्यंत त्याचे संपूर्ण बायबल मुखोद्गत झाले होते आणि त्यातला शब्द न शब्द त्याच्या मेमरीत फिट बसला होता.
मात्र दुसऱ्या बाजूला किम मोठा होत असताना इतर काही अनिष्ट गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या. इतर मुलांच्या तुलनेत त्याच्या स्नायूंचा विकास अत्यंत मंद गतीने होत होता. त्यामुळे कपडे काढणे किंवा घालणे, शर्टाची बटने लावणे यासारख्या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी करायलाही त्याला खूप त्रास होत असे. डोक्याचे वजन जास्त असल्यामुळे तो वयाच्या चौथा वर्षापर्यंत चालायलाही लागला नव्हता. पुढे प्रयत्नाने थोडेफार चालायला जमले तरी त्याची चालण्याची पद्धत सामान्य नव्हती.
इतरांप्रमाणे समोर सरळ रेषेत न चालता तो बाजूने चालत असे. त्याच्या जोडीला तो बोटांच्या अस्वस्थ हालचालीही करत असे. हे सगळे नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांनी तो सहा वर्षांचा असताना ‘लोबोटॉमी’ करण्याचा सल्ला दिला. ही एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये मेंदूतील मज्जातंतूंचे जुडगे विशिष्ट प्रकारे कापून टाकून मानसिक विकारांवर उपचार केले जातात.
परत एकदा किमच्या पालकांनी तो सल्ला धुडकावून लावला. पण त्याचवेळी आपल्या मुलाच्या बाबतीत घडत असलेल्या असामान्य गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. त्यांनी त्याला शिकवण्यासाठी घरीच एक ट्यूटर ठेवला. जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतशा अजून काही गोष्टी समोर येऊ लागल्या. त्यापैकी एक म्हणजे किमचा वाचनाचा अतिप्रचंड वेग हा वेग इतका जास्त होता की बऱ्यापैकी जाड पुस्तक तो अर्ध्या तासात वाचून संपवत असे.
एवढेच नाही तर या पुस्तकातील जवळपास ९८% तपशील त्याच्या लक्षातही राहत असे. पुस्तक उघडल्यानंतर डावे पान डाव्या डोळ्याने आणि उजवे पान उजव्या डोळ्याने वाचण्याची अद्भुत क्षमता किमच्या अंगी होती. एका नोंदीनुसार आयुष्यभरात किमने तब्बल १२ हजार पुस्तकांचा फडशा पाडला आहे आणि ही पुस्तके त्याने केवळ वाचलीच नाहीत तर ती त्याच्या डोक्यात संपूर्णपणे साठवली गेली आहेत.
किमची ही अद्भुत क्षमता केवळ पुस्तकातील शब्द न शब्द लक्षात ठेवण्याइतपतच मर्यादित नव्हती. संपूर्ण टेलिफोन डिरेक्टरीही त्याच्या लक्षात राहत असे आणि केवळ पत्ता बघून तो त्या माणसाचे नाव आणि इतर तपशील सांगू शकत असे. याशिवाय जगाचा नकाशाही त्याच्या मेंदूत उत्तम प्रकारे फीड केला गेला होता. त्याआधारे जगातल्या कोणत्याही दोन शहरांमध्ये प्रवास करायचा असल्यास तो सहजपणे स्मरणशक्तीच्या आधारावर त्या दोन शहरांमधील मार्ग सांगू शकत असे.
याव्यतिरिक्त संगीतातील नोट्सच्या आधारे संगीतरचना करणे, कालगणनाविषयक सर्व गणना करणे या गोष्टीही तो लीलया करू शकत असे. सुप्रसिद्ध ‘रेन मॅन’ या चित्रपटास किम कडूनच प्रेरणा मिळाली. या चित्रपटात अगदी किरकोळ बदल केलेले होते. उदाहरणार्थ त्यातील रेमंड हे पात्र ऑटिझम या विकाराने ग्रस्त असल्याचे दाखवले आहे. मात्र प्रत्यक्षात किमला हा आजार नव्हता. एका संशोधनानुसार किम पीक हा ‘एफ जी सिंड्रोम’ या विकाराने ग्रस्त होता आणि कदाचित त्यामुळेच त्याला अतुलनीय स्मरणशक्तीची देणगी लाभली होती.
‘रेन मॅन’ या सिनेमानंतर किम आपल्या वडिलांबरोबर जगभर फिरला. दुनियाभरातील जवळपास वीस दशलक्ष पेक्षा जास्त लोकांशी तो त्यांच्याकडून एकही पैसा न घेता बोलला. यावेळी त्याच्याकडे रेमंड या कॅरेक्टरसाठी डस्टिन हॉफमनला मिळालेले ऑस्करचे स्मृतिचिन्ह असे. हॉफमनने त्याला ते प्रवासादरम्यान बरोबर नेण्यासाठी दिले होते. तेव्हापासून ऑस्करचे ते स्मृतिचिन्ह मोस्ट लव्ह्ड ऑस्कर स्टॅच्यू म्हणून ओळखले जाते.
या अवलियाचे वयाच्या ५८व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र एक आख्यायिका बनून तो आजही अनेकांच्या हृदयात जिवंत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










