आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लिओनार्डो दा विंची या अवलियाने काढलेलं एक जगप्रसिद्ध पेंटिंग. अनेक कला शास्त्रज्ञांनी या चित्राचा अभ्यास केला. या चित्रातील स्मितहास्य करणारी ही महिला कोण आहे? तिच्या हास्याचे रहस्य काय? या चित्राची किंमत काय असेल? हे प्रश्न सगळ्यांनाच पडतात.
हे चित्र सध्या पॅरीसच्या द लुव्हर म्युझियममध्ये ठेवले आहे. दरवर्षी जवळपास एक कोटी लोक हे चित्र बघायला इथे येतात.
आता हे एवढं प्रसिद्ध, किंमती चित्र आपल्याकडे असावं हा मोह कोणालाही होणारच. असाच मोह एकाला झाला होता. तब्बल ११० वर्षांपूर्वी मोना लिसा चोरीला गेली होती. या चोरीनेच मोना लिसाला प्रसिद्धी मिळवून असं म्हणतात.
२१ ऑगस्ट १९११. मोना लिसाची नेहमीची जागा रिकामी होती. हे चित्र कोणी चोरलं? कधी चोरलं? याबद्दल कोणालाच कसलीच माहिती नव्हती. त्याकाळात तर हे चित्र फारसं कोणाला माहितीसुद्धा नव्हतं.
तेव्हा म्युझिअममधल्या सगळ्या पेंटिंग्जचं फोटोशूट सुरु होतं. असं म्हणतात की त्या फोटोग्राफरनेच हे पेंटिंग नेलं होतं. आश्चर्य म्हणजे म्युझिअमच्या स्टाफपैकी कोणालाच पेंटीग चोरीला जाऊन पार २४ तास उलटून गेले तरीही याची खबर नव्हती.
जेव्हा ही बातमी बाहेर पडली तेव्हा साहजिकच सगळ्या वृत्तपत्रांनी म्युझिअम प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. फ्रेंच सरकारकडे या म्युझिअमची जबाबदारी होती. त्यांच्या एकूणच कामावर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
सरकारने हे पेंटिंग शोधण्यासाठी शक्य तेवढी सगळी फोर्स कामाला लावली. एकूण ६० गुप्तहेरांची टीम हे चित्र शोधण्यासाठी नेमण्यात आली होती. आता तुम्ही म्हणाल की एवढे लोक चित्र शोधायला असल्यावर चित्र लवकर सापडलं असेल. पण ज्या कोणी हे पेटिंग चोरलं होतं तो फारच हुशार होता. त्याने या गुप्तहेरांची उत्तमप्रकारे दिशाभूल केली होती.
मग हे चित्र कोणी चोरलं?
यात सगळ्यात पहिला संशयीत होता कैसर विलियम. जर्मनीचा शेवटचा सम्राट. पहिल्या महायु*द्धाच्या आधी काहीतरी करून त्याला फ्रांससोबत भांडण उकरून काढायचं होतं. अशावेळी हे चित्र चोरून फ्रेंच सरकार अस्थिर करण्याचा विचार त्यानी केला असेल असं वाटणं स्वाभाविक आहे.
पण पोलीस तपासणीत हे उघड झालं की कैसरचा यात काहीही हात नव्हता.
दुसरा प्रसिद्ध संशयित होता. पाब्लो पिकासो. असं म्हणतात की लिओनार्डोला या चित्रामुळे मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे पिकासो त्याच्यावर जळत होता. याच कारणामुळे त्याने म्युझिअममधून मोना लिसाचं चित्र चोरलं. पण अर्थातच, त्याच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
म्युझिअमच्या स्टाफपैकीच कोणीतरी हे पेंटिंग चोरल्याचं उघडकीस आलं.
विन्शेंझो पेरुजीया या माणसाने हे चित्र चोरल्याचं पुढे आलं. विन्शेंझो म्युझिअमच्या देखरेखीचं काम करायचा. एक दिवस त्याने हे चित्र चोरून आपल्या मायदेशी इटलीला नेऊन तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्याकाळी म्युझिअममध्ये फार लोक कामाला नव्हते आणि अलार्म वगैरेची भानगडही नव्हती त्यामुळे विन्शेंझोला पेंटिंग चोरणं फार सोपं गेलं. त्याने अगदी सहज कोणी तिथे नाही हे बघून पेंटिंग उचललं आपल्या जॅकेटमध्ये लपवलं आणि चालायला लागला. इतकंच काय त्याच्याकडून बाहेर पडण्याचा दरवाजा उघडत नव्हता तेव्हा एका चौकीदाराने त्याला मदतही केली पण हा चित्र चोरून नेतोय हे त्याच्या लक्षातही आलं नाही.
त्याने हे पेंटिंग लगेच विकलं नाही. काही दिवस स्वतःच्या घरीच ठेवलं. रोज त्या पेंटिंगकडे बघून त्याला आत्मिक समाधान मिळायचं. तो त्या पेंटिंगच्या प्रेमात पडला आणि एक वेळ असाही विचार आला की आपण स्वतःकडेच ठेऊन घेऊ. पण त्याला आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करायचं होतं.
तब्बल दोन वर्षांनी जेव्हा त्याला वाटलं की या चोरीबद्दल सगळे विसरले असतील तेव्हा तो पेंटिंग विकायला एका इटालियन माणसाकडे गेला. पेंटिंग आणि त्याच्यावरचा स्टँप बघताच त्या डीलरच्या लक्षात आलं की हे ओरिजिनल पेंटिंग आहे.
त्याने विन्शेंझोला भरपूर पैसे मिळतील या आशेवर लटकवून शहर सोडू नको म्हणून सांगितलं. आपल्याला पैसे मिळतील आणि पेंटिंग आपल्या मायदेशाची शान वाढवेल असे स्वप्न बघत असतानाच त्याच्या घरावर पोलिसांची धाड पडली. ज्या हातात पैसे येण्याची तो वाट बघत होता त्याच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या.
काही दिवस इटलीच्या म्युझिअममध्ये हे पेंटिंग ठेवल्यानंतर ते पुन्हा एकदा लुव्हरमध्ये आणलं गेलं. विन्शेंझोला पैसे तर नाही मिळाले ना ते पेंटिंग इटलीमध्ये राहिलं, पण या चोरीने मोना लिसाला जगप्रसिद्ध केलं.
हा किस्सा घडून गेल्यावर मात्र लूव्हर वाल्यांनी कानाला खडा लावला. आपला स्टाफ वाढवला. म्युझिअमची सुरक्षा वाढवली. अलार्म सिस्टिम बसवून घेतली जेणेकरून पुन्हा असा प्रसंग ओढवणार नाही.
यामुळेच आज मोना लिसा लूव्हर म्युझिअममध्ये एका बुलेटप्रुफ काचेच्या आत एकदम सुरक्षित आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








