आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अमेरिकेत मध्यंतरी एक प्रकरण बरेच गाजले होते. एका विकृत मनुष्याने एका तरुणीला तब्बल दोन महिने डांबून ठेवून तिच्यावर अनन्वित अ*त्याचार केले होते. त्याआधी त्याने तिच्या प्रियकराचा तिच्या डोळ्यांसमोर गोळ्या झाडून खू*न केला होता. दोन महिन्यांच्या नरकयातनांमधून तिची सुटका झाली तेव्हा तिची अवस्था भयावह होती. तिचे नाव कला ब्राऊन. हे प्रकरण नेमके समजून घेण्यासाठी आजचा हा लेख..
कला ब्राऊन आणि तिचा मित्र चार्ल्स डेव्हिड कार्व्हर एकमेकांशी डेटिंग करू लागले त्याला काही दिवसच झाले होते. काही दिवसांच्या ओळखीनंतर त्यांनी एकत्र राहण्याचे ठरवले. ते खुश होते, एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते आणि एकमेकांच्या सोबतीने भविष्याची वाटचाल करण्यासाठी उत्सुक होते. पण नियतीला त्यांचा हा डाव मंजूर नव्हता.
दोघांनाही पैशाची चणचण भासत होती. आरामात आयुष्य घालवायचे असेल तर जास्त पैसा मिळवायला हवाच! त्यामुळे ते अजून चांगल्या संधीच्या शोधात होते. त्यातच थोडे जास्त पैसे मिळवण्यासाठी कलाने टॉड कोल्हेप नावाच्या माणसाकडे त्याच्या घराची साफसफाई करण्याचे काम स्वीकारले. या माणसाला ती पाच वर्षांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून भेटली होती. तो स्वतः यशस्वी रियल इस्टेट ब्रोकर होता.
ऑगस्ट २०१६ मध्ये टॉडने कला आणि चार्ल्स या दोघांनाही कामावर ठेवले. त्याची स्वतःची साऊथ कॅरोलायनाच्या ग्रामीण प्रदेशात ९५ एकर एवढी प्रचंड इस्टेट होती. त्यावेळी या तरुण जोडप्याला आपल्या मालकाच्या रूपाने समोर काळच उभा ठाकला आहे याची थोडीही कल्पना नव्हती.
३१ ऑगस्ट २०१६ रोजी कला आणि चार्ल्स टॉडच्या इस्टेटीपाशी पोहोचले, तेव्हा त्याने या दोघांना घराबाहेरच थांबायला सांगितले आणि स्वतः आत गेला. तो परत आला तेव्हा त्याच्या हातात बंदूक होती त्याने चार्ल्सच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने कलाला पकडले आणि तिला जबरदस्तीने एका शिपिंग कंटेनरमध्ये नेऊन सोडले. यावेळी ती प्रचंड मानसिक धक्क्यात होती. त्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही.
नंतर टॉडने कलाच्या मानेला आणि हातापायांना साखळ्या बांधून टाकल्या. त्यामुळे तिला हालचाल करता येईना. नंतर जेव्हा कलाची सुटका केली गेली तेव्हा तिथे असणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिला कुत्र्यासारखे बांधून ठेवलेले होते. टॉडने कलाला सांगितले की त्याने चार्ल्सचे प्रेत जमिनीत पुरलेले आहे आणि आता त्याला कोणीही शोधू शकणार नाही.
दररोज दुपारी एक ते तीनच्या दरम्यान टॉड कलाच्या मानेभोवती आणि पायाभोवती बांधलेल्या साखळ्या काढून टाकत असे. फक्त तिचे हात बांधलेले असत. नंतर तो तिला स्वतःच्या घरात घेऊन जात असे. तिथे तिच्यावर बळजबरी आणि शारीरिक अ*त्याचार करत असे. हे करताना तो तिच्या डोक्यापाशी बंदुक रोखुन धरायचा आणि त्याला खुश करण्यासाठीच त्याने तिला जिवंत ठेवले आहे याची तिला वारंवार आठवण करून द्यायचा.
नंतर तो तिला काहीतरी खायला घालायचा आणि परत स्टोरेज कंटेनरमध्ये आणून सोडायचा. कलाला दिवसातून एकदा बाथरूम वापरायची परवानगी होती आणि दर दिवसाआड तिला आंघोळ करण्यासाठी एक भांडेभर पाणी मिळत असे. कलाच्या त्या अंधार्या खोलीत फार काही सामान नव्हते फक्त टॉडच्या क्राईम नॉव्हेल्स इकडेतिकडे पसरून टाकल्या होत्या.
इकडे चार्ल्सच्या आईचा त्याच्याबरोबर ३१ ऑगस्ट नंतर काहीच संपर्क नव्हता. जेव्हा त्याचा फोन आला नाही तेव्हा तिला भीती वाटायला लागली. दोघे मायलेक एकमेकांच्या अगदी जवळचे होते. एकही दिवस ते एकमेकांशी फोनवर बोलल्यावाचून राहत नसत. त्यामुळे तिला आतून काहीतरी जाणवले आणि तिने मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यानच्या काळात कलाची एक मैत्रीण तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. कलाचा पत्ता लागेना तेव्हा तिने तिच्या घरापाशी जाऊन तिच्या नावे एक चिठ्ठी लिहून तिच्या गाडीजवळ ठेवली. पण तिचा पत्ता लागेना. कला आणि चार्ल्स यांनी पाळलेला कुत्रा अन्नपाण्यावाचून तडफडत होता. कला त्याला असे कधीच ठेवत नसे. त्यामुळे कलाच्या आईच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली.
त्याचदरम्यान चार्ल्सच्या एका मित्राने काहीसे विचित्र असे फेसबुक मेसेजेस त्याच्या फेसबुक अकाउंटवरून पाठवलेले बघितले. त्यामध्ये ड्र*ग्ज घेण्यासाठीही पैसे मागितले होते. त्यांचा मित्र कधीही ड्र*ग्ज घेत नसे त्यामुळे संशय अजूनच बळावला. मात्र दुसरीकडे चार्ल्सच्या फेसबुक पेजवर सातत्याने माइलस्टोन अपडेट्स येत होते. त्यात तो आणि कला यांनी घर घेतले आहे, त्यांचे लग्न झाले आहे, एवढेच नाही तर ते लवकरच आई-बाबा होणार आहेत, अशा आशयाचे अपडेट मिळत होते.
या सगळ्यातून संशयाचे वातावरण अजूनच गडद झाले. अखेर पोलिसांनी तपासाला गती द्यायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला कला आणि चार्ल्स यांच्या फेसबुक अकाउंटचा ॲक्सेस मिळवला. त्यावेळी त्यांना असे दिसले, की दोघांमध्ये ३१ ऑगस्ट नंतर मेसेजेसची देवाणघेवाण झालेली नाही. याच दिवशी चार्ल्सच्या आईचाही त्याच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. दोघांच्या फोन सिग्नलच वरून हेही लक्षात आले, की त्यांचे ३१ ऑगस्टचे लास्ट लोकेशन टॉडची इस्टेट हेच होते. अखेरीस ३ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी टॉडच्या इस्टेटीकडे मोर्चा वळवला आणि तेथे त्यांना मोठा धक्का बसला.
एका शिपिंग कंटेनर मधून जोरजोरात आतून धडका मारल्यासारखे आवाज येत होते. त्यामुळे त्याचे कुलूप तोडले गेले. आतमध्ये अत्यंत घाबरलेली आणि साखळ्यांनी बांधून टाकल्यामुळे नि:स्तब्ध बसलेली कला नजरेस पडली. पोलीस पथकाने तिला या साखळदंडातुन मुक्त केले आणि अखेरीस दोन महिन्यांच्या भयानक हालअपेष्टांनंतर कलाची सुटका झाली.
कलाची सुटका झाली तरी या कथेचा शेवट दुःखदायक होता, कारण कलाने आपल्या जोडीदाराला गमावले होते. त्यानंतर कलाने सांगितले, की टॉड तिच्या प्रेमात पडला होता आणि दोघांसाठी घरही बांधणार होता. त्या घरामध्ये कलासाठी एक साऊंडप्रूफ खोली असणार होती. मात्र प्रत्यक्षात असे काहीही नव्हते. हा सगळा टॉडचा बनाव होता. चार्ल्सला जेथे पुरले होते, त्याच्याशेजारीच एक मोठा खड्डा खणलेला पोलिसांना आढळला. त्यावरून टॉड लवकरच कलालाही मारून टाकणार होता, हे पोलिसांच्या लक्षात आले.
ही शोकमालिका एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती हे पोलिसांनी टॉडची चौकशी करायला सुरुवात केल्यावर लक्षात आले. मुळात टॉड हा विकृत मनोवृत्तीचा सिरीयल कि*लर होता. त्याने त्याआधीही अनेक सावजांची शिकार केली होती. पहिला गुन्हा त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी केला होता. याआधी त्याने सहा लोकांचा खू*न केला होता.
मे २०१७ मध्ये त्याची फाशीच्या शिक्षेतून थोडक्यात मुक्तता झाली. त्याला सात खू*न, दोन अपहरणे, तसेच इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आणि सात जन्मठेपींची शिक्षा ठोठावण्यात आली. आजही टॉडच्या म्हणण्यानुसार त्याने अजून काही बळी घेतलेले आहेत, पण यापलीकडे तो काहीही बोलत नाही. तोवर हे रहस्य उलगडणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.