आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्यापैकी अनेकजण नाश्ता म्हणून ब्रेड, दूध आणि अंडी आवडीनं खातात. सकाळी-सकाळी उठल्यानंतर आपल्याला भूक लागलेली असते. अशा वेळी लवकरात लवकर काहीतरी हातात मिळणं गरजेचं असतं. ब्रेड, दूध आणि अंडी हा सर्वात सोपा आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय आहे. म्हणून अनेकजण याला प्राधान्य देतात. घरापासून दूर राहणारी मुलं तर त्यांच्या किचनमध्ये या तीन गोष्टी कायम ठेवतात.
टोस्टरमध्ये भाजलेले ब्रेड, त्यावर हाफ कुक्ट ऑम्लेट आणि ग्लासभर दूध हा कदाचित जगभरातील सर्वात लोकप्रिय नाश्ता असावा. मात्र, अंडी, ब्रेड आणि दूध यांचं एकत्र मिश्रण असलेल्या आणखी एक पदार्थ देखील प्रचंड लोकप्रिय आहे. तुम्हाला देखील हा खाद्यपदार्थ माहिती आहे. तुम्ही-आम्ही त्याला ‘फ्रेंच टोस्ट’ नावानं ओळखतो.
तुमच्यापैकी अनेकांनी कंगना रनौतचा ‘क्वीन’ हा चित्रपट पाहिलेला असेल. त्यात एक सीन आहे. कंगना ऍमस्टरडॅममध्ये तिच्या मैत्रिणींसाठी स्वादिष्ट नाश्ता बनवत असते. एक जण तिला विचारते ती काय बनवत आहे. तर कंगना मोठ्या अभिमानानं ‘फ्रेंच टोस्ट्स’ असं उत्तर देते. हीच गोष्ट तिच्या फ्रेंच रुममेटच्या कानावर पडते आणि ती पटकन म्हणते, हा पदार्थ आमच्या देशाचा नाही! त्यानंतर कंगना तिच्याकडे गोंधळून पाहते. कारण, कंगनाच्या मते, फ्रेंच टोस्ट फ्रान्समध्येच तयार झालेला आहे.
चित्रपटातील कंगनाप्रमाणं जगातील कितीतरी लोक गेल्या कित्येक शतकांपासून याच गैरसमजामध्ये जगत आहेत. जर तुम्ही देखील असाच विचार करत असला तर थोडं थांबा आणि हा लेख वाचा, म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती समजेल.
जगातील प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तूला आपला स्वत:चा एक इतिहास आहे. या अलिखित नियामानुसार फ्रेंच टोस्टला देखील इतिहास आहे. फ्रेंच टोस्टची पाळंमूळं शोधण्याचा प्रयत्न केला असता ती थेट रोमन साम्राज्यापर्यंत जाऊन पोहचली असल्याचं दिसतं.
फ्रेंच टोस्ट हा खाद्यपदार्थ ‘फ्रान्स’ हा देश अस्तित्वात येण्यापूर्वीच अस्तित्वात होता! रोमन साम्राज्यात हा एक लोकप्रिय पदार्थ होता. ५व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या ‘एपिसियस’ या पाककृती संग्रहाचा आधार घेतल्यास, फ्रेंच टोस्ट हा एक ‘ऍलिटर डुलसिया’ (गोड खाद्यपदार्थ) म्हणून अस्तित्वात होता. रोमन लोक दुध आणि मधाच्या मिश्रणात ब्रेड बुडवून तो तेल किंवा बटरमध्ये डीप फ्राय करून खात होते, असा संदर्भ एपिसियसमध्ये सापडतो.
काळाच्या ओघात त्यात अंड्याची देखील भर पडली आणि एक चवदार ब्रेकफास्ट डीश म्हणून या टोस्टचा वापर सुरू झाला. मध्ययुगीन काळात संपूर्ण युरोपमध्ये फ्रेंच टोस्ट खाल्ले जात होते. शिळ्या झालेल्या ब्रेडचा अपव्यय टाळण्यासाठी दूध, अंडी आणि बटरचा वापर करून फ्रेंच टोस्ट तयार करणं, ही अतिशय सामान्य बाब झाली होती.
‘फ्रेंच टोस्ट’ जगभरात अनेक नावांनी ओळखला जातो. स्पॅनिश टोस्ट, जर्मन टोस्ट, नन्स टोस्ट, एगी ब्रेड, टोरिगा, पूअर नाईट्स ऑफ विंडसर, बॉम्बे टोस्ट अशी कितीतरी नावं या फ्रेंच टोस्टला मिळालेली आहेत.
फ्रान्समध्ये या डिशला ‘पेन पेअरडू’ किंवा ‘लॉस्ट ब्रेड’ म्हणून ओळखलं जातं होतं. या विचित्र नावामागे देखील एक गोष्ट आहे. पूर्वीच्या अनेकदा अन्न धान्याचा तुटवडा जाणवत असे. त्यामुळं लोक खाण्यापिण्याच्या वस्तूंचा अतिशय जपून वापर करत. काहीही वाया जाणार नाही याकडे अगदी कटाक्षानं लक्ष दिलं जाई. अगदी शिळा झालेला ब्रेड सुद्धा कसा वापरात आणला जाईल, याचे विविध मार्ग शोधले गेले. त्यातूनच पेन पेअरडूची रेसिपी समोर आली.
पारंपरिक फ्रेंच पेन पेअरडू रेसिपीमध्ये फक्त ब्रेड, अंडी, दूध, थोडीशी साखर आणि तळण्यासाठी लोणी यांचा समावेश केला जातो. परंतु, आधुनिक काळात त्यात अनेक गोष्टी टॉपिंग्ज म्हणून वापरतात. आता मेपल सिरप, जाम, मध, पीनट बटर, व्हीप्ड क्रीम, फळं, दही, आइस्क्रीम, नट किंवा बेकन यांचा देखील त्यामध्ये समावेश केला जातो. ब्रेड देखील वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात.
वसहतीकरणाच्या काळात युरोपीयन देशांतील अनेक गोष्टी जगभरात पसरल्या गेल्या. याच काळात फ्रेंचमधील पेन पेअरडूची क्रेझ इंग्लंडमध्ये गेली आणि सोळाव्या व सतराव्या शतकामध्ये या डिशला तिथे ‘फ्रेंच टोस्ट’ म्हणून लोकप्रियता मिळाली. वसाहतीकरणामुळं हा फ्रेंच टोस्ट इंग्लंडपासून अमेरिकेपर्यंत लोकप्रियता झाला.
एका लोकप्रिय आख्यायिकेनुसार, फ्रेंच टोस्टची निर्मिती न्यूयॉर्कच्या अल्बानीमध्ये करण्यात आली होती. जोसेफ फ्रेंच नावाच्या एका खाणावळी मालकानं १७२४ मध्ये गोल्डन ब्राऊन ट्रीटची एक लादी तयारी केली होती आणि त्याला फ्रेंच टोस्ट असं नाव दिलं. मात्र, इतिहासकारांनी ही गोष्ट नाकारली आहे. जर्मनीमध्ये फ्रेंच टोस्टला ‘पुअर नाईट्स’ या नावानं ओळखलं जात होतं. जर्मनीमध्ये १४व्या शतकात या पदार्थाचा प्रसार झाल्याचं सांगितलं जातं.
फ्रेंच टोस्टचं नाव आणि त्याच्या उगमाबद्दलचा गोंधळ कायम असला तरी बहुतांशी इतिहासकारांच्या मते, रोमन साम्राज्यापासून त्याची सुरुवात झालेली आहे. युरोपातून जगप्रसिद्ध झालेला आणि ‘फ्रेंच’ या शब्दाचा समावेश असलेला हा पदार्थ सध्याच्या घडीला युरोप व फ्रान्सपेक्षा अमेरिकेत जास्त प्रसिद्ध आहे. त्याठिकाणी दरवर्षी २८ नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय फ्रेंच टोस्ट दिवस’ साजरा केला जातो.
कधी काळी अन्नधान्याचा तुटवडा असलेल्या गरीब घरांमध्ये खाल्ला जाणारा हा टोस्ट आता उच्चभ्रू लोकांच्या ताटात जाऊन बसला आहे. कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असलेल्या अनेक धनाढ्यांच्या दिवसाची सुरुवातच या फ्रेंच टोस्टपासून होते. आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये तर साउथ ग्रेट जॉर्ज स्ट्रीटवरील सॅन लोरेन्झो कॅफेमध्ये वीकेंड ब्रंचसाठी कोको पॉप्स फ्रेंच टोस्ट घेण्यासाठी लोक अक्षरश: रांगा लावून उभे राहतात. कॅरेमेलाइज्ड केळी, पीनट बटर, मस्करपोन व्हीप्ड क्रीम आणि बेल्जियन चॉकलेट सॉसचा वापर करून तयार केलेला कोको पॉप्स फ्रेंच टोस्ट त्याठिकाणी अतिशय लोकप्रिय आहे.
ब्रिटीश, फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या वसाहतीकरणाच्या काळात भारतानं देखील अनेक परकिय गोष्टी स्वीकारल्या आहेत. त्यामध्ये या फ्रेंच टोस्टचा देखील समावेश होतो. चेन्नई आणि गोव्यातील काही जुन्या बेकरी आणि रेस्टॉरंट्समध्ये एकदम चविष्ट फ्रेंच टोस्टची चव चाखायला मिळते. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळालेला हा कदाचित एकमेव खाद्यपदार्थ असावा.
तर ही होती आपल्यापैकी अनेकांच्या आवडत्या ब्रेकफास्ट डिशची कहाणी. तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










