आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
चित्रपट बनवण्यासाठी एखाद्याने आपलं शेत विकल्याची गोष्ट आपण ऐकली असेल. मात्र, चित्रपट बनवण्यासाठी कोणी दिग्दर्शक शेतकरी झाल्याचं ऐकलंय? ख्रिस्तोफर नोलन या दिग्दर्शकाने मात्र असा प्रवास केलाय. जगातील काही उत्तम दिग्दर्शक असोत, दशकातील टॉप दिग्दर्शक असोत वा गेल्या शतकातील सर्वात चांगले दिग्दर्शक असोत या सर्व याद्यांमध्ये ख्रिस्तोफर नोलन हे नाव येतंच येतं. नेहमीपेक्षा हटके विषयांसोबतच, ते दाखवण्याची विशिष्ट पद्धत यासाठी नोलन प्रसिद्ध आहे.
ख्रिस्तोफर आणि त्याचा सीजीआय म्हणजेच स्पेशल इफेक्ट्स न वापरण्याचा अट्टहास सर्वांनाच माहिती आहे. जोपर्यंत अगदीच नाईलाज होत नाही, तोपर्यंत सेट, मॉडेल्स किंवा खऱ्या लोकेशनचा वापर करुन शूटिंग करण्याकडे त्याचा कल असतो. यामध्ये मग तो पैशांचा विचार करत नाही. कारण आपण काय करत आहोत, आणि त्याचा काय परिणाम होणार आहे यावर त्याला पूर्ण विश्वास असतो. यामुळेच मग ‘इन्सेप्शन’मधला पूर्ण इमारत गोल-गोल फिरतानाचा फाईट सीन असो, ‘डंकर्क’मधल्या युद्धनौका असो, वा ‘टेनेट’मध्ये अक्षरशः चक्काचूर केलेलं कोट्यवधींचं विमान असो-ख्रिस्तोफर सीजीआयऐवजी खऱ्या गोष्टी वापरण्यालाच प्राधान्य देत राहिला.
मात्र डंकर्क, टेनेट या सगळ्याच्याही पूर्वी २०१४ मध्ये आलेल्या ‘इंटरस्टेलर’ चित्रपटासाठी ख्रिस्तोफरने चक्क शेती करण्याचा निर्णय घेतला होता.
इंटरस्टेलरच्या कथेमध्ये मक्याचं पीक अत्यंत महत्त्वाचं आहे. ही कथा २०६७ मध्ये घडते. ‘दि ब्लाईट’ नावाच्या एका घटनेमुळे पृथ्वीवरील बहुतांश झाडं आणि पिकं नष्ट झालीत. उरलीत ती केवळ मका आणि ओक्रा ही पिकं. त्यामुळे हजारो एकरांमध्ये लोक मक्याचंच पीक घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नोलनला चित्रपटामध्ये कित्येक सीन्समध्ये मक्याचे मळे दाखवायचे होते. नेहमीप्रमाणे सीजीआयशिवाय हे कसं दाखवता येईल याचा विचार करत असताना नोलनला २०१३मध्ये आलेल्या ‘मॅन ऑफ स्टील’ चित्रपटाची आठवण आली. मॅन ऑफ स्टीलमध्ये दिग्दर्शक झॅक स्नायडरनेही अशाच प्रकारे मक्याचे मळे दाखवले होते. त्यासाठी त्यानं सुमारे ५०० एकरमध्ये मक्याचं पीक घेतलं होतं. नोलनने मग झॅकसोबत चर्चा केली. साधारणपणे किती मोठ्या प्रमाणात हे करणं शक्य आहे, याबाबत अंदाज घेण्यासाठी झॅकचा सल्ला घेतल्यानंतर मग नोलननेही तसंच करायचं ठरवलं.
अमेरिकेमध्ये आपल्यासारखं काही एकर किंवा गुंठ्यांमध्ये शेती नाही होत, तर शेकडो एकरांमध्ये शेती केली जाते. त्यामुळं नोलनलाही तसं करणं अवघड नव्हतं. मात्र, अडचण होती त्यांची लोकेशन. इंटरस्टेलरच्या कथेमधील नायक जिथे राहत होता, तिथून पुढे काही अंतरावर डोंगर होते. ते डोंगर फ्रेममध्ये घेता यावेत या हिशोबानेच त्याच्या फार्महाऊसचं लोकेशन ठरवण्यात आलं होतं.
मात्र, हे डोंगरच या शेतीसाठी मोठी अडचण ठरत होते. डोंगरामुळे हवा अडली जाऊन शेजारच्या जमीनीवर शेती करणं अवघड होतं. त्यामुळेच अशा भागामध्ये जास्त करुन पिकं आढळत नाहीत. मात्र, नोलनला आपल्या फ्रेममध्ये लांबवर पसरलेलं मक्याचं शेत, आणि पलीकडे डोंगर असं सगळंच हवं होतं – तेही सीजीआयचा वापर न करता. त्यामुळं कित्येकांनी याबाबत इशारा देऊनही नोलन ही शेती करण्यावर ठाम होता.
यासाठी येणारा एकूण खर्च तब्बल १ लाख डॉलर्स होता. मात्र, इंटरस्टेलरचं एकूण बजेट १६.५ कोटी डॉलर्स होतं, ज्यापुढे ही रक्कम काहीच नव्हती. त्यामुळंच इतरांचं ऐकण्याच्या फंदात न पडता ख्रिस्तोफरने हा जुगार खेळायचं ठरवलं.
इंटरस्टेलरचं यश पाहता, ख्रिस्तोफरने खेळलेला हा जुगार नक्कीच यशस्वी ठरला. मात्र, खऱ्या पिकाऐवजी सीजीआय वापरलं असतं तर काय फरक पडला असता? ख्रिस्तोफरसारख्या परफेक्शनिस्टने कधीही सीजीआयचा पर्याय वापरलाच नसता हे खरं असलं, तरी यामुळे किती फरक पडला असता याचं उत्तर काही वर्षांनंतर आलेल्या ‘जस्टिस लीग’ चित्रपटानं दिलं. यामध्ये भरमसाठ सीजीआयचा वापर केला होता. यात सुपरमॅनच्या घरासमोर असलेलं मक्याचं शेतही सीजीआयने दाखवलं होतं, जे अर्थातच फॅन्सना आवडलं नव्हतं. जस्टीस लीगमधील मक्याचं शेत आणि इंटरस्टेलरमधील मक्याचं शेत शेजारी-शेजारी ठेऊन तुलना केली, तर मग ख्रिस्तोफरचा निर्णय का आणि किती योग्य होता हे लगेच लक्षात येईल.
केवळ सिनेमॅटिक व्ह्यूच्या दृष्टीनेच नाही, तर इतर कारणांनीही हे पीक घेणं फायद्याचं ठरलं. इंटरस्टेलरच्या स्क्रिप्टमध्ये असे सीन होते, ज्यांमध्ये नायक आपली गाडी या उभ्या पिकामधून पळवतो. त्यामुळं ते पीक वाया जाणार हे नक्कीच होतं. मात्र, सगळे सीन ओके झाल्यानंतरही ५०० एकरपैकी भरपूर पीक सुस्थितीत राहिलं. विशेष म्हणजे, हे पीक विकून चित्रपटाच्या प्रोड्यूसर्सनी पुढे पैसेही कमावले.
ख्रिस्तोफरला सीजीआय आवडत नसले, तरी तो त्यांचा वापरच करत नाही असं नाही. त्याने आपल्या कित्येक चित्रपटांमध्ये स्पेशल इफेक्ट्सचा अत्यंत सफाईदारपणे वापर केला आहे. इंटरस्टेलरच्या व्हिजुअल इफेक्ट्ससाठी नोलनने सर्वांपेक्षा वेगळी पद्धत वापरली होती. इतर सिनेमांमध्ये कलाकार अगोदर ग्रीन स्क्रीन (हिरवा पडदा)समोर सीन शूट करतात. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनच्या वेळी त्या ग्रीन स्क्रीनच्या जागी इफेक्ट्स जोडले जातात.
इंटरस्टेलरमध्ये मात्र असं न करता, व्हिजुअल इफेक्ट्सच्या टीमने आधी जे दिसणार आहे ते इफेक्ट्स तयार केले. नंतर ते डिजिटल प्रोजेक्टर्सचा वापर करुन कलाकारांच्या मागे वापरले. या चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्टचा वापर केलेले एकूण ८५० शॉट्स होते. यांपैकी १५० शॉट्स हे इन-कॅमेरा डिजिटल प्रोजेक्टर्स वापरुन शूट केले गेले. तर, ७०० शॉट्स हे पोस्ट प्रॉडक्शनच्या वेळी जोडण्यात आले होते. विशेष म्हणजे, चित्रपटात दाखवण्यात आलेली अवकाशयाने ही कम्प्युटरवर नाही, तर हाताने तयार करण्यात आली होती. थ्रीडी प्रिंटर्सचा वापर करुन तयार करण्यात आलेले मॉडेल्स यासाठी वापरले होते. पुढे डंकर्क चित्रपटामध्येही नोलनने याच तंत्राचा वापर केला होता.
१६ कोटी डॉलर्समध्ये बनलेल्या इंटरस्टेलरने जगभरात तब्बल ७० कोटी डॉलर्सची कमाई केली. यासोबतच ८७व्या ऑस्कर चित्रपट सोहळ्यामध्ये याला सर्वोत्तम व्हिजुअल इफेक्ट्सचा पुरस्कारही मिळाला. तसेच, यावर्षी बेस्ट ओरिजिनल स्कोर, बेस्ट साऊंड मिक्सिंग, बेस्ट साऊंड एडिटिंग आणि बेस्ट प्रॉडक्शन डिझाईन या कॅटेगरीजमध्ये इंटरस्टेलरला नामांकन मिळालं होतं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









