आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात म्हणजे त्याचे फायदे असतात आणि तोटे सुद्धा असतात जे की सर्वस्वी तुमच्या वापरावर अवलंबुन असतात. याच बाबतीत प्रामुख्याने मोबाईलचं उदाहरण दिलं जातं, पण आज अशाच दोन बाजू असणाऱ्या टिक-टॉक या ऑनलाइन मनोरंजन करणाऱ्या ऍपच्या दुसऱ्या चांगल्या बाजू बद्दल माहिती घेणार आहोत.
सप्टेंबर २०१६ मध्ये बाईटडान्स या कंपनीने म्युसिकली नावाने हे ऍप तयार केलं होतं, नंतर कालांतराने या ऍपचं टिक-टॉक या नावात रूपांतर झालं आणि ते अधिकाधिक प्रसिद्ध झालं. मध्ये याच्यावर बंदी सुद्धा आली पण त्यातून सुद्धा पळवाट काढणार नाही ती चिनी कंपनी कसली. या ऍप सारखेच असलेले डबस्मॅश वगैरे नावाने ऍप सुद्धा इंटरनेटवर अनेक आहेत, पण आजच्या घडीला टिकटॉक ने आपल्या सर्वांच्या मोबाईल मधली घेतलेली जागा अफाट आहे.
तर आधी आपण जाणून घेऊया की हे ऍप नेमकं काय आहे व ते कस काम करतं. टिक-टॉक या नावाने प्रसिद्ध असणार हे अप्लिकेशन तुमच्यात असणाऱ्या कलाकारासाठी एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या ऍपवर वय वर्ष १० पासून ते वय वर्ष ६० पर्यंत वापरकर्ते आहेत.
या ऍपवर युजर्स त्याच ऍप वर उपलब्ध असणारे संगीत वापरून अभिनय करत असतात तर काही लोक आपले स्वतःचे संवाद घेऊन नवनवीन व्हिडिओ तयार करत असतात. नंतर ते व्हिडिओ टिक टॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातात, मग टिक टॉकच्या अल्गोरिदमनुसार त्या व्हिडिओला लाईक्स, कंमेंट्स व तुमच्या प्रोफाइलला फॉलोअर्स मिळतात.
जसे फॉलोअर्स आणि लाईक वाढतात तसे तुम्ही त्या ऍपवरचे लोकप्रिय कलाकार होऊन जातात. व तुम्हाला त्या ऍपकडून तसा बॅच प्राप्त होतो. त्या बॅचसाठी ही टॉक टॉक वर अभिनय करणारे मंडळी त्यांच्या दृष्टीने कष्ट करत असतात.
ज्या प्रमाणे एखाद्या ओसाड जागेवर घर बांधली जाऊन तिथे लोक राहायला येतात तेव्हा तिथे दुकाने, सेवा पुरवणारे कामगार, दवाखाने व इतर गोष्टी येतात अगदी त्याच प्रमाणे टिक टॉक च्या वापरकर्त्यांची आकडेवारी पाहून व तिथे असणारे दर्शक या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सध्याच्या काळात या ऍपवर प्रचंड प्रमाणात बॉलिवूड चे सितारे, मराठीतले ब्लॉगर, किंवा मराठीतले अभिनेते व अभिनेत्री असे अनेक लोक टिक टॉक या ऍपवर आपली कला सादर करत आहेत व आपल्या दर्शकांचे मनोरंजन करत आहेत.
याकडे तरुणाईने जास्त आकर्षित होण्याच एक कारण आपल्याला अत्यंत कमी वेळात मिळणारी प्रसिद्धी हे सुद्धा म्हणता येईल. टिक टॉक वर व्हिडिओ बनवणाऱ्या कलाकारांचे आज विविध शहरात फॅन असतात, जास्तीत जास्त लोकांनी यावं म्हणून कित्येक मोठ्या कार्यक्रमात या टिक टॉकवर सेलिब्रिटी असणाऱ्या कलाकारांना बोलावलं जात.
त्यांना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुण प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. एवढेच नाही तर त्या टिक टॉक सेलिब्रिटी लोक आपल्या फॅन्स ला भेटण्यासाठी मेळावा सुद्धा आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाला शंभर सव्वाशे तरुण तरुणी उपस्थित असतात.
आता आपण वळूया टिक टॉक या ऍपच्या आर्थिक विश्वाकडे, वर म्हणल्याप्रमाणे जिथे दर्शक आले तिथे जाहिराती आल्या व या जाहिरातीमधून होणारी आर्थिक उलाढाल आली. इथे असणारे कलाकार, मॉडेल्स किंवा इथे अभिनय करणारे लोकप्रिय लोक असतील तर ही लोक एका व्हिडिओ 15 सेकंदाच्या व्हिडिओसाठी 16 हजार रुपये घेतात.
जर एक उदाहरण द्यायचे झाले तर फक्त टिकटॉक या माध्यमामुळे लोकप्रिय व प्रसिद्ध झालेल्या विष्णुप्रिया नामक तरुणीबद्दल आपण बोलूया. एक करोड पेक्षा सुद्धा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या या तरुणीला अनेक ब्रँड्स आपली जाहिरात करण्यासाठी विचारणा करत असतात. अवघ्या 22-23 वर्षाची असणारी ही तरुणी १५ सेकंदाच्या एका व्हिडिओ साठी तब्बल १६,०००/- इतके मानधन घेते. यावरून तुम्हाला या ऍपवर होणाऱ्या उलढालींची कल्पना येईल.
आजच्या घडीला आपण टिक टॉक या ऍपची तुलना आपल्या फोन मध्ये असणाऱ्या फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या ऍप सोबत केली तरी ते वावगं ठरणार नाही.
इथे तुम्ही पैसे लावून स्वतःची जाहिरात प्रकाशीत करू शकता, इथे तुम्हाला युट्युब प्रमाणे माहितीपर व्हिडिओ पाहायला मिळतील. या ऍपवर तुम्हाला एखाद्या प्रवास करण्याचा छंद असणाऱ्याने टाकलेले अदभूत निसर्गाचे व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा याच ऍपवर तुम्हाला इंग्लिश सारखी भाषा शिकवणारे व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील.
इथे सुद्धा तुम्हाला नवीन लोक भेटतील, नवीन मित्र होतील त्यामुळे हे ऍप हळूहळू इन्स्टाग्राम किंवा फेसबुक पेक्षा जास्त वेगळं नाही असं वाटायला लागेल. जे की अतिशय खरं आहे.
तुम्हाला माहिती असावी म्हणून इथे सांगतो की टिक टॉक च्या वापरकर्त्यांची असणारी संख्या पाहता, व त्या ऍप्लिकेशन बद्दल च्या इतर चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे टिक टॉक या ऍपवर प्रोफाइल आहे व त्यांच्याकडून कोरोना या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी या ऍपचा वापर केला जातो आहे.
यावरून अनेक शंका निरसनाचे व्हिडिओ प्रकाशित केले जात आहेत. तर या सगळ्या वर मांडलेल्या मुद्द्यांवरून तुम्हाला आजच्या डिजिटल विश्वात असणारी टिक टॉक या ऍपची आणखी एक बाजू लक्षात येईल…!
पण या टिक-टॉकच्या सगळ्या चांगल्या बाजू मांडत असताना मला हे सुद्धा सांगावे वाटते की या ऍपच्या वापरावर बऱ्याच देशांत बंदी असून, वापरकर्त्याचा डेटा चोरी केल्याचा आरोप सुद्धा या ऍपवर झाला आहे. या ऍपमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना सुद्धा घडल्या असून एखाद्याच अनुकरण करण्याच्या नादात मृत्यू सुद्धा झाल्याची नोंद आहे.
यात पूर्णपणे जरी नसेल तरी काही प्रमाणात टिक-टॉक नक्कीच जबाबदार आहे. टिक-टॉकचा वापर हा खूप जास्त प्रमाणात असल्याने तिथे बऱ्याच चुकीच्या गोष्टी/अफवा पसरवल्या जात असतात असं अनेकदा होत आलं आहे. पण आपण सुज्ञान नागरिक असल्याने कुठल्या गोष्टीचा कसा वापर करावा हे जाणूनच आहोत फक्त प्रत्येक गोष्टीला दुसरी चांगली बाजू सुद्धा असते एवढ्यासाठीच हा लेख…
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









